Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 13, 2024 in जीवन प्रकाश

प्रत्येक पापात एक लबाडी दडलेली असते

प्रत्येक पापात एक लबाडी दडलेली असते

स्कॉट हबर्ड

“ वाचकांनी लक्षात ठेवावे की सैतान हा लबाड आहे.” असे सी एस लुईस यांची त्यांच्या “स्क्रू टेप लेटर्स” या पुस्तकाच्या आरंभीची सूचना आहे. आणि ही सूचना सर्वत्र असणाऱ्या प्रत्येक काळच्या लोकांसाठी आहे. आपण आध्यात्मिक युद्धात कितीही दक्ष असलो तरी आपल्याला सल्ला दिला आहे की सैतान हा लबाड आहे हे ध्यानात ठेवा.

पण हे आपण बऱ्याच वेळा लक्षात ठेवत नाही. कारण ह्या जगात असताना आपल्या अंतरंगातल्या काही गोष्टींना  –  जो कपटाच्या वासनांनी युक्त आहे (इफिस ४:२२) त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा असतो. जेव्हा तो आपल्याला सुचवतो की देवाच्या वचनाच्या कुंपणापलीकडे स्वातंत्र्य आहे, तेव्हा आपल्या आतल्या कशाला तरी त्यावर विश्वास ठेवायला हवा असतो. किंवा तो असेही सुचवतो की, आपल्या सुखासाठी आवश्यक गोष्ट पापात आहे किंवा देवाचे आज्ञापालन आपल्याला कष्टी करून टाकील. अर्थातच ह्या सर्व लबाड्या आहेत. पण पापाच्या फसवेगिरीच्या दिशेखाली सैतानाचे कुजबुजणे शुद्ध सत्य वाटू लागते. म्हणूनच पौलाप्रमाणे  “ त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही” (२ करिंथ २:११) असे म्हणू शकणे यावरच आपली शांती, सुरक्षा, सौख्य, आणि पवित्रता अवलंबून आहे.

सैतानाचा आराखडा

अगदी प्रत्येकच लबाडीचा संबंध आपण सैतानाशी लावू शकत नाही. खुद्द पापाला त्याचा  स्वत:चा फसवेपणा असतो (इब्री ३:१३). पण या जगातल्या सर्व लबाड्यांवर सैतानाचा शिक्का असतो. कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे. सर्व जगाला ठकवणारा (योहान ८:४४, प्रकटी १२:९). बापाच्या चेहऱ्याचा अभ्यास करा आणि त्याचे संतान ओळखण्यास तुम्हाला मदत होईल.

जेव्हा सैतानाचा आराखडा तुम्ही पारखू लागता तेव्हा तुम्हाला काय दिसते? आपल्याला दिसते की तो पापाचा  दोष  कमी करतो, पापाचा धोका लपवतो. आणि पापाचे सुख सुशोभित करतो.

पापाचा दोष कमी करतो

जेव्हा सैतान आपल्या प्रभूला अरण्यात भेटला तेव्हा पाप लहान दिसावे असा त्याचा प्रयत्न होता. जर येशू खरेच देवाचा पुत्र होता तर या एका धोंड्याची भाकर करणे, किंवा त्याला नमन करणाऱ्या देवदूतांनी त्याला झेलून धरणे यात काय बिघडणार होते? खरं तर त्या परिस्थितीमध्ये हे आवश्यक होते, सुसंधी होती, पाप नव्हते.

आता आपण तर देवाचे पुत्र नाहीत. पण हेच आपल्याला हजार मार्गांनी कसे सुचवावे हे सैतानाला ठाऊक आहे. कदाचित आपण ऐकतो,  “तू तर किती थकून गेला आहेस आणि अशा तणावात  तुला कोण दोष देईल?” किंवा  “गेल्या  आठवड्यात अमक्या तमक्याने हेच केलेले तू पहिले नाहीस का? किंवा “जर तू देवाचे मूल असशील तर तुला कृपा उपलब्ध आहे.” हळूहळू पापाचा काळेपणा राखडी होऊ लागतो. देवाच्या आज्ञा शिफारशी होऊ लागतात. आणि आपण त्याला बळी पडण्यापूर्वी आपल्या दुखऱ्या विवेकाला मलम चोळू लागतो.

