Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on दिसम्बर 13, 2017 in जीवन प्रकाश

ख्रिस्तजन्मदिनाच्या वेळी तुम्हाला काय ठाऊक असावे असे दु:खी लोकांना वाटते?

ख्रिस्तजन्मदिनाच्या वेळी तुम्हाला काय ठाऊक असावे असे दु:खी लोकांना वाटते?

लेखक: नॅन्सी गर्थी

“नाताळ सुखाचा जावो, नव्या वर्षाच्या शुभेच्छा” जसजसे वर्ष संपू लागते तसे जेथे तुम्ही वळता तेथे कोणीतरी तुम्हाला सांगत असते की तुम्ही सुखी, आनंदी असावे.
पण ज्या लोकांना नुकताच प्रिय व्यक्तीचा वियोग सहन करावा लागला हे त्यांना आनंदापेक्षा  हे सणावाराचे दिवस कसे तरी पार करण्याची वेळ असते. परंपरा आणि समारंभ जे या सणामध्ये आनंद देऊन अर्थभरीत करतात ते वेळोवेळी आठवण करून देतात की ज्या व्यक्तीवर आपण प्रेम केले ती आता येथे नाही. त्यांच्यातील कित्येक जणांना वाटते  की जानेवारी २ पर्यंत कोठेतरी लपून राहावे.
आपल्यातले जे आपण अशा दु:खी व्यक्तीच्या भोवताली असतो ते त्यांचे दु:ख शमवू शकत नाही तरी आपण त्यांच्या बाजूला उभे राहून या सणाच्या दिवसात त्यांना दु:खामध्ये विशेष सहानुभूती दाखवू शकतो. दु:खी लोकांची अशी इच्छा असते की या सणामध्ये निदान खालील पाच गोष्टी लोकांनी समजून घ्याव्यात.

१. अगदी उत्तम समयसुद्धा कोणीतरी नाही या जाणीवेने वेळोवेळी थांबतात.
एका मैत्रिणीशी झालेले संभाषण मला आठवते. आमची मुलगी होप हिच्या मृत्यूनंतर कोठेतरी सुट्टीला जाण्याचा आम्ही विचार केला होता. “ हे  छान होईल तुमच्यासाठी “ ती म्हणाली, आणि या उद्गारांना माझी संमती असावी अशी तिची अपेक्षा होती. जेव्हा तुमच्या कुटुंबातील कोणाला तुम्ही गमावता तेव्हा अगदी उत्तम समयसुद्धा कसे अपूर्ण असतात हे तिला कसे समजावून सांगावे हेच मला समजेना. कोणीतरी नाहीये. उत्तमातल्या उत्तम दिवसाला आणि आनंदाच्या समारंभाला दु:खाची झालर असते. जेथे कोठे तुम्ही जाता तेथे हे दु:ख तुमच्यासोबत असते.

२. सामाजिक भेटीगाठी कठीण असतात
जेव्हा तुम्ही दु:खी असता तेव्हा गर्दीची ठिकाणे इतकी कठीण का वाटतात हे मला कधी समजले नाही. इतकी मोठी गोष्ट घडल्यानंतर जुजबी बोलणी करणे कठीण वाटते. नवीन लोकांना भेटताना कुटुंबाबद्दल प्रश्न विचारले जातात.  जोडीदार गमावल्यानंतर जर एखाद्या खोलीत सगळी जोडपी बसलेली असतील  किंवा तुमचे मूल गेल्यानंतर एखाद्या मुलांनी भरलेल्या समारंभास जाणे हे ह्रदयावर आघात करणारी आठवण करून देते की तुम्ही काय गमावलेत. जर कोणी नुकतेच आपले प्रिय जन गमावले असतील तर त्यांच्यासाठी सुट्टी ही आनंद करण्यासाठी नसते तर तग धरण्यासाठी असते.
जर तुम्ही तुमची  सुट्टी आखली आणि त्यासाठी दु:खी व्यक्तीने सामील व्हावे म्हणून तिला बोलावले तर त्यांना याची कल्पना त्यांना द्या की शेवटच्या क्षणाला त्यांनी नाही म्हटले किंवा सुट्टीचे दिवस कमी केले तरी हरकत नाही; कारण हे तुम्ही समजू शकता.
जर काही समारंभ असेल आणि दु:खी व्यक्तीला तुम्ही त्यासाठी बोलावले तर तिला विचारा की तुम्हाला घेण्यास आम्ही येऊ का ? आणि त्या समारंभात सर्व वेळ तिच्यासोबत तिला आधार देण्यासाठी राहा. जर तुमची अशा समारंभात किंवा इतरत्र अशा दु:खी व्यक्तीशी गाठ पडली तर तिला/त्याला सांगा की तिचा वियोग झालेल्या व्यक्तीची तुम्हीही अजूनही आठवण करता. त्या व्यक्तीच्या आठवणीसंबंधी बोलण्यास त्यांना उद्युक्त करा. गत व्यक्तीचे नाव घेण्यास घाबरू नका. हे त्या दु:खी व्यक्तीच्या जिवाला मलमपट्टी केल्यासारखे वाटेल.

