नवम्बर 24, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

मोठी मिळकत मिळावी म्हणून प्रार्थना करणे चुकीचे आहे का?

जॉन पायपर

जेनेसिसचा प्रश्न
पास्टर जॉन, मला आरामशीर जीवन जगता यावे म्हणून अधिक पैसे दे असे देवाला मागणे पाप आहे का? की आपण ख्रिस्ती लोकांनी फक्त हानी आणि दु:ख सोसायचे आहे? अधिक भौतिक सुख शोधायला आपल्याला काही वाव आहे का? मी बायबल वाचते तेव्हा देवाने ईयोबाची संपत्ती शेवटी दुप्पट वाढवली (ईयोब ४२:१०-१७). हे फक्त ईयोबाकरताच  होते की देव आजही ख्रिस्ती लोकांना अशी प्रार्थना करायला मुभा देतो?

उत्तर

येथे मला तीन प्रश्न दिसतात.
१) आरामशीर जीवन जगता यावे म्हणून मला भरपूर पैसे दे अशी प्रार्थना करणे योग्य आहे का?
२) ख्रिस्ती लोकांनी फक्त हानी आणि दु:ख कवटाळावे का?
३) देवाने ईयोबाची संपत्ती दुप्पट केल्याने, हा नमुना आपल्यापुढे ठेवण्याची देवाची इच्छाआहे का?

पहिला प्रश्न

ईयोबाची संपत्ती दुप्पट करून, हा नमुना आपल्यापुढे ठेवण्याची देवाची इच्छा आहे का? जर देवाने हे ईयोबासाठी केले तर आपल्यासाठीही ते करण्याची देवाची इच्छा आहे का?

आता ह्या प्रश्नाचे उत्तर आपण प्रत्येकासाठी एकाच प्रकारे देऊ शकत नाही. उदा. माझी मिळकत दुप्पट कर अशी मी प्रार्थना करणे ही पापी वृत्ती आहे अशी माझी खात्री आहे. कारण अमेरिकेत आरामशीर, समृद्ध जीवन जगत असताना जगाच्या कोट्यावधी गरीब लोकांपेक्षा मी खूपच श्रीमंत आहे. त्यामुळे खूप धन गोळा करून पृथ्वीवर ते साठवत राहणे हे माझे प्रार्थनेचे ओझे नाही. तर जितके देता येईल तितके देत राहून, दुसऱ्या लोकांसाठी गुंतवणूक करत राहून मी स्वर्गामध्ये संपत्ती साठवत राहतो. मला जे आहे ते इतरांचे चांगले व्हावे म्हणून मी वापरतो कारण येशूने म्हटले, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे”  (लूक १८:२४). यामुळे मी सावधगिरी बाळगतो.

तथापि एखादा काबाडकष्ट करून कुटुंबासाठी दिवसाला १०० रू. कमवतो तर त्याचे उत्पन्न दुप्पट म्हणजे २०० रू. झाले तरी तो गरीबच असणार. जर त्याने दुप्पट उत्पन्न होण्याची इच्छा किंवा प्रार्थना केली तर कोण त्याला दोष लावू शकेल? तर ह्या  प्रश्नाचे उत्तर  प्रत्येकासाठी सारखेच असू शकत नाही.

या आणि पहा

जेव्हा आपण जुन्या करारातील ईयोबाचे उदाहरण वापरतो तेव्हा ते आपल्यासाठी वापरू शकत नाही. याचे कारण: जुन्या करारातील धर्म हा “या आणि पाहा” असा असावा अशी देवाची इच्छा होती. सधनता ही बाहेरच्या जगाला देवाचा विश्वासूपणा दाखवत होती. शबाची राणी पृथ्वीच्या  एका टोकापासून शलमोनाला भेटायला आली आणि त्याची संपत्ती व शहाणपणा पाहून ती गांगरून गेली (१ राजे १०:१-३). तो “या आणि पाहा” असा धर्म होता.

