नवम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

पुनरुत्थानदिन दहा प्रकारे सर्व काही बदलतो

जॉन पायपर


येशूच्या मेलेल्यातून पुन्हा उठ्ण्यामुळे सर्व काही बदलून गेले आहे असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. यावेळी अशा दहा बाबींवर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत.


१. येशूचे पुनरुत्थान नव्या निर्मितेचे मूर्त स्वरूप आहे आणि या जगात ते  देवाच्या अखेरच्या काळाची सुरुवात करते.

यामुळे येशू जेव्हा मेलेल्यातून उठला तेव्हा मानवी इतिहासातील ती नव्या युगाची सुरुवात होती. आदाम आणि हव्वा यांनी देवाविरुद्ध बंड केल्यापासून जग हे शापाखाली आले आहे. पण संपूर्ण जुन्या करारातून देवाने हव्वेच्या एका वंशजाद्वारे त्याच्या लोकांचा उद्धार करण्याचे व निर्मितीचे रूपांतर करण्याचे अभिवचन दिले. आणि यहेज्केल ३७मध्ये आपल्या लोकांचा हा उद्धार  देवाने पुनरुत्थानाच्या कृतीसारखा वर्णन केला आहे – शुष्क अस्थी व त्वचा यांच्यावर देव मांस चढवणार आहे, लोकांना त्यांच्या कबरांतून उठवणार आहे आणि त्याचा आत्मा तो त्यांच्यामध्ये फुंकणार आहे. यामुळे येशू मेलेल्यांतून उठल्यामुळे या पतित जगात नव्या निर्मितीच्या राज्याला सुरुवात झाली आहे.


२. येशूचे पुनरुत्थान त्याला या निर्मितिवर राज्य करणारा वचनदत्त  दाविदाचा राजा म्हणून ओळखते.

यशया ११:१-९ मध्ये देवाने अभिवचन दिले होते की तो दाविदाच्या वंशातून एक राजा उभा करील जो देवाच्या आत्म्याने अभिषिक्त असेल. तो धार्मिकतेने राज्य करील. आणि त्याच्या राज्यामुळे निर्मिती ही आरंभी जशी होती तशी  सुस्थितीला येईल. यामुळे पेन्टेकॉस्टच्या दिवशी आपल्या उपदेशामध्ये पेत्र सांगतो की, जेव्हा येशू मेलेल्यातून उठला तेव्हा दाविदाचा वचनदत्त वंशज हाच आहे हे सिद्ध झाले. हा येऊन निर्मितीवर राज्य करील.


३. येशूचे पुनरुत्थान त्याला जगाचा शेवटच्या काळाचा न्यायाधीश म्हणून ओळखते.

यशयाच्या ११व्या अध्यायात हा दाविदाचा राजा निर्मितीवर पूर्ण न्यायाने राज्य करील असे म्हटले आहे. लोकांचे दिसणे, त्यांची श्रीमंती, किंवा त्यांची सामाजिक-ऐहिक प्रतिष्ठा यामुळे तो विचलित होणार नाही. तर तो परिपूर्ण न्याय करील. यामुळेच जेव्हा पौल अथेन्स मध्ये मार्स टेकडीवर गेला तेव्हा तो म्हणतो, “अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चात्ताप करावा अशी तो माणसांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्याला मेलेल्यांतून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटवले आहे” (प्रेषित १७:३०-३१).

आणि तो जगाचा न्याय करणार असल्याचा पुरावा म्हणजे त्याने हा न्यायाधीश – येशू ख्रिस्त – मेलेल्यातून उभा केला आहे. येशू मेलेल्यातून उठल्यामुळे शेवटच्या काळी तो सर्व निर्मितीचा न्याय करणारा असे त्याला प्रस्थपित केले जाते.

४. येशूचे पुनरुत्थान त्याला शेवटचा आदाम म्हणून ओळखते.

१ करिंथ १५:२१-२२ मध्ये पौल म्हणतो, “कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.”

जेव्हा आदामाने पाप केले तेव्हा मरणाने जगात प्रवेश केला. जेव्हा येशू ख्रिस्त जो शेवटचा आदाम मरणातून उठला तेव्हा नव्या उत्पत्तीचे जीवन जगात वाहू लागले. कारण जेथे आदामाने आज्ञा मोडली तेथे येशूने आज्ञापालन केले. यामुळे शेवटचा आदाम असलेल्या येशूवर मरण दावा करू शकले नाही.


५. येशूचे मरण आपला मरणातून आध्यात्मिक जन्म आणि आध्यात्मिक पुनरुत्थान साध्य करते.

