जॉन पायपर
प्रेषित पौल विश्वासीयांच्या मंडळीला लिहिताना म्हणतो, “आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे” ( २ करिंथ ५:१०), आणि यामध्ये तो स्वत:ला पण गोवून घेतो. दुसऱ्या एका ठिकाणी तो ख्रिस्ती जनाना सांगतो, “आपण सर्व ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत” रोम १४:१०). असे थेट बोलणारी वचने आपले लक्ष खिळवून ठेवतात आणि आपल्याला भावी न्यायाचा विचार करायला लावतात. यामुळे अनेक प्रश्न आपल्यापुढे उभे राहतात. याबद्दल मला एक ईमेल आले: “पास्टर जॉन येशू आल्यानंतर ख्रिस्ती लोकांना कोणत्या न्यायाला तोंड द्यावे लागेल हे कृपया मला समजावून सांगला का?”
आता हे पाहताना आपण एका गौरवी बातमीने सुरुवात करू की, कोणत्या न्यायाला आपल्याला तोंड द्यावे लागणार नाही. ख्रिस्त आपल्यासाठी मेला व पुन्हा उठला याचा होकारात्मक भाग म्हणजे तो आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी मरण पावला (१ पेत्र ३:१८). देवाच्या सान्निध्याचा सर्वकाळसाठी अनुभव घेणे हा येशूच्या मरण्याचा व पुनरुत्थानाचा होकारात्मक भाग आहे.
आता क्रोधाखाली नाही
परंतु नव्या करारात पुन्हा पुन्हा आठवण करू दिली आहे की, आपण आता देवाच्या क्रोधाखाली नाही. त्याने एक नकारात्मक गोष्ट साध्य केली. हे असे घडणार नाही. ख्रिस्ताने आपली पापे वाहिली. आता त्यासाठी आपल्याला शिक्षा नाही. “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे” (योहान ५:२४).
याचा अर्थ शेवटच्या दिवशी आपण न्यायालयात जाणार नाही असा नाही तर शेवटच्या दिवशी न्यायालयात आपल्याला दोषी ठरवले जाणार नाही. आपल्याला निर्दोष ठरवलेले आहेच आणि न्यायालय ते सिद्ध करील. “म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच” (रोम ८:१). तसेच रोम. ८:३३- “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे.”
त्या न्यायाच्या वेळी आपल्यावर कोणताही आरोप लागू करता येणार नाही. “ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत” (१ योहान ३:१४).
तर क्रोधाचा न्याय आणि शिक्षा आणि अखेरचे मरण हे पार झाले आहे. आपल्यासाठी ते संपले आहे. जर आपण ख्रिस्तामध्ये आहोत तर येशूने ते आपल्यासाठी सहन केले. जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्याशी एक झालो आहोत तर त्याचे मरण आपले मरण झाले आहे. त्याची शिक्षा ही आपली होती. देवाचा आपल्यावरचा क्रोध त्याच्यावर टाकला गेला. म्हणून पौल म्हणतो, “कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोप घेत असलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे” ( १ थेस्स. ५:९-१०).
देव ख्रिस्ती लोकांचा कसा न्याय करतो
मग एका न्यायामध्ये ख्रिस्ती लोकांना दोषी ठरवले जाणार नाही तर आता आपल्यासाठी कोणता न्याय आहे? या न्यायामध्ये आपल्या सार्वकालिक जीवनाचा प्रश्न येत नाही तर येणाऱ्या युगात कोणत्या विविध प्रकारचे आशीर्वाद किंवा पारितोषिके आपण अनुभवू हे ठरवले जाईल.
मला समजतंय की यामुळे काही लोक अस्वस्थ होतील. कारण “विविध पारितोषिके” म्हणजे काही लोक आनंदित होतील आणि इतर नाही. पण बायबलमध्ये हे स्पष्ट आहे की, स्वर्गामध्ये नाखुषी नाही. प्रत्येक जण असावयाचा तितका आनंदीच असणार. आपल्या सर्व समाधान देणाऱ्या देवाच्या सान्निध्यात सर्व अश्रू पुसून टाकले जातील ( प्रगटी. २१:४). परंतु काही लोकांना आनंदाची जास्त क्षमता असणार, आनंदाच्या अधिक वाटा असणार.
आता असा विचार आपण का करतो? असे का बोलतो? कारण बायबल असे शिकवते की, आपण ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहू तेव्हा आपल्याला निराळी पारितोषिके मिळतील तरीही प्रत्येक जण परिपूर्ण रीतीने आनंदी असणार.