जा आणि सांगा

पण देवाची इच्छा आहे की नव्या कराराचा धर्म “जा आणि सांगा” असा असावा. ‘या आणि पहा’ नव्हे तर ‘जा आणि सांगा.’ यामध्ये साधेपणा, स्वार्थत्याग आणि उदारपणा यावर भर दिलेला आहे की ज्यामुळे सर्व जगाला सुवार्ता पोचवण्याचे कार्य साधले जाईल. तसेच आपली संपत्ती पृथ्वीवर नाही तर स्वर्गात आहे हे दाखवले जाईल. येशू हाच  आपली  अगाध संपत्ती आहे (इफिस ३:८). जेव्हा आपण नवा करार वाचतो तेव्हा तो सतत देवाच्या राज्याच्या वाढीसाठी  साधेपणा व उदारता यावर भर देतो. त्यापैकी काही संदर्भ असे:

लूक ६:२०:  “अहो दीनांनो, तुम्ही धन्य कारण देवाचे राज्य तुमचे आहे.”

लूक ६:२४: “परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात.”

लूक ८:१४: “लोक संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व ते
                  पक्‍व फळ देत नाहीत.”

मत्तय ६:१९: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर
                  फोडून चोरी करतात;

लूक १२:३३: “जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणार्‍या थैल्या    
                   आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही.”

लूक १४:३३: “म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य
                   होता येत नाही.”

लूक १८:२४: “ज्यांच्याजवळ धन आहे, त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे!”

२ करिंथ ६:१०: “आम्ही प्रेषित दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी
                      सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो.”


असे अनेक शास्त्रभाग सर्व जगभरच्या लोकांना गरजा पूर्ण करण्यास पुढे जा असे सांगत आहेत. आरामात जगण्यासाठी नाही. युद्धपातळीवरचे जीवन जगा.

तर माझे उत्तर आहे; नाही. आपली मिळकत वाढावी म्हणून ईयोबाचे उदाहरण तुम्ही घेऊ शकत नाही. एखाद्या गरिबाने तशी प्रार्थना केली तर मी त्यावर आक्षेप घेणार नाही.

हानी होण्यासाठीच नेमणूक?

दुसरा प्रश्न: ख्रिस्ती व्यक्तीने फक्त हानी आणि दु:ख सहन करायचे का?

नाही.

आपण जर आजारी असलो तर बरे होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे (याकोब ५:१६).

आपण जर निराश असलो तर आनंदासाठी प्रार्थना करायची आहे (रोम १५:१३).

आपले जीवन जर निष्फळ असेल तर फलदायी व प्रभावी होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे (फिली. १:११; कलसै १:१०).

जर जीवनात संघर्ष असल्याने दु:ख असेल तर नातेसंबंधातील शांतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे (फिली.४ :६-७).

जीवन उद्ध्वस्त करणारे मध्यपान, ड्रग्ज, व्यभिचार यांसारख्या पापावर विजय मिळण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे (रोम ६:१२-१४).

ह्या सर्व प्रार्थना आहेत. जेव्हा हानी होते, दु:ख येते तेव्हा त्यावर विजय मिळवण्यासाठीच्या इच्छा आहेत. दुसऱ्या शब्दात हानी, दु:ख ह्यांची इच्छा धरावी असे देव म्हणत नाही. ती काहीतरी दुसरे करण्यासाठी म्हणजे शुभवर्तमान पुढे करण्याची साधने आहेत. पण त्यांचा पाठपुरावा अथवा इच्छा करायची नाही.

१ तीमथ्य मध्ये अन्नाचा आणि विवाहाचा आनंद वाईट आहे असे जे शिकवत होते त्यांच्याविरुध्द पौल धोक्याची सूचना देत आहे. त्याने लिहिले, “लग्न करण्यास ते मना करतील, आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे ह्यांनी उपकारस्तुती करून ज्यांचा उपभोग घ्यायचा अशी देवाने निर्माण केलेली भक्ष्ये वर्ज्य करावीत असे सांगतील” (१ तीम. ४:३).

