गॅरेट केल
मला वॉल्ट भेटला तेव्हा मी एक वर्षाचा विश्वासी होतो. तो त्याच्या उपदेशाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करायचा. त्याचा सल्ला माझ्या आयुष्यात केंद्रस्थानी होता. माझ्या नवविश्वासाला बळकट करण्यासाठी देवाने त्याचा उपयोग केला. पण वॉल्ट एक ढोंगी निघाला. देवाचा गौरव घोषित केल्यानंतर, तो आपल्या पत्नीकडे घरी परत जाताना वेश्यांकडे जायचा. घटस्फोटानंतर त्याने दुसऱ्या पुरुषाची पत्नी पळवली. वॉल्टच्या अधःपतनाने मी चक्रावलो. अशा ढोंग्याकडून मला इतकी मदत कशी काय मिळाली?
दुर्दैवाने या प्रश्नाला सामोरे जाण्याची ही शेवटची वेळ नव्हती. मी सेमिनरीत शिकत असताना, एका देवभीरू मुलीने अविश्वासी मुलाशी लग्न केले आणि ख्रिस्ताला सोडून दिले. माझा विश्वास दृढ करणारा ख्रिस्ती विश्वासाचा समर्थक, एक हिंसक व्यभिचारी निघाला. माझ्या आवडत्या गीतांच्या कवीने त्याचे कुटुंब सोडून ख्रिस्तावरील विश्वासाचा त्याग केला. पवित्रतेवर पुस्तक लिहून अनेकांचे जीवन बदलले अशा लेखकाने आपली सेवा सोडली आणि आता अनैतिक जीवनात रममाण आहे. अनेकांच्या आध्यात्मिक जीवनाचा पिता असलेल्या व्यक्तीचे नैतिक पतन होऊन त्याच्या या सेवेतून तो गायबच झाला.
अशा ढोंगी पुढाऱ्यांमुळे गोंधळलेल्या अनुयायांना प्रश्न पडतो, “असे कसे झाले? ते खरंच विश्वासी होते का? असे फसवे जीवन जगत असताना ते आम्हाला आत्मिक बोध कसा देऊ शकले? त्यांनी दिलेल्या शिक्षणावर मी अजूनही विश्वास ठेवावा का?”
ढोंगीपणाचा पर्दाफाश
‘ढोंगी’ हा शब्द ग्रीक ’हायपोक्रिटेस’ (hypokritēs) या शब्दावरून आला आहे, हा शब्द नाटकात मुखवटा घालणाऱ्या नटाला संबोधित आहे. त्यामुळे, ढोंगी म्हणजे मुखवटे घालणारे लोक, ज्यांचे खरे जीवन एक, तर बाह्यदर्शी जीवन दुसरेच असते.
बायबल ढोंगी लोकांना लपवत नाही. देमासने एकेकाळी शिष्य बनवले, पण नंतर जगाची आवड धरल्याने ख्रिस्ताला सोडून दिले (२ तीम.४:१०). यहूदाने लोकांना येशूकडे आणले आणि नंतर त्याला चांदीच्या नाण्यांसाठी विकले (मत्तय २६:१४-१६). हूमनायने कदाचित ज्या मंडळीसोबत स्तोत्रे गायली असतील, तिलाच त्याने नंतर फसवण्याचा प्रयत्न केला (२ तीम.२:१६-१८). या मनुष्यांच्या बाबतीत असे काहीतरी घडले ज्यामुळे त्यांची भक्ती भरकटली. पापाकडे दुर्लक्ष, कबूल न केलेल्या तडजोडी, देवाच्या आज्ञांकडे कानाडोळा करणे. या गोष्टींद्वारे त्यांनी स्वतःचा घात केला, आणि त्यांच्या विश्वासाचे तारू फुटले आणि गोंधळलेल्या मेंढरांना ते तसेच सोडून गेले (१ तीम. १:१९-२०).
ढोंगीपण वेगवेगळ्या प्रकारचे असते. काहीजण एकेकाळी घोषित केलेला विश्वास नाकारून किंवा तारणकर्त्याचे आज्ञा पालन करण्याऐवजी, पापांबद्दल पश्चात्ताप करण्यास नकार देऊन धर्मत्याग करतात (१योहान २:१९). तर काही जण पेत्रासारखा खरोखर विश्वास ठेवतात, परंतु क्षणिक भावनेच्या भरात त्यांच्या विश्वासाची उद्देशपूर्ती होत नाही (लूक २२:५४-६२) आणि नंतर ते अत्यंत दुःखाने रडतात.
