जून 28, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

एका हट्टी हृदयाचा अचानक विनाश

ग्रेग मोर्स

“जो पुष्कळदा बोध पावून आपली मान ताठ करतो तो अकस्मात नाश पावेल आणि त्याला कोणताही उपाय असणार नाही” (नीतिसूत्रे २९:१).

उपदेशाने तो दुखावला  जातो, चूक दाखवल्यास तो चिडतो. तो पाप करतो, हे निश्चित. पण त्यात तुमचा  काहीही संबंध  नसतो. दुरुस्ती केल्याने तो आणखी बिघडतो. तो त्याच्या कणखर स्वभावासाठी नव्हे, तर त्याच्या ताठ मानेसाठी ओळखला जातो — बैलासारखा माणूस जो फक्त एकाच मार्गाने जातो: तो म्हणजे स्वतःच्या.

आपल्याला इतरांपेक्षा जास्त कळते असे त्याला वाटते. जर त्यांना अजूनही तो मित्र  या नावाने ओळखत असेल, तर ते त्याचे उघड दोष दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्याचे भले व्हावे असे वाटते. ते धाडसी आहेत. तुम्ही बैलाला कानाने वळवण्याचा प्रयत्न कराल का? तो धुमाकूळ घालत पुढे जातो, वाटेतील सर्व काही तुडवत. देव बोलतो; तो कान बंद करतो. ज्ञान रस्त्यावर ओरडून सांगते; तो दुसरीकडे वळतो. प्रेमाची विनवणी त्याला बांधू शकत नाही. सदसद्विवेकबुद्धी त्याला रोखू शकत नाही. ओकच्या झाडासारखी मजबूत असलेली त्याची मान अजूनच  ताठ होते.

ते म्हणतात तितका मी वाईट नाही, असे त्याला वाटते. मी कधीही थांबू शकतो. न्याय करणारे ते कोण?

तो एक मूर्ख आहे. एक नाबाल. “असा अधम आहे की त्याला बोलण्याची कोणाची छाती नाही” (१ शमुवेल २५:१७). आपल्या वडिलांपेक्षा स्वतःला जास्त शहाणा समजणारा मुलगा. आपल्या मेंढपाळांपेक्षा स्वतःला जास्त हुशार समजणारी मेंढी. बदल होण्यासाठी खूप गर्विष्ठ असलेला म्हातारा. देवाचे दान, म्हणजेच सुधारणा होण्यासाठी  कृपा- ती देणाऱ्या हातावर तो थुंकतो. पुढे  दरी  आहे अशी सूचना देणाऱ्या फलकांकडे दुर्लक्ष करून पुढे जातो. फारोप्रमाणे, तो आपल्या स्वतःच्या बनवलेल्या सिंहासनावरून ओरडतो, “हा कोण परमेश्वर की ज्याचे मी ऐकावे” (निर्गम ५:२).

अटळ पतन

आपले नीतिसूत्र धोका दाखवते की असा दीर्घकाळ दिलेला नकार कसा अचानक संपुष्टात येतो. न ऐकल्याची जागा जागा विनाशाने घेतली जाते. त्याचा मार्ग संपतो — “अचानक.” तो कोसळतो. असा मोडला जातो की त्याच्यासाठी कोणताही इलाज नसतो. हा तो दिवस आहे जो कधी येणार नाही असे त्याला वाटले होते.  हा तो शेवट आहे जो त्याला कधीही भेटणार नाही असे त्याने म्हटले होते. काही उपायाशिवाय तो पूर्णपणे उद्ध्वस्त होतो. दुसरी संधी नाही. पुन्हा प्रयत्न करण्याची संधी नाही. आपला मार्ग विचार करून बदलण्याची कोणतीही पुढील संधी नाही.

नोहाचे उपदेश आता ऐकू येत नाहीत. देव तारवाचा दरवाजा बंद करतो; पाऊस सुरू होतो.

लोटाच्या जावयांचे हसू थांबते; सदोमावर अग्नी कोसळतो.

संदेष्टे आता पश्चात्ताप आणि धिक्काराबद्दल ओरडून सांगत नाहीत; यरुशलेमेला बाबेलने वेढलेले आहे. रोमने वेढलेले आहे.  

