Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मार्च 1, 2022 in जीवन प्रकाश

याला मी अपवाद आहे असे तुम्हाला वाटते का?

याला मी अपवाद आहे असे तुम्हाला वाटते का?

 जॉन ब्लूम

          



आपल्या अनेक पापांचे मूळ कारण आहे: याला मी अपवाद आहे अशी समजूत. म्हणजे जे बहुतेक सर्वांना लागू पडते ते माझ्यासाठी नाही.
खाली दिलेल्या काही गोष्टी ओळखीच्या वाटतात ना?

  • मला उशीर झालाय आणि कोणाला असं वाटायला नको की मी बेपर्वा किंवा बेशिस्त आहे म्हणून मी ट्राफिकलाईट मोडून वेगाने जातो (अर्थात पोलीस दिसल्यास नाही).
  • जसे लोकांनी तुमच्याशी वर्तन करावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही त्यांच्याशी वर्तन करा (मत्तय ७:१२) हा नियम मला ठाऊक आहे. आपण रागाला मंद असावे (याकोब १:१९) मृदू उत्तर द्यावे (नीती. १५:१) हे मला माहीत आहे. पण सध्या मला राग आलेला आहे म्हणून मी कठोरपणे बोलणार ( मी स्वत:ला अपवाद समजेन). तुम्ही मला दोष लावू नका पण समजून घ्या की हा माझा स्वभाव आहे. (दुसरे जर माझ्याशी कठोरपणे बोलले तर मात्र मी जरूर दोष लावणार).
  • आपली पापे एकमेकांजवळ कबूल करावी म्हणजे पुढे पापाला तोंड द्यायला मदत होईल व नम्रतेने चालता येते हे मला ठाऊक आहे. पण हे पाप कबूल करायला मला ओशाळवाणे वाटते. त्यामुळे मी खरंच वाईट ठरेन. म्हणून मी स्वत:ला अपवाद करेन आणि पुढच्या वेळी स्वत: खूप प्रयत्न करेन. मला विजय मिळाल्यावर कदाचित मग मला ते कुणाजवळ कबूल करता येईल.
  • माझ्याकडे गाडी चालवायचं लायसन्स नाही पण मला ते काढायला वेळ नाही. म्हणून थोडे दिवस मी स्वत:ला या नियमासाठी अपवाद ठरवून तशीच गाडी चालवेन.
  • बायबल म्हणते की, “कित्येकांच्या चालीप्रमाणे एकत्र मिळणे सोडू नका” (इब्री १०:२५). पण रविवार हा एकच दिवस मी थोडे जास्त झोपून आराम करू शकतो. (शब्बाथ म्हणजे विसावाच ना?) नाहीतरी त्या गाण्यांतून आणि उपदेशातून मला विशेष शिकायला मिळत नाही. तसा मी ऑनलाईन गाणी, संदेश ऐकतोच की! स्थानिक मंडळीचा एक कृतिशील सभासद होण्यात मी अपवाद होऊ शकतो.
  • अश्लील चित्रे पाहणे एक व्यसन बनू शकते. त्यामुळे काही लोकांचा इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो  आणि वासना हे पाप आहे असे येशू म्हणतो हे मला ठाऊक आहे. पण या धोक्यासंबंधी मी मला अपवाद बनवू शकतो. कारण या गोष्टी मला न होण्याची मी काळजी घेईन. अधून मधून पहिले तर माझ्यावर फारसा परिणाम होणार नाही आणि नेहमीप्रमाणे येशू मला क्षमा करीलच.


अशा आणखी अनेक बाबी आपल्याला मांडता येतील. अशा गोष्टी आपण लिहीत राहणे गरजेचे आहे. कारण लिहून परत वाचल्याने अपवादात्मक तर्क हे खरे काय आहेत हे आपल्याला दिसून येईल. आणि खऱ्या रीतीने ते काय आहेत तर स्वार्थी गर्व!

