लैंगिक वासनांशी युद्ध हे इंटरनेटवरची विधाने वाचून किंवा एखाद्या मित्राशी जबाबदार राहून जिंकले जात नाही. तर आत्म्याद्वारे होणाऱ्या जाणीवेने निर्माण होणाऱ्या नव्या भावना आणि इच्छा यांद्वारे जिंकले जाते. विधाने व मित्र या लढ्यात चांगली शस्त्रे आहेत पण ते आपल्यासाठी हा लढा जिंकत नाहीत.
योसेफाला हे युद्ध कसे जिंकायचे ते माहीत होते. पण त्याला आता आपल्याला जे दैवी प्रकटीकरण आहे त्याचा फक्त काही अंशच ठाऊक होता. त्याच्या भावांनी त्याला विकल्यावर देवाने त्याला पोटीफराच्या घरी आणले. “परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला… परमेश्वर त्याच्याबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले” (उत्पत्ती ३९:२-३). पोटीफराने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्वकाही त्याच्या ताब्यात दिले” (३९:४).
पण पोटीफराच्या घरातील आणखी कोणीतरी योसेफाचे कौतुक करत होते. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. त्यानंतर असे झाले की, योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, ‘माझ्यापाशी नीज.’ (उत्पत्ती ३९:६,७). पण खात्रीने व सामर्थ्याने योसेफाने नकार दिला.
“हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भानसुद्धा नाही; आपले सर्वकाही त्याने माझ्या हाती दिले आहे. ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” (उत्पत्ती ३९:८,९).
मोहाच्या प्रसंगी पाच निश्चित मतांनी योसेफाला धैर्य व आत्मसंयमन दिले. जर तुम्ही लैंगिक पापाशी होणाऱ्या युद्धात हार खात आहात तर तर कदाचित ही बीजे तुमच्या अंत:करणात रुजली नसावीत. देवाचे वचन ग्रहण करत तुम्ही त्याच्याबरोबर चालत असताना देवाला मागा की ही मुळे तुमच्यामध्ये खोलवर रुजू देत.
१. भरवसा हा अत्यंत मोलवान आहे आणि तो सहज मोडू शकतो
योसेफ म्हणतो, “हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भानसुद्धा नाही; आपले सर्वकाही त्याने माझ्या हाती दिले आहे” (३९:८).
लैंगिक पाप असा भरवसा उध्वस्त करतो. आणि योसेफाला आपला व्यवसाय संपुष्टात येईल किंवा संपत्ती गमावली जाईल अशी मुख्य चिंता नव्हती तर इतक्या परिश्रमाने कमावलेल्या – आणि सहज गमावला जाईल – अशा विश्वासाला धोका देला जाईल याची काळजी होती. योसेफाच्या आत्मसंयमनमधले हे सर्वात मोठे मत नसले तरी सर्वात प्रथम हेच मत तो सांगतो. आणि लैंगिक पापाचा पराजय करायला ते फार महत्त्वाचे आहे. तुमचा जोडीदार/जोडीदारीण , तुमची मुले, तुमचा बॉस, तुमचे मित्र, तुमचे चर्च यांच्यासमवेत असलेला हा भरवसा / विश्वास याला तुम्ही अशी किंमत देता का? की तुमच्या देहाला समाधान देण्यासाठी हा भरवसा धोक्यात घालायला गुप्तपणे तुम्हाला आनंदच वाटतो?
२. अधिकार हा नोकरीसबंधी आहे, तो विशेष हक्क नाही
पुन्हा योसेफ म्हणतो, “हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भानसुद्धा नाही; आपले सर्वकाही त्याने माझ्या हाती दिले आहे. ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” (उत्पत्ती ३९:८,९). पोटीफराने योसेफाला त्याच्या घरावर , व्यवसायावर, त्याच्या मालमत्तेवर संपूर्ण अधिकार दिला होता ज्यामुळे योसेफाला अतुलनीय हक्क आणि प्रवेश उपलब्ध होते – इतके की तो पोटीफराच्या घरात त्याची बायको एकटी असली तरी वावरू शकत होता.
