Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on नवम्बर 11, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा ३०.                                            १ योहान ५:१६-१७                           स्टीफन विल्यम्स

धडा ३०.   १ योहान ५:१६-१७ स्टीफन विल्यम्स

                                                                             प्रीती, धैर्य आणि प्रार्थना

तुम्ही सात घातकी पापांविषयी ऐकले आहे का? क्षम्य व मरणाधीन पापांविषयी? पापाला अशा भाषेत संबोधण्याला काही अर्थ आहे का? चर्चा करा.

या शास्त्रभागात योहान विश्वासी व्यक्तीच्या खात्रीच्या प्रार्थनेचे लागूकरण प्रीतीशी करत आहे. त्यामुळे आपण सहकारी बंधूंच्या व बहिणींच्या पश्चात्तापासाठी धैर्याने देवासमोर विनंती करू शकतो.

शास्त्राभ्यास

प्रीती, धैर्य आणि प्रार्थना

ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल. अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यांस ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे; आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. सर्व प्रकारची अनिती पापच आहे; तरी पण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे (१ योहान ५:१६, १७).

१. आपण करत असलेल्या प्रार्थनेच्या द्वारे आपल्या बांधवावर आपण प्रीती करावी असे देव इच्छितो.

प्रथम आपण या वचनाचा कर्ता लक्षात घेऊ: योहान सहभागितेतील इतर विश्वासी जनांविषयी विश्वासीयांशी बोलत आहे. “आपल्या बंधूला कोणी पाहिले.” साध्यासोप्या भाषेत समजून घ्यायचे झाले तर योहान सहभागितेसंबंधी बोलत आहे.
• जेव्हा आपण “ज्याचा परिणाम मरण आहे” अशा पापाविषयी बोलतो तेव्हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याकडून निसटून जाण्याची शक्यता आहे. या वचनाचा पुढचा मागचा संदर्भ लक्षात घ्या.
• वचन १४ मध्ये जी ख्रिस्ती व्यक्ती सार्वकालिक जीवनाच्या खात्रीने जीवन जगत आहे, तिला पित्याला काहीही मागण्याचे धैर्य असते. पण अट आहे की ते मागणे देवाच्या इच्छेनुसार हवे.
याचा अर्थ आपल्या सर्व इच्छा मान्य केल्या जाव्यात या स्वार्थी इच्छेने आपण मागायचे नाही (याकोब ४:३).
तर उलट आपण ज्या प्रकारे इतर विश्वासी जनांसाठी प्रार्थना करतो त्याद्वारे प्रीती प्रदर्शित करायची (५:१).
• आता हे लक्षात घ्या की वचन १६ मध्ये वचन १४ व १५ चे लागूकरण केले आहे. आपल्या सहकारी बंधू अगर बहिणीच्या जीवनासाठी जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देवाचे या प्रार्थनेकडे कान असतात व तो उत्तर देतोच. विश्वासी व्यक्ती पश्चात्ताप करील अशी आशा आपण बाळगू शकतो.
• एखादी विश्वासी व्यक्ती इतर विश्वासीयांवर कशी प्रीती करते? वचन १६ मधील दोन कृती आपल्याला हे पाहण्यास सहाय्यक ठरतील:
पहिली गोष्ट, पाहणे – “तुम्ही कसे आहात” किंवा “मला तुम्ही आवडता” एवढ्यापुरतीच सहभागिता नसते तर सहभागितेत असलेल्यांविषयी याहून अधिक जाणीव असते.
۰आपल्यापैकी काही लोक आपल्या प्रियजनांमधील पापांकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांच्याशी सामना करायची आपल्याला भीती वाटत असते.
۰आपल्यापैकी काही लोक पापाकडे दुर्लक्ष करतात कारण त्यामुळे होणाऱ्या विचक्यात आपल्याला समाविष्ट व्हायचे नसते.
۰आपल्यापैकी काही लोक पापाकडे दुर्लक्ष करतात कारण आपण इतरांवर खरे प्रेम करत नसतो – आपण त्या पापाबद्दल कुजबुज करू पण त्यांचा पुनरुद्धार होण्याची इच्छा आपण करत नाही.
۰गलती ६:१,२  वाचा
दुसरी गोष्ट, मागणे – या शास्त्रभागात पहिली कृती पापाशी सामना करण्यासाठी कानउघडणी करण्याची नाही तर देवाजवळ मागणी करण्याची आहे.
۰ गलतीमध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे तुमच्या प्रार्थनेला देवाने उत्तर दिल्याने तुम्ही उत्तराचे साधन आहात – म्हणजे तुम्ही त्या भावाचे किंवा बहिणीचे पुनरुद्धाराचे साधन आहात. कृतीचीही गरज असणारच (मत्तय १८).
۰आपल्या हातात प्रकरण घेण्यापूर्वी त्या व्यक्तीचे संजीवन व नातेसंबंधाच्या पुनरुद्धारासाठी आपण प्रार्थना करणे गरजेचे आहे. पवित्र आत्मा खात्री देतो; आपण नव्हे.
۰ प्रार्थना ही एकदाच करण्याची गोष्ट नाही. त्या भावाच्या किंवा बहिणीच्या पुनरुद्धाराच्या प्रक्रियेत त्यासंबंधातील इतर गोष्टी करत असतानाच कित्येक आठवडे, महिने देवासमोर मागणी करावी लागेल.
ख्रिस्ती प्रीती “जाऊ देत, पडू देत” असे म्हणत नाही; तर विश्वासी जन ख्रिस्ताजवळ कसे येतील, आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करतील व शुद्धी पावतील अशी इच्छा करते.

