Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on नवम्बर 13, 2018 in जीवन प्रकाश

प्रभूमागे एकाकी आणि दु:खित जनांकडे जा                                                     लेखक : स्कॉट हबर्ड

प्रभूमागे एकाकी आणि दु:खित जनांकडे जा लेखक : स्कॉट हबर्ड

आमच्यापुढे असलेली मुले गटारात, उकिरड्यावर, गल्लीबोळात आणि इतर काही शहराच्या कोपऱ्यात सापडलेली होती. बहुतेकांना जन्मत:च शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व होते.  – आधीच गरिबीने पिचलेल्या त्यांच्या पालकांना हा भर खूपच जड होता म्हणून त्यांनी त्यांना मरण्यासाठी सोडून दिले होते.

आमचा संघ आफ्रिकेमध्ये तेथील स्थानिक पाळकांना प्रशिक्षण देण्यासाठी गेला होता. पण संघाच्या एका नेत्याने अनाथाश्रमाला भेट देण्याची योजना केली. तेथे आम्ही अर्भकांना जोजावले, छोट्या बालकांबरोबर हसलो, कर्मचाऱ्यांना उत्तेजन दिले आणि त्या टाकलेल्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली.

आम्ही बाहेर जाताना तेथले कर्मचारी बाहेर आले आणि आल्याबद्दल आमचे आभार मानू लागले. त्यांच्या या कृतज्ञतेने आम्ही भारावून गेलो. इतक्या छोट्याश्या भेटीने काय होणार? पण एका माणसाने जे सांगितले ते ऐकून मला हे समजले; “कोणी कधीच भेट देत नाही.”

भेट देणारे नाहीत

कोणी कधीच भेट देत नाहीत. त्या अनाथालयात दररोज कामाची वर्दळ असते – दुकानदार, शिक्षक, शेतकरी, उद्योगपती – पण भिंतीपलीकडे असणाऱ्या या मुलांना कोणीच भेट देत नव्हते. जन्माच्या वेळीच टाकून दिलेल्या या मुलांना शेजाऱ्यांनीही टाकून दिले होते कारण त्यांच्या व्यस्ततेमध्ये दखल घेण्यासाठी वाव नव्हता.

घरी परतल्यावर अनाथालयात ऐकलेल्या ह्याच शब्दांचा माझ्या सभोवतालच्या माणसांकडून प्रतिध्वनी येत असेल का, हा विचार सोडत नव्हता. कोणते शेजारी, कोणते चर्चचे सभासद, कोणते नातेवाईक शेकडो लोकांना समोरून जाताना पाहत असतील आणि कोणीतरी भेट द्यावी म्हणून शांतपणे आतल्या आत झुरत असतील?

आम्ही पाश्चिमात्य लोक कदाचित अनाथालये ओलांडून जात नसतो पण आम्ही सतत अशा लोकांना ओलांडून जातो की जे विसरले गेले आहेत, दुर्लक्षित आहेत आणि अत्यंत एकाकी आहेत: निराशग्रस्त, अपंग, समाजात मिसळू न शकणारे, दुखावलेले, वृध्द. ते जरी लोकांनी वेढलेले असतील तरी दुखावलेल्या त्या बहुतेकांना भेट द्यायला क्वचितच कोणी जाते. त्यांच्याकडे केवळ एक स्मितकटाक्ष टाकून पटकन निघून न जाता थांबून, बसून थोडा वेळ राहणारे लोक क्वचितच आढळतात. त्यांच्या जटिल समस्येच्या दलदलीत खाली उतरून त्यांच्या खांद्यावर मायेचा हात ठेवणारे कोणीतरी.

तुमच्या कौटुंबिक व मित्रांच्या वर्तुळातून बाहेर येऊन, वेळ बाजूला काढून, अशा गरजू व्यक्तीला भेट देण्याचे काम करण्याची तुमची शेवटची कोणती वेळ होती?