हानी आणि दु:ख हे आपले पवित्रीकरण होण्यासाठी देवाची साधने आहेत. सर्जनचा ऑपरेशनचा चाकू घेऊन आपण आपल्यालाच कापत नाही. आपण डॉक्टर सांगतात ते ऐकतो व तसे करतो. आणि जर आपल्याला सर्जरीची गरज असेल तर आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो व त्यांच्या सुज्ञतेची प्रशंसा करतो. ख्रिस्ती व्यक्तीचे ध्येय हे दु:ख सहन करणे नाही तर जे दु:ख आपण सहन करावे अशी देवाची अपेक्षा आहे ते प्रीतीने स्वीकारणे हे आहे.

तुमचे ह्रदय काय म्हणते?

आणि शेवटी तिसरा प्रश्न :
आरामशीर जीवन जगता यावे म्हणून मला भरपूर पैसे दे अशी प्रार्थना करणे योग्य आहे का?

पुन्हा ह्या  प्रश्नाचे उत्तर  सुद्धा प्रत्येकासाठी एकाच प्रकारे देता येणार नाही. काही श्रीमंत लोक मला माहीत आहेत . त्यांना अधिक आणि अधिक आणि अधिक गोष्टी हव्या आहेत; कारण त्यांना वाटते दोन गाड्या, दोन घरे,  वीस शर्टस त्यांना पुरेसे नाहीत. त्याचवेळी जगात कोट्यावधी लोक असे आहेत की त्यांच्यासाठी सुखसोयीचे जीवन म्हणजे, मला एक शर्ट, कुटुंबाला पुरेसे जेवण,  निवाऱ्याचे ठिकाण, मुलांना  प्राथमिक शिक्षण आणि पुरेशी वैद्यकीय मदत मिळावी हेच आहे.

प्रेषित पौल म्हणतो, “आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे” (१ तीम. ६:७-८). येथे पौलाच्या म्हणण्याचा अर्थ असा की जीवनाच्या मूलभूत गोष्टी हव्या असणे हे चुकीचे नाही. मग तुम्ही तुमच्या जीवनात अर्थपूर्ण कार्य व फलदायी होणे यासाठी श्रम करू शकता. हवे असणे चुकीचे नाही; त्यासाठी प्रार्थना करणे चुकीचे नाही.

हे सर्व आपल्या ह्रदयाशी निगडित आहे. तुमचे हृदय पौलाबरोबर म्हणू शकते का की, “मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही; कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते; हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे” (फिली. ४:११-१३)? की तुमचे ह्रदय म्हणते, मला तृप्त राहण्यासाठी अधिक आणि अधिक आणि अधिक हवे आहे? फक्त देवालाच तुमच्या हृदयाची खरी स्थिती माहीत आहे. तिथेच खरे युद्ध लढले  जाते.

तर देव आपल्या सर्वांना हे स्पष्ट करो की आपली किती अधिक साधने आपण शुभवर्तमान पुढे करण्यासाठी वापरू शकतो आणि हक्काने किती आपण आपल्यासाठी वापरू शकतो.

Previous Article

तुमच्या आनंदाचा विध्वंस करणारा गर्व 

Next Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

You might be interested in …

मुलांच्या जीवनात संपूर्ण बायबल कसे आणावे?   जिमी नीडहॅम

  दोन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीने एक ब्लॉग वाचला. एक आई आपल्या मुलांसोबत दररोज बायबलचा एक अध्याय वाचत होती. छोट्या मुलांसाठीच्या बायबलमधून नाही तर बायबल मधून. ते अगदी लहान असताना तिने सुरुवात केली आणि आता सर्व […]

लेखांक ४: माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरी जाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ

(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा ) (२) (अ) या घटनेव्दारे माझा देवावरचा विश्रास अजून बळकट होण्यास मदत झाली की देव माझा “स्थिर पाया”आहेव “त्याचे लोक”कोण आहेत हे […]