नवम्बर 23, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

गेथशेमाने बाग

लेखांक ६

“पाहा, घटका येऊन पोहंचली देखील ” ( मत्तय २६:४५; मार्क १४:४१).

ही मात्र मघाची सैतानाची घटका नव्हे अं?  ही त्याची देवनियुक्त, आत्मयज्ञाची, खरीखुरी घटका. ती आली. यहूदा आला आहे. शत्रुंच्या पुढं आहे. येऊन पोहंचलेला प्रभूला दिसला. त्याच्याकडं पाहून प्रभू हे वाक्य बोलून सुचवत आहे की ती पाहा माझी आत्मयज्ञाची घटका येऊन धडकली देखील! “मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे, उठा आपण जाऊ” ( मत्तय २६:४५-४६).

उठा. पुरे करा आता झोपायचं. परीक्षेचा एक टप्पा तर संपला. पुढं अद्याप वाट चालायची आहे. वाटचाल करायची तर पडल्या पडल्या काही होणार नाही. तशी वाटचाल असते स्वप्नसृष्टीतली, लटकी ! आपल्याला ह्या खडतर जगातली, तीही वधस्तंभाची, बदलीच्या उपकारक मरणाची, प्रायश्चित्ताची वाट चालायची आहे. त्यासाठी आपली प्रार्थनेनं तयारी होणं आवश्यक होतं. पण या दुर्बळ देहामुळं ते यथोचित झालं नाही. तरी अंतरात्मा त्याला तयार असल्यामुळं ते होऊन चुकलंच आहे. आता अंग झाडून झोप झटकलीच पाहिजे. उठा तर कसे आता… “आपण जाऊ!”

आपण? होय आपण! प्रभू तू निघाला आहेस ना? एकटाच अगदी? इतर कोण येणार तुझ्याबरोबर? आम्ही तर तुझ्याबरोबर येण्यासाठी कधी विनंतीही केली नाही. तरी स्वत:बरोबर तू आमचीही मोजदाद करतोस? आम्हा पातक्यांना स्वत:बरोबर गोवून घेतोस? मागं कितीदा राजबिंड्या, रुबाबदार अशा ‘तुझ्यामध्ये’ तू आम्हाला गोवून घेतलंस! “ चला, आपण पलीकडे जाऊ” असं म्हणत आम्हाला तुफानाच्या पार केलंस! “मला ज्यानं पाठवलं त्याची कामं आपल्याला केली पाहिजेत.” असं म्हणून तू आम्हाला सुवार्तेच्या सेवेचं, तुझ्या देहाच्या सेवेचं, तुझं शिक्कामोर्तब असलेलं अधिकारपत्र यापूर्वीच देऊन चुकला आहेस.

कुठं? कुठं चालला आहेस प्रभू तू? आणि आम्हाला कुठं नेणार आहेस? आत्ता दोन हजार वर्षांनी आम्हाला कळतंय की तू शाश्वताकडं निघाला आहेस. आम्हीही तुझ्याबरोबर यावं असं तुझ्या मनात आहे. म्हणून आम्हाला तू निवडलं आहेस! “यासाठी की तुम्ही माझ्याबरोबर असावं… राहात जावं” ( योहान १४:३)… तुझ्या शाश्वत राज्याकडे… त्याच्याही पलीकडे, तुझ्या पूर्णतेकडे, सर्वांनी सर्व भरलेल्या रूपांतराकडे…तू निघाला आहेस. आम्हाला सोडून तिकडं एकटंच जायची तुझी इच्छा नाही प्रभू! म्हणून तू म्हणत आहेस, ‘उठा आपण जाऊ.’

पण बाप्पा, तिकडचा तुझा रस्ता मृत्युच्छायेतून आहे. मरणाच्या कभिन्न दरीतून आहे. मरणदरीच्या पलीकडच्या तुझ्या समर्थ पुनरुत्थानानं खुल्या झालेल्या दरवाजातून पुढचा अनंतकालिन शाश्वताचा मार्ग आहे. हे या दोन हजार वर्षांत तू आम्हाला स्पष्टपणे दाखवलं आहेस. तुझी स्तुती असो प्रभू! त्यावेळच्या भांबावून गेलेल्या तुझ्या अज्ञान अनुयायांना ते न समजल्यानंच ते सर्व तुला “ सोडून पळाले” ( मत्तय २६:५६).