दडवलेला धोका

देव जेव्हा आपल्यावर येणाऱ्या मोहाचे वर्णन करतो तेव्हा तो सावज आणि शिकारी याचे रूपक वापरतो. पाप आपल्याला  “सैतानाच्या पाशात” अडकवते (१ तीम. ३:७). त्याचप्रमाणे “दुष्ट मनुष्याला त्याची स्वत:चीच दुष्कर्मे पछाडतात; तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो”  (नीति ५:२२). अर्थातच “एखाद्या पक्ष्याच्या डोळ्यांदेखत, जाळे पसरणे व्यर्थ होय” (नीति १:१७). म्हणून सैतान काळजीपूर्वक जाळे दिसणार नाही असे लपवतो. जरी देवाने मना केलल्या फळाबद्दल हजार वेळा धोक्याची सूचना दिली होती की,  “ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील.”   – तरी सैतान आदामाच्या मुलांना,  “तुम्ही खरोखर मरणार नाही”  (उत्पत्ती २:१७; ३:४); असे म्हणण्यास कधीच थकत नाही.  तो म्हणतो, “नाही, नाही. एका छोट्या पापात काय धोका असणार? एकदा मुक्त होऊन पहा, या एका वेळेला तुझ्या देहाची तृप्ती कर, तुझ्या वासनांना एकदा उत्तर दे आणि मग धार्मिकतेकडे पुन्हा वळ.”अशा शब्दांनी तो गळाला किडा लावतो आणि सापळा झाकण्यासाठी वरून फांद्या आणि पाने टाकतो.

पापाचे सुशोभित केलेले  सुख

जर पापाने सुखाचे वचन दिले नसते, जर सापळ्यावरच्या जाळ्याने खाणे देऊ केले नसते, जर गळाला किडा लावला नसता ते सर्व मोह पण अर्थहीन झाले असते. म्हणून सैतान पापामध्ये असलेले क्षणभंगुर सुख घेतो आणि त्या क्षणासाठी तरी ते देवाच्या उजव्या हाताला असणाऱ्या सौख्यापेक्षा गोड आहे असे भासवतो.

सैतानाच्या मोहाच्या बळजबरीखाली काईनाला सूड घेण्यात रोमांचकारी वाटते. आखानाला संपत्तीच्या गौरवात, दाविदाला व्यभिचारात आनंद मिळतो. आपले पण एखाद्या पापावर इतके लक्ष लागते की ते पूर्ण करण्याची गरज भासू लागते. जर आपण इथे जाऊन फोटो घेतला नाही, हे विकत घेतले नाही, ते प्यायले नाही, तर आपण कसे सुखी होऊ? आपले दु:खसहन किंवा कंटाळा आपण कसा निभावू शकू? हे केले नाही तर  कदाचित  आपला एक आवश्यक भागच आपण दडपून टाकू. किंवा आता आपण इतके पुढे गेलो तर त्यात सरळ उडी घेऊ या.

ह्या सर्व वेळ देवाचा मुखप्रकाश अंधुक होऊ लागतो. अरुंद मार्ग पिळवटून टाकू लागतो आणि ज्या देवाच्या आज्ञांनी एकदा आपल्याला स्वातंत्र्य दिले होते त्या आपल्यावर इतक्या जोराने आदळतात की त्यांचा भार आपण सहन करू शकत नाही.

आपण अज्ञानी नाही

तर असे काही सैतानाचे आराखडे असतात. आता पौलाबरोबर “त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही”               (२ करिंथ २:११) असे म्हणण्यासाठी आपण काय करायला हवे? आपण “ख्रिस्ताच्या सत्याने” ( इफिस  ४:२१) आपल्याला इतके भरून घ्यायला हवे की मोहाच्या क्षणी पापाचा दोष उघड होईल, पापाचा धोका प्रकट होईल आणि पापाच्या सुखाला परतवले जाईल.

दोष उघड होईल

जेव्हा सैतान सुचवतो “ हे पाप तर अगदी क्षुल्लक आहे,” तेव्हा शास्त्रलेख आपल्याला प्रत्युत्तर द्यायला शिकवतात की,  “क्षुल्लक असे पाप नाहीच. क्षुल्लक पापात गुंतण्यासाठी का माझ्या तारकाने आपला प्राण दिला? पवित्र आत्म्याच्या मंदिरात एखाद्या मूर्तीला ओढून आणणे ही क्षुल्लक बाब आहे का (इफिस ४:३०)? किंवा आपल्या पित्याची वचने रिकामे शब्द म्हणून बाद करणे ही क्षुल्लक बाब आहे का?”