प्रतिभासंपन्न आणि सामर्थ्यशाली पुरुषांनी अशा प्रकारच्या अधिकाराचा कसा दुरुपयोग केला याच्या कथांनी आपले मथळे भरलेले असतात. आपल्या पदाचा व सामर्थ्याचा फायदा उठवून त्यांच्या हाताखाली असणाऱ्या स्त्रियांचा ते फायदा उठवतात. पण जरी पोटीफरची बायको दिवसेंदिवस त्याला मोह घालत होती तरी योसेफाने आपल्या भूमिकेचा दुरुपयोग करणे नाकारले. “मी तुझ्याजवळ निजणार नाही” आणि त्यासाठी त्याला कित्येक वर्षे तुरुंगात जावे लागले.
योसेफाला माहीत होते की पोटीफराने त्याला जो काही अधिकार दिला होता ( आणि अखेरीस तो देवाकडून होता) तो इतरांची सेवा करण्याचा होता आणि इतरांचा फायदा उठवण्याचा नव्हता – इतरांच्या आनंदासाठी स्वत: मरणे (२ करिंथ १:२४) इतरांच्या किमतीत स्वत:चे सुख मिळवण्याचा प्रयत्न करणे नव्हे.
जर असे अनेक योसेफ कंपन्यांचे नेतृत्व करत असते, चित्रपट निर्माते असते आणि मंडळ्याचे पाळक असते तर –आपल्या स्वत:च्या गुप्त लैंगिक वासना पूर्तीसाठी सामर्थ्य व अधिकाराचा वापर करण्यास नकार देणारे पण त्याऐवजी आपला अधिकार व सामर्थ्य सेवा व संरक्षण करण्यासाठी वापरणारे पुरुष !
३. विवाह हा पवित्र आहे
योसेफ म्हणतो, ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही (३९:९).
पोटीफराची बायको आपला विवाहाचा धंदा करायला तयार होती – त्यांच्या आणा शपथा, त्यांची एकता – हे एका देखण्या पुरुषाबरोबर काही मिनिटे घालवण्यासाठी. पण तिला तिच्या विवाहाच्या वाटणाऱ्या किंमतीपेक्षा योसेफाला त्यांच्या विवाहाची किंमत फार मोठी वाटत होती. योसेफाला माहीत होते की देवाने पोटीफर व त्याच्या बायकोला जोडले आहे. अगदी जसे त्याने आदाम व हवा यांना एकत्र आणले तसेच त्याच्या सार्वभौमतेने यांनाही एकत्र आणले होते.
येशूने म्हटले “पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील. ती पुढे दोन नव्हत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये” (मार्क १०:७-९).
‘तू त्याची बायको आहेस म्हणून’ किंवा ‘तो तुझा नवरा आहे म्हणून’ किंवा ‘मी तिचा नवरा आहे म्हणून’, ‘मी त्याची बायको आहे म्हणून’ अशा भक्कम कारणांमध्ये शुध्द करण्याऱ्या सामर्थ्याचा साठा आहे.
लैंगिक मोहांना प्रतिकार करण्यास तुम्हाला सामर्थ्य हवे आहे का? विवाहाच्या दैवी पावित्रतेबद्दल मनन करा.
“लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील” (इब्री १३:४).
४.पाप हे फक्त चुकीचे नाही तर घृणास्पद आहे
विश्वास, अधिकार, विवाह हे व्यभिचाराविरुद्ध भव्य अशा प्रेरणा आहेत. पण शेवटची ही दोन विधाने शुद्धता व
निष्ठा ह्यासाठी इतर कोणत्याही प्रेरणांपेक्षा सर्वात पायाभूत आहेत. प्रथम आपण पापाचा द्वेष करून मोहांना नकार देण्यास शिकतो. ख्रिस्ती म्हणवणाऱ्या अनेकांना पाप हे चुकीचे आहे हे माहीत असते. पण पाप मारून टाकण्याची गुरुकिल्ली म्हणजे पाप हे चुकीचे आहे हे फक्त समजून घेणे नव्हे पण ते घृणास्पद आहे असे वाटणे. जसजसे आपण ख्रिस्तात वाढत जातो तसतसे पाप हे आक्षेपार्हच वाटत नाही तर ते किळसवाणे वाटते.
