अगस्त 11, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

घर सांभाळणे हे दैवी आहे, कमीपणाचे नाही

 कॅरीस कॉम्पटन

“हे तर कमीपणा आणणारे आहे!”

स्त्रिया घरचे काम करणाऱ्या असाव्यात (तीत २:३-५); त्यांनी  घर चालवावे (१ तीमथ्य ५:१४) किंवा नीतिसूत्रे ३१:२७ अशा प्रकारे आदर्श स्त्रीचे वर्णन करते, “ती आपल्या कुटुंबाच्या आचारविचारांकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही.  यांसारख्या स्त्रियांना घर सांभाळण्यास प्रोत्साहन देणाऱ्या वचनांना मिळणारा वरील प्रतिसाद परिचित आहे.

स्त्रियांना कमी लेखण्यासाठी देवाने हे काम दिले आहे का?

घर सांभाळण्याचे काम हे एक दिव्य कार्य आहे

घर सांभाळणाऱ्यांमध्ये सर्वोत्तम खुद्द देवच आहे.

हे जग घडवण्यात आणि त्याला सुव्यवस्थित करण्यात त्याला आनंद मिळाला; आकाशात लावलेल्या प्रकाशाच्या आधारे त्याने दिवस आणि रात्री निश्चित केल्या. ज्या प्राण्यांना त्याने अजून अस्तित्वात आणायचे होते, त्यांच्यासाठी त्याने खास निवासस्थाने तयार केली — रानटी शेळ्यांसाठी उंच पर्वत, सारस पक्ष्यांसाठी फर वृक्ष आणि खडकाळ कड्यांवर राहणाऱ्या प्राण्यांसाठी उंच कडे (स्तोत्र. १०४:१७-१८). त्यानंतर त्यांच्या आनंदासाठी त्याने पृथ्वीवर अन्नाची रेलचेल केली. पण आपल्या प्रतिमेत निर्माण केलेल्या मानवांसाठी त्याच्या मनात काहीतरी वेगळेच होते; त्यांच्यावर त्याने आपल्या जगावर राज्य करण्याची जबाबदारी सोपवली. त्याने त्यांना स्वतः तयार केलेल्या एका सुंदर बागेत, त्यांच्या ‘घरात’ स्थापित केले; अशी जागा जिथे तो दिवसाच्या गारव्यात त्यांच्यासोबत फिरायचा आणि जिथे ते त्या बागेची निगा राखण्याच्या, त्यावर राज्य करण्याच्या आणि ती भरून काढण्याच्या स्वतःच्या कामात आनंद घ्यायचे.

आपल्या आदि-मातापित्यांना त्यांचे घर सांभाळण्यात अपयश आले, तरीही दिवसेंदिवस आणि पिढ्यानपिढ्या देव त्याचे ‘घर सांभाळण्याचे’ कार्य करतच आहे. तो आपला हात उघडून आपल्या प्राण्यांना अन्न देतो; ज्यामुळे पक्षी गातात, सिंह गर्जना करतात आणि पृथ्वी त्याच्या “कार्याच्या फळाने तृप्त” होते (स्तोत्र. १०४:१३). तो त्यांना वस्त्रेही देतो — काहींना नेत्रदीपक नक्षीकाम तर काहींना आश्चर्यकारक पिसे बहाल करतो. त्याच्या हृदयाच्या अत्यंत जवळ असलेल्यांच्या नग्नतेची लज्जा प्राण्यांच्या कातड्याने तो झाकतो आणि त्यानंतर त्याने आणखी एक कार्य पूर्ण केले ते म्हणजे त्यांना नीतिमत्त्वाची वस्त्रे लेववली.

देव आपल्या लोकांचे — शरीर आणि आत्मा या दोन्हींचे — जतन व पोषण करतो. शब्बाथ दिवस (विश्रांतीचा दिवस) नेमून त्याने हे सुनिश्चित केले की त्यांच्या शरीराला विश्रांती मिळावी आणि त्यांच्या मनाला आठवण राहावी की त्याने त्यांच्यासाठी कसे कार्य केले आहे. त्याने सणांचे वेळापत्रकही निश्चित केले, ज्यामध्ये गंभीर चिंतन आणि आनंदी उत्सवांचे मोसम समाविष्ट होते. त्याने आपल्या लोकांना त्याचे अमूल्य शब्द सांगण्यासाठी संदेष्टे, याजक आणि राजे दिले; कारण केवळ भाकरीने तृप्ती होणे शक्य नव्हते. आज त्याचे लोक त्याच्या आध्यात्मिक अन्नाचा आस्वाद घेण्यासाठी आणि नीतिमत्त्वाची नवीन वस्त्रे पांघरून आनंद घेण्यासाठी, ‘प्रभूच्या भोजनाच्या’ मेजाभोवती एकत्र येतात.

