ग्रेग मोर्स
“बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते” (नीतिसूत्रे १४:४).
तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, हा मजकूर आपल्याला पालकत्वाविषयी शिकवतो. हे कुटुंबाबद्दल आहे.
विशेषतः लहान मुले असलेल्या काही मातांसाठी हे एक जीवन-सूत्र म्हणून उपयोगी ठरू शकते. तुमच्या मुलांचे व्यक्तिमत्त्व जितके अधिक उत्साही आणि रंगीबेरंगी असेल किंवा त्यांना स्वच्छता आणि शांतपणे खेळण्याचा जितका जास्त कंटाळा असेल, तितकेच हे वचन तुमच्या जिवाला अधिक योग्य वाटेल. ज्या माता सहनशक्तीच्या परीसीमेला पोहोचल्या आहेत, कदाचित ज्यांना अनेक मोलवान मुलगे असतील तर देवाचे वचन तुमच्या अवास्तव अपेक्षांच्या मुळावर घाव घालू दे आणि तुम्हाला शांती देऊ दे. आपण हे तत्त्व अशा प्रकारे पुन्हा लिहू शकतो: “जिथे मुले नाहीत, तिथे घर स्वच्छ असते.”
कमी स्वच्छ घर
जिथे बैल नसतात, तिथे गोठा स्वच्छ असतो. जिथे जनावरे गोठ्यात येत नाहीत, तिथे गोठा स्वच्छ राहतो. जेव्हा कुत्र्यासाठी बनवलेल्या घरात कुत्रा नसेल , जेव्हा घरट्यात पक्षी नसतात, जेव्हा खोल्यांमध्ये मुले नसतात, तेव्हा स्वच्छता तणावमुक्त असते. जेव्हा तुमची कामवाली बाई तुम्ही दिवसभर केलेले काम बिघडवत नाहीत, तेव्हा घराचे व्यवस्थापन सोपे होते.
केवळ घराच्या स्वच्छतेचा विचार केल्यास, लहान मुले बंडखोर, कारस्थानी, तोडफोड करणारी असतात. एकेकाळी स्वच्छ असलेल्या गोष्टींना अस्वच्छ करण्यासाठी नवीन योजना आखताना दिसतात तेव्हा त्यांची सर्जनशीलता पूर्णपणे, सातत्याने, आणि प्रभावीपणे पुढे येते. एका क्षणात ते भिंत आणि छताला सिस्टिन चॅपेलसारखे रंगवून टाकतात. लष्करी अचूकतेने, ते लेगोचे तुकडे जमिनीवर सुरुंगांप्रमाणे पसरवून ठेवतात, जे मध्यरात्रीच सापडतील. ज्या गोष्टी देवाने कधीही एकत्र जोडण्यासाठी बनवल्या नाहीत, त्या ते चिकटवून टाकतात. गोंधळ माजवताना ते एकमेकांचे कधीही नव्हे इतके चांगले मित्र असतात. जर प्रत्येक आई स्वच्छ दिवाणखाने, व्यवस्थित स्वयंपाकघर आणि चकचकीत स्नानगृहांची स्वप्ने पाहत असेल — तर कोणतेही मूल त्यात सहभागी नसते.
जिथे मुले नाहीत, तिथे घर स्वच्छ असते. तेथे पसारा नसतो, तिथे कारच्या पुनर्विक्रीची किंमत चांगली मिळते, अंगणात खेळणी पसरलेली नसतात, टॉयलेट सीटला जास्त पुसण्याची गरज नसते आणि घर सतत ‘वापरलेल्या’ अवस्थेत नसते. येथील तत्त्व असे गृहीत धरते की, जिथे ह्या आनंदी छोट्या मूर्ती फिरतात, तिथे घर कमी स्वच्छ राहील. पूर्ण घरात अधिक काम असणार — विशेषतः जेव्हा मुले लहान आणि एकत्र असतात. आम्ही त्यांना शिस्त लावतो, आम्ही त्यांना स्वच्छता करायला शिकवतो आणि पेन किंवा पर्मनंट मार्करने ओलांडल्या जाऊ नयेत अशा मर्यादा घालतो. तरीही ती मुलेच आहेत. आपल्यापैकी बहुतेकजण जितक्या कुशलतेने स्वच्छता करतात, त्यापेक्षा जास्त कुशलतेने ती पसारा करतात.
तर चला, त्याबद्दल बोलू या: तुमच्या घराबद्दलच्या तुमच्या अपेक्षा. परिपूर्णतावादी लोकांनो, आपल्या घरात कोण राहत आहे याचा आपण विचार करत आहोत का? जिथे बैल नसतात, तिथे गोठा स्वच्छ असतो; जिथे अनेक बैल असतात, तिथे गोठा, अर्थातच कमी स्वच्छ असतो. ज्यांच्या घरात बैल आहेत, त्यांनी स्वच्छतेचे बैलांशिवायच्या गोठयासाठीचे मापदंड ठेवले तर समस्या निर्माण होणारच.