येशूचा दाखला आठवतोय? राजा दूर देशी जातो आणि परत येतो. ज्यांनी त्याचा पैसा वेगवेगळ्या रीतीने गुंतवला होता त्यांना तो वेगवेगळी पारितोषिके देतो. “मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ त्याने त्याला म्हटले, ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’ नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत.’ त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे” (लूक १९:१६-१९)
आता हे चित्र शेवटच्या दिवशी मिळणाऱ्या निरनिराळ्या पारितोषिकांचे आहे. ह्या जगात आपण ख्रिस्तासाठी आपले जीवन कसे वापरले त्यासंबंधी .
पौलाने १ करिंथ ४:५ मध्ये म्हटले म्हणून त्या समयापूर्वी म्हणजे प्रभूच्या येण्यापूर्वी तुम्ही न्यायनिवाडा करूच नका; तो अंधारातील गुप्त गोष्टी प्रकाशात आणील आणि अंतःकरणातील संकल्पही उघड करील; आणि मग प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देव त्याची वाहवा करील. तर न्याय हा आपल्या ह्रदयाची वृत्ती लक्षात घेईल. फक्त आपली बाहेरची कामेच नाही.
इफिस ६:८ मध्ये पौल विश्वासीयांच्या न्यायबद्दल सांगतो की, “कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल.” दुसऱ्या शब्दांत ख्रिस्ती या नात्याने तुम्ही केलेली प्रत्येक चांगली गोष्ट मग ती मोठी असो किंवा छोटी असो ती त्याला प्रभूपासून परत मिळेल. तर आपण जे करतो ते कोणी पाहते का किंवा या जीवनात आपल्याला काय पारितोषिक मिळेल अशा गोष्टींची चिंता न करण्यासाठी ही किती चांगली प्रेरणा आहे बरे! प्रत्येक गोष्ट लिहिली जाते आणि देवाने ती पाहिली आहे. आपण केलेल्या प्रत्येक कामासाठी, कोणी पाहिले असेल व नसेल, त्यासाठी देव योग्य बक्षीस देईल.
आपल्या दुष्टतेबद्दल देवाचा प्रतिसाद
पुढे २ करिंथ ५:१० मध्ये पौल म्हणतो, “कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो.” शेवटचे विधान आहे बरे असो किंवा वाईट. याचा अर्थ काय? आता इथे नवा प्रश्न उद्भवतो की आपण केलेल्या वाईट गोष्टींचे प्रतिफळ मिळेल याचा अर्थ काय? जर आपल्या पापांची क्षमा झाली आहे , आणि देवाच्या न्यायालयात आपल्याला दोषमुक्त ठरवले आहे तर याचा अर्थ आपल्या पापासाठी आपल्याला शिक्षा मिळणार का? नाही याचा अर्थ असा नाही.
हे पौल १ करिंथ ३:११-१५ मध्ये स्पष्ट करतो असे मला वाटते. “येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो, तर बांधणार्या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वत: तारला जाईल; परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.”
आता २ करिंथ ५:१० मध्ये पौल जेव्हा म्हणतो “ कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, ह्यासाठी की, प्रत्येकाला, त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे; मग ते बरे असो किंवा वाईट असो.” आपल्याला वाईट मिळेल याचा अर्थ आपली वाईट कृत्ये जळून जातील. म्हणजे त्याने जर चांगले केले असते तर जे प्रतिफल त्याला मिळाले असते ते त्याला मिळणार नाही. हे पौल शिक्षा म्हणून पाहात नाही तर पारितोषिक नाही या अर्थाने पाहतो. हा देवाचा त्याच्या लेकराविरुद्ध असलेला क्रोध नाही. देवाने त्याच्या मुलांना त्यांच्या पापासाठी बक्षीस देणे हे अगदीच अयोग्य आहे. हे आपल्या सर्वांनाच कळते. जेव्हा हे घडेल तेव्हा खरे ख्रिस्ती लोक देवाविरुद्ध तक्रार करणार नाहीत. जे काही मिळेल त्याच्या कृपेमध्ये ते आनंद करतील आणि त्यांच्या आशीर्वादाचा प्याला भरून वाहील.
तर आपल्या येणाऱ्या न्यायाचे हे चित्र आहे. आपल्याला दंडाज्ञा नाही किंवा शिक्षा नाही. पण आपल्याला विविध प्रकारचे आशीर्वाद मिळतील., आनंदाच्या निरनिराळ्या वाटा दिसतील. निरनिराळ्या आकाराचे प्याले मिळतील पण प्रत्येक प्याला काठोकाठ भरलेला असेल.
Social