अगस्त 18, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

नग्नता पाहण्याची मोठी किंमत

जॉन पायपर

टोनीचा प्रश्न

 लैंगिकतेशी संबंधित सामग्री सर्वत्र आहे. जाहिरातदार वस्तू विकण्यासाठी सूचक प्रतिमा वापरतात. सोशल मीडिया फॉलोअर्स मिळवण्यासाठी उत्तेजक किंवा अर्ध-नग्न फोटो पोस्ट करतात. संगीतकार अनेकदा प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नर्तकींवर अवलंबून असतात,. चित्रपट आणि मालिकांमध्ये नग्नता असते. प्रौढ वेबसाइट्सवर उपलब्ध असलेली अश्लील सामग्री, वासनेने प्रेरित माध्यमांपर्यंत थेट प्रवेश देते.

तर पास्टर जॉन, याबद्दल तुमची काय मते आहेत? ख्रिस्ताच्या शुद्धतेच्या आवाहनाचा आदर करताना तुम्ही या संस्कृतीत वैयक्तिकरित्या कसे वावरता?

अत्यंत शुद्धतेचा ध्यास

टोनी, जसजसा मी मृत्यूच्या आणि येशूला वैयक्तिकरित्या समोरासमोर भेटण्याच्या, आणि माझ्या जीवनाचा, मी बोललेल्या निष्काळजी शब्दांचा आणि हेतुपुरस्सर टाकलेल्या नजरांबद्दल  हिशोब देण्याच्या (मत्तय १२:३६) जवळ जात आहे, तसतसा माझा हा निर्धार अधिक दृढ होत आहे की, मी जाणूनबुजून असा कोणताही टीव्ही शो, चित्रपट, वेबसाइट किंवा मासिक पाहणार नाही, जिथे मला नग्नतेची छायाचित्रे किंवा व्हिडिओ दिसतील. कधीही नाही. हाच माझा निर्धार आहे. आणि जसजसा मी मृत्यूच्या जवळ जात आहे, तसतसे मला त्याबद्दल अधिक चांगले वाटत आहे आणि मी अधिक वचनबद्ध होत आहे.

आणि मला प्रामाणिकपणे, सर्व ख्रिस्ती लोकांना हृदय आणि मनाच्या अधिक शुद्धतेच्या या ध्यासात माझ्यासोबत सामील होण्यासाठी आमंत्रित करायचे आहे. आजच्या काळात, जेव्हा मनोरंजनाची माध्यमे जगाची एक प्रकारे सामान्य भाषा बनली आहेत, तेव्हा हे एक वेगळे, जगावेगळे बनण्याचे आमंत्रण आहे. आणि माझा मनापासून विश्वास आहे की जगाला अत्यंत धाडसी, त्यागमय प्रेम करणारे, देवाच्या प्रेमात वेडे झालेले, जगावेगळे लोक हवे आहेत.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, मी तुम्हाला जगासाठी, जगाला नाही’ म्हणण्यासाठी आमंत्रित करत आहे. जगाला स्वतःच्याच अधिक कूल, हिप, सांस्कृतिकदृष्ट्या जाणकार, प्रतींची  गरज नाही. हा एक भ्रम आहे, ज्या भ्रमाने हजारो तरुण ख्रिस्ती व्यक्तींना फसवले आहे. त्यांना जगावेगळे दिसू नये म्हणून हिप, कूल, जाणकार, सांस्कृतिकदृष्ट्या जागरूक राहावे लागते, सर्व काही पाहावे लागते, आणि हेच त्यांना नैतिकदृष्ट्या त्यांच्या साक्षीसाठी हानिकारक ठरत आहे.

दृढनिश्चय करण्याची बारा कारणे

तर, ही माझी कारणे आहेत. माझ्याकडे बारा कारणे आहेत. मित्रांनो, इतरांना गरज असो वा नसो, मला यांची गरज आहे, आणि मला वाटते की इतरांनाही आहे. मी अशा कोणत्याही गोष्टीपासून पूर्णपणे दूर राहण्याचा दृढनिश्चय का केला आहे त्याची ही कारणे आहेत.

कारण १

येशू माझी शुद्धी करण्यासाठी मरण पावला. तो आपल्या लोकांची शुद्धी करण्यासाठी मरण पावला. येशू केवळ नग्नता पाहण्याच्या पापाबद्दल आपल्याला क्षमा करण्यासाठी मरण पावला, पण ते न पाहण्याच्या सामर्थ्यासाठी आपली शुद्धी करण्यासाठी नाही  असा अर्थ लावणे हा क्रूसाचा घोर अपमान आहे. त्याच्या क्रूसामध्ये रक्ताने विकत घेतलेले सामर्थ्य आहे. तो आपल्याला शुद्ध करण्यासाठी मरण पावला. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे’ (तीत २:१४). जर आपण अपवित्रतेला मान्यता देण्याचा, स्वीकारण्याचा, तिचा आनंद घेण्याचा किंवा तिचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला, तर आपण प्रत्येक वेळी येशूच्या कुशीत भाला खुपसतो (इब्री ६:६). त्याने आपल्याला अपवित्रतेपासून मुक्त करण्यासाठी दुःख सोसले.

