जोनी एरिक्सन टाडा
दुःखाला सोबती आवडतात, पण आनंदाला मात्र गर्दीची ओढ असते.
हे विश्व निर्माण होण्यापूर्वीच्या अनंत युगांपासून, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकमेकांच्या सहवासात असीम आनंदाचा अनुभव घेत होते. परंतु त्या त्र्यैक्याच्या मनात एका अधिक मोठ्या गर्दीचा विचार चालू होता. देवाची योजना अशी होती की, असंख्य पुत्र आणि कन्यांना आपल्या आनंदाच्या त्या गर्जणाऱ्या धबधब्यात सामावून घ्यावे.
या योजनेत, येशू ख्रिस्त केंद्रस्थानी विराजमान आहे आणि पिता त्याचे गौरवगान गाताना कधीच थकत नाही: “पाहा… माझा निवडलेला, ज्याच्यामध्ये माझा जीव संतुष्ट आहे” (यशया ४२:१). येशूमध्ये, पिता त्या सर्व बुद्धिमत्तेचा, वैभवाचा आणि चांगुलपणाचा कुठेही नसणारा उगम पाहतो. (पवित्र आत्म्याला याचे मुळीच वाईट वाटत नाही.) म्हणून, जर आपल्याला हे जाणून घ्यायचे असेल की देवाचे हृदय कशाने (किंवा कोणी) आनंदाने भरून जाते, तर पिता स्वतःच आपल्याला मत्तय ३:१७ मध्ये सांगतो: “हा माझा ‘पुत्र,’ मला ‘परमप्रिय; आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
येशू म्हणजे आनंदाचेच मूर्तिमंत रूप आहे. परमानंदाच्या सागरात तो विहार करतो. त्याचा हा आनंद आपल्याशी वाटून घेण्यासाठी तो अत्यंत उत्सुक असतो. का? कारण गर्दीमध्ये आनंद अनेक पटींनी वाढतो. योहान १५:११ मध्ये तो म्हणतो त्याप्रमाणे: “मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत, यासाठी की माझा आनंद तुमच्यामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.” येशूची अशी तीव्र इच्छा आहे की, त्याने आपल्या शिष्यांना अशा प्रकारच्या सखोल आणि अढळ आनंदाने भरून टाकावे. याच आनंदाने त्याच्या स्वतःच्या दुःखाच्या काळात त्याला आधार दिला होता (इब्री १२:२). आणि जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला असेल, तर तुम्ही त्या ‘रक्ताच्या मोलाने विकत घेतलेल्या’ गर्दीचाच एक भाग आहात.
पण यात एक अट आहे.
दुःख नाही, तर आनंदही नाही
सर्वांचा परमसमर्थ अधिपती म्हणून, देव आपला आनंद आपल्या स्वतःच्या अटींवर वाटून घेतो. आणि त्या अटींनुसार, आपल्यालाही काही प्रमाणात दुःख सोसावे लागते —जसे त्याच्या प्रिय पुत्राने पृथ्वीवर वावरत असताना सोसले होते, अगदी तसेच (फिलिप्पै १:२९). देवाचा आनंद काही फुकटात मिळत नाही. त्यासाठी आपल्याला किंमत मोजावी लागते. कारण, जर येशूने आपल्यासमोर ठेवलेल्या आनंदासाठी आपला वधस्तंभ सहन केला असेल, तर आपण त्यापेक्षा कमी कशाची अपेक्षा करावी? पेत्र आपल्याला सांगतो: “कारण ह्याचकरता तुम्हांला पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख भोगले आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे ” (१ पेत्र २:२१).
पण घाबरू नका. येशूसाठी दुःख सोसण्याची आपली हाक अशा देवाकडून येते, जो अवर्णनीय कोमल आहे. तुमच्या वेदना आणि अशक्तपणात, तो भावापेक्षाही अधिक जवळचा आहे (नीतिसूत्रे १८:२४), तो तुमच्या दुःखाची हाक ऐकतो (स्तोत्र. ९:१२), तो तुमचे सर्व अश्रू जपून ठेवतो (स्तोत्र. ५६:८), आणि तो तुमच्या सहनशीलतेचे प्रतिफळ अनंतकाळात मिळू शकणाऱ्या सर्व आनंदाने देईल (२ करिंथ. ४:१७). कदाचित सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे, जर आपण त्याच्याबरोबर दुःख सोसले, तर “आपण त्याच्याबरोबर राज्यही करू” (२ तीमथ्य. २:१२). काय, तो आनंद!
वर्षानुवर्षे माझ्या व्हीलचेअरमध्ये असताना, मी या सर्वांबद्दल आंधळी होते. मला माझ्या पक्षघाताचा तिरस्कार वाटत होता. मी व्हिनेगरच्या बरणीतील लोणच्याप्रमाणे आराम आणि सोयीच्या संस्कृतीत पूर्णपणे भिनले होते, स्वार्थीपणात भिजले होते आणि माझ्या कुरकुरण्याने व तक्रारींनी होणाऱ्या गंभीर अपराधाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. अशा अपरिपक्व श्रद्धेने, मी येशूवर केवळ माझ्या कल्पनेतच विश्वास ठेवत होते.