३. नातेवाईकांमध्ये  सहज वावरणे कठीण व अस्वस्थ वाटते
दु:ख हे अस्वस्थ करते- विशेषत: आपण ज्यांच्या अधिक जवळ असतो त्यांच्यामध्ये.
मी आणि माझे पती ज्यांनी आपली मुले गमावली आहेत त्यांच्यासाठी रीट्रीट घेतो. या जोडप्यांमध्ये एक विषय असतो की नातेवाइकांसोबत सुट्टीला जाणे किती अस्वस्थपणाचे असते. त्यांना ठाऊक असते की काही कुटुंबियांना वाटते की आता त्यांनी बराच काळ दु:ख भोग्ले आहे . आता येथून पुढे जाण्याची गरज आहे. इतर काहींना गेलेल्या व्यक्तीबद्दल बोलायला हवे असते पण ते कसे करावे हे त्यांना समजत नाही. कित्येक वेळा त्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेखही केला जात नाही आणि दु:खी व्यक्तीला वाटते की आता ही गेलेली व्यक्ती कुटुंबातून पुसून टाकली गेली आहे.
एखादी अशी दु:खी व्यक्ती नातेवाइकांसोबत सुट्टीला जात आहे असे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपासून असलेल्या अपेक्षा विचारा. जर आपल्या प्रिय व्यक्तीची अशा वेळी खास आठवण केली जावी अशी जर त्यांची इच्छा असेल व त्याच वेळी असे होणार नाही याची भीतीही त्यांना वाटत असेल तर तुम्ही त्यांना उत्तेजन द्या की आपल्या कुटुंबियांना त्यांनी पत्र लिहावे व कशामुळे आपल्याला समाधान होईल ते कळवावे. कारण त्यांच्या अपेक्षा नातवाईकांना आपोआप समजणार नाहीत.

४. अश्रू ही समस्या नाही
आपल्या बहुतेकांना दु:खाने अश्रू येऊ लागतात.- अपेक्षा नसताना अवेळी ते येतात. कधीकधी दु:ख करणाऱ्या व्यक्तीला समजते की आपले अश्रू ही जवळच्या लोकांना समस्या वाटते व ती दूर करण्याचा ते प्रयत्न करतात. अश्रू म्हणजे ही व्यक्ती दु:खाशी योग्य मुलाबला करत नसावी. पण कोणाला तरी गमावण्याचे गहन दु:ख हे अश्रूद्वारेच बाहेर पडते. अश्रू हे शत्रू नाहीत. अश्रू हे विश्वासाची कमतरता दाखवत नाहीत. अश्रू ही देवाची देणगी आहे आपल्या हानीचे दु:ख धुवून टाकायला ते मदत करतात.
तुमच्या भोवताली असणाऱ्या दु:ख करणाऱ्या व्यक्तीला आपल्या अश्रूबद्दल ओशाळवाणे वाटू नये हे त्यांना सांगणे हे एक मोठे दान आहे- त्यांना तुमच्या सोबत रडू द्या. याहून मोठे दान म्हणजे ज्या प्रिय व्यक्तीला  त्यांनी गमावले आहे त्याच्यासाठी तुम्हीही अश्रू ढाळू शकता. त्यामुळे त्यांच्यासोबत तुम्हीही त्या व्यक्तीची आठवण करता याची खात्री त्यांना होईल.

५. नाताळ इतका सुखाचा का असावा याची आठवण देत राहणे कठीण आहे
ख्रिस्तजन्माची गीते गाताना काहींचा आशय असतो, “आशेचा आनंद, थकले भागलेले  जग उत्सव करते.”  आपल्या भोवती असलेल्या दु:खी लोकांना जीवनाचा थकवा जाणवतो आणि आपल्याभोवतीचे लोक एवढा आनंद कसा करू शकतात असे वाटते. त्यांचा एकाकीपणा व निराशा ख्रिस्ताने खर्या रीतीने मोडून टाकण्याची एक प्रखर गरज त्यांना भासते. जरी आपण त्यांना उपदेश करण्याची गरज नाही तरी देव स्वत: आपल्याला सोडवण्यास ख्रिस्तामध्ये आला हे सांगण्याची संधी आपण शोधावी व त्यांना समाधान व आनंद द्यावा.
येशूच्या जीवनाची सुरुवात कडब्याच्या गव्हाणीत झाली आणि त्याचा मृत्यू लाकडी क्रुसावर झाला . पण हे मूर्खपणाचे अर्थहीन मरण नव्हते. ते मृत्यूला जिंकणारे मरण होते. त्यानंतर नव्या  पुनरुथानाचे जीवन आले.. इब्री लोकांच्या पत्राचा लेखक स्पष्ट करतो. “आणि ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोही त्यांच्यासारखाच रक्तामांसाचा झाला , हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे (इब्री २:१४). सध्या मृत्यूला इतके दु:ख आणण्याचे हे सामर्थ्य कायम असेच राहणार नाही. येशूने आपल्या पहिल्या येण्यामध्ये मरणाचा पराभव करून ज्याची सुरुवात केली त्याचे पूर्ण फळ तो जेव्हा पुन्हा येईल तेव्हा मिळेल.

हीच ख्रिस्तजन्माची महान आशा आहे आणि जे नाताळाच्या वेळी दु:खात आहेत त्यांना पण ती सांगायची आहे.-“की पलीकडे एक गौरवी पहाट उगवत आहे” जो ख्रिस्त बाळ म्हणून जन्माला आला व आपल्याऐवजी मरण पावला तो एक दिवस पुन्हा येईल आणि आपले राज्य स्थापित करील.आणि जेव्हा हे तो करील तेव्हा “तो त्यांच्या डोळ्यांतील अश्रु पूसून टाकील (प्रगटी२१:४).