अप्रैल 7, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

२०२० मध्ये कुठे चालता याकडे लक्ष द्या स्कॉट हबर्ड

ख्रिस्ती जीवन हे जोराने धावण्याची छोटी शर्यत नाही. तो दहा कोटी पावलांचा प्रवास आहे.

पापाच्या ओझ्यापासून दूर होत येशूच्या मागे जीवनाच्या मार्गात जात असताना  दिवसांमागून दिवस, वर्षांमागून वर्षे आपण एका पावलापुढे दुसरे पाउल टाकत असतो. स्वत:चा त्याग करून प्रीतीकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मूर्खपणापासून सुज्ञतेकडे. एक एक पाउल – दहा कोटी वेळा.

पण वेळोवेळी आपण थांबून पुढे मागे लक्षपूर्वक पाहिले नाही तर आपली पावले देवाच्या मार्गातून सरकून दुसऱ्या मार्गात अडखळतील. दूरवर भटकंती करताना आपले होकायंत्र न पाहणाऱ्या मनुष्याप्रमाणे आपण सुरुवातीला योग्य दिशेने जाऊ आणि शेवटी पोचण्याच्या ठिकाणापासून कित्येक मैल दूर गेलेले असू. हळूहळू, आपोआप आणि कदाचित नकळत आपण जीवनाकडे जाणारा अरुंद, कठीण मार्ग सोडून रुंद, सोप्या अशा नाशाच्या मार्गाला लागू (मत्तय ७:१३-१४).

नवे वर्ष हा मार्ग सुधारण्याचा वेळ आहे – आपला नकाशा बाहेर काढून, होकायंत्र पाहत “अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला” (इफिस ५:१५) या पौलाच्या आज्ञेकडे लक्ष देण्याची वेळ आहे.

इफिसकरांस पत्रामध्ये पौल आपल्या वाचकांना पाच वेळा – चांगली कृत्ये करत, पाचारणास योग्य, प्रीतीमध्ये, प्रकाशामध्ये , शहाणपणामध्ये –  “चाला” अशी आज्ञा करतो.  यावेळी आपण त्यातल्या तीन ‘चाला’ या आज्ञांकडे लक्ष देताना पुढे मागे पाहू या. मार्गातून कोठे तुम्ही बाहेर पडला? देवाच्या मदतीने तुम्ही येशूच्या मागे या कठीण पण आनंदमय मार्गात जाताना या वर्षी कोणती पावले उचलाल?

प्रीतीमध्ये चाला

“ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला” (इफिस ५:२).

येशूसाठी प्रीती म्हणजे हातापायात खिळे ठोकले जाणे व कुशीत भाला भोसकणे होते. प्रीती म्हणजे क्रूसावर चढून स्वत:चे अर्पण करणे होते. त्याच्यासाठी प्रीती म्हणजे अडचणी, दु:ख आणि एक असह्य मरण होते. याच प्रीतीने आपल्या मृत शरीरात जीवनाचा श्वास घातला (इफिस २:४-५). ही प्रीती आकाशगंगापेक्षा अफाट, उंच, खोल आणि मोठी आहे (इफिस ३:१८-१९). ही प्रीती आमच्या जिवात्म्याचा प्रत्येक डाग धुवून टाकते (इफिस ५:२५-२७); अशी प्रीती की देव तिचे अनुकरण करण्याची आज्ञा देतो – जरी आपली सर्वोच्च प्रीती त्याच्या संगीताच्या निनादापुढे कुजबुज असल्यासारखी वाटेल.

