जनवरी 3, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

संतापाचं भांडण: पौल व बर्णबा (॥)

(ब) योहान मार्कावर झालेला परिणाम – पहिल्या फेरीत हा तरूण होता पौल व बर्णबाबरोबर (प्रे. कृ. १३:५). त्याचं यहूदी नाव योहान आहे, तर त्यानं जे एक विदेशी नाव घेतलं आहे ते आहे मार्क. त्याचा मार्क १५: ३९ पासूनच केवळ मार्क नामनिर्देश सुरू होतो. कारण तोपर्यंत त्याची मतं यहूदी असल्यानं त्याचे योहान हे नाव आढळतं. त्याचं कट्टर सनातनी मत बदलून पौल व बर्णबाप्रमाणं जागतिक ख्रिस्ती मंडळीकडं झुकलं तेव्हापासून त्याचं नाव मार्क वापरात दिसतं असं स्पष्ट दिसतं. १३ व्या अध्यायातील पहिल्या फेरीत तो केवळ योहानच आहे. मग पफेहून तो का सोडून गेला, आलं का आता लक्षात?

(१) बर्णबा हा त्याचा चुलत वडील भाऊ, त्याचा दादाच होता. आपल्या दादाला दुसरं स्थान आणि त्याच्याहून तरुण नवशिक्यानं पुढं पुढं होऊन पुढारपण घ्यावं हे त्याला नसेल पटलं.

(२) मार्क त्यावेळी तरुण असल्यानं यरुशलेमातल्या कट्टर यहूदी पंथाचा असण्याचा संभवच अधिक. तो सनातनी यहूदी धर्माविरुद्ध काम करण्यास न कचरणाऱ्या आवेशी पौलासोबत या फेरीमध्ये पुढं का बरं जाईल? त्यापेक्षा आपल्या सनातनी धर्माच्या माहेरी, यरुशलेमाला जायचा पोक्त विचार करून तो त्यानं अमलातही आणला (प्रे. कृ. १३:१३). मात्र हा सुवार्तेचं ‘देवाचं काम सोडून गेला’ ही गोष्ट पौलाच्या लक्षात राहिली (प्रे. कृ. १५:३८). तर आपला कैवार घेऊन आपल्या मनाजोगं झालं नाही म्हणून तो गेला ही गोष्ट बर्णबाच्या मनात राहिली (प्रे.कृ. १५:३७). आता मार्काचं कसं चुकलं, तो का सोडून गेला हे स्पष्ट झालं.

(३) अशी चूक कोणाच्या हातून होते हे थोडं पाहू या. प्रे.कृ. १३:५ मध्ये म्हटलं आहे, “ नि योहान हाही त्यांचा सेवक होता.”  सेवक म्हणजे वैयक्तिक नोकर? नाही. कारण पौल म्हणतो, मी माझ्या बरोबरच्यांसाठी माझ्या हातानं श्रम केले आहेत. मग कसला “सेवक” ? लूक ४:२० मध्ये तोच शब्द वापरलाय. तो सभास्थानाचा सेवक आहे. त्यात शास्त्राचं शिक्षण देणे हे त्याचं एक काम आहे. तेव्हा तो संतांच्या संगतीत असलेला, संत पेत्रास पुत्राप्रमाणं असलेला (१ पेत्र ५:१३); त्याच्या शिकवणीची व्यवस्थित टिपणं ज्याच्याजवळ होती, असा तो आहे.
ख्रिस्ताच्या शिकवणीशी चांगला परिचित असलेला, संत संप्रदायातील असलेला, सत्यशोधक कोणी आल्यास व्यवस्थित शिक्षण देणारा सेवक असणं योग्यच होतं. म्हणूनच तर त्यानं प्रभूच्या तडफदार सेवेच्या कामाचं प्राधान्यानं चित्र रेखाटलेलं मार्काचं शुभवर्तमान आपल्याला दिलं. अशा या व्यक्तिमध्ये परिस्थितीनं निर्माण केलेलं दुर्बलपण होत. “तो त्यांना सोडून यरुशलेमास गेला.” पण ही सर्व गोष्ट प्रे.कृ. १३ मधली आहे हे लक्षात ठेवा. १५ व्या अध्यायाचा परिणाम मार्कावर एवढाच झाला की पौल त्याला सोबत घ्यायला तयार नसल्यानं शांतपणानं तो बर्णबाबरोबर कुप्रास गेला.

