दिसम्बर 12, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

प्रकरण ९
मिसरातील भयानक तडाखे (उत्पत्ती ३७-४५)

 

उत्पत्ती ३७ मध्ये योसेफाची स्वप्ने सुरू होतात आणि पुढच्या १२ अध्यायांमध्ये तो ती जगतो.

फोलोपांना योसेफाची गोष्ट फारच प्रिय आहे. ते भाषांतर चालू असता मंडळीत व गावभर तोच विषय चालू होता.

अगदी त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. बापाचा तो लाडका होता तर भावंडांनी त्याला तुच्छ लेखले होते. स्वप्ने तर भावी वैभवाची पाहिली होती पण दरम्यानच्या काळात खोटे आरोप होऊन तो धिक्कारला गेला होता. तरीही संपूर्ण हयातीत त्याचे शील निष्कलंक होते व अखेरपर्यंत त्याचा देवावर भरवसा होता.

हेपल इसा व मी भाषांतर सत्राला जाऊन आलो आणि पहिले लिखाण बाजूला सारून पुन्हा नव्याने त्यावर काम करू लागलो. आणखी दहा लोक आम्हाला येऊन मिळाले. वेळोवेळी आणखी लोक सामील होत राहिले. पदोपदी आम्ही वचनाची फोड करायला वेळ घेत होतो. बायबलची व फोलोपाची संस्कृतीं व व्याकरण जाणून घेत होतो.जरी आमचा वेग कमी असला तरी प्रत्येक शास्त्रभागावर  चर्चा केल्याने खोल अर्थ समजल्याच्या समाधानाने व आश्चर्याने नतमस्तक होत होतो.

भावांनी खाड्यात टाकल्याने योसेफाला तडाखा बसला. जे काही त्याने केले त्यात त्याला तडाखाच बसत गेला.

लाडका पुत्र म्हणून वावरल्यानंतर आता त्याची जरी दयनीय अवस्था झाली असली तरी जे काही त्याला सामोरे येईल त्या प्रसंगात तो विश्वासूच राहिला. तो उत्तम गुलाम म्हणून सादर झाला. तो चलाख, शीघ्रबुद्धीचा, शिस्तीचा, उपजत नेता होता. त्याने नवी भाषा आत्मसात केली. हिशोब, अर्थव्यवस्था व लोक हाताळले. याखेरीज तो तरूण, देखणा व बांधेसूद होता. त्याने ‘बेटे’ मूळारंभ केला……

फारोचा अमलदार, पोटीफर याने घरकामासाठी या गुलामाला आपल्या घरी ठेऊन घेतले आणि सुवेळी योसेफ त्याचे घरदार, शेतीपोती, गुलाम, नोकरचाकर , पैसापाणी, या सगळ्यावरचा नायक झाला. पोटीफर व त्याची पत्नी फक्त आयते अन्न खात होते.

पोटीफराची पत्नीच त्याला समस्या होती. सतत नवरा बाहेर; घरात काही कामधाम नाही, सतत रिकामटेकडी. मग नट्टापट्टा करून घरभर मिरवायचे, एवढेच काम. तो इब्री गुलाम तिला दररोज अधिकच देखणा दिसू लागला.

रोज गोष्ट रंगतदार होत चालली. आम्ही भाषांतर केले:

“योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. यानंतर असे झाले की, योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेऊन त्याला म्हणाली, माझ्यापाशी नीज” (उत्पत्ती ३९:६,७) “हे असे कसे?” लोकांनी मध्येच विचारले.

“ती काय म्हणाली माहीत आहे का?  माझ्याबरोबर बिछान्यात झोपायला चल.”

ते पार गोंधळलेले दिसले. मी फोलोपात त्यांना आणखी स्पष्ट करून सांगितले: “तिला त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवायला हवा होता.”

“असे होय; पण आम्ही असे नाही म्हणत.”

“मग तुम्ही कसे म्हणता ?”

“आम्ही म्हणतो ए सासेपे; म्हणजे मला दे.”

तसे लिहून आम्ही पुढे काम सुरू केले.

ती म्हणाली “मला दे.”  रोजच ती असे बोलत असता तो तिला द्यायला किंवा तिच्या जवळही जायला नकार देत राहिला. पुढचे वचन:

“एक दिवशी असे झाले की तो आपले काही कामकाज करण्यास घरात गेला, त्यावेळी घरातल्या माणसांपैकी कोणीही मनुष्य तेथे घरात नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नीज; पण तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून गेला.” (उत्पत्ती ३९:११-१२). टेबलापाशी बसलेली प्रत्येक व्यक्ती योसेफाचे नैतिक सामर्थ्य पाहून भारावून गेली. नक्कीच त्यालाही सर्वांसारख्याच वासना होत्या, तो तरुण होता, एकटा होता, आतापर्यंत खूप काही सहन केले होते. मग खाजगीत केलेले काहीही कोणाला समजणार होते? तरीही खाजगी जागेविषयी आमची चर्चा अडली. पापूआ संस्कृतीत घरे छोटी व कुटुंब मोठी असल्याने लैंगिक संबंध बागेत चालत असत. झुडुपांचा आडोसाच काय तो खाजगीची जागा असे. त्यामुळे पोटीफरची पत्नी योसेफाला घरात बोलवीत असता तो बाहेर बागेच्या दिशेने पळाला म्हटल्यावर त्यांच्याकडे तसे नसल्याने गोष्ट उलटीच झाली म्हणावे लागेल. मग आम्ही पुढचे भाषांतर केले.