म्हणून प्रीतीमध्ये चाला – दुसऱ्यांना उचलण्यासाठी खाली जा. एकाकी जनांबरोबर वेळ घालवा. ओझे उचलण्यासाठी तुमचे शरीर वाकवा. गरजा मिटवण्यासाठी मार्ग धुंडाळा. दु:ख भोगत असलेल्यांसोबत वेळ घालवा. दुर्लक्षित असलेल्यांवर लक्ष केंद्रित करा.  अर्थातच अशा प्रीतीसाठी आपल्याला किंमत द्यावी लागेल. आपल्याला बराच वेळा आराम आणि सुखसोयी गमवाव्या लागतील. पण या प्रीतीच्या वाटेवर जे काही तुम्ही गमवाल त्याची परतफेड कशी करायची हे येशूला ठाऊक आहे. तुम्हांला माहीत आहे की, “प्रत्येक जण…जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल” ( इफिस ६:८). प्रीतीमध्ये स्वत: खाली जा आणि ख्रिस्त स्वत: तुम्हाला उंच करील. या वर्षी प्रीतीमध्ये चाला.

प्रकाशामध्ये चाला

“पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला” (इफिस ५:८).

जेव्हा ख्रिस्ताच्या प्रकाशाचा तुमच्या जीवनात उदय झाला आणि तुमची कायमची मध्यरात्र त्याने विखरून टाकली; तेव्हा तो तुमच्यावर प्रकाशित झाला यासाठी की या प्रकाशाने तुमच्यामध्ये आपले घर करावे. प्रकाशाच्या देवाने तुम्हाला प्रकाशाचे मूल बनवले आहे – ख्रिस्ताच्या सूर्याने पेटली गेलेली एक छोटी मेणबत्ती.  म्हणून प्रकाशात चाला. तुमच्या जिवावरील सावल्या दूर करा. तुमच्या जिभेला इतरांना इजा करण्याऐवजी बरे करणारे शब्द वापरण्याची सवय लावा. लैंगिक अनीतीला बळी न जाता शुद्धतेचा खोल आनंद लुटा. देवाने तुम्हाला जे दिले नाही त्याचीच उजळणी न करता त्याने तुम्हाला जे दिले आहे त्याबद्दल त्याला कृतज्ञ असा  “प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते” (इफिस ५:९) त्यासाठी आस बाळगा.

या वर्षी तुम्ही प्रकाशाच्या मार्गात चालू शकता कारण तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहातच. तुमची काळी आवृत्ती येशूबरोबर त्याच्या वधस्तंभावर मरण पावली, तिला येशूसमवेत कबरेत पुरले गेले – आणि ती परत कधीच उठणार नाही. जरी तुम्हाला सध्या मिणमिणत्या वातेसारखे वाटत असले तरी जर तुम्ही ख्रिस्तामध्ये असाल तर तुम्ही करायची गोष्ट म्हणजे,  “आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशत राहा” (मत्तय १३:४३). जेव्हा तुम्ही तुमच्या सावलीतून बाहेर पडाल आणि जो काही अंधार तुम्हाला धरून आहे त्याबद्दल देवाकडे आणि इतरांकडे पश्चात्ताप कराल आणि देवाच्या वचनाचा प्रकाश त्यावर पडू द्याल तरच तुमच्यामध्ये हे रूपांतर घडून येईल. ह्या वर्षी प्रकाशात चाला.

सुज्ञतेमध्ये चाला

“अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत” (इफिस ५:१५-१६).

या जगातला प्रत्येक मार्ग शत्रूच्या परसदारातून जातो. आपण अजून नवे आकाश आणि नवी पृथ्वीच्या संरक्षणात चालत नाही. आपण या “दुष्टयुगात” चालत आहोत (गलती १:४). ज्या युगात सैतान आपले जळते बाण सर्व पृथ्वीवर सोडत आहे, निष्काळजी वाटसरूला त्याचे चाणाक्ष डोळे शोधत आहेत (इफिस ६:१६). आपल्या जीवनाच्या प्रत्येक विभागात आपण कसे चालतो यासाठी देवाची सुज्ञता जर आपण वापरत नाही तर तो मार्ग आपल्यासाठी आखण्यात सैतानाला आनंद आहे.

