Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जून 9, 2020 in जीवन प्रकाश

तुमच्या काळ्याकुट्ट दिवसामध्ये देवावर भरवसा ठेवणे                               डेविड मॅथिस

तुमच्या काळ्याकुट्ट दिवसामध्ये देवावर भरवसा ठेवणे डेविड मॅथिस

“कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत” (यशया ५५:८-९).

देव तुमचे सर्व अरिष्टांपासून येथे आणि लगेच सुटका करण्याचे आश्वासन देत नाही. यामुळेच तो तुमच्यावर खूपच प्रेम करतो. तो तुमची इतकी अपरंपार काळजी घेतो की प्रत्येक वेदना व परीक्षा यापासून तो तुमचे रक्षण करत नाही. पण प्रत्येक वेदना व दु:खात, प्रत्येक कठीण समस्येत आणि त्यामधून तो त्याचे तुमच्यासाठी असलेले अनंतकालिक हेतू उलगडत असतो. हे, अगदी हेच तो तुमच्या अखेरच्या आनंदासाठी करत राहतो.

देव त्याच्या ह्या विशेष प्रेमाच्या मार्गाची झलक बायबलमधून वारंवार दाखवतो. पण खुद्द येशूच्या जीवनाच्या सेवेच्या प्रत्येक वळणावर तो हे विशेष सामर्थ्याने करतो (मत्तय १६:१५; मार्क ८:२७, लूक ९:२०).

मानवी अपेक्षा

प्रथम येशूने शिष्यांना विचारले की इतर लोक तो कोण आहे याबद्दल काय बोलतात? मग त्याने त्यांचे मत विचारले. “मी कोण आहे याबद्दल तुम्ही काय म्हणता?” यानंतर तो यरुशलेमेकडे निघाला त्याचे आश्चर्यकारक पाचारण पूर्ण करण्यासाठी. आणि जाता जाता तो त्याच्या या शिष्यांना पुढे येणाऱ्या धक्क्याला तोड देण्यासाठी बळकट करणार होता.

त्याने विचारलेल्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून पेत्र, १२ जणांचा  प्रवक्ता म्हणून पुढे सरसावला. “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहात” (मत्तय १६:१६). त्याने अगदी बरोबर उत्तर दिले होते. पण त्याचे श्रेय त्याला जात नाही तर ती देवाची देणगी होती. येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे” (मत्तय १६:१७).

अखेरीस पेत्र आणि इतर शिष्यांना ते समजू लागले पण तरीही त्यांच्यापुढे अजून खूप मोठे अडखळण होते. त्यांची अजून उलथापालथ होण्याची गरज होती. त्यांच्या अपेक्षा मानवी होत्या. ख्रिस्त त्याच्या शत्रूंवर विजय मिळवील आणि मग लागलीच त्याच्या गौरवामध्ये येईल अशी त्यांची अपेक्षा होती. यामुळे येशूने त्यांचे मानव रचित मार्ग आणि विचार घालवून टाकण्याची गरज होती. त्याने जाहीर केले  “मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसर्‍या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे”  (मत्तय १६:२१).

आता पेत्राला नवा आत्मविश्वास  आला होता कारण त्याने पहिल्या प्रश्नाचे अचूक उत्तर दिले होते व त्याची वाहवा झाली होती. म्हणून तो येशूला बाजूला नेतो व त्याचा निषेध करू लागतो. “प्रभूजी, आपणावर दया असो, असे आपल्याला होणारच नाही” (मत्तय (१६:२२).  परंतु येशू पेत्राकडे वळून म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा! तू मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टींकडे तुझे लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे आहे”  (मत्तय १६:२३).

आपल्यापेक्षा उच्च

पेत्र आणि शिष्यांनी येशूला ख्रिस्त म्हणून अचूक ओळखले असेलही पण त्याचा अर्थ काय हे त्यांना अजून समजले नव्हते. – देवाच्या बाजूने त्याचा अर्थ. ते त्यांची मने देवाच्या गोष्टींवर लावण्यापेक्षा मानवाच्या गोष्टींवर लावत होते. येशू हा खरोखरच ख्रिस्त आहे – पण तो क्रुसावर दिला जाणार होता. तो विजयी होऊन त्याच्या गौरवात येणार होता. पण विजय मिळवण्याच्या मार्गावर तो प्रथम स्वत:ला काबीज करण्यासाठी देऊन टाकणार होता. तो लज्जा आणि दु:खसहनाच्या मार्गावरून चालणार होता.

पेत्राचे मन मानवाच्या गोष्टींवर असल्याने त्याचा इच्छित नमुना असा होता: येशू हा ख्रिस्त आहे; त्यामुळे तो मरणार नाही; आणि आम्ही त्याच्याबरोबर विजयी होऊ. पण येशूचा नमुना जो आता तो त्याच्या शिष्यांना दाखवत आहे तो असा होता: मी ख्रिस्त आहे म्हणून मी माझ्या लोकांसाठी लज्जित केला जाईन आणि मी सन्मानाने उठणार आहे; आणि माझे लोकही माझ्याबरोबर लज्जित होतील आणि माझ्याबरोबर सन्मानाने उठतील.

जो शेवट होणार त्याबद्दल पेत्र बरोबर होता- गौरव आणि सन्मान. पण त्याचे साधन – दु:खसहन आणि लज्जा – याबद्दल नाही. तो अजूनही नैसर्गिक रीतीने विचार करत होता. तो त्याचे लक्ष मनुष्याच्या गोष्टींवर लावत होता. त्याच्या अपेक्षा अजूनही मानवी होत्या.

आणि हेच आरंभापासून देवाच्या लोकांच्या बाबतीतही खरे आहे.

 

मन जड असताना आनंद

आपण मर्त्य आणि पतित मानव आहोत. आपला फक्त मानवी अपेक्षेकडे कल नाही तर आपण त्यात अडकून पडलेलो आहोत. आणि देवाने यशया संदेष्ट्याद्वारे पुकारा केला “कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत” (यशया ५५:८-९).

आपले मार्ग व धारणा यांवरच जर आपल्याला सोडून दिले तर आपले काळेकुट दिवस हे आपल्याला शांती मिळण्याचा समय आहे हे आपण कधीच पाहू शकणार नाही. अरण्य हे जीवन मिळण्याचे ठिकाण असे आपण कधी पाहू शकणार नाही. आपल्या मनाचा जडपणा हा दैवी आनंदाची शक्यता म्हणून आपण कधी पाहणार नाही .

पण देवाचे मार्ग आणि विचार हे आपल्यापेक्षा उच्च आहेत. जे दु:ख आणि वेदना आपण कधी निवडल्या नसत्या त्या तो घेतो आणि तसे असताना  नव्हे तर त्यांच्यामध्ये आणि त्यांच्यामुळे – तो आपल्याला अधिक आणि अधिक त्याच्या पुत्रासारखे करतो. जसे त्याच्या पुत्राने त्याचा काळाकुट समय, अरण्य आणि जड मन वधस्तंभावर कवटाळले यासाठी की आपल्याला अनंतकालचे तारण मिळावे.

आता आपण कितीही शत्रूंनी वेढलेले असलो तरी आपण या शत्रूला पळ काढताना पाहू. पराजय हा टाळता येणार नाही असे कितीही आपल्याला वाटले तरीही आपण विजय येताना पाहू. आपल्याला हे ठाऊक आहे: देवाचे मार्ग आपल्यापेक्षा उंच आहेत, आणि आपल्या सर्वात कठीण समयात इथे आणि आता येशू हा नेहमी आपल्याबरोबर आहे.