“ते वस्त्र आपल्या हाती सोडून तो बाहेर पळाला असे तिने पाहिले, तेव्हा तिने घरातल्या माणसांना बोलावून सांगितले, पाहा, आमची अब्रू घेण्यासाठी त्यांनी हा इब्री मनुष्य घरात आणला आहे; तो मजपाशी निजण्याच्या हेतूने माझ्याजवळ आला तेव्हा मी मोठ्याने ओरडले. मी मोठ्याने ओरडले हे पाहून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला’ (उत्पत्ती ३९: १३-१५). शेवटचा भाग वाचून होईपर्यंत बायबल खोलीतील प्रत्येक जण आपल्या खुर्चीत सरसावून बसला होता. आता ते एकसाथ ओरडले, “ही लबाडी आहे.” मुठी आवळल्या गेल्या होत्या, घशाच्या शिरा फुगल्या होत्या, ते दातओठ खात होते. हे तर कटकारस्थान होते. अशा सरळ, नीतिमान, निष्कलंक मनुष्याला एखादी ‘वाईट’ बाई  इतकी दुष्टाईची वागणूक कशी देऊ शकते?  मग पोटीफर घरी आल्यावर आणखीनच परिस्थिती चिघळली. त्याने तर तिच्यावरच विश्वास ठेवला. त्याने योसेफावरच आग पाखडली; आणि फोलोपा त्याच्या बायकोवर आग पाखडू लागले व सर्व अन्यायाचे खापर तिच्यावरच फोडू लागले. पण योसेफाला तुरुंगात पाठवत असता त्याची कोणीही बाजू घेतल्याची नोंद नाही.

हे फोलोपा कधी योसेफ तुरुंगातून बाहेर पडतो आणि संपूर्ण मिसराचा मुख्यमंत्री होतो ते पाहायला रोज हजर होत होते. वरवर हे सर्व घडत असले तरी या मनुष्याला मुळारंभ ‘बेटे’ होता. देव सर्व घटकांचा सूत्रधार होता; आणि त्याने दाखवून दिले होते की आतापर्यंतच्या सर्व घटनांवर त्याचे नियंत्रण होते. आम्ही भाषांतर संपवल्यावर आमचे लिखाण तपासून पाहायला दुसरा गट आला. सर्व स्पष्ट समजायला यापूर्वी  भाषांतर करताना घडलेला वृत्तांत त्यांना ठाऊक नव्हता. ते मोठ्याने वाचून तपासत होते व कॅरल लगेच टाइप करत होती.

योसेफाच्या जीवनाचा फोलोपांवर खोल परिणाम झाला होता.

त्याच्यावर खोटा आरोप करण्यात आला होता, तुरुंगवास घडला होता, कितीही वाईट परिस्थिती आली तरी तो

वरवरच चढत होता. तो स्वप्नदर्शी होता. फोलोपांसाठी स्वप्ने फार महत्त्वाची असतात. त्याच्या भावांनी त्याच्यावर अत्याचार केला होता. फोलोपांच्या कथांमध्ये भावंडामधील नातेसंबंध नेहमीच विस्ताराने मांडले जातात. त्या भावंडांचे गुप्त कारस्थान, फसवेगिरी, योसेफ तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याचे उच्चपदी चढणे त्यांच्यासाठी उत्तम चर्वण होते.

योसेफ त्यांना आपली ओळखत देत नव्हता. बन्यामिनाला आणल्याखेरीज धान्य मिळणार नाही ही योसेफाची अट आणि त्याला आणल्यावर त्याच्याशी योसेफाने केलेली तुरुंगवासाची खेळी; हा तर भावांना जोरदार तडाखा होता. हे फोलोपांना फारच परिचित वाटले. अखेर केव्हातरी केलेल्या आपल्या पापाचे न्याय्य प्रायश्चित्त  आपण भोगत आहोत याची भावांना जाणीव होत होती… अजून त्याच भावासमोर आपण उभे आहोत याची त्यांना कल्पना नव्हती. त्या भावांना जसा पापाचा भार जाणवत होता, तसेच या फोलोपांना वाटत होते. आपण शिक्षेला पात्र असल्याची जाणीव सर्वसाधारणपणे फोलोपांमध्ये तीव्र असते. निरपराध रक्त पाडण्याबद्दल त्यांना अपराधी वाटत होते आणि आता ते रक्त त्यांची भेट घ्यायला येत होते. हे असे फोलोपांना वाटत असते.