“जिथे मुले नसतात, तिथे घर स्वच्छ असते.”
अहो मार्थांनो, तुम्ही अनेक गोष्टींबद्दल चिंता करता. आणि प्रत्येक नवीन मुलासोबत, नवीन चिंता तुमच्या दाराशी दबा धरून बसतात. त्यांचा ओढा तुमच्याकडे आहे. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येतात आणि जुन्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कमी वेळ मिळतो. तुमच्यापैकी अनेक जणी सद्गुणी स्त्रिया आहात. “शहाणी स्त्री आपले घर बांधते” (नीतिसूत्रे १४:१). पण श्वास घे, प्रिय बहिणी, प्रिय माते. लहान मुलांसोबत घर फोटोसाठी तयार ठेवता येत नाही.
आता मला तुमच्या घरात ढवळाढवळ करायची नाही. तुमच्या पतीशी बोला आणि तुमच्या अपेक्षांवर चर्चा करा. माझ्या पत्नीला आणि मला आयुष्याच्या या टप्प्यात आमच्या घरासाठी आमचे मापदंड काय असावेत यावर चर्चा केल्याने फायदा झाला. आयुष्याच्या या टप्प्यात हा शब्द महत्त्वाचा आहे.
माझ्या छोट्याश्या पाहणीनुसार, पत्नी अनेकदा तिच्या पतीपेक्षा खूप वरच्या दर्जाच्या मापदंडाखाली काम करते — कदाचित घरी भेटायला येणाऱ्या इतर स्त्रियांचा विचार करून. म्हणूनच वरील वचनातून दिलासा मिळतो. शहाणपण जे स्पष्ट आहे तेच गृहीत धरते: गोठ्यात जास्त प्राणी म्हणजे जास्त घाण, म्हणजे जास्त काम, म्हणजे गोष्टी सुस्थितीत ठेवण्याची कमी क्षमता. घरातील सौंदर्य ही लहान मुलांसाठी द्याव्या लागणाऱ्या “किंमतीचा” एक भाग आहे. पण जेव्हा टी व्ही वरील आदर्शांनुसार जगण्याचा मोह होतो, तेव्हा हे वचन आपल्याला आठवण करून देते की हे छोटे पसारा करणारे जीव त्यापेक्षा मोलाचे आहेत.
समृद्ध घर
“बैल नसले तर गोठा स्वच्छ राहतो, पण बैलाच्या बलाने धनसमृद्धी होते” (नीतिसूत्रे १४:४)
दडपणाखाली असलेल्या मातांनो, तुम्ही थकला आहात कारण मातृत्व कठीण आहे, पण तुमचा आशीर्वाद लक्षात ठेवा. चर्चमधील बाकांवर तरुण, मध्यमवयीन आणि वृद्ध स्त्रिया बसल्या आहेत, ज्यांना तुमची जागा घ्यायला आवडेल. त्या स्वच्छ बिछान्यांपेक्षा, बाळ स्वीकारतील. शांत आणि व्यवस्थित घर त्यांच्यासाठी दुःखाचे कारण असू शकते. एकतर त्यांची घरटी रिकामी झाली आहेत — फक्त त्या गोंधळाच्या सुंदर आठवणीच उरल्या आहेत — किंवा त्यांच्या घरट्यांमध्ये कधीच पिल्ले नव्हती.
त्यांना पुन्हा तो चिवचिवाट ऐकण्याची किती ओढ लागली आहे. तरुण मातांनो, मी खात्रीने सांगतो की, जर तुम्ही पुरेसे दीर्घायुष्य जगलात, तर तुम्हाला कार्यक्षमतेच्या या धन्य दिवसांची आठवण येईल. या धुक्यातही आपला दृष्टिकोन स्पष्ट ठेवा.
या म्हणीच्या दुसऱ्या भागावर जोर दिला आहे: बैल असले की गोंधळ आणि कष्ट येतात हे खरे आहे, पण त्यासोबत विपुल पीकही येते. आयुष्य कदाचित अधिक गोंधळाचे होईल, पण आपले जीवन अधिक सामर्थ्यवान होते. मुलांच्या रूपाने, बैलांप्रमाणे, अनेक वर्षांच्या गुंतवणुकीनंतर आपल्याला सामर्थ्य मिळते. जसे आपण त्यांना आपल्या प्रभूच्या भयामध्ये प्रशिक्षण देतो, तेव्हा ते कुटुंबाचे आणि समाजाचे फलदायी सदस्य बनतात. त्यांनी नेहमीच आपल्या जीवनात आनंद भरला; आता ते समृद्धी आणतात. मुलांसारखा मोठा खजिना मिळवण्यासाठी आपण आनंदाने आराम आणि स्वच्छ घरांचा त्याग करतो — ते बैल नाहीत, तर अमर आत्मे आहेत.