भेटी देणारे शिष्य

अर्थातच आपल्यात असे जे भग्न लोक आहेत त्यांना भेट देण्याकडे आपण का दुर्लक्ष करतो याची हजारो कारणे आपण शोधून काढू शकतो. त्यांच्या समस्या फार खोलवर आणि तापदायक आहेत आणि त्या सहज सुटू शकणार नाहीत. त्यांच्या वेदना आपल्याला मानसिकरित्या अगदी रिकामे करून सोडतात. आपल्यालाच सर्व बाजूंनी किती मागण्या असतात – आपल्याच जिवाला किती गरज आहे, आपल्या कुटुंबाच्या – मित्रांच्या समस्या, कार्यालयाची अथवा शैक्षणिक कामे.
तथापि बायबल पुन्हा पुन्हा देवाचे लोक हे भेटी देणारे कसे आहेत याचे वर्णन करते. याकोबानुसार भेटी देणारे हे प्रामाणिक आध्यात्मिकतेच्या केंद्रभागी आहेत. “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे” (याकोब १:२७). आणि येशूने म्हटल्याप्रमाणे त्याच्या मेढरांना भेटी देणे ही त्याच्या शिष्यांची आवश्यक खूण आहे. “तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, ‘अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या; कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात.’” (मत्तय २५:३४-३६). येशूचे शिष्य फक्त उपदेश करतात, गाणी गातात, सेवा करतात एवढेच नव्हे. ते भेटी देतात.

गरजू लोकांना भेटी देण्याचा बायबलचा आदेश आपण टाळू शकत नाही निदान आपण प्रयत्न तरी करायला हवा. आपल्या पित्याच्या आज्ञा पाळण्यास कठीण नाहीत (१ योहान ५:३).  येशूने देऊ केलेल्या विपुल जीवनासाठी या आज्ञा आनंदाचे आमंत्रण आहे (योहान १०:१०). अन् त्यामध्ये भेटी देण्याचा समावेश आहे.

तुमच्या पित्याचे अनुकरण करा

ख्रिस्ती जन भेटी देतात याचे मूळ कारण आपला देव भेटी देतो. विश्वाचा हा देव भेटी देणारा देव आहे. नम्र जनांचा दरवाजा ठोकून आत येण्यास तो कधीच खूप व्यस्त नसतो.
सूर्यमालेच्या भ्रमणकक्षांची तो देखरेख करत असला तरीही त्याला मानवाची जाणीव असते, अगदी लहानात लहानाचीही. देव आपल्या पवित्र निवासस्थानी असला तरी तो पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी आहे. एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो (स्तोत्र ६८:५-६).  कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूंचा प्रभू, महान, पराक्रमी व भययोग्य देव असला तरी  तो भग्नहृदयी जनांना तो बरे करतो; तो त्यांच्या जखमांना पट्ट्या बांधतो (अनुवाद १०:१७-१८, स्तोत्र १४७:३).

जेव्हा येणाऱ्या मशीहासाठी जखऱ्याने देवाची स्तुती केली तेव्हा तो म्हणाला “इस्राएलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने ‘आपल्या लोकांची’ भेट घेऊन त्यांची ‘खंडणी भरून सुटका’ केली आहे” (लूक १:६८). जेव्हा देव पृथ्वीवर आला तेव्हा तो भेट देण्यासाठी आला. जे टाकावू त्यांना मान देण्यास आला  (योहान ४:७-१०). तुच्छ लोकांबरोबर भोजन करायला  (मार्क २:१५-१७), कुष्टरोग्यांना स्पर्श करायला (मत्तय ८:२-४). विसरून गेलेल्यांचे ऐकायला (लूक १८: ३५-४३) आणि भग्न झालेल्या आदामाच्या मुलांना मरणाच्या मातीतून उठवायला आला.

