सितम्बर 2, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुम्हाला शुद्ध राहायचे आहे का?

बॉबी स्कॉट

जीवन आपल्याला कठीण गोष्टी करण्यास सांगते. विजय मिळविण्यासाठी खेळाडू  प्रचंड वेदना सहन करतात. जीव वाचवण्यासाठी डॉक्टर दीर्घ, नाजूक शस्त्रक्रिया करतात. राष्ट्रांचे रक्षण करण्यासाठी सैनिक दुर्गम अडचणींवर मात करतात. बाळांना जगात आणण्यासाठी माता तीव्र वेदना सहन करतात.

आणि येशू आपल्याला आणखी कठीण गोष्टी करण्यास सांगतो – खरं तर, अशक्य गोष्टी. त्याने पेत्राला नावेतून बाहेर पडण्याची आज्ञा दिली आणि पेत्राने आज्ञा पाळली आणि पाण्यावर चालला (मत्तय १४:२९). येशूने चार दिवसांपासून मृत असलेल्या लाजरला “बाहेर ये” अशी आज्ञा दिली आणि लाजर उठला आणि दफन केलेल्या कपड्यांमध्ये गुंडाळलेला बाहेर आला (योहान ११:३८-४४). जेव्हा येशू आज्ञा देतो तेव्हा तो विश्वासणाऱ्यांना आज्ञा पाळण्याचे सामर्थ्य देखील देतो.

आता, येशूने तुम्हाला शुद्ध राहण्याचे आवाहन केले आहे यावर विचार करा “जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील”  (मत्तय ५:८). कधीकधी, शुद्धतेची लढाई जिंकणे अशक्य वाटते का? कधी कधी आपण इतके निराश होऊ शकतो की येशूने त्या पंगू माणसाला विचारलेला प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, “तुला बरे होण्याची इच्छा आहे का?” (योहान ५:६). जवळजवळ चाळीस वर्षे  पांगळ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीला हा प्रश्न विचारणे  विचित्र वाटते, बरोबर ना? पण कदाचित इतकी वर्षे वाट पाहिल्यानंतर, तो पांगळा माणूस कधीतरी बरे होण्याची आशाच गमावत होता. येशूने विचारले कारण त्याची अशी त्याची इच्छा होती की मशीहा, जगाचा तारणारा, देवाचा पुत्र या नात्याने तो कोणालाही बरे करू शकतो हे सर्वांना कळावे. मग येशूने त्या पांगळ्या माणसाला त्याची बाज उचलून चालण्याची आज्ञा दिली आणि तो चालू लागला.

आपल्यासाठी मुद्दा स्पष्ट आहे: येशूच्या आज्ञा आपल्याला कितीही कठीण किंवा अशक्य वाटत असल्या तरी, प्रभू म्हणून येशू आपल्याला आज्ञा पाळण्यास शक्ती देऊ शकतो. ही उत्तेजनदायक बातमी आहे. म्हणून, जर तुम्हाला अश्लील व्हिडीओ पाहणे थांबवण्यापासून, हस्तमैथुन सोडण्यासाठी आणि अशुद्ध नातेसंबंधात राहण्याबद्दल पश्चात्ताप करण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर तुम्ही येशूला प्रामाणिकपणे या प्रश्नाचे उत्तर द्या: “तुला शुद्ध व्हायचे आहे का?” कारण तो तुम्हाला मुक्त करू शकतो. शुद्धपणे जगण्याचा प्रयत्न करणारा ख्रिस्ती म्हणून वासनेविरुद्धच्या तुमच्या युद्धात खालील तीन बायबलसंबंधी सूचनांनी स्वतःला सज्ज करा.

१. तुमच्या पापाचा द्वेष करा

पापावर प्रेम करणारा कोणीच खऱ्या रीतीने येशूला त्याला ते मारण्यासाठी सामर्थ्य दे असे सांगणार नाही. आणि येशू दुटप्पी मनाच्या प्रार्थनांचे उत्तर देत नाही. तो भग्न, पश्चात्तापी हृदयाचे रडणे ऐकतो आणि उत्तर देतो. म्हणून प्रार्थना करा की आत्मा तुम्हाला दोषी ठरवेल (योहान १६:७-८) आणि तुमच्या पापाची खोली तुम्हाला दाखवेल (स्तोत्र १३९:२३-२४).  ज्या गोष्टींचा देव द्वेष करतो त्याबद्दल आत्मा तुम्हाला द्वेष करण्यास मदत करेल अशी प्रार्थना करा:  “तुझ्या विधींच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते, म्हणून मी प्रत्येक असत्य मार्गाचा द्वेष करतो ” (स्तोत्र ११९:१०४).