आणि असा एक दिवस जवळ येत आहे, जेव्हा बायबलचे अभ्यासगट नामशेष होतील, आणि आपल्याला माहीत असलेल्या चर्चमधील उपासना समाप्त होतील; येशू येईल. ताठ मान असलेल्यांचा अखेरीस आणि कायमचा नाश होईल.

हट्टी बैल, जे नियंत्रणाबाहेर आणि सुधारणा न होणारे असतात, ते शेवटी कड्यावर पोहोचतातच.

ते खाली कोसळतात आणि विव्हळतात, “मी शिक्षणाचा द्वेष कसा केला? माझ्या अंत:करणाने शासन कसे तुच्छ मानले? मी आपल्या शिक्षकांची वाणी ऐकली नाही, मला जे बोध करीत त्यांच्याकडे मी कान दिला नाही ” (नीतिसूत्रे ५:१२-१३). त्याच्या पतनामुळे शहाणपण रडते का? त्याच्या अंतिम दुःखाबद्दल ते शोक करते का? “ह्यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन; तुमच्यावर संकट आले असता मी थट्टा करीन;… जेव्हा तुमच्यावर संकट आणि क्लेश येतील” (नीतिसूत्रे १:२४-२७). तरीही येशू त्यांच्यासाठी नक्कीच रडतो का? “आता ज्या माझ्या वैर्‍यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा” (लूक १९:२७). जसे त्याने सर्वशक्तिमानाची हाक ऐकली नाही, तसेच सर्वशक्तिमान त्याची हाक ऐकणार नाही. अरे, कठोर शब्दांपेक्षा कठोर हृदयाला अधिक भिऊन राहा.

दोष दाखवणारे प्रेम

तुमच्यापैकी काहींना अनेक वर्षांपासून वारंवार दोष दाखवण्यात आला आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तुम्हाला विनवण्या केल्या गेल्या, गंभीरपणे ताकीद दिली गेली, तुमच्या जवळच्या अनेक नातेवाईकांनी तुमच्याशी संवाद साधला, तरीही तुमची मान अधिकच ताठ झाली आहे. ख्रिस्ती लोकांचा त्रासदायक हस्तक्षेप म्हणून तुम्ही जे स्वीकारले नाही, ते एका सहनशील देवाचे आमंत्रण होते. जो पुन्हा पुन्हा म्हणत आहे, “दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे ह्याने मला संतोष होतो ना” (यहेज्केल १८:२३)? त्याच्याकडून मिळणारी विनामूल्य आणि संपूर्ण क्षमा आणि त्याच्या कुटुंबात कायमचे आनंद उपभोगण्याची संधी तुम्ही दुर्लक्षित करणार का? ही संधी त्याच्या स्वतःच्या प्रिय पुत्राच्या अचानक आणि पूर्णपणे भग्न होण्याने मिळाली, हे समजून तुमच्या पाषाणमय हृदयातून अश्रू येणार नाही का?

तुमच्यापैकी इतरांना माहीत आहे की देव तुम्हाला दोष दाखवण्यासाठी पाठवू इच्छितो – आणि तुम्ही बहुतेकदा शांत राहिला आहात. तुम्ही योना आहात, जो पश्चात्ताप आणि तारणाचा संदेश घेऊन निनवेला जाण्यास तयार नाही. तुम्ही कदाचित एकदा काहीतरी बोलला असाल, पण तुम्ही पुन्हा त्या आगीत हात घालणार नाही. नम्रपणे, प्रेमाने, प्रार्थनेने, योग्य प्रकारे, दोष दाखवण्याचे काम करा. “सोन्याचे कर्णभूषण आणि उत्कृष्ट सोन्याचा दागिना, तसा सुज्ञ उपदेशक लक्ष देणार्‍या कानाला आहे” (नीतिसूत्रे २५:१२). ऐकणाऱ्या कानासाठी प्रार्थना करा.

