- तुम्ही कधी लोकाशी (अविश्वासीयांशी देखील) पापाविषयी बोलला आहात का? लोकांच्या पापाविषयी काही चुकीच्या कोणत्या कल्पना आहेत? तुम्ही पापाची कशी व्याख्या कराल?
• या अभ्यासात आपण पाहणार आहोत की जर आपल्याला देवाची तारणातील महानता व्यवस्थित समजून घ्यायची असेल तर
आपण पाप नीट समजून घ्यायला हवे व मान्यही करायला हवे.
शास्त्राभ्यास
आपण पापाने कलंकित आहोत
आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वत: ला फसवतो व आपल्या ठायी सत्य नाही.
(१ योहान १:८)
- तुम्हाला आठवत असेल की देवाबरोबर आपले नातेसंबंध असल्याच्या ३ खोट्या दाव्यांबद्दल योहान बोलत आहे. त्यापैकी पहिला खोटा दावा आपण ५व्या वचनात पाहिला.
▫ जर कोणी येशूला आपण ओळखत असल्याचा दावा करत असेल तर त्या व्यक्तीच्या ख्रिस्ताला अनुसरण्यावरून तिचा दावा खरा आहे की खोटा आहे ते सिद्ध होते. ह्याला योहान “प्रकाशात चालणे” म्हणतो; कारण “देव प्रकाश आहे.”
▫ ही पहिली व्यक्ती ढोंगी आहे.
• आता दुसरा खोटा दावा आणखी खोल जातो. ही दुसरी व्यक्ती ढोंगी नाही. पण पाप नाकारणारी आहे. हे पुढील दोनपैकी एका प्रकारे करता येते.
▫ पहिले, जेव्हा कोणी आपण पापाचे अस्तित्वच नाकारतो. योहानाच्या काळात काही खोटे शिक्षक असे शिकवत होते. त्यांच्यापैकी काहींच्या मते पाप “दैहिक” असल्याने ते आत्मिक स्वभाव कलंकित करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर निवडलेले असाल तर तुमच्या ठायी पापाचे अस्तित्त्वच नसते.
۰ बुद्धाची शिकवण अशा प्रकारची आहे – कारण प्रत्यक्षात सर्व जग माया आहे. म्हणून पाप काही वास्तव “गोष्ट” नाही.
▫ दुसरे, कोणी पाप निरर्थक किंवा आपल्याशी संबंधित नाही असे समजत असतो. योहान ज्या उद्देशाने लिहीत आहे ते काही थेट चुकीचे नाही. आपण अशा प्रकारे पाप नाकारणे आजही पाहातो.
۰ लोक पापाऐवजी “अयोग्य निवडी” किंवा “चुका” असे शब्द वापरतात. चर्चमधून देखील हल्ली पापाबद्दल बोलू नये म्हणून जोर धरला जातो. कारण ही संकल्पना फार पुरातन व स्वत:ची किंमत नष्ट करणारी मानली जाते.
۰ आधुनिक जगात आजार किंवा मानसिक असंतुलन हे शब्द पापाऐवजी वापरणे अधिक फॅशनेबल समजले जाते. हे देखील पाप नाकारणेच नाही का?
۰ जेव्हा कोणी “पापाविषयी” बोलतो तेव्हा तो पापाचे सार्वकालिक परिणाम उलगडून सांगत असतो. जेव्हा कोणी आजार किंवा असंतुलनाविषयी बोलत असेल तर तो वर्तमानातील, मर्यादित परिणामांविषयी बोलत असतो. पापाचे मर्यादित परिणाम आहेतच, पण आपण सार्वकालिक परिणाम काढून टाकू शकत नाही.
۰ जो पाप नाकारतो त्या व्यक्तीवर योहान दोन आरोप करतो (वचन ८).