म्हणून सुज्ञतेत चाला. सैतानाच्या हातातून तुमचे दिवस वाचवा. तुमच्या जीवनातील प्रत्येक संधी कवटाळून धरा आणि ती देवाच्या दिशेकडे वळवा. तुमच्या वैवाहिक जीवनासाठी या वर्षी योजना करा. तुमच्या पालकत्वासाठी विशेष कष्ट घ्या. तुमची ज्यांच्याशी मैत्री आहे त्या मैत्रीचा अजमास घ्या. या प्रत्येक जीवनाच्या विभागात (आणि इतर) प्रश्न विचारा या माझ्या जीवनाच्या विभागात मी ख्रिस्त मोलवान आहे, शुभवर्तमान समर्थ आहे, पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे आणि अनंतकाल जवळ येत आहे हे कसे दाखवीन?

सैतानाची तुमच्यावरची भुरळ देवाने मोडून टाकली आहे. त्याने तुम्हाला त्याचे बाण विझवण्यासाठी ढाल दिलेली आहे आणि चालवायला तलवार दिली आहे (इफिस ६:१६-१७). हे दिवस दुष्ट असतील पण तुम्हाला तसे व्हायचे नाही – तुमच्या जीवनातील कुठलाच विभाग तसा व्हायला नको. काळजीपूर्वक लक्ष देत आणि पवित्र आत्म्याच्या मदतीने तुम्ही या दुष्ट दिवसांचा उत्तम उपयोग करू शकता. या वर्षी सुज्ञतेत चाला.

देवाची आनंदनगरी

लवकरच एके दिवशी तुम्ही कसे चालत आहत हे काळजीपूर्वक पाहण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. तुमच्या पुनरुत्थित शरीराच्या धमन्यांतून परिपूर्ण प्रीती वाहू लागेल. तुमच्या प्रत्येक विचारातून, शब्दातून, कृतीतून, देवाच्या नीतिमत्तेचा प्रकाश चमकू लागेल. तुमच्या आमरण खांद्यावर स्पष्ट सुज्ञता विराजमान होईल.

त्या दिवसापर्यंत २०२० हे आणखी एक वर्ष “सभोवार नजर ठेवून जपून चालण्यासाठी” आहे (इफिस ५:१५). प्रीतीमध्ये चाला – इतरांना उंचावण्यासाठी खाली जा. प्रकाशामध्ये चाला- तुमच्या जिवावरच्या सावल्या दूर करा. आणि सुज्ञतेत चाला – सैतानाच्या हातातून तुमचे दिवस वाचवा. हे तीन रस्ते देवाच्या आनंदनगरीकडे जातात. येथे आपला दहा कोटी पावलांचा प्रवास अखेरीस संपेल.

Previous Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर  

Next Article

स्वत:ची सुधारणूक किती ख्रिस्ती आहे? मार्शल सीगल

You might be interested in …

मुलांच्या जीवनात संपूर्ण बायबल कसे आणावे? 

जिमी नीडहॅम   दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने एक ब्लॉग वाचला. एक आई आपल्या मुलांसोबत दररोज बायबलचा एक अध्याय वाचत होती. छोट्या मुलांसाठीच्या बायबलमधून नाही तर बायबल मधून. ते अगदी लहान असताना तिने सुरुवात केली आणि […]

देव त्याचे वैभव उघड करतो

डेव्हिड मॅथीस बेथलेहेम हे आपण  एक योग्य शहर असल्याचे दाखवणार होते.पुरातन इस्राएलला या वचनदत्त जन्मासाठी याहून चांगले ठिकाण नव्हते. – हा राजकीय वारस एका क्षुल्लक खेड्यात वाढणार होता पण राजधानीत मरण्यासाठी तो आला होता. बेथलेहेम […]

नातेसंबंधातील बहुतेक संघर्ष कसे सोडवावेत

लेखक:  जॉन ब्लूम   आपल्यामधला आनंद हिरावून घेणाऱ्या, भावनांवर हक्क दाखवणाऱ्या, मन विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागेल नातेसंबंधातील संघर्षांचा. नातेसंबंधातील संघर्षाइतका गोंधळ घालणारे व नाश घडवणारे दुसरे काही नसते. आणि यातले कितीतरी आपण टाळू […]