कारण २

बायबलमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत, मन, हृदय आणि जीवनाच्या पवित्रतेसाठी एक मूलभूत आवाहन आहे. “तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा ” (१ पेत्र १:१५). किंवा २ करिंथ. ७:१: “तेव्हा प्रियजनहो, आपल्याला ही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.” चित्रपटांमधील आणि फोटोंमधील नग्नता पवित्र नाही आणि ती आपल्या पवित्रतेत वाढ करत नाही. ती अपवित्र आणि अशुद्ध आहे.

कारण ३

येशू म्हणाला, “मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे” (मत्तय ५:२८-२९). नग्न  स्त्रिया आणि पुरुषांना पाहिल्याने स्त्री-पुरुष आपल्या मनाने आणि वासनांनी, आणि अनेकदा शरीरानेही पाप करतात. जर येशूने आपल्याला वासनेपासून वाचण्यासाठी आपले डोळे काढून टाकून आपल्या हृदयाचे रक्षण करण्यास सांगितले आहे, तर तो किती अधिक म्हणाला असता की, “ते पाहू नका”?

कारण ४

ख्रिस्तामधील जीवन म्हणजे मुख्यत्वे वाईटापासून दूर राहणे नव्हे, तर मुख्यत्वे चांगल्या गोष्टींचा उत्कटतेने पाठपुरावा करणे होय. फिलिप्पै. ४:८: “जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा..” माझे वडील म्हणायचे, “चांगल्या कामात इतके व्यस्त रहा की वाईट गोष्टींसाठी वेळच मिळणार नाही.”  माझे जीवन मर्यादित जीवन नाही. ते एक स्वतंत्र जीवन आहे. “बंधुजनहो, तुम्हांला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले; तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा” (गलती. ५:१३).

कारण ५

मला या जीवनात आणि पुढच्या जीवनात देवाला शक्य तितक्या पूर्णपणे पाहायचे आहे आणि ओळखायचे आहे. नग्नता पाहणे हा त्या ध्येयाच्या मार्गातील एक मोठा अडथळा आहे. “जे अंतःकरणाने शुद्ध आहेत, ते धन्य, कारण ते देवाला पाहतील” (मत्तय ५:८). नग्नता पाहिल्याने मन आणि हृदय अपवित्र होते, ज्यामुळे देवाला पाहण्याची आणि त्याचा आनंद घेण्याची हृदयाची क्षमता मंदावते.

कारण ६

देव स्त्रियांना “आदरणीय वस्त्रांनी, नम्रता आणि आत्मसंयमाने स्वतःला सजवण्यास” सांगतो. हे १ तीमथ्य २:९ मध्ये आहे. जेव्हा आपण आपल्या मनोरंजनात नग्नतेचा पाठपुरावा करतो किंवा स्वीकारतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे अशा स्त्रियांच्या पापाला मान्यता देत असतो, ज्या स्वतःला या मार्गाने विकतात. आणि म्हणूनच आपण त्यांच्या आत्म्याबद्दल निष्काळजी असतो. त्या १ तीमथ्य २:९ चे उल्लंघन करत आहेत, आणि आपण म्हणत आहोत की ते ठीक आहे.

कारण ७

बहुतेक ख्रिस्ती नग्नता पाहण्याच्या बाबतीत ढोंगी असतात. कारण, एकीकडे ते पाहून असे म्हणतात की हे ठीक आहे. आणि दुसरीकडे त्यांना आतून माहीत असते की, आपल्या मुलीने किंवा पत्नीने अशी भूमिका करावी असे त्यांना अजिबात वाटणार नाही. हाच ढोंगीपणा आहे.

कारण ८

पडद्यावरील नग्नता ही खून आणि हिंसेसारखी नाही जी केवळ एक बनावट गोष्ट असते; त्यात कोणीही खरोखर मारले जात नाही. पण नग्नता ही बनावट नसते. या अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर खरोखरच नग्न असतात, आणि दिग्दर्शक त्यांच्या हात, पाय आणि स्तनांबद्दल जे काही सांगतो, तेच त्या करतात. त्या तिथे उभ्या असतात, आणि लाखो लोकांसमोर नग्न असतात — संपूर्ण जगाला पाहण्यासाठी.