(क) बर्णबावर त्या भांडणाचा परिणाम – आता नीट जपून हा मनुष्यही किती योग्यतेचा होता ते पाहू या. आणि त्याचं झालेलं अध:पतन धोक्याचं समजून मनात रुतून राहू देऊ या. तो प्रेषित म्हणून मंडळीने पाठवलेल्यांत सर्वश्रेष्ठ हुद्यावर, तसेच संदेष्टा व शिक्षकही होता (प्रे. कृ. १३:१)
त्याच्या नावाचा अर्थ ‘बोधपुत्र, सांत्वनपुत्र’ होय. तो लेवी वंशातला, कुप्राचा रहिवासी होता. मंडळीच्या सेवेसाठी मालमत्ता विकून दानशूरपणे ते प्रेषितांच्या चरणी ठेवणारा ( प्रे. कृ. ४:३६). भला विश्वासी, आत्म्याने पूर्ण होता. शिवाय पौलाला मंडळीने स्वीकारण्यास दार खुले करून देणारा, त्याला शोधून काढून सेवेला लावण्यात पुढाकार घेणारा होता. तो येथे संतापला, चिडला, भांडला व अखेर पौलापासून वेगळा झाला. यात आपलं काही चुकतंय असं त्याला वाटलंही नाही. पौल करतो तेच सुवार्तेचं काम मीही करीन असं त्याला वाटलं अन् त्यानं केलंही. पण सुवार्ता कार्यातून तो वजाबाकीतच निघाल्याचं पाहून मन पिळवटून निघतं.

(ड) काय असेल या खेदजनक हकीगतीचं कारण? तो लेवी होता. त्यांना देवाची आज्ञा होती की त्यांनी जमीनजुमला बाळगू नये. “मी तुमचं वतन आहे” असं देवाचं त्यांना वचन होतं. तरी त्याच्याकडे जमीन होती? तारणदायी विश्वास त्याला होता. पण देव त्याला उपजीविका पुरवून देईल हा विश्वास त्याला होता का? हेच मनाला लागून त्यानं जमीन विकून प्रेषितांच्या चरणी ती रक्कम आणून ठेवली असेल असं वाटतं. भावनाप्रधान, क्षणात शिखरावर, क्षणात खोऱ्यात, चंचल, धरसोड करणारा तो दिसतो. म्हणून अखेर चिडून, संतापून व सुवार्तेच्या कामातून अंग काढून घेऊन तो वेगळा झाला. हे त्याच्या चंचल, चिडक्या, मनाची साक्ष देते. सनातनी परूशी यहूदी शिक्षणाचा कैवार घेण्यास आले तेव्हा पौल म्हणतो, “बर्णबाही त्या ढोंगानं ओढला गेला” (गलती २: १३). पहिल्यापासून सुवार्ताकार्यात भाग घेणारा, पण वारं फिरलं की तसा फिरणारा, धरसोड करणारा हा माणूस दिसतो.

(ई)१५:३९ मध्ये योहान मार्काचं यहूदी नाव न घालता लूक काय ध्वनित करू इच्छितो? मार्काचा पूर्ण पालट झाला हेच सांगू इच्छितो. पफेतलं त्याचं मत राहिलं नव्हतं तो आता पुरता पौलाच्या मताचा झाला होता. ख्रिस्ती सार्वत्रिक मंडळीचा सिद्धांत त्याला चांगला समजला होता. मग बर्णबाला इतकं चिडायचं कारण काय ? ते कारण त्यानं पौलाला सांगायला हवं होतं. का नाही सांगितलं? “तू शेवटला होतास (प्रे कृ १३:१) माझ्या मध्यस्थीमुळं तू पहिला झालास (१३:१३). यामुळं माझा धाकटा भाऊ रागावून निघून गेला.” हे कारण तो पौलाला मनमोकळेपणे सांगू शकला असता. ते न सांगता त्यानं फक्त हट्ट धरला. मग पौलही चिडला, संतापला, भांडला.