ढोंग्यांचा ढोंगीपणा कसाही उघडकीस आला असला तरी, त्यांच्या आत्म्याबद्दल, त्यांच्या देवाविषयीच्या शिकवणीबद्दल आपल्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. आपल्या मनात संशय निर्माण करून आम्ही येशूला सोडून द्यावे हे सैतानाचे धोरण आहे. पण त्याच्या योजनेला बळी पडण्याऐवजी, आपण येशूकडे वळले पाहिजे.
१. येशूचा ढोंग्यांविषयीचा सावधनतेचा इशारा
स्वतःला विश्वासी म्हणवणाऱ्यांमधील ढोंग पाहून आपल्याला आश्चर्य नव्हे तर दुःख झाले पाहिजे, येशूने आपल्याला सांगितले होते की हे होणार आहे. त्याने आपल्याला ढोंगी लोकांपासून “सावध राहा” असा इशारा दिला आहे. (लूक १२:१). त्याला माहीत होते की आपल्याला त्याच्या इशाऱ्याची गरज लागेल, कारण ते मेंढरांच्या रूपात आलेले परंतु अंतरी क्रूर लांडगे असतात (मत्तय ७:१५). ते कोणाच्याही लक्षात न येता आपल्या सहभागितेत चोर पावलांनी शिरकाव करतात (यहूदा ४), आणि पवित्र असल्याचा देखावा करतात पण आतमध्ये घाणीने भरलेल्या कबरेसारखे असतात (मत्तय २३:२७-२८).
पण काही विशिष्ट नेत्यांबद्दल आपल्याला वाटणारे आश्चर्य स्वाभाविक आहे. तीव्यक्ती ढोंगी असेल असा विचारही आपल्याला शिवलेला नसतो. सैतानाला आपल्या या आश्चर्याचा फायदा घेऊन येशूच्या विश्वसनीयतेबद्द्ल शंका निर्माण करायची आहे. त्याच्या या सापळ्यात अडकू नका. येशूने दिलेली सावधगिरी हा पुरावा आहे की आपण सैतानाच्या सापळ्यात अडकू शकतो. येशू उत्तम मेंढपाळ आहे. त्याच्या सूचनांना प्रेमळ संरक्षण समजा आणि त्या दुष्टाकडे आपले कान लावू नका.
२. ढोंगी लोकांच्या येशूने सोसलेल्या इजा
देवाने आपल्याला आध्यात्मिक अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवण्यासाठी निर्माण केले आहे. त्याचा आवाज ऐकण्यास आणि त्याच्यासोबत कसे चालावे हे जाणून घेण्यास मदत करण्यासाठी तो आपल्याला नेते देतो. म्हणूनच त्यांच्या विश्वासघातामुळे खूप दुःख होते. दुःख आपल्याला दाविदाप्रमाणे विलाप करण्यास प्रवृत्त करते, “तर तो तूच माझ्या बरोबरीचा पुरुष माझा सोबती आणि माझा ओळखीचा मित्र होतास” (स्तोत्र.५५:१३).
तुमच्या दुःखातून तुम्ही येशूकडे वळा. त्यानेही ढोंगीपणाचे दुःख सहन केले. ज्या बागेत यहूदा एक दिवस त्याला शत्रूच्या हाती धरून देईल हे माहीत असूनही, त्याच बागेत येशू शिष्यांसोबत जेव्हा बसत असे तेव्हा त्याला काय वाटले असेल (योहान १८:२)? यहूदा गरिबांच्या काळजीचे नाटक करून बटव्यातून पैसे चोरतो, हे पाहून त्याला कसे वाटले असेल (योहान १२:४-६)? शेवटच्या भोजनाच्या मधूनच यहूदा त्याला चांदीसाठी विकायला निघून जाईल हे माहीत असूनही त्याला घास देताना (योहान १३:३०), त्याला काय वाटले असेल ?
तडजोड करणाऱ्याच्या पतनामुळे देवाचे सत्य नष्ट होत नाही
येशूने नेमके काय अनुभवले हे माहीत नसले तरी, त्याने पाप न करता ते सर्व सहन केले हे आपल्याला माहीत आहे (१ पेत्र.२:२२). निंदा न करता, कटुत्व किंवा अविश्वास न बाळगता, त्याने ढोंग्यांकडून होणारा त्रास सहन केला, तो तुमच्या दुःखाबद्दल सहानुभूती दाखवतो, तुमच्या गोंधळात तुम्हाला सांत्वन देतो आणि पतनातून उठवण्यासाठी तुम्हाला कृपा पुरवतो (इब्री. ४:१५-१६). येशूकडे या; त्याची सेवा तुम्हाला हानी पोहोचवणार नाही.