आपल्या तर्कांमधील गर्व
 इच्छेने केलेल्या प्रत्येक  पापामागे, जाणीवपूर्वक मोडलेल्या देवाच्या प्रत्येक आज्ञेमागे असा तर्क (गृहीत) असतो की, देव किंवा त्याने नेमलेला अधिकार ( सरकार, शाळा, बॉस, पालक) हे जे म्हणतात ते इतर लोकांसाठी चांगले आहे पण ते आपल्याला लागू करण्याची गरज नाही. स्वभावतःच आपला असा विश्वास असतो की आपण आपल्यासाठी धार्मिकतेचे आणि न्यायाचे उत्तम न्यायाधीश आहोत. आणि प्रीती, सन्मान, आदर यांची योग्य व्याख्या फक्त आपणच करू शकतो व त्याचे लागूकरण करू शकतो. अशा खोट्या भ्रमाने  आपण स्वत:ला भरून टाकतो. पण ह्या खोट्या भ्रमाहून वाईट आहे तो जुनाट, एदेनात उगम पावलेला स्वकेंद्रित गर्व.
आपल्याला हे माहीत आहे कारण आपण ते इतरांमध्ये पाहू शकतो. विशेषत: जेव्हा त्यांच्या खोट्या भ्रमांचा आपल्यावर थेट परिणाम होतो.

कोणीतरी खूप वेगाने आपल्याला ओलांडून गर्दीतून गेले किंवा आपल्याशी कठोरपणे बोलले किंवा आपल्या छोट्या गटात प्रामाणिकपणे बोलले नाही तर ते आपल्याला आवडत नाही. तुमच्या मुलाने तुम्हाला न विचारता  विनापरवाना गाडी चालवली, मंडळीचा एखादा सभासद इतरांची पर्वा करत नाही किंवा तुम्हाला माहीत असलेली व्यक्ती अश्लील फिती पाहते हे तुम्हाला समजले तर ते तुम्हाला आवडत नाही. दुसरे जेव्हा असे वर्तन करतात तेव्हा आपण त्याला योग्य तेच नाव देतो: स्वार्थी! – गर्वाचे हेच वर्तन असते.
दुसऱ्यांच्या स्वार्थीपणाचा असा संताप येणे आणि तरीही आपण तशाच गोष्टी करणे हे उपरोधिक नाही का?
पण आपल्याला आपला स्वार्थीपणा तितका दुष्ट का दिसत नाही? कारण गर्व हा आपल्याबद्द्लचा दृष्टिकोन बदलतो. आपण जर स्वत:च्या वृत्ती व कृतींचे  निश्चयाने व निर्दयपणे मूल्यमापन करणार नसलो तर आपण आपल्याला चुकीच्या भ्रमाच्या गुलाबी भिंगातून पाहू.

निदान करण्यासाठी एक जलद तपासणी
अशा प्रकारचा गर्व आपल्या कल्पनेपेक्षा आपल्यावर अधिक भार आणतो (इब्री १२:१) कारण तो पापी प्रवृतीचे प्रवेशद्वार आहे. तो आपल्या ह्रदयाचा दरवाजा अनेक पापांसाठी  उघडतो आणि अशी कल्पना देतो की त्यामुळे आपल्याला विशेष हानी किंवा नुकसान पोचणार नाही. दरम्यान आणखी एक झुरका, आणखी एक राईड, आणखी एका वासना पूर्तीसाठी बटन दाबणे अशा कृतींनी हा भार वाढत जातो व तो आपली आध्यात्मिक इच्छा अधिक बोथट करतो, आपली प्रीती करण्याची क्षमता कमी करतो आणि आपल्या स्वार्थी इच्छांच्या आड येणारी कोणतीही गोष्ट खपवून घेणे कमी करतो. आपल्याला कळण्यापूर्वीच आपण एका आध्यात्मिक रोगाला बळी पडलेले असतो व हे का घडत आहे हे आपल्याला समजत नाही.