(फ) खरं-खोटं; सत्य-असत्य – कुठल्याही भांडणात म्हटलं जातं, खरं खोटं करू या. पण कधी तरी खरं ते खरं, खोटं ते खोटं होतं का? १५ व्या अध्यायात पौलाचं हे चुकलंय की मध्ये बराच काळ लोटल्यानं मार्काचं परिवर्तन झाल्याची खात्री अगर विचारही त्यानं केला नाही. तसं मार्काला विचारलं असतं तर त्यानं स्पष्ट केलं असतं. आणि इथंच हा खटका तुटला असता. आणि भांडणाचं मूळच नष्ट झालं असतं. घडल्या हकीगतीशी, निगडित राहून त्यानं योहानाला सोबत न घेण्याचाच हट्ट चालू ठेवला. दूरदृष्टीनं पौलाचं बरोबर होतं. सुवार्ताकार्यासाठी लागणारी पात्रता वशिल्यानं, म्हणजे केवळ बर्णबाचा धाकटा चुलत भाऊ म्हणून ठरवायची नसते. सुवार्तेच्या नांगराला हात घालून तो मागे वळला होता.

बर्णबाचं काय चुकलं ते आपण पाहिलं आहे. मार्काचा पालट झाल्याचं त्याला माहीत असणं शक्य होतं. आणि मागच्या गोष्टी काढून असा कडक न्याय का घ्यावा हे त्याला वाटणं बरोबर होतं. सारांश असा की खरं खोटं हे इतकं मिसळलेलं असतं की खऱ्या खोट्याचं दृश्य व अदृश्य फसवं असतं. या भ्रष्ट जगात खरं खोटं करण्याच्या फंदात कोणी पडूच नये. ते अशक्य आहे. त्यावर एकच मार्ग आहे, वाट पाहाणं. दीर्घ वाट पाहिली तर जिवंत जो येशू ख्रिस्त तो अचूक निकाल देतो. शेवटी सत्यच तर टिकून राहातं आणि असत्य सावकाश, निश्चितपणे कुठच्या कुठं निघून जातं.

३. सुवार्तेच्या सत्याचं सामर्थ्य  

पौल आपल्या संतापाचं कारण गलती २:११ ते २१ मध्ये देतो. वचन १४ मध्ये चिमुकल्या वचनात “सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते चालत नाहीत” असे म्हणत त्यात बर्णबालाही गोवतो. सुवार्ता, तारण, सत्य म्हणजे कोण? तर येशूच ! त्या नमुन्याप्रमाणं, येशूप्रमाणं, नीट तंतोतंत ते चालत नाहीत. सत्य माणसानं शोधून काढणं किती अशक्य आहे. माणसानं भांडणातलं सत्य शोधून काढलंच… बर्णबाला त्याच्या नकळत आपणहून सुवार्ताकार्य करत असूनही बर्णबाला त्या कार्यक्रमातून वगळलं. ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे ! पौल चुकला तरी त्याचं सत्य सुवार्तेचं सत्य होतं. त्याच सत्यानं म्हणजे येशूनं त्याला हाती धरलं आणि मानवधारी येशूविषयीच्या कार्यात प्रे.कृ. १३ ते २८ अध्यायांचा त्याला नायकच करून टाकलं. तरुण मार्काचं पण चुकलंच. पफेत तो ह्या दोन सुवार्तिकांना सोडून सनातनी यरुशलेमकरांकडे गेला. पण सुवार्तेच्या सत्यानं त्यालाही सावरलं. दरम्यानच्या काळात यरुशलेमात महामंडळाची सभा भरली. सुवार्तेचे रथी महारथी, पेत्र, पौल, बर्णबा, याकोब…अशा वीरांची भाषणं (प्रे.कृ. १५) मार्काने तेथे ऐकली. त्यावर शांतपणे विचार केला आणि आपलं मत बदललं. पौलानं यहुदीतरांना सुवार्ता सांगितल्याचा अहवाल त्यानं पौलाच्या तोंडानेच ऐकला. आणि त्याच्याच दादानं शिफारस केल्यानं तो दुसऱ्या फेरीला त्यांच्याबरोबर जायला तयार झाला होता (प्रे.कृ. १५:३७-३८). यावेळी त्याला ऐहिक, सनातनी यरुशलेम दिसलं नाही. तर शृंगारलेल्या नवरीप्रमाणं यरुशलेम, स्वर्गीय देवाचा सार्वत्रिक देह, मंडळी त्याला दिसली.