कारण ९

लैंगिक संबंध ही एक सुंदर गोष्ट आहे. देवाने ती निर्माण केली आणि तिला चांगले म्हटले. हा काही प्रेक्षकांचा खेळ नाही. हा एक पवित्र आनंद आहे, जो कोमल प्रेमाच्या सुरक्षित ठिकाणी पवित्र असतो.

कारण १०

असा कोणताही महान चित्रपट नाही ज्याला आपला मोठेपणा वाढवण्यासाठी नग्नतेची गरज आहे. लैंगिक संबंधांना प्रेक्षकांचा खेळ न बनवता आणि अभिनेते व अभिनेत्रींना सेटवर नैतिकदृष्ट्या अडचणीच्या परिस्थितीत न टाकता, वास्तवाशी प्रामाणिक राहण्याचे अनेक सर्जनशील मार्ग आहेत. यामागे कोणतीही महान कलात्मक सचोटी नाही. या सर्वामागे पुरुषांची लैंगिक भूक आहे, जी या व्यवसायाला चालना देते, आणि त्यातूनच उद्योगातील समवयस्कांचा दबाव आणि विक्री वाढवणाऱ्या रेटिंगची इच्छा निर्माण होते. नग्नता ही कला आणत नाही. तर ती कामुकतेचे आकर्षण आहे. ती विकली जाते.

कारण ११

ख्रिस्ती लोक पवित्रता वाढवण्याच्या उद्देशाने नग्नता पाहत नाहीत. त्यामुळे ते पुन्हा पुन्हा ते कार्यक्रम पाहत नाहीत. त्यांना अंतर्मनातून माहीत असते की, हे टीव्ही कार्यक्रम किंवा हे चित्रपट अशा वृत्ती आणि कृतींच्या स्तुतीने भरलेले आहेत. ते स्वार्थत्याग आणि ख्रिस्ताच्या गौरवाशी पूर्णपणे विसंगत आहेत. त्या ख्रिस्ती लोकांना पुन्हा पुन्हा येण्यास प्रवृत्त करणारी गोष्ट म्हणजे ही भीती की, जर त्यांनी ख्रिस्ताचे शब्द खरे मानले आणि पवित्रतेला मी सांगत आहे तितके गांभीर्याने घेतले, तर त्यांना इतके टीव्ही कार्यक्रम आणि इतके चित्रपट पाहणे थांबवावे लागेल. त्यांच्याकडे विचित्र म्हणून पाहिले जाईल. आणि आजच्या काळात हेच सर्वात मोठे पाप आहे. विचित्र म्हणून पाहिले जाणे हेच आज खूप मोठे पाप आहे.

कारण १२

एक बायबलसंबंधी मार्गदर्शक तत्त्व आहे जे जीवन खूप सोपे करते. रोम. १४:२३: “जो कोणी शंका बाळगतो, तो खाल्ल्यास दोषी ठरतो, कारण ते खाणे विश्वासातून होत नाही. कारण जे काही विश्वासातून होत नाही ते पाप आहे.” माझा स्वैर अनुवाद: जर तुम्हाला शंका असेल, तर ते करू नका. यामुळे लाखो लोकांच्या पाहण्याच्या सवयी बदलतील — आणि हो, ते आपल्या सदसद्विवेकबुद्धीसह किती शांतपणे झोपतील!

म्हणून मी पुन्हा म्हणतो: माझ्यासोबत अशा शुद्धतेच्या शोधात सामील व्हा, जी देवाला पाहते आणि त्याच्या उपस्थितीत पूर्ण आनंदाचा आणि त्याच्या उजव्या हाताशी असलेल्या शाश्वत सुखाचा अनुभव घेते.

Previous Article

घर सांभाळणे हे दैवी आहे, कमीपणाचे नाही

You might be interested in …

 स्तोत्र १३३: उपासना – (।)

प्रस्तावनादेवाचं वचन काय आहे? ते गरजवंताला देवपण देणारं सामर्थ्य आहे. ते केवळ तिथंच आपण घेण्यानं मिळतं. ते प्रथम त्यातील अर्थरूप समजल्यानं, म्हणजे बुद्धीनं अनुभवल्यानं मिळतं. तो अनुभव पूर्ण, सर्वांगी अनुभव आहे. अर्थ स्पष्ट समजल्यानंतर अगर […]

मी ख्रिस्ताच्या पूर्णपणे स्वाधीन आहे का?

जॉन पायपर मरियाचा प्रश्न – पास्टर जॉन मी ख्रिस्ताच्या  पूर्णपणे स्वाधीन आहे का नाही  हे मला कसे समजेल? उत्तर – या प्रश्नाचे उत्तर देताना मरिया जे ध्येय व्यक्त करते तेथून सुरुवात करू या, ते म्हणजे […]