▫ पहिले, अशी व्यक्ती स्वत:ला फसवते :
۰ पाप नाकारणाऱ्याविषयी पहिली अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे ती वास्तव नाकारते. तुम्ही आपल्या जीवनाकडे, आपल्या जगाकडे पाहूनही अधर्म किंवा दुष्कृत्ये नावाची काही गोष्ट आहे हे प्रामाणिकपणे नाकारू शकत नाही.
۰ एका परिषदेत एका व्यक्तीने आपल्या संदेशात असा दावा करताना चार्ल्स स्पर्जनने ऐकले की त्याचा पापरहित अवस्थेत प्रवेश झाला आहे. स्पर्जनने त्यावेळी किंवा त्यांच्या संदेशातही त्यावर काही भाष्य केले नाही. पण दुसऱ्या दिवशी न्याहारीच्या वेळी त्या गृहस्थाच्या टेबलजवळून जाताना तसे बोलणाऱ्याच्या अंगावर दुधाने भरलेले भांडे रिते केले. रागीट माणूस म्हणून त्याची ओळख असल्याने त्याने केलेला दावा नक्कीच खोटा ठरला.
۰ बायबल पापाबद्दल काय म्हणते?
▫ १ योहान ३:४ – पाप म्हणजे देवाचे आज्ञानियम मोडणे.
▫ रोम ५:१२ – पाप जन्मापासून अनुवंशिक आले आहे. कृत्यांनी नव्हे – आपण पाप करतो कारण आपण पापी आहोत.
▫ रोम ६:२३ – पापाचे परिणाम केवळ मर्यादित नसतात तर देवापासून ती कायमची ताटातूट असते.
(आध्यात्मिक मरण), स्तोत्र ५१:५ देखील वाचा.
• पण आपण किती वाईट आहोत (आणि आपण आहोतच) या विचाराने आपण हताश होऊन स्वत: ला दोष देत राहण्यापूर्वी आपण हे समजून घ्यायला हवे की देव आपले पाप अशा प्रकारे उघड करतो याचे कारण आपल्याला त्यापासून मुक्ती मिळावी.
▫ कर्मांनी नव्हे तर ख्रिस्तावरील विश्वासाने. पाप नाकारणाऱ्याविषयी खेदजनक बाब ही आहे की तो आपल्याला मिळत असलेली मुक्तीच नाकारतो. हेच आपण ९व्या वचनात पाहणार आहोत.
आपण ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध झालो आहोत
जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील (१योहान१:९).
- पाप नाकारण्याच्या उलट काय? वचन ९ सांगते: पापकबुली.
▫ “पापे” हा शब्द सांगतो की आपण मोघमपणे “मी पापी आहे” अशी देवाला कबुली देत नाही तर आपण पापी आहोत हे सिद्ध करणाऱ्या विशिष्ट व एकेक पापी कृतीचा उल्लेख करून आपण देवाला पापकबुली देतो.
▫ “मी पापी आहे ” असे म्हणून खोटी नम्रता प्रदर्शित करून केलेल्या विशिष्ट पापांचा उल्लेखही न करता ती मान्य न करणे सोपे असते. जेव्हा आपण आपल्या पापकबुलीत पापांचा खास उल्लेख करतो तेव्हा खरोखरच आपली दरिद्री अवस्था देवाला खऱ्या अर्थाने दाखवतो. येथे पापांची अचूक यादी बनवा असे म्हणणे नाही तर देवासमोर प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे.
• कोण पापकबुली करतो? योहान येथे विश्वासी जनांशी बोलत आहे. ख्रिस्ती असणे म्हणजे देवासमोर पाप कबूल करण्याच्या जीवनरहाटीत प्रवेश करणे.
▫ ख्रिस्तीत्व म्हणजे एकदाच पापकबुली करणे नव्हे.
▫ ती पश्चात्तापाची, देवाच्या क्षमेची, नम्रतेची, देवाच्या कृपेची जीवनरहाटी.
• विश्वासी व्यक्तीच्या पापकबुलीचा परिणाम काय होतो?
