ख्रिश्चन जीवन प्रकाश वाचण्यामध्ये तुम्हाला आनंद लाभत आहे अशी माझी खात्री आहे. हा अंकही नेहमीप्रमाणेच विविध प्रकारचे लेख, वृत्त, मुलांचे पान अशा सदरांनी युक्त असून या नव्या वर्षात पाऊल टाकताना तुम्हांला प्रेरणादायी ठरेल अशी आशा आहे.
नव्या वर्षाची सुरवात करताना प्रत्येक गोष्ट नवी आहे या विचाराने सुरुवात करण्याची परंपरा आहे! अशा “नवेपणा”च्या विषयावर संदेश दिले जावे अशी आपली अपेक्षा असते आणि याच विषयावर लेख लिहिले जावे असे आपल्याला वाटते. पण यामध्ये किती सत्य आहे? खरं तर कोणती गोष्ट खऱ्या अर्थाने नवीन आहे?
एकदा सणाचे दिवस संपले आणि पुन्हा वास्तवात प्रवेश केला की जीवन पुन्हा एकदा त्याच जुन्या गोष्टींमध्ये गुरफटून जाते. आपल्या जुन्या सवयी व पापी मार्गामध्ये आपण चालत राहतो. आपली वैयक्तिक आणि कौटुंबिक आध्यात्मिक स्थिती तसेच आपली मंडळीची स्थिती अगदी जशीच्या तशीच असते. आपले नवे कपडे आणि आपल्या घराला दिलेला नवा रंग जुनेपणामध्ये फिका पडू लागतो आणि अखेरीस काहीच नवे नसते.
पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की–आणि ही एक चांगली बातमी आहे – सुवार्ता हे कधीही न बदलणारे शुभवर्तमान आहे. हे अजूनही पाप्यांचे रूपांतर करणारे आणि आपल्याला नवजीवन देणारे देवाचे सामर्थ्य आहे. आपल्या ख्रिस्ती लोकांना ख्रिस्तामध्ये हे नवीन जीवन लाभले आहे का? आपण परंपरेने ख्रिस्ती आहोत की सुवार्तेची हाक ऐकून आपल्या पापापासून फिरून आपण येशूकडे अंत:करणपूर्वक वळले आहोत?
ह्यामुळे सर्व काही नवे केले जाईल. ह्या नवीन जीवनाचा आनंद घ्या आणि हा सुवार्तेचा संदेश २०१६ सालामध्ये आपण इतरांना देऊ या.
क्रिस विल्यम्स
अध्यक्ष , लव्ह महाराष्ट्र




 
	 
		 
			 
			 
			 
			 
			
Social