किंवा जेव्हा तो कुजबुजतो, “ पण देव दयावान आहे” तेव्हा आपण म्हणतो “होय देव दयावान आहे – फक्त मला क्षमा करण्यासाठीच नाही तर मला शुध्द करण्यासाठीही. दया, कृपा आणि क्षमा मला पाप करण्यास मोह घालत नाही. त्या मला  “असे शिकवतात की,  धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे” ( तीत २:११-१२).  “ देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस का”  (रोम २:४)? किंवा जेव्हा आपण ऐकतो की, “ पण तू किती तणावाखाली होतास” तेव्हा आपण उत्तर देतो , “पण तणाव हे देवाच्या आज्ञा तुच्छ लेखण्यासाठी सबब नाही. माझे कटुत्व, राग, कींव घट्ट धरून मी तणावाखाली होतो असे म्हणत मी प्रामाणिकपणे ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खर्‍या स्वरूपाने कसा प्रकट होऊ शकेन (२ करिंथ ५:१०)?

धोका प्रकट होतो

पवित्र आत्मा पापाचा दोष उघड करतानाच त्याचा धोकाही प्रकट करतो. जेव्हा “ फक्त ह्या वेळीच” अशी गळ आपल्याला घातली जाते तेव्हा आपल्याला आठवण येते की कोळ्याला आपला मासा पकडण्यास एकच किडा लागतो. शिकाऱ्याला सापळ्यात अडकवण्यास फक्त एकाच पायाची गरज असते. तसेच सैतानाला आपल्या आत्म्यावरची पकड घट्ट करण्यास एकच संधी पुरेशी असते. दारूने एकदाच मस्त होणे, अश्लील चित्रे एकदाच पाहणे, आपली हाव एकदाच तृप्त करणे हे सर्व पश्चात्तापाशिवाय आपल्याला कधी बदलणार नाही. आपल्या पापी इच्छा एकच संधी देऊन शमवणे हे जाळ विझवण्यासाठी त्यात आणखी एक ओंडका टाकण्यासारखे आहे.

सुख परतवणे

पापाचा दोष दिसल्याने आणि त्याचा धोका प्रकट झाल्याने लढा संपलेला नसतो. देवाने दिलेली सुखासाठीची इच्छा नायगरा धबधब्यासारखी इतकी प्रबल असते ती फक्त स्वनाकार करून नष्ट होणार नाही. नदी कुठेतरी वहायलाच हवी. आणि जर पापाकडे नाही तर कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी.

इथे आपल्यापैकी अनेक जण संकटात सापडतात. पापाचे सुख हे बहुधा लगेचच मिळते तर धार्मिकतेचे सुख बहुधा उशीरा मिळते. पापाच्या सुखाला स्वनाकाराची गरज नसते, तर धार्मिकतेच्या सुखासाठी कधीकधी हात कापून टाकण्याची गरज असते (मत्तय ५:३०). जे कठीण आहे आणि उशिरा मिळते त्याच्यासाठी  आपण जे सहज आणि लगेच मिळू शकते ते कसे नाकारू शकतो?

जसे गिर्यारोहकाला कमालीची तहान लागली असली तरी खाऱ्या पाण्याच्या डबक्यातले पाणी तो कधीच पिणार नाही. कारण त्याला माहीत असते की मार्गावर दोन किमी वर एक शुद्ध झरा वाहत आहे . त्याला आठवते की हे खरे पाणी त्याची तहान अजूनच वाढवेल आणि तो जर चालतच राहिला तर देवाने त्याच्यासाठी गोड पाण्याचा साठा ठेवलेला आहे. आणि म्हणून  “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्‍या गोष्टींबद्दलची खात्री आहे” (इब्री ११:१); यामुळे  तो पुढे पाहत चालतच राहतो.

यामुळे प्रत्येक मोह हे तात्पुरत्या पापाला फक्त नाकारण्याची संधीच  नाही तर ख्रिस्ताचे अगाध मोल कवटाळणे आहे. प्रत्येक मोह हा सैतानाला लाजिरवाणे करण्याची संधी आहे. केवळ स्वनाकार करून नाही तर अधिक चांगल्या  तुप्तीद्वारे. ती तृप्ती म्हणजे खुद्द ख्रिस्त. तो आपल्या कल्पनेपलीकडे असलेली सौख्ये देऊ करतो – आणि तो कधीही लबाड बोलत नाही.