दिसम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाची सुज्ञता लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

“अहाहा ! देवाचे ज्ञान व विद्या यांची संपत्ती किती अगाध! त्याचे न्याय किती अतर्क्य आणि त्याचे मार्ग किती अगम्य! (रोम ११:३३).
अचानक कोळशाची खाण खचली आणि गावातील मुले मरण पावली तर देवाने किती मोठी चूक केली अशा आशयाची विधाने आपण करतो. कॅन्सरग्रस्त मुलाच्या वेदना पाहताना “देव का गप्प बसलाय, कळत नाही का त्याला ह्या वेदना?” असे उपहासाचे उद्गार आपण काढतो. पण शांतपणे विचार केला तर खोलवर आपण जाणतो की, देव आपल्या जीवनांमध्ये चुका करत नाही. उत्तम ते काय हे तो जाणतो. मानवाचे उत्कृष्ट शहाणपणदेखील चुकते. परिस्थितीचा संपूर्ण तपशील मानव जाणू शकत नाही. भविष्यकाळ समजू शकत नाही. महत्वाच्या अनेक निर्णयांबद्दल आपण हळहळतो. उत्तम कृती व्हावी म्हणून आपण विचारमग्न राहतो. पण देवाला आपल्या निर्णयाबद्दल कधीच हळहळावे लागत नाही. त्याला कोणाचा सल्ला घ्यावा लागत नाही. त्याची सुज्ञता अचूक, स्व-पुढाकाराची, अमर्याद आहे. त्याची बुद्धी अतिशय विशाल आहे (स्तोत्र १४७:५) . शेवट उत्तम व्हावा म्हणूनच तो कार्यरत असतो. अखेर त्याचा गौरव व्हावा व त्याच्या लोकांचा गौरव करावा हाच त्याचा हेतू असतो. योहान १५:८; रोम १:२१; ११:३६; १ करिंथ १०:३१; इफिस१:१२,१४; प्रकटी. ४:११; ५:१३; १५:४. देवाचा गौरव ही संकल्पना आपल्यासाठी रहस्यमय आहे. आपल्याला त्याचे आकलन होऊ शकत नाही. पण गौरव म्हणजे त्याचे अद्भुत तेज, अद्भुत परिपूर्णता व त्याचे ज्ञान व्यक्त होणे. मानवाचा गौरव देव करील तेव्हा मानवामधून देवाचे तेज, त्याची अद्भुत परिपूर्णता व त्याचे ज्ञान व्यक्त होईल. देवाने आपल्यासाठी किती धन्यता ठेवली आहे बरे!

देवाची सुज्ञता आपल्या जीवनात कशी कार्य करते हे आपण पाहत आहोत. हा देव राखेच्या ऐवजी हर्षरूप तेल देतो. खिन्न आत्म्याऐवजी प्रशंसारूप वस्त्र देतो (यशया ६:१-३).

राखेतून सौंदर्य

शोक घटनेकडे आपण पाहतो आणि देवाला प्रश्न करतो, असे का? कारण त्यातून आपण चांगली बाजू पाहत नाही. प्रतिकूल परिस्थितीत त्याचा जो गौरव होतो तो पाहत नाही. आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादांपेक्षा आपल्याद्वारे व्यक्त होणारे देवाचे ज्ञान व गौरव हे अधिक महत्त्वपूर्ण आहेत. देवाचे ज्ञान व सुज्ञता आणि आपले कल्याण व त्याचा गौरव ही सर्व आपत्ती, गोंधळ व प्रतिकूल परिस्थितीतून व्यक्त होतात. देवाचे लोक या जगात परके प्रवासी असे आहेत (१ पेत्र २;११). सैतान त्यांचा शत्रू आहे. तो गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो (१ पेत्र ५:८). पेत्राला चाळले तसे तो आपल्याला गव्हासारखे चाळू पाहतो (लूक २२:३१). ईयोबावर आणल्या तशा आपल्यावर आपत्ती आणून देवाला शिव्याशाप द्यायला आपल्याला उद्युक्त करतो. या पापी जगात रोग, दु:ख, निराशा यांपासून देव आपल्याला अलिप्त ठेवत नाही तर हे सर्व भलेबुरे घटक तो घेतो आणि त्या प्रत्येकाचा सदुपयोग करतो. आपल्या देवाचे परिपूर्ण ज्ञान आपली सर्व परिस्थिती हाताळत असते. ज्या घटना अगर व्यक्ती फक्त अधर्मच व्यक्त करतात, त्यांना देव आपल्या हाती घेतो आणि आपल्या कल्याणासाठीच त्या सर्वांचा वापर करतो. वाईटातून चांगले निष्पन्न करण्यात देवाचे अमर्याद ज्ञान सतत कार्यरत असते, तो राखेतून सौंदर्य निर्माण करत असतो. त्याच्या मुलांविरुद्ध उठलेले सर्व हल्ले त्यांच्या कल्याणाकरता वापरतो. ते कल्याण आपण चित्रित केलेले असते त्याच्यापेक्षा अत्यंत उत्तम असते.