पौल १ करिंथ १५:४५ मध्ये म्हणतो की येशू हा जिवंत करणारा आत्मा असा झाला.  आता हे वचन समजण्यास फार कठीण आहे. परंतु पौल जे म्हणतो त्याचा आशय असा की, पुनरुत्थित येशू हा त्याच्या लोकांना आध्यात्मिक जीवन देतो. इफिस २:४-६ मध्ये सुद्धा पौल असाच मुद्दा मांडतो. “तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर उठवले व त्याच्याचबरोबर स्वर्गात बसवले.”

येशू हा मरणातून उठल्यामुळे तो आपल्याला आध्यात्मिक मरणातून उठवून आध्यात्मिक जीवनात नेतो.

६. येशूचे पुनरुत्थान आपल्याला नीतिमान ठरवणे साध्य करते.

तारणाच्या विश्वासाचा गाभा  आहे की येशूला देवाने मेलेल्यातून उठवले असा विश्वास धरणे. जेव्हा देवाने येशूला मेलेल्यातून उठवले तेव्हा तो येशूचे समर्थन करीत होता. तो जगाला दाखवून देत होता की तो त्याच्याविरुद्ध केलेल्या आरोपांबाबत  निर्दोष होता आणि मरणाचा त्याच्यावर काहीही हक्क नव्हता. रोम ४:२५ आपल्याला सांगते की,     येशू मरणातून पुन्हा उठल्याने जे आपण विश्वासाने त्याच्याशी जोडले गेलो आहोत त्या आपल्याला न्यायी ठरवले गेले आहे. देवाच्या न्यायालयात आपण निर्दोष आहोत असे घोषित केले.

७. येशूच्या पुनरुत्थानामुळे तो त्याच्या लोकांना पवित्र आत्मा देऊ शकतो.

योहान ७:३९ सांगते की येशूचा गौरव होईपर्यंत पवित्र आत्मा दिला जाऊ शकत नव्हता. येथे गौरव होणे याचा अर्थ त्याचे मरण व पुनरुत्थान. मग पेंटेकॉस्टच्या दिवशी पेत्र समुदायाला उपदेश करत असताना म्हणाला, “त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. तो देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे”

(प्रेषित २:३२-३३). येशू मरणातून पुन्हा उठल्याने तो आपल्याला आपल्यामध्ये वस्ती करण्यासाठी पवित्र आत्मा देतो.

८. येशूचे पुनरुत्थान आपल्याला पापाचे दास्य, मरण व सैतान यापासून मुक्त करते.

आणि येथेच येशूच्या पुनरुत्थानाचे सर्वात प्रात्यक्षिक असे लागूकरण दिसून येते. रोम ६:१-११ सांगते की, जो येशू ख्रिस्ताशी विश्वासाने जोडला गेला आहे तो मेला, पुरला गेला व येशूबरोबर उठवला गेला आहे. आणि हे खरे असल्याने आता आपण पापाचे गुलाम नाहीत तर नीतिमत्त्वाचे  गुलाम आहोत. कारण आपल्याला देवाच्या आत्म्याद्वारे त्याची आज्ञा पाळण्यास सामर्थ्य दिले आहे व आपण त्याची नीतिमत्त्वाची साधने आहोत. आणि मग रोम ८:१०-१७ पुढे सांगते ज्या पवित्र आत्म्याने ख्रिस्ताला मरणातून उठवले तो आपल्यामध्ये राहतो यासाठी की आपल्याला पापाला ठार मारण्यासाठी सामर्थ्य मिळावे. तसेच इब्री २:१४-१५ हे सत्य सांगते की येशूने आपल्याला

सैतान व मृत्यूच्या भीतीतून सोडवले आहे. येशू मेलेल्यातून पुन्हा उठल्यामुळे आपल्यामध्ये पवित्र आत्मा राहण्यास येतो हे महान अभिवचन आहे. तो आपल्याला पाप, मरण व सैतान यांच्या  दास्यातून मुक्त करतो.

९. येशूचे पुनरुत्थान आपल्याला खात्री देते की एक दिवस आपल्यालाही पुनरुत्थित शरीर मिळणार.