‘सिक्रेट सेक्स वॉर्स: अ बॅटल क्राय फॉर प्युरिटी’ या पुस्तकात एच.बी. चार्ल्स पुढील कथा सांगतात:

एक लहान मूल एका अतिशय मौल्यवान फुलदाणीशी खेळत होते ज्याला त्याने स्पर्शही करायचा नव्हता. आणि अर्थातच, त्याने त्यात हात घातला आणि तो बाहेर काढता येईना. त्याच्या वडिलांनीही मुलाचा हात मोकळा करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. त्याच्या पालकांनी फुलदाणी तोडण्याचा विचार केला. त्यापूर्वी वडील म्हणाले, “मुला, तुला सोडवण्यासाठी आणखी एकदा प्रयत्न करू या. मी तीन म्हणताच, तुझा हात उघडा आणि तुझी बोटे शक्य तितकी सरळ धरा आणि नंतर ओढ.” तो लहान मुलगा जे म्हणाला ते ऐकून त्यांना आश्चर्य वाटले, “ नाही बाबा, मी अशी बोटे बाहेर काढू शकत नाही. जर मी असे केले तर मी माझे पैसे मला  टाकून द्यावे लागतील!”

पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांच्या हृदयात आपल्या पापाचा द्वेष करण्यास प्रवृत्त करतो जेणेकरून आपण ते सोडून देऊ. हा द्वेष असा द्वेष नाही जो एखाद्या व्यक्तीला आत्म-तिरस्कार आणि प्रायश्चित्ताची तळमळ देतो. आत्म्याने निर्माण केलेला पापाचा द्वेष आपल्याला पापाच्या पकडीतून इम्मान्युएलच्या नसांमधून काढलेल्या रक्ताने भरलेल्या झऱ्याकडे वळवतो. तिथेच येशू आपली अंतःकरणे  आणि वासना शुद्ध करतो त्यामुळे आपले सर्व घाणेरडे डाग निघून जातात.

आत्म्याद्वारे  पापाची खात्री झालेले ख्रिस्ती पौलाप्रमाणे येशूकडे ओरडतात, “किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवील” (रोम. ७:२४)? निराशेच्या त्या विहिरीतून, आपल्याला ख्रिस्ताने मिळवलेल्या पापावरील क्षमा आणि विजयात आत्म्याला आनंद देणारी आशा मिळते. तेथे, आपण पौलासोबत उद्गार काढू, “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो” (रोम. ७:२५). म्हणून, स्वतःची फसवणूक करू नका. कोणीही पापाचा पश्चात्ताप करू शकत नाही आणि त्याच वेळी त्याची कदर करू शकत नाही. जगिक दुःख आणि खरा, जीवन देणारा पश्चात्ताप यात हाच शाश्वत, खोल फरक आहे (२ करिंथ. ७:१०).

२. ख्रिस्तामध्ये तुमचा आत्मा तृप्त करा.

पापाची खात्री झालेल्या लोकांसाठी आत्मा सुवार्ता खरी बनवतो. तो आपल्याला खात्री देतो की येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे, ख्रिस्त आपला प्रभू बनला आहे, तो भग्न पाप्यांना वाचवतो, त्याच्या मृत्यूने आपल्या पापासाठी प्रायश्चित्त दिले आहे, तो चेपलेला बोरू मोडत नाही, मिणमिणीत वात बुजवत नाही. तो त्याच्या निवडलेल्या लोकांना खात्री देतो की येशूने आपल्याला वाचवले आहे आणि तो आपल्याला त्याच्यासारखे बनण्यास सामर्थ्य देतो (गलती. ५:२२-२५).

 उपासनेद्वारे आपल्याला समाधानी करून तो  हे करतो. येशूने अनैतिक शोमरोनी स्त्रीला तारले आणि असे करून, त्याने तिला जिवंत पाणी दिले जे तिची तहान भागवणार होते. त्यामुळे ती पुन्हा अनैतिक संबंधांच्या इच्छेला बळी पडणार  नव्हती (योहान ४:१३-१४). हाच येशू आज जिवंत आहे. तो स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकाराने पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तो अजूनही ज्यांचे तारण करतो त्या सर्वांना तो आपला आत्मा देतो (१ करिंथ. १२:१३) आणि आत्म्याद्वारे पश्चात्तापी पापी लोकांच्या आत्म्यांना तृप्त करतो.

येशू म्हणतो, “माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो” (योहान १७:१३). म्हणून, ख्रिस्ताच्या कृपेने खरेदी केलेल्या, सुवार्तेद्वारे दिलेल्या देणग्यांचा आस्वाद घ्या आणि तुमचा आत्मा आनंदित करा. जर तुम्ही देवाचे मूल असाल, तर देवाशी तुमचा समेट झाला आहे याचा आनंद घ्या. तुम्हाला क्षमा झाली आहे. तुम्हाला अनंतकाळचे जीवन आहे. तुमचा नवा जन्म झाला आहे. तुम्हाला अंधाराच्या राज्याच्या सत्तेतून मुक्त करण्यात आले आहे. तुम्ही जगावर विजय मिळवला आहे. देव तुमच्यावर प्रीती करतो. तुम्हाला कधीही एकटे सोडले जाणार नाही किंवा त्याच्या प्रीतीपासून वेगळे केले जाणार नाही. जेव्हा तुम्ही त्याला जसे आहे तसे पाहता तेव्हा तुम्ही त्याच्यासारखे बनाल.

