लेखक: जॉन ब्लूम
आपल्यामधला आनंद हिरावून घेणाऱ्या, भावनांवर हक्क दाखवणाऱ्या, मन विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वात प्रथम क्रमांक लागेल नातेसंबंधातील संघर्षांचा. नातेसंबंधातील संघर्षाइतका गोंधळ घालणारे व नाश घडवणारे दुसरे काही नसते. आणि यातले कितीतरी आपण टाळू शकतो.
अर्थातच सर्वच संघर्ष आपण टाळू शकत नाही. काही मतभेद सत्य, धार्मिकता, न्याय अशा मूलभूत बाबींवर आधारलेले असतात. अशा बाबींवर आपण प्रामाणिकपणे आपला विश्वास असा उभारलेला असतो की त्यामुळे नातेसंबंध बिघडले तरी चालतील. खुद्द येशूने सांगितले की तो आल्यामुळे आपल्या जीवनातील आपले महत्त्वाचे, सार्थ आणि जवळचे नातेसंबंध दुरावण्याची शक्यता आहे (मत्तय १०:३४-३६).
पण आपल्या जीवनातील बहुतेक संघर्ष इतक्या मुलभूत विषयांवर नसतात. ते दुय्यम, गौण, क्षुल्लक किंवा अगदी स्वार्थी गोष्टींतून उद्भवतात. आणि या बाबतींमध्ये शांतीसाठी एकच मार्ग आहे.
युद्ध करणाऱ्या वासना
“तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवांत ज्या वासना लढाई करतात त्यांतून की नाही” (याकोब ४:१)? असे म्हणून याकोब आपल्या वर्मावरच घाव घालतो. आपल्याला हे सांगण्याची गरज आहे हे देवाला माहीत आहे. पण हे आपल्याला आधीच ठाऊक नाही असेही नाही. वैयक्तिक रीतीने विचार करताना आपण हे मान्य करतो. फक्त ते इतरांजवळ कबूल करायला आपल्याला कठीण वाटते.
संघर्ष झाल्यावर एकटे असताना किती वेळा आपण ज्या वाईट पध्दतीने बोललो किंवा दुसऱ्याला वागवले याबद्दल आपल्याला दोषी वाटते? किती वेळा आपण अमुक अमुक गोष्ट मृदू, प्रेमळ रीतीने बोलायला हवी होती याची कल्पना करतो आणि अशी क्षमा मागायला हवी आणि समेट व्हावा अशी इच्छा करतो? पण जेव्हा प्रत्यक्षात त्या व्यक्तीशी बोलायची वेळ येते तेव्हा आपले पाप मान्य करायला आपल्याला इतके कठीण जाते की आपली दिलगिरी सौम्य करून हे योग्य आहे असे भासवतो. काही वेळा तर आपण भांडण सोडवण्याऐवजी ते पुन्हा उकरून काढतो.
का बरे आपण असे करतो? संघर्ष मिटवणे आपल्याला इतके कठीण का वाटते?
आपण धरून का ठेवतो?
आपल्याला याचे उत्तर माहीत आहे: ते म्हणजे आपला कुरूप, स्वार्थी गर्व. आपल्याला स्वत:ला असुरक्षित जागी ठेवायला नको असते. नातेसंबंधामध्ये वाटाघाटी करताना आपली पत आपल्याला गमवायला नको असते. आपण किती मूर्ख आणि स्वार्थी आहोत हे मान्य करायला आपल्याला नको असते. एकदा हे बिंग बाहेर पडले की ते परत मागे घेता येत नाही. आपला गर्व मान्य करण्यापेक्षा आपण आपल्या वासनांना युद्ध करू देतो. त्यामुळे आपले कुटुंब, मित्र, आणि चर्च यांना अप्रत्यक्ष हानी पोचली तरी चालेल.
आपण हे गंभीरतेने घेण्याची गरज आहे असे याकोबाला वाटते. म्हणून याची दखल देताना तो ते स्पष्ट शब्दांत मांडतो. या युद्ध करणाऱ्या वासनांना तो जगाशी मैत्री व आध्यात्मिक व्यभिचार म्हणतो व ते देवाबरोबर वैर आहे असे तो म्हणतो. जेव्हा अशा वासनांचे आपण आपल्यावर वर्चस्व चालवू देतो तेव्हा आपण देवाचे वैरी असल्यासारखे वागतो. आणि हे येशूने त्या क्षमा न करणाऱ्या दासाचा दाखला सांगितला तितकेच गंभीर आहे.
शांतीचा मार्ग
गर्वाशी तुम्ही तडजोड किंवा वाटाघाटी करू शकत नाही. तो तुम्हाला ठार करायलाच हवा. आणि हे विश्वासाचे सर्वात मोठे युद्ध आहे.
गर्व हा आपल्या आत असणारा शत्रू आहे आणि तो आपल्याशी आपल्या मित्राप्रमाणे बोलतो. त्याचा सल्ला आत्मसंरक्षण, सुरक्षा आणि प्रगती होणारा आहे असे वाटते पण तो आपला आणि इतरांचा नाश करत आहे हे आपल्याला दिसत नाही. जेव्हा दुसऱ्यांचा गर्व आपल्याला हानी पोचवतो तेव्हा तो एखाद्या दावा मांडणाऱ्या वकीलासारखा आवेशाने उठून उभा राहतो. पण जेव्हा आपल्या गर्वाने इतरांना हानी पोचते तेव्हा तो तिचे स्वरूप कमी दाखवतो, त्यासाठी सबबी पुढे करतो, त्याचे समर्थन करतो आणि तो दोष दुसऱ्यावर ढकलतो. आपला गर्व आपला बचाव करत आहे असा विश्वास ठेवून आपण सहज फसू शकतो पण खरे तर तो आंतरिक यहूदा आपल्याला चुंबनाने फसवत असतो.