मग देवाने ख्रिस्तासोबतच्या माझ्या कमकुवत वाटचालीत एक बॉम्ब टाकला: आता मला पक्षाघातासोबतच तीव्र वेदनाही होऊ लागल्या. या सगळ्या दुःखाने मला एक निवड करण्यास भाग पाडले. मी खरंच देवावर विश्वास ठेवणार होते की नाही? एका शहाण्या मित्राने मला फिलिप्पै. १:२९ हे वचन दाखवले: “तुम्हाला ख्रिस्तासाठी केवळ विश्वासच नव्हे, तर त्याच्यासाठी दुःखही सोसण्याची कृपा झाली आहे.” देवाने मला अनेक दुःखांची कृपा दिली होती, ज्यामुळे त्याच्यावरील माझा खरा विश्वास येशूला महान ठरवणार होता.
या सगळ्या गोष्टीत सिंहासारख्या धैर्याचे आमंत्रण होते. देवाला प्रसन्न करेल असे काही मी करू शकेन का? आणि म्हणून मी देवावर दृढ विश्वास ठेवला. कालांतराने, असे केल्याने माझ्यातील तक्रारी दूर झाल्या, मी माझ्या तारणाऱ्याच्या आणि त्याच्या कृपेच्या अधिक जवळ गेले. माझ्या हृदयाला आणि मनाला शिस्त लागली. माझी आशा विस्तारली. मला सत्याची भूक लागली आणि मी दुःख व वेदनेच्या काळात आभार मानायला शिकले. माझ्या दुःखाने मला एका नवीन मार्गावर आणले — पवित्रतेच्या मार्गावर.
ज्या अढळ आनंदाने त्याला स्वतःच्या दुःखांतून तारले, त्याच प्रकारच्या आनंदाने आपल्या शिष्यांना भरून टाकण्याची येशूची तीव्र इच्छा आहे.
आणि त्यातच तो आनंद इतका उत्स्फूर्त आणि उल्हासित करणारा आहे की, जणू काही आनंदाच्या गडगडाटी धबधब्याखाली पाऊल ठेवल्यासारखे वाटते. जेव्हा जेव्हा संसर्ग, दाबामुळे होणाऱ्या जखमा (pressure sores) आणि न्यूमोनिया यामुळे माझी वेदना तीव्र होते, तेव्हा मी देवाचा अधिकच आधार घेते, चिंता आणि भीतीसारख्या पापांचा अधिकच त्याग करते आणि ख्रिस्ताला अधिकच गौरव अर्पण करते. आणि अशा प्रकारे, तो माझ्यासाठी आनंदाचे दरवाजे सताड उघडतो; आणि मग मला हे बोलल्यावाचून राहवत नाही की, “म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन” (२ करिंथ. १२:९–१०). केवळ समाधानीच नव्हे, तर मी निःसंशयपणे आणि पूर्णपणे आनंदी आहे. “कारण, हे प्रभू, तू मला आनंदित केले आहेस” (स्तोत्रसंहिता ९२:४).
त्याची आनंदाची नदी
मी अजूनही माझ्या अपंगत्वाशी झगडते का? अर्थातच. आणि असह्य वेदनेने विव्हळते का? होय. पण यामुळे माझा आनंद किंचितही कमी होत नाही. कारण मी “दुःखी असूनही, सदैव आनंदित असते” (२ करिंथ. ६:१०).
तुम्ही काही एखाद्या लोणच्याच्या बरणीत (अडचणीत) राहण्यासाठी निर्माण झालेले नाही. तुम्ही तर आनंदाच्या नदीत विहार करण्यासाठी निर्माण झालेले आहात. तेव्हा “ख्रिस्त येशूचा एक चांगला सैनिक म्हणून, त्याच्या दुःखात सहभागी व्हा” (२ तीमथ्य २:३). स्वर्गाच्या भिंतींवरून ओसंडून वाहणाऱ्या, आनंदाने भरलेल्या त्या पूर्ण जलाशयासाठी तुमचे हृदय खुले करा (स्तोत्र. १६:११).
मित्रा, मानवजातीचा उद्धार करण्याची पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांची जी योजना आहे, ती केवळ मानवाच्या हितासाठीच नाही. तर ती खुद्द देवाच्या हितासाठी आहे. पिता अशा एका समूहाला एकत्र करत आहे—एक असा वारसा, जो शुद्ध आणि पवित्र आहे—ज्याने युद्धाच्या अग्निदिव्यातून स्वतःला सिद्ध केले आहे. हा समूह त्याच्या आनंदात रममाण होईल आणि पवित्र आत्म्याच्या सुखात त्याच्या पुत्राची उपासना करणे, हेच आपले शाश्वत ध्येय मानेल. देव हाच प्रीती आहे; आणि ज्यांच्यासाठी देवाने कष्ट सोसले आहेत, त्यांना आनंदाने चिंब भिजवून टाकणे, हीच प्रीतीची इच्छा असते.
आणि लवकरच, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांची ही इच्छा पूर्ण होईल.




Social