३. आमच्या ढोंगीपणाबद्दल येशूने दिलेली धोक्याची सूचना
जेव्हा इतर फसवे म्हणून उघडकीस येतात तेव्हा आपण स्वतःला त्यांच्यापेक्षा सरस समजतो. आपले हृदय त्या परूशासारखे म्हणू शकते, “हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण इतर माणसे, जी लुटारू, अन्यायी, व्यभिचारी त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही” (किंवा या ढोंगी पाळकासारखा सुध्दा नाही) (लूक १८:११).
पौलाचा इशारा कधीही विसरू नका: “म्हणून ज्याला असे वाटते की, आपण उभे आहो, त्याने पडू नये म्हणून संभाळावे” (१ करिंथ. १०:१२). आपल्यापैकी कोणीही पापापासून सुरक्षित नाही. या सत्यावर शंका घेणे हे दर्शविते की पतनापूर्वी येणारा हा गर्व आहे (नीती. १६:१८). म्हणूनच, इतरांचा न्याय करण्यापूर्वी स्वतःचे नम्रपणे आत्मपरीक्षण करण्याची येशू आज्ञा देतो (मत्तय ७:१-५). जेव्हा एखादा आध्यात्मिक नेता पापात पडतो, तेव्हा आपण तारणकर्त्यासमोर नतमस्तक होऊन संरक्षणासाठी विनवणी करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे.
पण त्यांच्या तडजोडींमुळे माझे देखील पतन अटळ आहे, असे समजू नका. माझ्या एका मित्राला नुकतेच त्याच्या एका आध्यात्मिक नायकाच्या अयोग्यतेबद्दल समजले. त्याने असे गृहीत धरले की, जर त्याचा आदर्श यशस्वी होऊ शकला नाही, तर तोही यशस्वी होऊ शकणार नाही. पण हे खरे नाही. येशू हा कधीही न हारणारा नायक आहे, जो आपल्याला नशिबावर भरवसा ठेवण्याऐवजी सुज्ञ आणि सावध राहण्यास मदत करतो. “येशू तुम्हास अडखळण्यापासून राखायला समर्थ आहे” (यहूदा २४). म्हणून स्वतःला लीन करा आणि मदतीसाठी त्याच्याकडे धाव घ्या.
४. ढोंग्याच्या शिकवणीला हाताळण्याविषयी येशूची शिकवण
आपला विश्वासघात होण्यापूर्वी, येशूने ढोंग्यांच्या शिकवणीबद्दल भाष्य केले: “शास्त्री व परूशी मोशेच्या आसनावर बसले आहेत, म्हणून जे काही ते तुम्हाला सांगतात ते सर्व करा व पाळीत जा, परंतु तुम्ही त्यांच्या कृत्यांप्रमाणे करू नका, कारण ते सांगतात, पण तसे करीत नाहीत” (मत्तय २३:२-३). येशूने आपल्या शिष्यांना संदेश आणि संदेश देणारा यांमधील फरक ओळखायला शिकवले. पतित नेते आपल्याला देवाचे सत्य नेहमीच अविश्वसनीय आहे अशी शंका घेण्यास प्रवृत्त करतात. पण मॅथ्यू हेन्री आपल्याला सल्ला देतात , “वाईट सेवकांकडून उपदेश केला जातो म्हणून आपण चांगल्या सत्यांना वाईट समजू नये.”
त्याऐवजी आपल्याला “ प्रत्येक आत्म्याची परीक्षा करा” (१योहन ४:१) आणि “सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा”(१थेस्स. ५:२१) असे सांगितले आहे. बिरूयातील लोकांप्रमाणे, आपणही आपल्याला जे शिकवले ते बायबलमध्ये असेच आहे का हे शोधले पाहिजे (प्रे.कृ.१७:११). तुम्हाला असे आढळेल की एखाद्या शिक्षकाचा अधःपात हा त्याच्या सिद्धांतापासून अलग नव्हता, तर तो त्याच्या दृढ विश्वासाशी तडजोड केल्याचे कटू फळ होते. इतर ढोंगी लोक सत्य शिकवत असतानाच, पाषाणमय ह्रदयाने असत्य जीवन जगण्याची कुशलता विकसित करतात. दोन्ही परिस्थितीत, येशूची शिकवण एकच आहे: तडजोड करणाऱ्याच्या पतनामुळे देवाचे सत्य कधीच नष्ट होऊ शकत नाही. लक्षात ठेवा की अंतिमतः देवानेच तुम्हाला त्याचे वचन दिले आहे (१ करिंथ ३:५-७). जरी त्यांनी भ्रष्ट हेतूने प्रचार केला असला तरी, ज्या ख्रिस्ताची त्यांनी घोषणा केली तो खरा आणि विश्वासू आहे (फिलिपै.१:१५-१८).
