लेखक: टीम चॅलीस
आमचे संभाषण चालले असताना एकजण म्हणाला, “ख्रिस्ती जन द्वेष बाळगू शकतच नाहीत.” याला पर्याय नाही. हा दुर्गुण आपण चालवून घेऊ शकतच नाही .पण ख्रिस्ती लोक करू न शकणारी ही एकच गोष्ट नाही. इतर अशी
अनेक वर्तने आहेत जी देव चालवून घेऊ शकत नाही. त्यांना देव पापी बंडखोर वृत्तीमध्ये गणतो. दु:खाची गोष्ट अशी की तरीही आपण ते थांबवत नाही. देवाच्या मुलांना या न शोभणाऱ्या गोष्टी आहेत असे देव ठाम सांगत असतानाही आपण अशा काही गोष्टी चालूच ठेवतो. यापैकी काही गोष्टी मी माझ्या जीवनात, कुटुंबात, सेवेत हाताळल्या आहेत त्या येथे मांडत आहे..
ख्रिस्ती लोक मनात द्वेष बाळगू शकत नाहीत.
जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याविरुद्ध गुन्हा करते तेव्हा तुमच्यापुढे दोन पर्याय असतात: त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकता किंवा ते समोरासमोर हाताळू शकता. (नीती १९:११, मत्तय १८:१५-१७). त्या व्यक्तीच्या विरुध्द ते जमेत न धरता सोडून देऊ शकता किंवा त्या त्या व्य्क्तीपुढे ते प्रेमाने आणून एका निरोगी निर्णयापर्यंत तुम्ही येऊ शकता. पण राग बाळगून वा कटुत्वाने ते तुम्ही धरून ठेवू शकत नाही. विश्वासी व्यक्तीसाठी हा पर्याय नाहीच.
ख्रिस्ती लोक क्षमा आवरून ठेवू शकत नाहीत.
जर एखादी व्यक्ती तुम्हाला क्षमा मागते तर तिची क्षमा करणे हे तुमचे कर्त्तव्य आहे (लूक १७;१-४). जरी त्या व्यक्तीने पुन्हा पुन्हा तुमचा गुन्हा केला आणि प्रत्येक वेळी क्षमा मागितली तरी प्रत्येक वेळी तिची क्षमा करणे तुमचे कर्तव्य आहे. त्या व्यक्तीने प्रथम थोडा ताप सहन करणे गरजेचे आहे , तिला थंड प्रतिसाद देणे आवश्यक आहे किंवा ती प्रमाणिकपणे हे करत नाही हे तुम्ही ठरवायचे नाही. देवाने जशी ताबडतोब व मोफत तुम्हाला क्षमा केली तशीच तुम्ही क्षमा करायची आहे.
ख्रिस्ती व्यक्तीने आपली संपत्ती साठवत ठेवत राहायचे नाही.
ख्रिस्ती व्यक्तीला पैसे कमावता यायला हवेत व तिने ते कमवावेत. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिने अधिक पैसे कमवणे जरुरीचे आहे. गरीबीमध्ये काही अमोल गुण नाही आणि श्रीमंतीत पण काही त्रासदायक गुण नाही. पण ख्रिस्ती लोकांनी स्वत:साठी संपत्ती साठवत बसायचे नाही (मार्क १०:२३). तर ख्रिस्ती जनांनी हे समजून घ्यायला हवे की देवाच्या कार्यासाठी पैसा हे साधन आहे. यामध्ये स्वत:ची आपल्या परिवाराची तरतूद करणे व भविष्याची पुरेशी तरतूद करणे यांचा समावेश आहेच पण त्यासोबत देवाच्या कार्याला इथे पुरवठा करणे हे सुद्धा येते. आपण किती पैसा साठवतो ह्यावरून देव संपत्ती अजमावत नाही तर त्याच्या कार्याला किती दिले त्यावरून तिची किंमत करतो.
ख्रिस्ती जन तक्रार करत नाहीत.
कुरकुर करणे हे अनेकांचे लाडके पाप आहे. काही जण तर पुढे जाऊन तो एक चांगला गुण आहे असे त्याला हाताळतात.- कॉमेडीच्या नावाखाली दाखवलेल्या टी व्ही शोचा विचार करा नी त्यात किती कुरकुर असते ते आठवा. परंतु बायबल दाखवते की कुरकुर करणे ही ह्रदयाची समस्या आहे आणि असे वर्तन ख्रिस्ती व्यक्तीला शोभत नाही. आपल्याला सांगितले आहे की सर्व काही कुरकुर न करता करा” (फिली. २:१४; तसेच १ पेत्र ४:९; याकोब ४:१-३). कुरकुर करण्याऐवजी कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्ही प्रार्थना करायची आहे देवाने केलेल्या पुरवठ्याबद्दल त्याचे आभार मानायचे आहेत .
ख्रिस्ती लोकांनी एकटेच पुढे जायचे नाही
मानवाच्या अंत;करणात जीवनात एकटेच पुढे जाण्याची एक स्वतंत्र, तीव्र, खोल इच्छा असते. तथापि ख्रिस्ती लोकांनी मंडळ्या स्थापन कराव्यात, विश्वसियांच्या समाजात जीवनाची देवाणघेवाण करावी (इब्री १०:२५) अशी आज्ञा त्यांना दिली आहे. एकटे ख्रिस्ती हे देवाची आज्ञा मोडणारे आहेत व देवाच्या सर्वात मोठ्या कृपेला ते स्वीकारत नाहीत. ख्रिस्ती समाजाच्या बाहेर राहणे हा ख्रिस्ती व्यक्तीसाठी योग्य पर्याय नाही.
