Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जून 2, 2020 in जीवन प्रकाश

फिलदेलफिया येथील मंडळीला संदेश                                            सॅमी  विल्यम्स

फिलदेलफिया येथील मंडळीला संदेश सॅमी  विल्यम्स

फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही :

‘जो पवित्र व सत्य आहे, ज्याच्याजवळ ‘दाविदाची किल्ली आहे, ज्याने उघडल्यावर कोणी बंद करणार नाही आणि ज्याने बंद केल्यावर कोणी उघडणार नाही,’ तो असे म्हणतो: तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही; तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस. पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.

धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.

मी लवकर येतो; तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा.जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही; त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.

आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको (प्रकटीकरण ३:७-१३).


छळ सहन करत असलेल्या मंडळीसाठी ख्रिस्ताची तरतूद

या शहराचे नाव आहे ‘बंधुमधले प्रेम.’ लीदिया शहरापासासून ते २५ मैलांवर होते. ह्याच्या सरहद्दीवर त्या काळी जिवंत ज्वालामुखींचे उद्रेक होत असल्याने वारंवार भूकंप होत असत. फिलदेल्फिया हे भूकंपकेंद्राच्या जवळ होते इ.स. १७ मध्ये झालेला भूकंप जगाच्या इतिहासामधला खूप मोठा भूकंप ठरला. लीदियाच्या विभागातली १२ शहरे उध्वस्त झाली त्यात फिलदेल्फिया व सार्दीस ही शहरे होती. यामुळे उरलेल्या रहिवाश्यांना पूर्वीच्या शहरापासून दूर  वसाहत स्थापन करावी लागली. तेथे सुपीक जमीन असल्याने बहुतेक जण उपजीविकेसाठी शेती करू लागले. तेथे मोठ्या प्रमाणात मूर्तिपूजा चालू असे.

तरीही या सर्वांमध्ये एक छोटी मंडळी अस्तित्वात होती. या मंडळीला येशूने कोणताही निषेध केलेला नाही. ते स्मुर्णाच्या मंडळीसारखे होते पण स्मुर्णापेक्षा येशूने त्यांची अधिक वाखाणणी केली. १८व्या शतकापर्यंत येथे एक समर्थ ख्रिस्ती मंडळी होती पण आधुनिक युगात ती जवळजवळ नामशेष झाली आहे.

संकटात असलेल्या आपल्यासाठी येशूच्या तीन उत्तेजन देणाऱ्या तरतुदी.

१. येशू त्याच्या लोकांची तृप्ती करील (व७).
‘फिलदेल्फिया येथील मंडळीचा देवदूत.’ म्हणजे योहान हे शब्द मंडळीच्या मुख्य वडिलाला, पाळकाला लिहीत आहे. या मंडळीला आशा देण्यासाठी येशूचे तीन गुणधर्म सांगितले आहेत.

अ) पवित्र (वेगळे केलेला). हे येशूचे चित्र आहे. तो पापविरहित आहेच पण खास वेगळा केलेला पित्याच्या अगदी जवळ असलेला आहे. तोच त्याच्या मंडळीला पित्यासमोर पवित्र व नीतिमान करतो.

ब) सत्य (खरा) – येशूच्या सच्चेपणा वर हा गुण जोर देतो. कसोटीच्या वेळी आपली आशा फक्त मशीहाने पूर्ण केलेल्या अभिवचनावरच आधारित आहे. तो आपल्या अभिवचनाशी विश्वासू आहे.

क) सार्वभौम– ज्याच्याजवळ ‘दाविदाची किल्ली आहे. देवाच्या राज्याची किल्ली. “दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यांवर ठेवीन; त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही; त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही” (यशया २२:२२).

त्याच्या राज्यामध्ये कोणी जावे यावर त्याचा अधिकार आहे. तोच आत येऊ देतो हे आणि अशा रीतीने तो आपल्या मंडळीशी विश्वासू राहतो.

२. येशू आपल्या लोकांना शक्ती पुरवील (व.८).
तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. – आपली मुले संकटाला कसा प्रतिसाद देतात हे येशू पाहतो. याचे फळ तो त्यांना शक्ती पुरवतो.

मंडळीला तो तीन प्रकारे शक्ती पुरवतो.

अ) प्रगती–  उघडे दार, ठेवले आहे. याचा अर्थ तो त्यांना शुभवर्तमान सांगण्यासाठी संधी देतो (१ करिंथ १६:९).