२. लोकांनी पाप केले तरी आपण देवाच्या कृपेविषयी खात्री बाळगावी अशी देवाची इच्छा आहे

जे “मरणदायी पापांविषयी” असे विचार शिकवतात की विश्वासी व्यक्तीने एका विशिष्ट स्तरावरील पाप केले तर मग त्यांनी काहीही केले तरी त्यांच्यासाठी स्वर्गाचे दार बंदच राहील, त्यांच्या या शिकवणीने भय निर्माण होते.
• पण योहान दोन गोष्टी सांगतो :
वचन १६ “ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप” करणाऱ्या बंधुसाठी प्रार्थना करा.
वचन १७  ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे.
• दुसऱ्या शब्दात सांगायचे तर विश्वासी व्यक्ती अशी पापे करील की जी आज्ञाभंगाची, अनितीची असतील;     तरी त्याला आशा आहे. जेव्हा आपण पापकबुली करून पश्चात्ताप करतो (१ योहान १:९), तेव्हा देव विश्वसनीय असल्यामुळे आपल्या पापाने त्याला आपण जरी दुखावलेले असले तरी तो आपल्याला त्या पापापासून शुद्ध करील.
पहिले, पाप देवासमोर अनीतिमान आहे. ते घाणेरडे  व तिरस्करणीय आहे (वचन १७). हा स्वैराचार आहे (१ योहान ३:४).
बायबल असे मुळीच शिकवत नाही की विश्वासी व्यक्तीने पाप केल्यास तिला देवाच्या राज्यातून काढून टाकले जाईल.
“प्रीतीत भय नसते” (१ योहान ४:१८).
•  दु:खी असणाऱ्या विश्वासी व्यक्तीला आशा आहे. तुम्ही देवाच्या कृपेपासून कधीच दूर जाऊ शकत नाही.