काही गोष्टी जशा आहेत तशाच राहू देणे चांगले असते. “जो वारंवार दोष दाखवूनही आपली मान ताठ करतो, तो अचानक असा मोडला जाईल की त्याला काही इलाज राहणार नाही.” तो देवावर विश्वास ठेवण्यास नकार देतो, पण तुमचा विश्वास आहे. आत्म्यांना घायाळ करणाऱ्या सुऱ्यांशी खेळणे त्याला क्षुल्लक वाटते, पण तुम्हाला अधिक चांगले माहीत आहे. आणि तुम्हाला अधिक चांगले माहीत असल्यामुळे, तुम्ही अधिक चांगले अनुभवू शकता. हार मानू नका. त्याच्यासाठी प्रार्थना करायला विसरू नका. त्याच्यासाठी रडा. त्याच्याकडे विनवणी करा. त्याच्याबद्दलची तुमची भावना बंद करू नका, जरी त्यामुळे तुमच्या हृदयात “मोठा खेद आणि अखंड वेदना” आल्या तरी (रोम. ९:२).  उपवास करण्यासाठी, मध्यस्थी करण्यासाठी, तुमच्या तारणाऱ्याप्रमाणे “यरुशलेमे, यरुशलेमे” (मत्तय २३:३७) असे  करुणेने ओथंबून वाहण्यासाठी ही धोक्याची घंटा वाजत आहे.

यामुळे आपण ख्रिस्ती लोकांनी, आनंदाने दोष स्वीकारणारे लोक व्हावे. “नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही” (स्तोत्र १४१:५). आपल्याला मात्र ते नाकारायचे असते. संदेश देणाऱ्याच्या सांगण्याच्या पद्धतीवर टीका करायची असते. तुमच्या डोक्याला हे तेल नाकारू देऊ नका. त्या बैलासारख्या माणसाकडून शिका आणि थरथरा. असुरक्षित लोक, गर्विष्ठ लोक, आत्मविश्वासी लोक दोषारोप सहन करू शकत नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही देवाच्या परिपूर्ण इच्छेनुसार वागत नाही, आणि तुम्ही हे पूर्णपणे मान्य करू शकता कारण तुम्ही तुमच्यासाठी असलेल्या येशूच्या परिपूर्णतेवर विश्वास ठेवता.

तुम्ही असे ताडनाचे शब्द सहन करू शकता — आणि ते मनापासून स्वीकारू शकता. पवित्र आत्मा अपूर्ण लोकांचा आणि दोष दाखवण्याचा उपयोग करून आपल्याला पुत्राच्या प्रतिरूपात घडवतो. अखेरीस अचानक याचे आनंदात परिवर्तन होईल. जेव्हा आपण त्याला समोरासमोर पाहू तेव्हा आपण सर्व प्रकारच्या भग्नतेपलीकडे बरे होऊ.

Previous Article

जिथे वस्तूंचा पसारा असतो

Next Article

वचनाचे पाठांतर जीवनाला वास्तवता आणते

You might be interested in …

आपल्या पित्यापासून शक्ती मिळवणे  (उत्तरार्ध) क्रिस विल्यम्स

ब. काळजी घेणाऱ्या पित्याची सुरक्षा मत्तय ६:२५-३४ या वचनांचा भर आहे की आपला स्वर्गीय पिता आपली काळजी घेतो. ३२ वे वचन हे दाखवते – “तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” […]

अपयशाला तोंड देताना लेखिका : वनिथा रेंडल

अपयशावर मी खूप विचार केला, विशेषकरून ईस्टरनंतरच्या काही आठवड्यात. येशू जेव्हा वधस्तंभाकडे धैर्याने व सामर्थ्याने सामोरा गेला तेव्हा त्याच्या भोवतालची माणसे लज्जा आणि खेदाने व्यापून विरघळल्यासारखी झाली होती. जेव्हा मी माझ्या जीवनाकडे पाहते तेव्हा मला […]

ख्रिस्ती लोक कोणत्या गोष्टी करू शकत नाहीत?

लेखक: टीम चॅलीस आमचे संभाषण चालले असताना एकजण म्हणाला, “ख्रिस्ती जन द्वेष बाळगू शकतच नाहीत.” याला पर्याय नाही. हा दुर्गुण आपण चालवून घेऊ शकतच नाही .पण ख्रिस्ती लोक करू न शकणारी ही एकच गोष्ट नाही. […]