जर तुम्हाला तुमची निदान करण्यासाठी एक जलद तपासणी करायची असेल तर अपवादात्मक गर्वाची ही काही सामान्य लक्षणे आहेत:

  • कृतद्न्यतेचा अभाव (मला हे मिळायलाच हवे!)
  • कटुत्व ( संकटे , संघर्ष , दु:खसहनन , वेदना, निराशा हे मला सहन करण्याची गरज नाही)
  • द्वेष (मला त्याच्यासारखा मान व कौतुक मिळायला हवे)
  • अधीरपणा (त्या व्यक्तीच्या पापाचा परिणाम मी का सोसू?)
  • चिडचिड (ही गैरसोय मी का सोसू?)
  • उपभोग (मला ज्याची तीव्र इच्छा होते ते मी करणारच)

अपवादाचे हे ओझे दूर टाका
आपल्याला उपजतच पापस्वभाव  मिळालेला असल्याने असे चिकटून राहणारे पापाचे ओझे आपण सर्वच जण उचलत राहतो. आणि म्हणून लवकरात लवकर ते दूर सारण्यास आपण शिकले पाहिजे (इब्री १२:१). आपण अशी ओझी उचलतो कारण ती आपल्यासाठी स्वातंत्र्याच्या किल्ल्या आहेत असे आपल्याला वाटते. पण त्यांचा शेवट स्वत:चे लाड पुरवणाऱ्या मोठ्या साखळ्यांनी स्वत:ला बांधून घेण्यात होतो आणि इतरांना देण्यामध्ये (प्रेषित २०:३५), सेवा करण्यामध्ये (मार्क १०:४३-४५), मान देण्यात (रोम १२:१०) आणि आपल्यासारखी इतरांवर प्रीती करणे (मत्तय २२:३९) यामध्ये  जो खरा आनंद असतो तो आपल्यापासून हिरावून घेतला जातो. येशू यासाठी आला की त्याने आपल्याला अशा अपवादाच्या गर्वापासून मुक्त करावे, म्हणजे आपल्याला देवाच्या मुलांचे निरोगी व नम्रतेचे वैभवी जीवन जगता यावे  (रोम ८:२१).

हा गर्व दूर सारण्याची सुरुवात आपण प्रभूला प्रामाणिकपणे याची कबुली देऊन व जे काही दिसते त्याचा पश्चात्ताप करून व जे दिसत नाही ते दाखवण्यासाठी पवित्र आत्म्याला विनंती करून होईल. अशी प्रार्थना करण्यास जितके तुम्ही कचराल तितके अधिक प्रार्थना करण्याची तुम्हाला गरज आहे. पण तिथेच थांबायचे नाही. देवाने आपल्याला मंडळीत व कुटुंबात आध्यात्मिक बहीण भावंडे दिली आहेत. आपला गर्व आपला स्वत:बद्दलचा दृष्टिकोन आपल्याला  इतका बदलून टाकतो की आपल्याला न दिसणारे डाग दिसण्यासाठी आपल्याला त्यांच्या स्पष्ट निरीक्षणाची गरज असते. हे स्वत:हून करायला ते बहुतेक नकार देतील. जर असे असेल तर आपण नम्रतेने त्यांना विचारण्याची गरज आहे व त्यांनी प्रामाणिकपणे सांगावे म्हणून त्यांना सुरक्षित ठेवण्याची गरज आहे.

आपण अपवाद नाहीत. प्रीतीच्या नियमाच्या अथवा देवाच्या, देशाच्या नियमाच्या  वर आपण आहोत असे वाटण्यापासून जे मुक्त झाले आहेत त्यांना समजून येते की ते फक्त देवाच्या क्रोधाला पात्र आहेत. येशूमध्ये त्यांना सर्व कृपेनेच मिळाले आहे. यामुळे चांगल्या गोष्टी देणग्या होतात, प्रत्येक ओझे हलके होते. त्यांना आश्चर्यकारक, विस्तृत, आनंददायी असे नम्रतेचे वैभवी दार सापडते. आणि तेथे “जे सोम्य ते धन्य” असे येशूने का म्हटले हे त्यांना गवसते.