तुझा रस्ता मरणानं मुगुटाचा असल्याचं अजूनही आम्हाला नाही समजलं. तुझा रस्ता गुन्हेगाराच्या लाजिरवाण्या, वधस्तंभाच्या मरणाचा आहे. सर्वभक्षक मरण, अपमान, निंदा, दु:खसहनाचा आहे असं त्यांना वाटलं. आज दोन हजार वर्षांनीही आम्हाला तेच वाटतं. पण मरण केवळ एक दरवाजा आहे. त्यातून पुनरुत्थानाची, जीवनाची वाट जाते. त्याच्याही पुढं स्वर्गारोहणाची वाट जाते. नि अखेर शाश्वत जीवनाची वाट देखील जाते. हे त्यांना त्यावेळी नाही समजलं. कसं समजणार प्रभू? आम्हाला समजून देखील त्यांच्या व आमच्यामध्ये फरक तो काय आहे प्रभू? आजही तुझं ते जाग आणणारं वाक्य तू सर्वकाळासाठी वातावरणात सोडून दिलं आहेस; “ उठा, आपण जाऊ!” त्यासाठी वापरलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ हात धरून नेणं, पुढारपण करणं. हा विचारात घेतल्यास ते वाक्य “उठा, आपण जाऊ…हाती धरून नेऊ…पुढारपण करू !” असे होईल. त्याचा खोल अर्थ पाहू. कुणाचं पुढारपण करू या?

कुणाला आपण हाती धरून नेऊ या? संपूर्ण दुनियेला. त्यांना प्राणांतिक दु:खसहनाची, बदलीच्या मरणाची, मरणानं मुगुटाची वाट कुठं माहीत आहे? ती त्यांना दाखवू या. त्यांना हाती धरून नेऊ या. तमाम दुनियेचं, संपूर्ण दुनियेचं पुढारपण आपण करू या. हा अर्थ किती उपकारक आहे पाहा.
“आपण” करू. पहिल्यानं तुम्ही…मग मी… तुमच्या सहवासामध्ये. असं प्रभू आपल्याला म्हणतोय. मान देतोय तो ! लाजवण्याकरता तो हे म्हणत आहे का? त्याची तेव्हा आणि आता पण सर्व खऱ्या तारलेल्यांसाठी साद आहे. कारण त्यावेळी तेही त्याच्याबरोबर राहिले नाहीत व त्याच्या सहवासात वधस्तंभाची वाट चालले नाहीत. “सर्व त्याला सोडून पळून गेले” (मत्तय २६:५६). त्यांनी त्यावेळी हे असं केलं, आणि आज मनानं आम्ही तेच करत आहोत. म्हणूनच आजही प्रभूच्या इच्छेविरुद्ध निष्क्रिय निद्रेतून आम्हाला जाग येण्याकरता सर्व काळातील सर्व संतांना त्या त्या आणीबाणीच्या वेळी जाग येण्याकरता आजही नवीन सामर्थ्यानं गुंजत राहणाऱ्या त्या शब्दांना आपण मनात जपून जतन करून ठेऊ या… “ उठा आपण जाऊ.”

(पुढे चालू)

 

Previous Article

गेथशेमाने बाग

Next Article

गेथशेमाने बाग

You might be interested in …

१०००० छोट्या परीक्षा लेखक : स्कॉट हबर्ड

जेव्हा मी कामावरून परतलो आणि किचनमध्ये गेलो तेव्हा मला जाणवले की मी एकटा नव्हतो. क्षणभर मी घुटमळलो, मग मला सावरून मी लाईट उघडले. आणि ते तिथे होते, सर्व दिशांनी माझ्याकडे पाहात. भांडी. सिंकमध्ये कप वाट […]

 देवाच्या प्रीतीचा अनुभव जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

“माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान अगर भविष्य अशा गोष्टी, बले, आकाश, पातळ किंवा कोणतीही सृष्टवस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची जी आपल्यावरील प्रीती आहे, तिच्यापासून वेगळे करण्यास समर्थ होणार नाही” […]

एक प्रसिध्द आणि विसरलेली प्रीती

मार्शल सीगल पौलाच्या पत्रामध्ये दखल घेण्यासारख्या एका सुंदर विवाहाकडे बऱ्याच जणांचे लक्षही जात नाही. ह्या विवाहाने पौलाचे ह्रदय काबीज केले असावे. तो लिहितो, “ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना सलाम सांगा; त्यांनी माझ्या […]