प्रतिकूल परिस्थितीतून पवित्रता

कारण देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांस सर्व काही त्यांच्या कल्याणार्थ सहकारी असे होते (रोम ८:२९). कारण म्हणजे अट आहे. हे कारण म्हणजे ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. आपले कल्याण म्हणजे आता आपण ख्रिस्तासारखे होत राहावे. आणि नंतर जेव्हा आपण त्याला तोंडोतोड पाहू तेव्हा ख्रिस्तासारखे गौरवी शरीर धारण करून त्याच्या सारखे होऊ. त्याचसाठी देव आजही कार्य करत आहे. आपल्याला आता सुख, शांती, आराम मिळावा म्हणून नव्हे. तर वाढत्या प्रमाणात आपण ख्रिस्तासारखे होत जावे म्हणून. आणि सार्वकालिक जीवनात त्याच्या पूर्णतेला पोहचावे म्हणून. इब्री १२:१० मध्ये हाच विचार आहे. “…त्यांना बरे वाटेल त्याप्रमाणे ते आपल्याला शिक्षा करीत.  पण हा (देव ) तर  आपल्या हितासाठी म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून शिक्षा करतो.”  देवाच्या पवित्रतेत वाटेकरी होणे म्हणजे ख्रिस्तसदृश्य होणे. आपण काय होणार हे देवच जाणतो. ते परिणाम साकार करायला भले बुरे काय हेही तोच जाणतो. या वचनात मानवी आईवडिलांचे मर्यादित, चुका करणारे ज्ञान पाहा. आणि देवाचे अचूक अमर्याद ज्ञान पाहा. केवढा फरक! आपण मुलांना शिक्षा करताना अनेकदा खिन्न झालो. आपण चांगले केले असे आपण समजत होतो. त्यात आपण किती चुका केल्या हे पाहून आपण हळहळतो. पण वचन म्हणते, आपली पात्रता न पाहता आपल्या कल्याणासाठी देव आपल्याला शासन करतो. देव हळहळत नाही. आपण योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा तो करत नाही. आपल्यासाठी भले काय याचा विचार करत तो बसत नाही. देव चुकत नाही. त्याच्या अचूक अमर्याद ज्ञानाने तो बऱ्यावाईट परिस्थितीचा मिलाप करतो . आणि आपल्याला त्याच्या पवित्रतेचे भागीदार करतो. खूप मीठ घालून खारट जेवण बनवावे असे तो करत नाही. विपत्कालात तो आपल्याला नमवतो आणि आशीर्वाद देतो हे सार्थच असते.

इब्री १०:११ म्हणते की, शासन क्लेशदायक असते. पण ते खात्री देते की ते फायद्याचे असते. ते नितीमत्त्व व शांतीचे फळ देते. शिक्षा देण्याचा देवाचा उद्देश आपले रूपांतर करणे हा असतो. आपली शिक्षा त्याने येशूवर लादली आहे. “आम्हांस शांती देणारी शिक्षा त्याला झाली” (यशया ५३:५). आपण ख्रिस्तासारखे अधिकाधिक होत जावे हाच शिक्षेचा हेतू असतो. “मी पिडीत झाल्यामुळे माझे बरे झाले कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो” (स्तोत्र ११९:७१). अनुभवातून शिकावे असे हे वचन सांगते. देवाची इच्छा समजून उमजून शिकण्यासाठी देवाचे वचन वाचणे, अभ्यासणे महत्त्वाचे असते. तेथे मनाचे नवीकरण होण्याची प्रक्रिया होत असल्याने बदल होण्यास सुरुवात होते. हे वचन आचरले गेल्याने जीवनात खरा बदल होतो. तो दृश्य स्वरूपात दिसून येतो. त्यासाठीच प्रतिकूल परिस्थिती यावी लागते. आपण सहनशीलतेची प्रशंसा करू. त्या गुणाचा हव्यासही करू. पण आपल्यावर अन्याय झाल्याशिवाय आणि दीर्घकाळ दु:ख सहन केल्याशिवाय आपण सहनशील होऊ शकणार नाही.