ख्रिस्ती व्यक्ती पाळकासाठी एक खुपणारा काटा असू शकत नाही.
कित्येक मंडळ्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा काही लोक पाळकाने प्रामाणिक राहावे, त्याच्या प्रत्येक हालचालीला आवाहन द्यावे, त्याला शंकेसाठी कारण देवू नये म्हणून त्याच्यावर पाळत ठेवून असतात. सैतानाचा हस्तक असणे ही त्यांची मंडळीतील सेवा आहे असे त्यांना वाटते – मंडळीच्या पुढार्यांना आळा घालणे हीच त्यांची सेवा असते. पण बायबलमध्ये अशा सेवेला परवानगी नाही. तर असे सांगितले आहे की, “ आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दु:खाने न करता आनंदाने करावे” {इब्री १३:१७).
ख्रिस्ती लोक फळ न देता राहू शकत नाहीत.
आळस व फळ न देणे आपल्यापासून दूर असायला हवेत. कार्यक्षम असणे कठीण असते व मन विचलित होणे सोपे असते. आपल्या जबाबदारीतून सुटका करून मनोरंजनकडे जाण्यासाठी नेहमीच कारण मिळू शकते. पण ख्रिस्ती लोकांनी आळशी राहू नये. त्यांनी फळ द्यायलाच हवे. फलद्रूप असणे या शब्दाचा बेअर्थ केला गेला आहे व त्याच्याबद्दल गैरसमज आहेत. जर त्याचा योग्य अर्थ समजून घेतला तर तो ख्रिस्ती जीवनाचा गाभा आहे. फलद्रूप असणे याची सर्वात चांगली व्याख्या म्हणजे इतरांसाठी चांगले करून देवाच्या नावाचा गौरव करणे (गलती ६:१०, इब्री १०:२४). यासाठीच तुम्ही या जगात आहात.
ख्रिस्ती लोकांसाठी एखादे आवडते पाप नसते.
याविषयी चूक करू नका. हे कठीण व निराशाजनक होवू शकते. अशी लाडकी पापे मारून टाकणे हे अतिशय कठीण काम असते. अशी पापे की ज्यांचे तुम्ही आयुष्यभर लाड केलेत आणि आता तुम्हाला ती फारच आवडतात ( कलसै ३:५). ख्रिस्ती जनांनो तुमच्यासाठी लाडके, क्षुल्लक पाप नसतेच – असे पाप कि जे पवित्र आत्म्याच्या मदतीने मुकाबला करण्यास तुम्ही नाकार करता. कोणतेही पाप मग ते कितीही लहान असो किवा तुम्हाला मोलाचे वाटत असो त्याच्या मुलाबला करून ते नष्ट केलेच पाहिजे.
ख्रिस्ती जन काळजी करू शकत नाहीत
कित्येक ख्रिस्ती लोकांना वाटते की काळजी करणे, असंतुष्ट असणे हे पाप करण्यापेक्षा कमी आहे. काही जण तर असाही विचार करतात की काळजी करणे हे आवश्यक आहे आणि जीवनाची दु:खे चिंता याविषयी काळजी न करणे म्हणजे बेफिकिरी दाखवणे. पण खरे तर काळजी न करणे हे देवाच्या इच्छेसंबंधी असलेली आपली खात्री दाखवते. देव आपल्या लोकांना सांगतो की चिंता करू नका, काळजी करू नका तर त्याऐवजी सर्व काही त्याच्या प्रेमळ व चांगल्या तरतुदीसाठी सोपवून द्या (फिली.४:६-७) .काळजी करणे हा ख्रिस्ती व्यक्तीसाठी न्याय्य पर्याय नाही.
ख्रिस्ती व्यक्तीने एकमेकांविषयी वाईट बोलू नये.
एकमेकांविषयी चहाड्या करीत बसणे, मत्सराने खोटी माहिती पसरवणे हे योग्य नाही हे आपल्याला माहीत आहे. तरीही आपण इतर मार्गांनी हे करत राहतो – कधी प्रार्थनेच्या विनंतीच्या वेषात, कधी मदत करा म्हणून विनंतीमध्ये किंवा विनोद करून. ख्रिस्ती या नात्याने आपण इतरांविषयी वाईट बोलण्याची व आपले शब्द चुकीच्या पद्धतीने वापरण्याच्या प्रवृत्तीची आपल्याला जाणीव असायला हवी ( याकोब ३:६,९). आणि जर तुम्ही त्या व्यक्तीसमोर असताना जे बोलू शकला नसता अशा त्या व्यक्तीविरुद्धच्या गोष्टी इतरांसमोर बोलण्यापासून स्वत;ला आवरायला हवे. शब्द वापरताना ते एकमेकांची वृद्धी होण्यासाठी वापरावे, एकमेकांना तोडण्यासाठी नाही.
तर अशा ह्या अनेक गोष्टींपैकी काही गोष्टी आहेत ज्या ख्रिस्ती लोक करू शकत नाहीत. या गोष्टी तुम्ही करू शकत नाहीत कारण त्या देवाला सोडून आहेत, त्याला धरून नाहीत. त्या पापाला धरून आहेत तारणाला नाही. या प्रत्येक बाबीतून देवाने आपल्याला त्याच्या शुभवर्तमानाद्वारे मुक्त केले आहे, नवे आणि – प्रीती, क्षमा, उदारपणा, उत्तेजन, समाज, अधीनता, कष्टाळूपणा, शुद्धता आणि स्वातंत्र्य यामध्ये चांगले जीवन जगण्यासाठी. या गोष्टी आपण करणार नाही कारण त्यामुळे आपल्याला व आपल्या भोवतीच्या लोकांना अपाय पोचेल.
Social