तरुण पिढीतील अनेकजण मुलांना संपत्ती मानत नाहीत. ते त्यांना ओझे समजतात. मुले मोकळा वेळ हिरावून घेतात आणि जीवनात गोंधळ निर्माण करतात, कुत्रा कमी त्रासदायक असतो, असा त्यांचा युक्तिवाद असतो. त्याचे घर (केनेल) स्वच्छ करणे सोपे असते आणि त्याचे आयुष्य जास्त मागणी करत नाही. कुत्र्यांचे आयुष्य कमी असते, आणि त्यांना दूर करणे सोपे असते. म्हणून मूल होऊ न देता जोडपी मुलांऐवजी आपल्या पाळीव कुत्र्याला कुटुंबाचा सदस्य म्हणून वाढवतात. पण, “लाइफ ॲप्लिकेशन स्टडी बायबल” म्हणते त्याप्रमाणे, “तुमचे जीवन लोकांच्या समस्यांपासून मुक्त ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ते लोकांपासून मुक्त ठेवणे. पण जर तुमचे जीवन लोकांशिवाय रिकामे असेल, तर ते निरुपयोगी आहे; आणि जर तुम्ही फक्त स्वतःसाठी जगत असाल, तर तुमच्या जीवनाचा अर्थ नाहीसा होतो. . . तुमचे जीवन स्वच्छ आहे, पण ते रिकामे आहे का?”
आपले जीवन अधिक गोंधळाचे होईल. आपल्या योजनांमध्ये व्यत्यय येईल; आपल्या रात्री अनपेक्षितपणे व्यापल्या जातील. आपल्याला अनेकदा विनाव्यत्यय मैत्री, मोकळा वेळ आणि फक्त जोडीदारासोबत घालवलेल्या रात्री मिळणार नाहीत. पण ते फायदेशीर आहे. मुले ही एक अशी गुंतवणूक आहे जी शेवटी समृद्धीकडे घेऊन जाते.
पित्याचे घर
मला सांगितले जाते की, हे दिवसही निघून जातील. असे दिवस येतील जेव्हा मुले स्वतःहून गाडीत बसतील आणि स्वतःच नाश्ता बनवतील. ते संदेशादरम्यान स्नानगृह वापरू शकतील आणि गोंधळात आणखी गोंधळ न घालता स्वतःची खोली स्वच्छ करतील. आणि त्या दिवशी, जेव्हा आपण हायचेअर आणि बिबशिवाय टेबलाभोवती जमून जेवण करू, तेव्हा आपण एकमेकांना दिल्याबद्दल आपल्या प्रभूच्या चांगुलपणाची आणि विश्वासूपणाची साक्ष देऊ शकू.
त्या स्वातंत्र्याच्या दिवसांमध्ये, आपण त्यांच्या परावलंबनाचे दिवस प्रेमाने आठवू. आणि देवाच्या कृपेने, आपल्याला जे अप्रिय काम वाटले, त्या काळाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करू, कारण त्याचे फळ मिळाले. वाढ आणि समृद्धी, अस्वच्छता आणि गोंधळाच्या आठवणींना सुंदर बनवेल. तोपर्यंत गोठा, घर आणि गाडी आपल्या अपेक्षेपेक्षा कमी स्वच्छ असतील.
शेवटचा विचार म्हणून, देवाच्या हृदयाच्या प्रकाशात आपल्या विषयाचा विचार करा, ज्यामुळे त्याने या पतित जगाला आपले घर बनवले. त्याने पाप, मृत्यू आणि मुक्तीच्या या संपूर्ण गोंधळापासून स्वतःला वाचवले असते; त्याने आपल्या पुत्राला वाचवले असते आणि पृथ्वीवर कुत्र्याच्या पिल्लांनी वस्ती केली असती — जर त्याने आपल्याला निर्माण केले नसते तर. पण त्याने आपल्याला निर्माण केले. जर त्याने पुराद्वारे सर्व काही संपवले असते, तर पृथ्वी युद्धे, कुरूपता आणि प्रदूषणापासून स्वच्छ राहिली असती. जिथे माणसे किंवा पतित देवदूत नाहीत, तिथे पृथ्वी स्वर्गाइतकीच स्वच्छ असली असती.
पण देवाने सहन केले, विजय मिळवला आणि सार्वकालिक विपुलता निर्माण केली. ख्रिस्ताने आपले पाप स्वतःवर घेतले, जेणेकरून आपण त्याची परिपूर्ण शुद्धता स्वतःवर घेऊ शकू. आपल्या लहानशा मार्गाने, आपल्या अपेक्षेपेक्षा कमी स्वच्छ असलेल्या, आपल्या क्षेत्रातील आपले आनंदी पालकत्व, त्या परिपूर्ण कथेचा एक अस्पष्ट प्रतिध्वनी म्हणून त्यात सामील होते.




Social