ब) प्रार्थना – तुला थोडी शक्ती आहे- म्हणजे तू असहाय आहेस. त्यांना आपल्या कमकुवतपणाची जाणीव होती. आणि त्यामुळे ते मोठ्या रीतीने प्रार्थना करून ख्रिस्तावर विश्वास ठेवत होते. जेव्हा आपण आपला अशक्तपणा मानतो तेव्हा देव आपला उपयोग करून घेईल (याकोब ५:१३).

क) चिकाटी– तू माझे वचन पाळलेस. त्यांनी त्याचे वचन पाळले आणि त्याच्या नावाचा नकार केला नाही. छळामध्ये त्यांनी त्याला नाकारले नाही तर त्याच्यावर भरवसा ठेवण्यात ते वाढत गेले. “मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो” (स्तोत्र ११९:७१).

३. येशू त्याच्या लोकांना सुरक्षित ठेवील (९-१३).

अ) शत्रू समेट करतील. “पाहा” (९) आता येशू भविष्याद्वारे त्यांना उत्तेजन देत आहे. “जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात;” जे रोमी लोकांना छळ करण्यासाठी प्रवृत्त करत होते ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’. ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल. देव त्यांच्यातील काही जणांचे तारण घडवून आणील. ख्रिस्त आपल्या प्रीतीद्वारे त्यांना खंडून घेईल. “मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस” (योहान १७:२३).

ब) मंडळीचे लोकांतरण (रॅप्चर) होईल. “धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन” (व १०).

महान संकटाच्या पूर्वी लोकांतरण होईल यावर बायबलचा भर का आहे?

योहान १७:१५ “तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो.” आपल्याला सैतानाच्या  आध्यात्मिक  प्रभावापासूनव मृत्यूपासून  दूर ठेवले आहे आणि म्हणून परीक्षेच्या घटकेपासून दूर ठेवले आहे.

या अभिवचनाचा आशय आहे  तो त्यांना “राखील.”  याचा अर्थ  आरक्षित करील, टिकवून ठेवील, रक्षण करील.

‘पासून’ हा शब्द हेच दाखवतो की त्यामधून. म्हणजेच काढून घेतले जाईल असे सूचित करतो.

परीक्षेच्या प्रभावापासून – एक ठराविक कारण आहे-  पृथ्वीवर राहणार्‍या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन. स्पष्टपणे हे महान संकटाच्या काळाविषयी आहे.

“नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू” (१ थेस. ४:१७).

हे वचन प्रकटी १९:१४-१५ पेक्षा निराळे आहे. येथे येशू त्याच्या संतांसह पृथ्वीवर येत आहे. प्रकटी ४:१८ मध्ये मंडळीचा उल्लेख नाही. पण प्रगटी १९:१४ मध्ये मंडळी ख्रिस्तासह दिसते.


क) ख्रिस्त लवकरच परत येणार आहे (व. ११-१३).

“मी लवकर येतो” येशू लवकर परत येणार आहे. त्याचे येणे जवळ येऊन ठेपले आहे. जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. जे तुझ्याजवळ आहे म्हणजे तुझा विश्वास आणि तुझी प्रगती. यामुळे तुझा मुगुट कोणी घेणार नाही.

“जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन.” म्हणजे तू राज्य करशील. ज्या व्यक्तीला ख्रिस्ताने स्थिर करण्यासाठी उपयोग केला त्याचा तो मशीहाच्या राज्यात वापर करील.

तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही. तुम्ही तेथे निरंतर सुरक्षित राहील.

“मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव लिहीन.” हे देवाशी आपले नाते दाखवते. – आपण त्याच्यासारखे होऊ. आपण नव्या यरुशलेमेमध्ये राहू – हे नागरिकत्वाचे हक्क आहेत.

नाव हा शब्द तीनदा आला आहे. हा आपली देवाशी ओळख आहे अशी त्रिवार खात्री देते. माझ्या देवाचे नाव हे देवाचे असण्याशी समरूप आहे. तसेच “नवे नाव” म्हणजे दैवी अधिकार सुपूर्त केला जाईल.

म्हणजे येशू ख्रिस्त व तो त्याच्या गौरवामध्ये जो आहे त्याचे पूर्ण प्रगटीकरण होईल. त्याच्या पुनरुत्थानाशी सर्व मंडळी सादृश्य असणार.