फोलोपा संस्कृती बरीचशी जुन्या कराराच्या संस्कृतीशी सादृश आहे. त्यांच्यातही पितापुत्र संबंध व विशेषकरून धाकट्या पुत्राशी घट्ट संबंध असतात. ‘दुधतुट्या मुलाचे संबंध’ असे फोलोपा त्याचे वर्णन करतात. अशा बन्यामिनाच्या तुरुंगवासाच्या बातमीने बाप शोकाने घायाळच होणार होता. यहूदा त्याच्या संरक्षणाची बापाला हमी देतो.  भाषांतर बरोबर झालंय का पाहायला आम्ही पुढचे वाचू लागलो.

“तर आपला दास माझा बाप याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला तर, या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्यामुळे मुलगा नाही हे पाहून तो तत्काळ प्राण सोडील. अशाने आपल्या या दासाच्या पायी आपला दास आमचा बाप याला दु:खी करून त्याचे पिकलेले केस आम्हीच अधोलोकी उतरले असे होईल. माझ्या बापापाशी या मुलाबद्दल मी जामीन झालो आहे. मी म्हणालो की मी यास आपणाकडे परत न आणले तर मी आपला निरंतरचा दोषी ठरेन. तर आता मी विनंती करतो की या मुलाऐवजी या आपल्या दासास स्वामींनी गुलाम ठेवावे आणि या मुलास त्याच्या भावांबरोबर जाऊ द्यावे. कारण हा मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापास दु:ख होईल ते मला पाहावणार नाही” (उत्पत्ती ४४: ३०-३४). त्यांना वचने समजली का याचा मी अंदाज घेऊ लागलो. सगळे मूक होते. तोंडे काळवंडलेली होती. छाती जोरात खालीवर होत होती. एकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत असलेले मला आढळले. पुढे मी वाचू लागलो. योसेफाला गहिवर आवरेना. त्यालाही बाप व धाकट्या मुलातील घट्ट संबंध माहीत होते. त्याला घरी काय होईल याची कल्पना होती. खरोखरच बाप प्राण सोडेल. पण धाकट्या भावाबदली हा मोठा भाऊ त्याची शिक्षा घ्यायला तयार होता. ही त्याची प्रीती व एकनिष्ठेने केलेली विनवणी पाहून योसेफाला रडूच कोसळले आणि आपल्या खोलीत जाऊन तो मोठ्याने रडला व मग बाहेर येऊन त्याने आपल्या भावांना आपली ओळख दिली.

येथवर कॅरलनेही शेवटच्या पानाचे टायपिंग संपवले. आता सुट्टीची वेळ झाली होती. मी सर्वांसाठी चहा- ब्रेड आणली. तरीही जणू स्मशान शांतता होती. टाइपरायटर खेरीज कशाचाच आवाज नव्हता. ते कॅरलभोवती जमून टाइप केलेले शब्द हळूहळू वाचू लागले. योसेफाने सांगितले की त्याने भावांना ओळखले होते त्यांचे पाप आठवले होते. पण तो बदला घेणार नव्हता. त्याच्या लक्षात आले होते की त्यांच्या गरजेच्या वेळी देव त्यांच्यासाठी त्याचा वापर करून घेत होता. या क्षणी एका वडील बंधूने माझ्याकडे दृष्टी लावून आपल्या घशावर हात ठेऊन म्हटले “हे स्वादिष्ट बोल आमचे प्राण कंठाशी आणीत आहेत.” त्याने कागद उचलून वचन वाचले.

“तुम्ही मला या देशात विकून टाकले याबद्दल आता दु:ख करू नका, आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले” (उत्पत्ती ४५:५).

सर्वांकडे चौफेर नजर टाकल्यावर बाहेर नजर स्थिरावून तो सावकाश बोलू लागला, “ज्या भावाला त्यांनी सर्वाधिक दुखावले, तो हे म्हणत आहे. त्यांचा नाश करण्याचा त्याच्या हाती अधिकार असताना हे म्हणत आहे. तरी असे न करता तो त्यांचे प्राण वाचवणारा झाला. येथे मोठा मूळारंभ ‘बेटे’ आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Previous Article

संघर्षला तोंड देताना जॉश स्क्वायर्स

Next Article

आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील जॉन पायपर

You might be interested in …

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर   अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण २२ एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे […]

मी असले कृत्य करणार नाही

मार्शल सीगल लैंगिक वासनांशी युद्ध हे इंटरनेटवरची विधाने वाचून किंवा एखाद्या मित्राशी जबाबदार राहून जिंकले जात नाही. तर आत्म्याद्वारे होणाऱ्या जाणीवेने निर्माण होणाऱ्या नव्या भावना आणि इच्छा यांद्वारे जिंकले जाते. विधाने व मित्र या लढ्यात […]