१. येशू आपले कर्ज माफ करतो
- या वचनात देवाचा स्वभाव सांगणारे दोन शब्द वापरले आहेत.
• पहिला शब्द आहे, विश्वसनीय –
▫ हा शब्द एकनिष्ठतेविषयी बोलतो. त्याने दिलेल्या अभिवचनांविषयी सचोटी दर्शवतो. देव जेव्हा क्षमा करतो तेव्हा कोणत्या अभिवचनांसंबंधी तो विश्वासू राहतो?
▫ एक शक्यता म्हणजे त्याने नव्या करारात केलेल्या अभिवचनाविषयी. (यिर्मया ३१:३४; ३३:८) येथे आपण पाहतो की आपण देवाशी अविश्वासू राहिलो तरी देव आपली क्षमा करण्याच्या त्याच्या अभिवचनाशी विश्वासू राहतो; तसेच
आपल्याशीही विश्वासू राहतो.
• दुसरा शब्द आहे, न्यायी –
▫ जेव्हा एकादी व्यक्ती साधारणपणे “न्यायाने क्षमा करते” तेव्हा तिने योग्य न्याय दिला असे म्हटले जाते. आरोपी निरपराध ठरला म्हणून तो न्यायाधीश “क्षमा करण्यात न्यायी” ठरतो.
▫ समस्या आहे की, ९व्या वचनानुसार आपण “पाप कबूल करतो” – म्हणजे आपल्या कबुलीनुसार आपण दोषी आहोत. मग देव कसा “क्षमा करण्यात न्यायी” ठरतो? (निर्गम ३४:७).
▫ यामागचे एकच कारण आहे, वधस्तंभ. पुढे (१ योहान २:२) येशू पापांबद्दल “प्रायश्चित्त” असल्याबद्दल योहान बोलतो. या शब्दाचा अर्थ ” समाधान. “कशाचे? न्यायाचे समाधान.
▫ जेव्हा शिक्षा घेतली जाते तेव्हा दुसऱ्यांदा शिक्षा देण्याची गरज राहत नाही. जेव्हा येशूने तुमच्या पापांसाठी वधस्तंभावर न्याय झेलला तेव्हा त्याचा अर्थ न्याय भरून दिल्याचे काम संपले.
▫ म्हणून आपण जे कोणी येशूजवळ आपल्या पाप व अपराधांची कबुली देतो – तेव्हा देव म्हणतो;
“त्यांना केव्हाच शिक्षा करण्यात आली आहे. तुमच्या बदली मी माझ्या पुत्राला तुमची शिक्षा दिली आहे.”
२. येशू पापांचा कलंक दूर करतो
- पण जेव्हा आपण देवासमोर आपली पापे व अपराध मोकळेपणे कबूल करतो तेव्हा तो आपल्यावरील पापाच्या कर्जाची क्षमा करतोच शिवाय त्यांच्या कलंकापासूनही शुद्ध करतो.
• (स्तोत्र १५:१-२) पापामुळे तुम्हाला अशुघ्द, देवापासून दूर गेल्यासारखे वाटले आहे का? पाप आपल्याला नैतिकदृष्ट्या अशुद्ध व डागाळलेले बनवते. आपण ताठ मानेने देवासमोर उभे राहू शकतो कारण सहभागितेतील सर्व अडथळे दूर झाले आहेत.
चर्चेसाठी प्रश्न
- या शास्त्रभागानुसार क्षमा व शुद्धतेसाठी अटी आहेत की त्या गोष्टी विनाअट आहेत? पाप लपवण्यातील धोके कोणते? पापकबुलीचे आशीर्वाद कोणते? (स्तोत्र ३२:१-५; नीतिसुत्रे २८:१३)
• आपण पाप नाकारण्याची किंवा पापावर प्रकाश टाकण्याची काही कारणे कोणती?
• पाप नाकारणारे होऊ नये म्हणून कोणते व्यावहारिक मार्ग आहेत?
Social