पण आपल्या भावाच्या चिडखोरपणामुळं व पौलाच्या दुराग्रहामुळं त्याला दुसऱ्या फेरीत पौलाबरोबर जाता आलं नाही. पौलाच्या त्याच्याबद्दलच्या गैरसमजाबद्दल तो शांत राहिला. पुढं कितीतरी वर्षे त्यानं वाट पाहिली. सुवार्तेच्या सत्याची, पौलाची, त्याला बदलणाऱ्या ख्रिस्ताची वर्षानुवर्षे वाट पाहिली. आणि अखेर तो दिवस उगवला. त्याला पौलाचंच बोलावणं आलं (२ तीमथ्य. ४:११). इतकंच नव्हे तर तो पौलाजवळ, त्याच्या कैदखान्यात त्याच्यासोबत राहिला. यावेळी त्याची निराळी सेवा केली. त्या सेवेनं या वृद्ध संताचं मन त्यानं भारून टाकलं (२ तीम. ४:११; फिलेमोन २४; कलसै ४:१०). धन्य सुवार्तेचं सामर्थ्य! शांत शिकणाऱ्याला, नम्रतेनं नवीन होण्यास तयार असलेल्यांचं रूपांतर करणारं ते स्वर्गीय सामर्थ्य आहे!

४. समारोप
आरंभीच आपण पाहिलं की पवित्र शास्त्र हे अजब, अद्वितीय पुस्तक आहे. ते सामान्य पुस्तक नसून जिवंत सामर्थ्याचं घर आहे. “दोष दाखवणं” हे त्याचं काम आहे. तसंच ते “ प्रत्येक देवभक्ताला पूर्ण करून प्रत्येक चांगल्या कामाला सज्ज करणारं” आहे (२ तीम. ३:१६-१७). “संताप” हा जो शब्द प्रे. कृ. १५:३९ मध्ये वापरला आहे, तोच शब्द इब्री १०:२४ मध्ये वापरला आहे. इथं त्याचा अर्थ सकारात्मक, ‘धार येणं’ ‘पेटवून देणं’ असा आहे. त्यानुसार याचंच भाषांतर असं आहे, “ प्रीतीला व सत्कार्याला धार यावी… पेटवून द्यावं… यासाठी एकमेकांकडे लक्ष द्या.” त्याउलट शास्त्रवचन दोष दाखवतं याचंही उदाहरण पाहू. १ करिंथ १३:५ मध्ये पौल तोच शब्द वापरून म्हणतो, “प्रीती चिडत नाही.. संतापून भांडत नाही” त्याला आपण जोड देऊ या का? “संतापून भांडत नाही.. नि वेगळं होत नाही.”
प्रियांनो, तू चूकला आहेस, तू बरोबर आहेस; असं खरंखोटं करण्याऐवजी अभ्यासपूर्वक, प्रार्थनापूर्वक हा लेख वाचा आणि प्रीताला, सत्कार्याला धार देऊन पेटवायला एकमेकांकडे पूर्ण लक्ष द्या. आमेन … आमेन!

 दिनांक २२:८:५७ – मिरज

समाप्त

Previous Article

 संतापाचं भांडण : पौल व बर्णबा

Next Article

अन्यायाचं धन : लूक १६:९

You might be interested in …

सर्वात वाईट शुक्रवारला आपण उत्तम शुक्रवार का म्हणतो?

  लेखक- डेविड मॅथीस जगाच्या सर्व इतिहासातला तो एकमेव भयानक, निष्ठूर असा दिवस होता. अशी दु:खद घटना कधी घडलेली नाही आणि भविष्यात अशी घटना घडणे शक्य नाही. कोणतेही दु:खसहन इतके अयोग्य ठरलेले नाही. कोणत्याही मानवाला […]

मला क्षमा कर आणि क्षमा करण्यास मदत कर

मार्शल सीगल जर तुम्ही तुमच्या मुलांना प्रभूची प्रार्थना शिकवत असाल तर कोणती ओळ जास्त समजवून सांगण्याची गरज आहे? “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या […]

मानव होणारा राजा

जॉन मकआर्थर येशूचा दुसरा जन्मदिन येण्यापूर्वीच तो हेरोद राजाच्या वधाच्या कटाचे लक्ष्य बनला होता. हा राजा रोमच्या अधिपत्याखाली असलेल्या यहूदीयाचा दुष्ट व कावेबाज अधिपती होता. देवाने स्वप्नात सांगितल्यानुसार मरीया व योसेफ हे बाळ घेऊन दुसऱ्या […]