आता ती पुनरुत्थित शरीरे कशी असतोल हे एक गूढ आहे. १ करिंथ १५:३५-४९ ही वचने आपल्याला सांगतात की, आपली सध्याची शरीरे व पुनरुत्थित शरीरे यात काही साधर्म्य असेल आणि काही बाबतीत साधर्म्य नसेल. पण फिली. ३:२०-२१ सांगते, जेव्हा येशू परत येईल तेव्हा तो आपली शरीरे त्याच्या पुनरुत्थित शरीरासारखी करील. आणि हेही  एक असामान्य अभिवचन आहे. आपण पतित जगात राहताना आपली शरीरे क्षय पावतात, आजार, म्हातारपण यांना तोंड देतात. पण एक दिवस असा येत आहे की, येशूच्या पुनरुत्थानामुळे आपल्या शरीराचे त्याच्या परिपूर्ण, गौरवी पुनरुत्थित शरीरासारखे रूपांतर होईल.

१०. येशूचे पुनरुत्थान हमी देते की एक दिवस देव सर्व निर्मितीचे रूपांतर करील.

१ करिंथ १५:२०-२८ दाखवते की येशूचे पुनरुत्थान हे सर्व विश्वाचे रूपांतर होण्याची सुरुवात आहे. जेव्हा आपला देवाच्या आत्म्याद्वारे नवा जन्म होतो त्याक्षणी आपण या नव्या उत्पत्तीचा अनुभव घेतो. आणि रोम ८:१८-२५ सांगते की, सबंध सृष्टी आजपर्यंत शापाच्या ओझ्याखाली कण्हत आहे व वेदना भोगत आहे. देव सर्व निर्मितीला पूर्णपणे रूपांतर करणार त्या दिवसाची आशेने वाट पाहत आहे. “आणि जल समुद्राला व्यापून टाकते तशी पृथ्वी परमेश्वराच्या प्रतापाच्या ज्ञानाने भरेल” (हबक्कूक २:१४). आणि जेव्हा तो दिवस येईल तेव्हा आपण देवाला समोरासमोर भेटू. पतनाचा व शापाचा प्रत्येक डाग  निर्मितीतून नाहीसा होईल.  प्रत्येक अश्रू पुसला जाईल, त्यापुढे मरण नसणार, रडणे व शोक नसणार   (प्रकटी २१:३-४).  हे सर्व नाहीसे होईल कारण येशू मेलेल्यातून उठला आहे.


तर येशूचे पुनरुत्थान  का महत्त्वाचे आहे याची ही काही कारणे आहेत. पुनरुत्थान  सर्व काही बदलून टाकते. म्हणून आपण केवळ पुनरुत्थानदिन साजरा करत नाही तर दर रविवारी एकत्र येऊन त्याची भक्ती करतो कारण प्रत्येक रविवार हा पुनरुत्थानदिन आहे. येशूचा आत्मा आपल्यामध्ये राहतो म्हणून आपण त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याचा अनुभव घेतो हे किती अद्भुत आहे. आणि हे आपल्याला किती आशा देते! या पतित जगात आपल्याला कशालाही तोंड द्यावे लागले तरी आपण टिकून राहतो कारण पुनरुत्थित येशू आपल्यामध्ये राहतो व आपण अखेरपर्यंत विश्वासू राहावे म्हणून आपल्याला सामर्थ्य पुरवतो.

Previous Article

तो पुन्हा उठला – जगाला धोक्याची सूचना देण्यासाठी

Next Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

You might be interested in …

खिस्तजयंतीच्या वेळी तुम्हाला ख्रिस्ताचाच कंटाळा येत नाही ना? लेखक : स्टीफन विटमर

ख्रिस्तजयंतीच्या वेळी मार्काच्या शुभवर्तमानाकडे दुर्लक्ष केले जाते. इतर शुभवर्तमाने येशूच्या जन्माची तपशीलवार हकीगत सांगतात (मत्तय आणि लूक) किंवा त्याचा उल्लेख तरी करतात (योहान). मार्क आपल्याला यातले काहीच देत नाही – गव्हाणी नाही, मेंढ्या नाही, मेंढपाळ […]

माझा पुनर्जन्म नक्की झाला आहे का? विल्यम फार्ली

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जी व्यक्ती माझा पुनर्जन्म झाला आहे असा दावा करते ती ख्रिस्ताची खरीखुरी अनुयायी असते. लाईफ वे रिसर्च या संस्थेने २०१७ मध्ये एक सर्वेक्षण केले. त्यात त्यांना आढळले की अमेरिकेतील २४% […]

कोमट जन माझ्याकडे येवोत

मार्शल सीगल येशूसाठी तुमचे ह्रदय थंड होण्यास केव्हा सुरुवात झाली? बहुतेक तुम्हाला तो दिवस अथवा आठवडा किंवा कदाचित वर्षही आठवत नसेल. तुम्ही जेव्हा आवेशी (उष्ण) होता तो वेळ बहुतेक तुम्हाला आठवत असेल. तुम्हाला बायबल वाचायची […]