ही सर्व कार्ये आपल्या घर सांभाळण्याच्या कामात प्रतिबिंबित होतात. जर देवाला या गोष्टी करण्यात आनंद मिळत असेल, तर त्या गोष्टी एखाद्या स्त्रीचा दर्जा कसा काय कमी करू शकतील?

घर सांभाळण्याचे काम हे एक उत्तम कार्य आहे

एक सुज्ञ स्त्री—मग ती अविवाहित असो वा विवाहित—आपले घर उभारताना, परिसराची मांडणी करताना आणि त्या घरात येणाऱ्या जिवांसाठी जागांची खास रचना करताना देवाचे अनुकरण करण्यात आनंद मानते. देवाने जसे तिच्यासाठी केले आहे, तसेच ती देखील आपल्या देखरेखीखालील लोकांचे पोट भरण्यासाठी आणि त्यांना वस्त्र देण्यासाठी आपला हात पुढे करते; आणि जोपर्यंत तिचे कुटुंब “तिच्या कामाच्या फळाने तृप्त” होत नाही तोपर्यंत ती हे करत राहते. ती त्यांचे संगोपन करण्यासाठी कष्ट करते; शरीरासाठी अन्न आणि आत्म्यासाठी ‘जीवनाची भाकरी’ (आध्यात्मिक पोषण) पुरवते. ती दैनंदिन दिनचर्या आणि परंपरा निश्चित करण्यास मदत करते, ज्यामुळे तिच्या कुटुंबाला त्यांच्या देवाच्या चांगल्या मार्गांचे प्रशिक्षण मिळेल. ती आपल्या घरातील सदस्यांना करण्यासाठी चांगली कामे उपलब्ध करून देते. थोडक्यात सांगायचे तर, देवाने आपल्या लोकांसाठी जे केले आहे, तेच एक उत्तम गृहिणी आपल्या लोकांसाठी करते.

एखाद्या स्त्रीचे घर विस्तारू शकते—ज्यात पती, मुले, पाहुणचाराची गरज असलेले अनोळखी लोक, वृद्ध आई-वडील, थकलेले शेजारी, प्रेमासाठी आसुसलेली अनाथ मुले, दुःखी स्त्रिया, भेटीला आलेले देवाचे सेवक आणि नातवंडे यांचा समावेश असू शकतो. किंवा मुलांचे स्वतंत्र होणे, मृत्यूमुळे होणारी ताटातूट आणि स्थलांतरामुळे होणारे वेगळेपण यांमुळे ते घर आकुंचनही पावू शकते. तिची कार्यकक्षाही वाढू शकते—जसे  ती प्राणी, झाडे, मालमत्ता आणि इतर उपक्रम आपल्या देखरेखीखाली घेते—आणि वय वाढल्यामुळे ती कमीही होऊ शकते. काळाच्या ओघात घराच्या गरजा आणि साधने बदलत असताना या कामात अनंत विविधता असते; परंतु एक सुज्ञ स्त्री बदलांच्या वादळांचा धैर्याने सामना करते, वाढत्या जबाबदाऱ्यांसह प्रगती करते आणि देवाचे प्रतिबिंब म्हणून, घरासाठी आवश्यक असलेल्या कामाचा स्वीकार करण्यासाठी आपले संपूर्ण अस्तित्व पणाला लावते.

घर सांभाळण्याचे काम हे एक उत्तम कार्य आहे. घर सांभाळण्याचे काम हे एक दैवी कार्य आहे.

घरगुती काम हे कष्टाचे काम आहे.

तरीही, घरगुती काम हे कष्टाचे काम आहे. जेव्हा देवाने जमिनीला शाप दिला, तेव्हा ती पतित मानवी हृदयाप्रमाणेच ओसाड बनली आणि बागेतील फलदायी काम हे एदेनच्या पूर्वेकडे जीवनातील थकवणाऱ्या कष्टांमध्ये बदलले. पण याच शापित जगात येशूचा जन्म झाला. सेवक होण्यासाठी जन्मलेल्या येशूने आपले जीवन घरगुती स्वरूपाच्या अनेक कामांनी भरून टाकले. भुकेल्यांना अन्न देणे, घाणेरडे पाय धुणे, आजाऱ्यांना बरे करणे, लग्नसमारंभात आनंद साजरा करणे, कबरीजवळ अश्रू ढाळणे, लोकांच्या भीतीचे म्हणणे ऐकून घेणे, धोक्याची सूचना देणे आणि सत्याचे शिक्षण देणे यात त्याने आपली शक्ती खर्ची घातली. आणि जरी त्याने आपल्या शिष्यांना वारंवार सांगितले की त्याला धार्मिक नेत्यांच्या हातून त्याला मरण येईल, तरीही त्यांना काहीच समजले नाही (लूक १८:३४). असे असूनही, येशूने आपल्या त्या पुनरावृत्ती होणाऱ्या आणि वरकरणी निरर्थक वाटणाऱ्या कामात कष्ट केले.

देवाने येशूला हे काम त्याला कमी लेखण्यासाठी दिले होते का?