देवाच्या सत्याचा शोध घेण्याने तुमचा आत्मा प्रफुल्लित होतो. यामुळे तुमची नजर पतित झालेल्या संदेश देणाऱ्यावरून हटून, देवाच्या अचूक संदेशावर स्थिरावते. अशा प्रकारे, सैतानाचा डाव त्याच्यावरच उलटतो. जर तुम्ही विश्वासाने त्याच्या वचनात खऱ्या येशूला शोधायला आलात, तर तो तुम्हाला सापडेल. जेव्हा आपण “चांगले आणि वाईट यांतील भेद ओळखायला” शिकतो (इब्री ५:१४), तेव्हा आध्यात्मिक परिपक्वता विकसित होते. अशा प्रकारे एका ढोंगी व्यक्तीचे पतन तुमच्या विश्वासाची मुळे जिवंत पाण्याच्या प्रवाहात अधिक खोलवर रुजवून, तुमचे जीवन फलदायी करते (स्तोत्र.१:२-३). देव आम्हाला दाखवतो की, तो किती हवाहवासा आणि तृप्त करणारा आहे.
५. आपले जीवन कोणावर बांधावे याविषयी येशूचा बोध
शिक्षक आपल्याला मदत करू शकतात, पण आपण त्यांच्यावर आशा ठेवू नये. यिर्मया संदेष्ट्याने चेतावणी दिल्याप्रमाणे, “जो पुरुष मनुष्यावर भरवसा ठेवतो…. तो शापित असो” (यिर्मया १७:५). केवळ येशूच आपल्या पूर्ण विश्वासास योग्य आहे. येशूने सांगितलेल्या घर बांधणाऱ्यांच्या दाखल्यानुसार. एकाने आपले जीवन येशूच्या शिकवणीच्या खडकावर बांधले. पण दुसऱ्याने तसे केले नाही. अखेरीस वादळ आले. जो ख्रिस्त या पायावर बांधलेला होता तो पूर आणि वादळांत खंबीरपणे उभा राहिला. जो इतरत्र बांधकाम करतो, त्याचा विश्वास ढासळतो, कारण त्याचा पाया वाळूवर असतो.
प्रेषित पौल अयोग्य पायांवर उभारलेल्या डळमळीत विश्वासाला आव्हान देतो: “कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाच्या विश्वासूपणाला व्यर्थ करील? असे न होवो! तर देव खरा आणि प्रत्येक मनुष्य लबाड दिसून येवो”(रोम ३:३-४). जर आपण ख्रिस्ताशिवाय इतर कशावरही उभे असू, तर आपली असुरक्षितता उघड होणे आवश्यक आहे, ज्यामुळे आपण कधीही न डगमगणाऱ्या निश्चल खडकावर आपली इमारत उभारू शकू.
६. ढोंगाला कदापि बळी न पडणारा येशू
पुढारी तुम्हाला धोका देतात, पण येशू कधीही असे करत नाही. इब्रीकरांस पत्राचा लेखक आपल्याला बोध करतो, “जे तुमचे पुढारी आहेत, ज्यांनी देवाचे वचन तुम्हाला सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा” (इब्री.१३:७). पुढाऱ्यांनी असे जीवन जगले पाहिजे की त्यांचे अनुकरण करण्यास प्रोत्साहन मिळावे. म्हणून जेव्हा ते अपयशी ठरतात, तेव्हा आम्ही गोंधळून जातो. त्यांचा आवाज, जो एकेकाळी आध्यात्मिक मदतीचा स्रोत होता, तो आता आध्यात्मिक हानीचा स्रोत बनला आहे. याच कारणामुळे इब्रीकरांस पत्राचा लेखक आपल्या बोधानंतर आश्वासन देतो: “येशू ख्रिस्त काल व आज व सर्वकाल सारखाच आहे” (इब्री.१३;८). आपली दृष्टी येशूवर खिळलेली असावी. तो नेहमीच पवित्र, न बदलणारा आणि विश्वासू असा होता, आताही आहे आणि सर्वकाळ असणार आहे.
जेव्हा ढोंगी लोकांनी मला येशूकडे वळवले, तेव्हा त्यांनी मला मदत केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जेव्हा त्यांचे पतन झाले, तेव्हाही त्यांनी मला मदत केली, कारण त्यांच्या पतनामुळे मला पुन्हा एकदा येशूकडे धाव घ्यावी लागली. आणि तो नेहमीच विश्वासू आहे. म्हणून विश्वासातील तुमचे आदर्श असलेल्यांच्या पतनाबद्दल तुम्ही शोक करत असलात तरी, तुमची दृष्टी येशूवर ठेवा. दुसरा कोणताही पाया खचणाऱ्या वाळूसारखा आहे.


Social