विपत्तीमुळेच देवभिरू व्यक्ती घडतात

त्याग केल्याशिवाय किंमत भरून देणारी प्रीती आपण करू शकत नाही. केवळ नैसर्गिक सुखाद्वारे पवित्र आत्म्याचे आनंद’ हे फळ प्राप्त होऊ शकत नाही. देवाच्या पुत्राच्या प्रतिमेसारखे अधिकाधिक होण्यासाठी आपल्यावर प्रतिकूल परिस्थिती यायला हवी याची त्या अमर्याद देवाला अचूक जाणीव असते. आपल्याला कशाची केव्हा गरज आहे व ती अधिक उत्तम प्रकारे आपल्या जीवनात कशी भागवता येईल हेही तो जाणतो. तो परिपूर्ण शिक्षक आहे. त्याची शिस्त व्यक्तीच्या गरजेनुसार साजेशी समर्पक असते. अधिकच प्रतिकूल परिस्थिती पाठवून तो आपल्याला प्रशिक्षणाचा डोसही पाजत नाही.

देव कधीही स्पष्टीकरण देत नाही

खेळाचे अथवा कोणतेही प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी तो शिक्षक आपल्याला सरावाचे उद्देश सांगतो. त्याचे शिक्षण कितीही कष्टमय वाटले तरी ते आपण निमूटपणे सहन करतो. कारण शेवट चांगला आहे हे आपल्याला समजत असते. पण मी केव्हा, काय, का व कसे करतो, ते किती काळ चालेल याविषयी देव कधीच पूर्वसूचना देत नाही. ईयोबावर आपत्ती का आली याचे सकारण स्पष्टीकरण देवाने ईयोबाला दिले असे आढळत नाही. देव व सैतान यांच्यामधील पडद्यामागच्या युद्धाचे आपण निरीक्षण करायचे आहे. पण देवाने ईयोबाला ही गोष्ट सांगितली नाही. ईयोबावर ही संकटे का येऊ दिली ते सांगितले नाही. रोम ८:२८ हे वचन ईयोबाप्रमाणेच आपल्यालाही लागू आहे. ईयोबावरील संकट त्याने उच्च उद्देशासाठी वापरले. खुद्द देव व सैतान यांच्यामधील द्वंद्वाचा बळी म्हणून ईयोबाचा वापर केला नाही. पहिल्या दोन अध्यायात सैतानाने देवासमोर येऊन केलेल्या आवाहनानंतर पुढे सैतानाचा उल्लेखच नाही. देव व सैतान यांच्यामधील या द्वंद्वात आपण विजयी झाल्याचा देव दावा करत आहे असा त्यांच्यामधील संवाद अखेरीस सापडत नाही. तर उलट देव व ईयोब यांच्यामधील संवाद दिला आहे. त्यात देवाशी आपले घनिष्ट संबंध प्रस्थापित झाल्याचे ईयोब व्यक्त करीत आहे “कर्णोपकर्णी मी ऐकले आहे आता तर माझ्या डोळ्यांनी तुला पाहिले आहे”  (ईयोब ४२:५).  या सर्व विपत्ती मागे हा घनिष्ट संबंध प्रस्थापित करण्याचा देवाचा उद्देश होता असे दिसते.