इतर पुरुष आकर्षक, तीव्र इच्छा असलेल्या, प्रभावी स्त्रियांसमवेत शय्या सोबत करण्यास आनंदाने उडी घेतील. पण योसेफ विचारतो, “एवढी मोठी वाईट गोष्ट मी कशी करू?” (३९:९). व्यभिचार हा फक्त चुकीचा नाही तर ती दुष्ट गोष्ट आहे. फक्त दुष्ट नाही तर मोठी दुष्ट गोष्ट. जेव्हा तुम्ही मोहाला “नाही’ म्हणता तेव्हा ती गोष्ट तुमच्यातील प्रत्येक रेणूला जरी करावीशी वाटत असते आणि तरीही ती चुकीची आहे हे तुम्हाला ठाऊक असूनही तुम्ही करता का? की तुमच्यामध्ये वाढता संघर्ष होत असतो – पापाची भुरळ घालणारी ओढ समजते पण त्याच वेळी त्या रंगोटी केलेल्या चेहऱ्यामागची तुच्छ, कुरूपता दिसते? पाप हे चुकीचे आहे पण प्रथम त्याला काहीच लायकी नसते. देवाला मागा की ते तुमच्या डोळ्यांना अधिक आक्षेपार्ह वाटू देत.
५. देव हा सेक्सपेक्षा अधिक चांगला आहे
जसजसे देव अधिक सुंदर मोलवान, अधिक समाधान देणारा वाटू लागतो तसतसे पाप हे अधिकाधिक चुकीचे वाटू लागतेच पण किळसवाणे वाटू लागते. व्यभिचार त्याचे भुरळ घालणारे सामर्थ्य गमावू लागतो कारण देवाच्या आनंदाच्या खोल व टिकणाऱ्या अभिवचनापुढे व्यभिचाराचे सुख फिके पडू लागते (स्तोत्र १६:११).
पोटीफराला ही भानगड किती उध्वस्त करणारी ठरेल याबद्दल योसेफ बोलतो, “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” (उत्पत्ती ३९:९). दाविदाने जेव्हा आपला व्यभिचार देवाजवळ कबूल केला तेव्हा त्याने असेच म्हटले, “तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे” (स्तोत्र ५१:४). पोटीफराचा विश्वास हा योसेफाला फार मोलवान होता पण देवावरचा विश्वास त्यापेक्षा कितीतरी अधिक होता. पोटीफराच्या प्रतिष्ठेची योसेफाला किंमत होती पण योसेफ हा देवाच्या गौरवासाठी जगत होता. “देवाच्या विरुद्ध हे पाप मी कसे करू?”
आपली नोकरी किंवा पैसा किंवा लैंगिक तणाव जाईल याची योसेफाला प्रथम चिंता नव्हती. देवाला गमावणे त्याने नाकारले. तिच्याशी शैय्यासोबत करण्याहून देवाचे गौरव फारच अद्भुत, त्याच्याची मैत्री फारच मोलाची, त्याचे अभिवचन त्याला फारच महान होते. जर तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या पत्नीशी शैय्यासोबत करणे टाळायचे असेल तर तर शक्य तितके देवामध्ये अधिकाधिक आनंद घ्या.
दीर्घ प्रयत्नासाठी सामर्थ्य
पोटीफरच्या बायकोने योसेफाला एकदाच भुरळ घातली नाही. ती रोज रोज योसेफाशी बोलत असताही तिच्यापाशी निजायला किंवा तिच्याजवळ जायला तो तिचे ऐकेना (३९:१०). त्याच्या निश्चित मतामुळे तो फक्त चुकीच्या एका पायरीपासून वाचला नाही तर त्यामुळे त्याला पुन: पुन: सामर्थ्य मिळाले. तो हताश झाला नाही. विश्वास हा अजूनही तितकाच मोलाचा होता. अधिकार हा अजूनही सेवा करण्यासंबंधीच होता. विवाह हा अजूनही पवित्र होता. पाप अजूनही दुष्टच होते, देव अजूनही या सर्वांपेक्षा चांगला होता.
जर तुम्ही व्यभिचाराला, अश्लील माध्यमांना, लैंगिक अनीतीला फक्त “नाही” म्हणत असला – कारण ते चुकीचे आहे- तर पापाशी युद्ध करण्यातील तुमची हवा लवकरच संपून जाईल. पण जर ही पाच सत्ये तुमच्या ह्रदयात खोल आणि खोल मूळ धरतील तर तुमच्या इंजिनाला इंधन मिळेल. पुढच्या वेळी लैंगिक मोह येईल तेव्हा योसेफाची आठवण करा व त्याला व्यभिचारापासून दूर ठेवणाऱ्या या पाच सत्यांची आठवण करा.
Social