त्यांना देव दाखवा

भेटी दिल्याने दुखावलेल्या गटांना देव कसा आहे हे समजते. जेव्हा आपण भेटी देतो तेव्हा आपण देवाचे अभिवचन घेतो व त्याला शरीर देतो – आपले स्वत:चे शरीर. आपण देवाची स्वत:विषयीची साक्ष घेतो आणि ती दिवाणखान्यात, अंगणात आणतो. आणि असे करताना आपण त्या हताश लोकांना असा विश्वास ठेवायला मदत करतो की देव जितका चांगला आहे असे तो म्हणतो तितका तो चांगला असावा. जेव्हा विशीतल्या खिन्न तरुणांचे आपण सातत्याने व धीराने ऐकतो तेव्हा देवासमोर येऊन आपले ह्रदय त्याच्यापुढे मोकळे करा हे आमंत्रण आपण त्यांना पुढे करतो (स्तोत्र ६२:८).
जेव्हा आपण मतिमंद शेजाऱ्याला भेट देतो व त्याचे विचित्र शब्द समजून घेण्याची पराकाष्ठा करतो तेव्हा थोड्या परिमाणाने का होईना आपण त्याला देवाचे त्याच्याबद्दलच्या जवळीकतेचे ज्ञान आणि कळकळ दाखवत  असतो.
(स्तोत्र ४०:५; १ पेत्र ५:७).
जेव्हा समाजात मिसळू न शकणाऱ्या व्यक्तीला न टाळता तिला बोलके करण्यासाठी प्रश्न विचारत राहतो तेव्हा येशू
शुभवर्तमानातून देऊ करत असले आमंत्रण आपण पुढे करत असतो (रोम १५:७).
जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावल्यावर आपण त्या कुटुंबातील दु:खितांना आठवड्यामागून आठवडे नव्हे तर महिन्यानंतर महिने आणि वर्षानंतरही भेट देत राहतो तेव्हा आपण प्रभूचा सततचा बरा करणारा स्पर्श आणि समाधान एका छोट्या मंचावर सादर करतो (स्तोत्र १४७:३; २ करिंथ १:३).
जेव्हा शुश्रुषा केंद्रांमध्ये त्यांच्या कहाण्या ऐकायला (दहा वेळा जरी ऐकल्या असतील तरी) आपण भेट देतो तेव्हा “मी तुला कधीही सोडणार किंवा टाकणार नाही” (इब्री १३:५) या देवाच्या अभिवचनाचे आपण व्यक्तिश: चिन्ह बनतो.

छोटे राजदूत

आता हे ही सत्य आहे की देवाला हवे असेल तर त्याच्याविषयीची ही सर्व सत्ये या भेटी देणाऱ्यांशिवायही तो दाखवू शकतो आणि बऱ्याच वेळा तो तसे करतोही. पण देवाला त्याच्या लोकांमध्ये स्वत:ची प्रतिमा कोरायला आवडते. आणि त्यांना तो त्याच्या स्वभावाचे राजदूत म्हणून बाहेर पाठवतो. जेथे पाहुणे कधीही जात नाहीत अशा खोलीमध्ये त्याच्या मुलांना आणणे त्याला आवडते- मग ते आफ्रिकेतील अनाथाश्रमात असेल किंवा पलीकडच्या रस्त्यावरील एका स्वयंपाकघरात असेल – आणि हात, मिठी, तोंड व कान यांद्वारे तो स्वत:ला प्रगट करतो.

“कोणी कधीच भेट देत नाही” असे जे शब्द मी अनाथालयात ऐकले असे म्हणू शकणाऱ्या अनेक लोकांना आपण दररोज ओलांडून जातो. दु:खितांना भेटी देताना आपल्या पित्याचे सतत अनुकरण करत व त्याचे शब्द बोलताना आपले केवळ हेच ध्येय नसावे की ते म्हणतील “शेवटी कोणीतरी आम्हाला भेट दिली” तर त्यांना अशा जाणीवेने सोडावे की आमच्याद्वारे खुद्द देवाने त्यांची भेट घेतली आहे.