आणि दरम्यान, तो देत असलेल्या आशेवर तुमचे मन स्थिर करून तुम्ही शुद्ध व्हाल. “जो कोणी त्याच्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो” (१ योहान ३:३). आत्मा दररोज तुमची आशा येशूवर आणि त्याच्या सुवार्तेवर स्थिर करू इच्छितो. तो दररोज तुमच्या आत्म्याला या सर्व शुभवर्तमानांच्या आशीर्वादाने आणि इतर गोष्टींच्या मेजवानीने तृप्त करू इच्छितो. म्हणून तारण  झालेल्यांच्या मेजवानीत मुक्तपणे खा.

३. देहाची कृत्ये मारून टाका.

देवाचे वचन आज्ञा देते की आपण “तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ — ह्याला मूर्तिपूजा म्हणावे — हे जिवे मारा” (कलस्सै ३:५).  “कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे” (१ थेस्स. ४:३). परंतु लैंगिक मोहांना “नाही!” म्हणणे पाण्यावरून चालण्याइतके अवघड आहे. म्हणून आपण असा विश्वास ठेवला पाहिजे की येशू आपल्याला अशक्य गोष्टी करण्याची आज्ञा देतो आणि सामर्थ्य देतो.

पवित्र आत्मा तुमचा मदतगार त्याला  तुम्हाला  मदत करू द्या. तुमच्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत राहा (इब्री लोकांस १२:२). जेव्हा पेत्राने येशूवरून आपली नजर हटवली तेव्हा तो बुडू लागला. पण देवाचा प्रिय संत, पेत्र बुडला नाही. बुडताना तो ओरडून म्हणाला, “प्रभूजी, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास” (मत्तय १४:३०-३१)?

आत्मा तुम्हाला तो जे करायला बोलावतो ते करण्यास सामर्थ्य देतो याबद्दल शंका घेऊ नका आणि जेव्हा तुम्हाला त्याच्या मदतीची आवश्यकता असेल तेव्हा तो तुम्हाला नाकारेल यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या शुद्धतेसाठी लढणे  हे सोपे नाही; ते युद्ध आहे. तुमचा वधस्तंभ उचलणे आणि दररोज मरणे (लूक ९:२३) ही एक मंद, वेदनादायक प्रक्रिया आहे. तरीही नवा जन्म  घेतलेले विश्वासणारे ते करू शकतात आणि करतील. कारण येशू आपल्यासाठी आणि आपल्या ऐवजी  मरण पावला  (रोम. ६:६-७) आणि आपल्याला सामर्थ्य देण्यासाठी त्याचा आत्मा दिला (रोम. ८:१३).

आपले युद्ध जिंकता येते

आपला सुरुवातीचा प्रश्न थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारून संपवू या: येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान आणि त्याच्या आत्म्याची देणगी तुम्हाला शुद्ध करू शकते यावर तुमचा विश्वास आहे का? मी प्रार्थना करतो की तुम्ही ते करावे.  अमर्यादपणे. येशूच्या क्रूसाने आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी पापाविरुद्धच्या युद्धाची  दिशा बदलवली . हे एक जिंकता येणारे युद्ध आहे – पूर्णपणे जिंकता येणारे नाही, परंतु खरोखर जिंकता येणारे – येशूमुळे.

म्हणून आजच आत्म्याच्या सामर्थ्याने जगण्याचा प्रयत्न करा, जबाबदारी घ्या आणि देहाच्या कृत्यांना मारून टाका. मग उद्या पुन्हा येशूच्या सुवार्तेची कृपा अनुभवा आणि तुमच्या शुद्धतेसाठी आणि तो तुम्हाला देत असलेल्या प्रत्येक उद्यासाठी लढा. तुम्ही लैंगिक शुद्धतेचे युद्ध जिंकू शकता.

Previous Article

सहनशक्ती आणि वेदना ही उपासना आहे

You might be interested in …

तुमच्या काळ्याकुट्ट दिवसामध्ये देवावर भरवसा ठेवणे डेविड मॅथिस

“कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत” (यशया ५५:८-९). देव […]

तुमचा देव तुमच्या समस्येपेक्षा मोठा आहे स्कॉट हबर्ड

देवाची अभिवचने आपल्या जीवनात अनेकदा त्यांचे सामर्थ्य गमावतात कारण खुद्द देवच आमच्या डोळ्यांपुढे लहान झालेला असतो. आपण देवाची डझनभर अभिवचने पाठ म्हणू शकू. पण आपल्या अंत:करणात देव हा आता सैन्यांना जिंकणारा  आणि समुद्र दुभागणारा राजा […]