आपण त्याला बायबलमध्ये म्हटल्यानुसार जिवे मारले पाहिजे – गर्वाला गमावले पाहिजे. आणि हे करण्याचा एकच मार्ग आहे. आपण स्वत:ला नम्र केले पाहिजे.
नम्रपणामध्ये अभिवचन
गर्व देत असलेला सल्ला आपण धिक्क्कारला पाहिजे आणि आपला प्रभू जे शिक्षण देतो ते स्वीकारले पाहिजे. तो म्हणतो “नम्र व्हा” कारण अखेरीस नम्र जन उंचावले जातील; पण जे गर्विष्ठ आहेत त्यांना वाईट रीतीने खाली ओढले जाईल (१ पेत्र ५:६; मत्तय २३:१२). हे फार कठीण आहे. गर्वाला ठार मारणे कठीण आहे. त्यासाठी धैर्य लागते – विश्वासाचे धैर्य. याचा अर्थ नम्र होऊन आपण आपल्याला अशा असुरक्षित ठिकाणी ठेवतो की तेथे आपला धिक्कार केला जाईल अशी आपल्याला भीती वाटते (आणि तसे बहुधा घडतेच). अशा कमकुवत ठिकाणी की जेथे वाटाघाटी करण्याची पत आपण गमावून बसतो, इतक्या खालच्या ठिकाणी की आपल्याला आपण किती मूर्ख आणि स्वार्थी आहोत हे कबूल करण्यास भाग पाडले जाते. आपली प्रतिष्ठा गमावली जाण्याचा अनुभव येणार असल्याने आपण देवावर भरवसा टाकायला हवा. आपली कबुली व नम्रता लोक त्यांच्या फायद्यासाठी वापरतील अशीही शक्यता असते.
आपण देवावर विश्वास टाकायला हवा की गर्व देत असलेल्या अभिवचनांपेक्षा तो याकोबाद्वारे देत असलेले अभिवचन विसंबून ठेवण्यास योग्य आहे. ते म्हणते, “जर आपण स्वत:ला नम्र केले तर तो आपल्याला कृपा पुरवील” कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो”
(याकोब ४:६). आपण जितके नम्र बनत जाऊ तितकी अधिक कृपा पुरवली जाईल.
तुम्ही कशामुळे प्रकाशित बनता?
जेव्हा आपले पाप नातेसंबंधाच्या संघर्षाला खतपाणी घालत असते तेव्हा गर्व आपल्याला सांगतो की बचावाच्या फसव्या रूपाने आणि रागाने हाताळल्यास तुम्ही सत्य दडवून ठेवू शकता. स्वत:च्या प्रतिष्ठेचा देखावा आपल्याला देवाच्या गौरवापेक्षा जास्त किंमती वाटू लागतो. आणि आपला नावलौकिक सांभाळणे हे आपले नाते सांभाळण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे वाटू लागते. पण देव आपल्याला सांगतो, त्याच्या गौरवासाठी (व सुधारलेल्या नातेसंबंधासाठी) नम्रपणे तुमचे पाप उघड करा. यामुळे आपला मोठेपणा उथळपणे दाखवण्यापेक्षा आणि खोट्या प्रतिष्ठेपेक्षा खूपच समाधान मिळेल.
जेव्हा नम्रतेने आपण स्वार्थी कुरकुर व गर्वाने भांडणे सोडून देतो तेव्हा आपण देवाची मुले आहोत असे दाखवून “ज्योतीसारखे जगात दिसतो” (फिली. २:१४-१५). गर्व हा प्रकाश झाकून टाकतो. पण नम्रता तो लखलखीत चमकवते. नम्रताच आपल्याला खऱ्या रीतीने प्रकाशित करते.
म्हणूनच येशूने म्हटले “शांती करणारे ते धन्य कारण त्यांना देवाचे पुत्र म्हणतील” शांती करणारे म्हणजे भांडणाऱ्या दोन समूहामध्ये फक्त समझोता घडवणारे नाही तर जे नम्रपणाने आपली चूक कबूल करतात आणि उदारपणे क्षमा करतात. ते शांती कशी करता येते हे दाखवतात – खरी शांती कशी घडवली जाते हे दाखवतात.
तुमच्यांमध्ये असे संघर्ष आहेत का? असतील तर प्रभूकडून तुम्हांला आमंत्रण आहे की तुम्ही शुभवर्तमानाचे सामर्थ्य दाखवावे. गर्वाचा तुमच्यावर असलेला पगडा कमी करावा आणि देवाची कृपा तुमच्याकडे अधिक प्रवाहित व्हावी म्हणून तुम्ही नम्र व्हावे. हे आमंत्रण देवाच्या अधीन होण्याचे आहे, सैतानाला आडवण्याचे व तो तुमच्यापासून कसा दूर पळतो तो पाहण्यासाठी आहे (याकोब ४:७).
Social