कडक इशारा

ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे; आणि त्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही (५:१६ब )

कृपा गृहीत धरण्याकडे आपला कल असतो. तरीही एक चुकीची विचारसरणी आपण टाळली पाहिजे. ती म्हणजे जर तुम्ही एखादे “ज्याचा परिणाम मरण आहे असे पाप” केले तर तुमच्यासाठी स्वर्गाचा दरवाजा बद होतो किंवा तुम्हाला देवाच्या राज्याबाहेर काढले जाते. योहान सांगतो की असा टोकाचा विचार तुम्ही करू नये.
•  कोणी म्हणेल की – “मी ख्रिस्ताला मानतो मी ख्रिस्ती असल्याचे जाहीरपणे सांगतो. देवाच्या प्रीतीपासून मला  काहीच विभक्त करू शकत नाही.”
पाप हे आज्ञाभंग आहे (३:४) – तुम्ही अनुभव घेतलाच असेल की प्रथमच तुम्ही नियम मोडला (उदा. वाहतुकीचा नियम मोडला) तर तुम्हाला अपराधी वाटते; पण परत परत तुम्ही हे करत राहिला तर तुम्हाला काहीच वाटत नाही असे होते ना? तसेच कृपा गृहीत धरण्याची वृत्ती देवाचे नियम मोडणे चालू शकते असे समजते व देवाला तिरस्कार वाटावा अशीच वागत राहते.
पाप अक्षरश: अनिती असते (वचन १७) – परत परत पापाला जीवनात मुभा देण्याने एखादी व्यक्ती देवापुढे अशुद्ध होऊ नये म्हणून अजिबात दक्षता बाळगत नसते.
योहान एखाद्या विशिष्ट पापाविषयी बोलत नाही ( उदा. खून). तो पश्चात्ताप न केलेल्या व मरणाकडे नेणाऱ्या पापाच्या सवयीविषयी बोलत आहे. “ज्याचा परिणाम मरण आहे असे हे पाप होय.”
अधीन न राहणे व अवज्ञा करणे ही जीवनरहाटीच बनून जाते, अशी व्यक्ती अशा एका बिंदुपाशी येते की ती इत:पर पापकबुली करू शकत नाही किंवा खरा पश्चात्ताप करू शकत नाही कारण ती त्या दृष्टीने स्वत:कडे पाहूच शकत नाही.

वचन १:९ मध्ये जे कोणी पापकबुली करील त्याला  क्षमा देऊ केली आहे. पण पापाची गहनता व चिकाटी अशी असते की ते तुम्हाला “पापकबुली करण्याच्या क्षमतेपासून दूर नेते. देव त्या पापाकडे जसे पाहतो तसे तुम्हाला त्या पापाकडे पाहू देत नाही. त्या पापाचा तिरस्कार करून त्यापासून तुम्हाला दूर पळू देत नाही. मग ती व्यक्ती अशा पायरीला येते ती त्या पापापासून फिरण्याच्या बिंदूकडे ती तेथून वळूच शकत नाही.” (जॉन पायपर)

अशा प्रकारची व्यक्ती आपल्याच बंडखोरीच्या जीवनरहाटीमुळे कोणत्याही आशेच्या मर्यादेपलीकडे गेलेली असते. आणि ती आपली कबुली चूक असल्याचा पुरावाच देते. ते बंधुजन असल्याचे म्हणतात पण पापात मृत असल्याचेच सिद्ध करतात.
• कोणी म्हणेल, पण आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करायला नको का? आणि आपल्याला होणाऱ्या वेदनांमुळे आपण तसे करूही.
योहानाची भाषा पाहा – होय, तो म्हणत नाही की “त्यांच्यासाठी प्रार्थना करू नका” पण अप्रत्यक्षपणे तो सूचित करतो की या प्रार्थना परिणामकारक होण्यासाठी आपण धैर्याने उभे राहू शकत नाही. तो म्हणतो, “ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही”
येथे खरोखर भयजनक विचार आहे. त्यांनी स्वत:ला अशा जागी आणून ठेवले आहे की जेथून ते परत मागे फिरू शकत नाहीत.

चर्चा व मननासाठी प्रश्न

जेव्हा तुम्ही व मी पाप करतो तेव्हा पाप करत राहण्याने आपण पापाचा परिणाम मरण याकडे जात आहोत की काय आणि कसे यावर चर्चा करा.
• १ योहान १:८,९. तुम्हाला पश्चात्ताप करण्याची निरोगी सवय आहे का? पश्चात्ताप न करण्याच्या पापापासून दक्ष राहा.