येशूच्या मनात असा विचार कधीच आला नाही. त्याने आपले काम आनंदाने स्वीकारले, जसे त्याच्या पित्याने त्याच्या कामाचा गौरव केला तसेच त्यानेही घोषित केले, “हे माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद वाटतो” (स्तोत्रसंहिता ४०:८; इब्री लोकांस पत्र १०:७).

कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही एकाच गोष्टीची पुनरावृत्ती करत आहात; कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतःला थकवत आहात पण काहीच साध्य करत नाही आहात. घरगुती काम हे कष्टाचे काम आहे. येशूपेक्षा हे कोणालाच चांगले समजले नाही. पण येशूचे कार्य आपल्या थकव्याला एक दिलासादायक संदेश देते. तो — परमेश्वराचा सेवक — कदाचित असे ओरडला असेल, “मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचले,” पण त्याच्या पुढच्याच वाक्यात त्याचा विश्वास दिसून येतो: “तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे; माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे” (यशया ४९:४).

आपले मार्ग येशूच्या मार्गाचीच प्रतिमा आहेत. घरगुती काम — जे दैवी आहे — ते आपल्याला थकवेल, पण देव आपल्याला त्याचे प्रतिफळ देईल. येशूचा यावर विश्वास होता, म्हणून तो निराश झाला नाही, जरी त्याच्याकडे निराश होण्याचे कारण इतर कोणापेक्षाही जास्त होते. त्याने मरेपर्यंत सेवा केली आणि नंतर गौरवाचा मुकुट प्राप्त करण्यासाठी तो पुनरुत्थित झाला.

आणि जे त्याचे आहेत ते नक्कीच तसेच करतील.

घरगुती काम हे प्रतिफळ देणारे काम आहे

आपण आपली घरे बांधतो आणि नीटनेटकी ठेवतो, घरात राहणाऱ्यांचे संगोपन करतो, भुकेल्यांना अन्न देतो, उघड्या-नागड्यांना वस्त्र देतो आणि सत्य शिकवतो — हे सर्व काही व्यर्थ नसते. बाळाचे डायपर बदलणे असो, प्रेमाने एखादे सत्य शिकवणे असो किंवा जेवण तयार करणे असो—या प्रत्येक कामातून देव आपल्या गूढ मार्गांनी तुमच्यासाठी आणि या जगासाठीच्या त्याच्या गौरवशाली योजना पूर्ण करत असतो. खरे तर, घरातील ही कामे आपल्याला स्वर्गातील एका उत्तम घरासाठी—म्हणजेच जिवंत देवाच्या नगरासाठी—घडवत असतात. तिथे येशू आता आपल्यासाठी एक उत्तम जागा तयार करत आहे; तिथे तो आपल्याला शुभ्र पांढरे वधूचे वस्त्र परिधान करवेल, आपल्या मस्तकावर नीतिमत्त्वाचा मुकुट सजवेल आणि आपल्याला अशा मेजवानीच्या टेबलावर बसवेल जिथे आपण त्याच्या हातांच्या कार्याचा आनंद घेऊ आणि सदैव तृप्त राहू.

या आठवड्यात, घरातील कामे करत असताना, ज्यांना देवाने तुमच्या स्वाधीन केले आहे त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उदार मनाने आणि मुक्त हाताने पुढे या. जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल किंवा या सर्व गोष्टी व्यर्थ वाटू लागतील, तेव्हा येशूचे हे शब्द आठवून पहा: “तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद वाटतो” (स्तोत्रसंहिता ४०:८). “माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे” (यशया ४९:४).

Previous Article

आपण अधिक चांगल्या नगराकडे पाहतो

You might be interested in …

मी कोमट आहे का?

जॉन पायपर कोमटपणा म्हणजे काय? कोमटपणाचे सार म्हणजे असे म्हणणे, “ मला कशाची गरज नाही, मला काहीच नको. मला येशू मिळाला ते पुरे आहे. एक दिवस मी त्याला माझ्या ह्रदयात यायला आमंत्रण दिले होते आणि […]

धडा १५.   १ योहान ३:४-६ स्टीफन विल्यम्स

  पाप म्हणजे स्वैराचार ख्रिस्ती लोक ढोगी आहेत अशी लोक टीका करतात हे तुम्हाला माहीत आहे का?  हा मोठा मनोरंजक आरोप आहे; कारण ख्रिस्ती लोक चांगले असलेच पाहिजेत असे गृहीत धरून  त्यावर आधारित केलेला हा […]

चिडचिड? विसरून जा

स्कॉट स्मिथ देवाने आपल्यासाठी येशूमध्ये  भरभरून केलेल्या, अढळ, न संपणाऱ्या प्रीतीची आठवण जितकी मी अधिक करतो तितके मी इतरांवर चिडण्याचे विसरून जातो. दुर्दैवाने चिडचिड करावी असे मी स्वत:ला सांगतो. पण जिथे मी कमकुवत आहे तेथे […]