आपत्तीनंतर आपण फायदे पाहतो. आपत्तीमधून जाताना ते दिसत नाहीत. योसेफाने मिसराचा मंत्री झाल्यावर असंख्य फायदे पाहिले पण संकटातून प्रत्यक्ष जात असताना ते त्याला दिसले नव्हते. उलट तेव्हा ते प्रतिकूल प्रसंग निरर्थक वाटले. बालपणी स्वप्नात ज्या भावी आशा अपेक्षा प्रकट केल्या होत्या त्याच्या उलट हे प्रसंग वाटले. आपल्याला पुढचे फायदे दिसोत ना असोत. आपण देवाची प्रीतीपूर्ण व आपल्यासाठी उत्तम असलेली इच्छा त्यात पाहायची व पूर्णत्वास नेण्याचे ज्ञान त्याला आहे असा विश्वास ठेवायचा. एका व्यक्तीच्या जीवनात ३०-३५ वर्षे आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्व बाजूंनी संकटे आली तरी अखेर ती म्हणू शकते की, “मला ठाऊक आहे देव कधी चुकत नाही. त्याचे मार्ग परिपूर्ण असतात. म्हणून असे का? हा प्रश्न त्याला विचारायचा नाही व त्याच्या कृतीची पारख व्हावी म्हणून देवाने सकारण स्पष्टीकरण करावे अशी अपेक्षाही करायची नाही. देवाच्या कृतीला पुरेशी करणे असतात. आपण त्याच्या सार्वभौम ज्ञानावर व प्रीतीवर विश्वास ठेवायला शिकावे. आपण देवा, असे का अशी आरोळी करतो याविषयी येथे आपण विचार करत नाही. पण स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी देवाला अट्टाहासाने असे का अशी विचारणा करत राहायचे नाही असे मला सुचवायचे आहे. कारण या प्रश्नात देवावर आरोप केल्याचा सूर जाणवतो. प्रथम मानवी प्रतिक्रिया असते नंतर पापी प्रतिक्रिया होते. स्तोत्र १०, २२, ७४ यांची सुरुवात का या प्रश्नाने होते. पण या प्रत्येक स्तोत्राची अखेर देवावरील विश्वासाने होते. ‘का’ या प्रश्नाला स्तोत्रकर्त्याने फार वाहवत जाऊ दिले नाही. त्याची ती चिंतेने केलेली आरोळी होती. वेदनेवर प्रतिक्रिया होती. ईयोबाच्या पुस्तकात १६ वेळा ‘का’ आले आहे. त्यामुळे देवावर आरोप करण्याचे त्यात सातत्य दिसते. देवाने ‘का’ चे नव्हे तर ‘कोण’ चे उत्तर दिले. एक देवाचा लेखक म्हणतो, ‘देवाला का विचारणे मी बंद केले आहे.’ देव प्रश्नाचे स्पष्टीकरण देत नाही. त्याला हवे ते आणि हवे तसे तो करतो. कारण तो देव आहे. त्या घटना का घडल्या याची जाणीव करून घेण्याची त्याला गरज नव्हती. ईयोबापेक्षा कमी आपत्ती असूनही देवाला ‘का’ हा प्रश्न मी अनेकदा केलेला आहे. देवाने इयोबाच्या धार्मिकतेची शिफारस केली पण तरी देव ईयोबाला कसे हाताळत होता हे आपण शिकावे म्हणून ह्या नोंदी करून ठेवल्या आहेत. ईयोबाच्या जीवनावरून एक धडा तर आपण नक्की शिकतो की आपण ‘का’ प्रश्न विचारणे थांबवावे. व्यभिचाराच्या पातकाबद्दल ५१व्या स्त्रोत्रात दाविदाने केलेला पश्चात्ताप देवाने शतकानुशतके वापरला. हे त्या ‘का’ चे उत्तरच नाही का? देवाच्या चांगुलपणावर शंका घेऊन इयोबाने जी धडपड व्यक्त केली त्याचाही देवाच्या सेवेसाठी त्याने वापर केला. ईयोबाकडून आपण शिकतो की ‘का’ चा आग्रह धरणे पाप आहे.

पुढे चालू

Previous Article

धडा १५.   १ योहान ३:४-६ स्टीफन विल्यम्स

Next Article

धडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स

You might be interested in …

सर्व पुनरुत्थानाचे ईश्वरविज्ञान एकाच अध्यायात

लेखक – जॉन पायपर प्रभू उठला आहे! आणि त्या एका घटनेद्वारे अमर्याद आशीर्वादांची रेलचेल आपल्यापर्यंत आली आहे. संबंध विश्वाने त्याला होय म्हटले! देवपित्यानेही. कारण ह्या कृत्याद्वारे जे व्हायला पाहिजे होते ते सर्व केले गेले. तसेच […]

देवावर भरवसा (तुम्ही जसे आहात त्याबद्दल) लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

आपण जे आहोत ते देवानेच आपल्याला घडवले आहे. केवळ आईवडिलांच्या शरीर संबंधातून आपली निर्मिती झाली एवढी ती बाब क्षुल्लक नाही. “तू माझ्या आईच्या उदरी माझी घटना केलीस” (स्तोत्र १३९:१३). आईच्या उदरात बालकाला गुंफण्याचे काम करणारा […]

देवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी – भाग २ लेखक: जेरी ब्रिजेस

जेरी ब्रिजेस  ( १९२९ -२०१६) हे गेल्या काही दशकातील नामवंत ख्रिस्ती लेखकांपैकी एक आहेत. त्यांची अनेक पुस्तके जगप्रसिद्ध झाली असून अनेकांना त्यांच्या ख्रिस्ती वाटचालीत खोल मार्गदर्शन करणारी ठरलेली आहेत. त्यांच्याशी जवळून परिचय असणाऱ्यांची साक्ष आहे […]