मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. योहान १४:२७
लेखक: ऑस्वल्ड चेंबर्स
आपल्या वैयक्तिक जीवनात काही समस्या आली की देवाला दोष देण्याचा मोह आपल्याला होऊ लागतो. पण चुकीची बाजू आपली असते देवाची नाही. देवाला दोष देणे हेच दाखवते की आपल्या जीवनात कोठेतरी असलेली अवज्ञेची वृत्ती सोडायला आपण तयार नाही. पण ही वृत्ती सोडून देताच सर्व काही प्रकाशासारखे लख्ख होते. जोपर्यंत आपण दोन धन्यांची सेवा करायचा प्रयत्न करतो- आपली आणि देवाची –तोपर्यंत संशय आणि गोंधळ यासोबत आपल्याला समस्याही असतील. आपली वृत्ती देवावर पूर्ण भरवसा ठेवणारी असायला हवी. एकदा आपण या बिंदुला येऊन पोचलो की, देवाची व्यक्ती म्हणून जीवन जगणे सोपे जाते. जेव्हा जेव्हा पवित्र आत्म्याचा अधिकार आपण हिरावून घेऊन तो स्वत:च्या हेतूंसाठी वापरू लागतो तेव्हा तेव्हा आपल्या जीवनात समस्या निर्माण होतात.
जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे आज्ञापालन करता तेव्हा त्याच्या संमतीचे चिन्ह तो देतो ते म्हणजे त्याची शांती.तो आपल्याला अमर्याद, खोल अशी शांती देतो . जग देते तशी ही नैसर्गिक शांती नसते तर ख्रिस्ताची शांती. जेव्हा जेव्हा शांती येत नाही तेव्हा वाट पाहा किंवा ती का येत नाही याची कारणे शोधा. जर तुम्ही स्वत:च्या स्फूर्तीने कृती करीत असाल किंवा इतरांनी आपल्याला पाहावे म्हणून काहीतरी विशेष करीत असाल तर ख्रिस्ताची शांती तुम्हाला मिळणार नाही. यामुळे तुमचे देवाशी ऐक्य आहे किंवा देवावर विश्वास आहे हे दिसत नाही. साधेपणाचा, स्पष्टतेचा, आणि एकतेचा आत्मा हा तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याद्वारे जन्म घेतो तुमच्या स्वत:च्या निर्णयामुळे नाही. आमच्या स्वेछेच्या निर्णयांना देव साधेपणा व त्याच्याशी एकता असावी म्हणून आव्हान देतो.
जेव्हा जेव्हा मी आज्ञा पाळत नाही तेव्हा माझ्यामध्ये प्रश्न निर्माण होतात . जेव्हा मी देवाची आज्ञा पाळतो तेव्हा समस्या येतात पण त्या देव आणि माझ्यामध्ये नसतात. तर त्या देवाचे सत्य वचन मी विस्मयतेने तपासून पाहत राहावे यासाठी साधन ठरतात. जर देवामध्ये अन माझ्यामध्ये कोणतीही समस्या आली तर ती मी त्याची आज्ञा न पाळण्याचा परिणाम असतो. मी आज्ञा पाळत असताना ज्या काही समस्या येतात ( आणि अशा समस्या येतच राहतील ) त्यामुळे माझा आनंद वाढतच जाईल , कारण माझ्या पित्याला हे ठाऊक आहे व तो माझी काळजी घेतो ही खात्री दृढ होत राहते . मग मी अपेक्षेने तो माझ्या समस्या कशा सोडवतो हे पाहत राहीन.
Social