नवम्बर 23, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस

 

देवाचे  मार्ग अनाकलनीय आहेत

आपण कधी कधी देवाकडे स्पष्टीकरणाचा आग्रह धरत नाही. पण तो काय करत आहे याची आपणच कल्पना करतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या बाबतीत प्रत्यक्षात काय घडत आहे यावर विचार केल्याशिवाय आपल्याला होत नाही. ‘का’ चे उत्तर सापडेपर्यंत आपला शोध आपण चालू ठेवतो आणि असमाधानी राहतो. ही निरर्थक अविश्वासाची व निष्फळ कृती आहे. कारण देवाचे मार्ग अमर्याद, अगम्य, अनाकलनीय असल्याने ते आपल्याला उमगत नसतात. त्याचे मार्ग आपले नव्हत. मानवी दर्जाने त्यांची उंची मापता येत नाही. निर्णय शोधता येत नाहीत. त्याच्या कार्यपद्धतीचा मागमूस लागत नाही. एवढे ते रहस्यमय व अनाकलनीय आहे. देव काय करतो हे आपण आपल्या कोत्या बुद्धीने शोधू पाहतो. पण त्याचे मन आपल्याला समजत नाही. पण हे करताना आपण किती उद्धट दिसतो! विपत्तीत जर आपल्याला शांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याचे मार्ग आम्हाला अगम्य आहेत हे आम्ही प्रथम कबूल करावे. ‘का’ हा प्रश्न विचारणे बंद करावे. अगर त्याची उत्तरे शोधणेही आपण थांबवावे. असे केल्याने देवाच्या वचनाला व पुढे आलेल्या परिस्थितीला आपण समर्पित होऊ. अखेरीस ईयोब देवाच्या अगाध ज्ञानाबद्दल नम्रपणे बोलतो; “अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा कोण? तो मी. यास्तव मला समजत नाही ते मी बोललो. ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे ते मला कळले नाही” (ईयोब ४२:३). देवाचे मार्ग समजून घेणे व ओळखणे अद्भुत आहे असे तो म्हणतो. देवाला सर्वसामर्थ्यनिशी वैभवानिशी तो पाहतो. तेव्हा उर्मटपणे प्रश्न केल्याबद्दल तो पश्चात्ताप करतो व म्हणतो, “ मी धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करीत आहे” (इयोब ४२:६). त्याने प्रश्न करणे बंद केले आणि भरवसा ठेवला. दाविदानेही सर्वसमर्थ देवाच्या उद्देशापुढे व अमर्याद ज्ञानापुढे वंदन केले व म्हटले, “माझे मन गर्विष्ठ नाही, माझी दृष्टी उन्मत नाही. मोठमोठ्या व मला असाध्य गोष्टीत मी पडत नाही” (स्तोत्र १३१:१). महान व अद्भुत गोष्टी म्हणजे देवाचे गुप्त हेतू. आणि ते सफळ करण्याची त्याची अमर्याद साधने. ती समजून घेण्याची दाविदाने कसरत केली नाही. तर तो देवाच्या अधीन राहिला. देवावर भरवसा ठेवून शांत राहिला. देवावर भरवसा ठेवावा, त्याची शांती प्राप्त करावी, त्याचा सन्मान करावा अशी इच्छा असेल तर आपण दाविदासारखे करावे. मग आपणही म्हणू शकू, देवा मला अधिक जाणून घेण्याची गरज नाही मी फक्त तुझ्यावर विश्वास ठेवतो.

अर्थ काढीत न बसता फक्त विश्वास ठेवायचा

देवाचे ज्ञान अगाध आहे. त्याचे मार्ग विश्लेषण करण्याजोगे नाहीत. त्यांचा अर्थ लावताना आपण फार काळजी घ्यायला हवी. अर्थ लावण्याऐवजी सावधानता बाळगावी. पिडीत झाल्यामुळे आपले बरे झाले अशी दावीदराजा कबुली देतो (स्तोत्र ११९:७१). प्रतिकूल परिस्थितीत देवाने इस्राएलांना पुरवठा केला त्यातून ते धडा शिकले. अनुवाद ८:३ म्हणते, “त्याने तुला लीन केले. तुझी उपासमार होऊ दिली तेव्हा तुझ्या पूर्वजांना ठाऊक नसलेला मान्ना त्याच्या योगाने तुझे पोषण केले. ते यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल. हे तुझ्या प्रत्ययास आणून द्यावे,” रोजच्या गरजांसाठी आपल्या कोठाराकडे वळता येणार नाही अशी परिस्थिती देवाने निर्माण केली. आणि त्यावेळी त्यांना दैवी पुरवठा केला. त्याद्वारे त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याचा धडा शिकवला. देव त्यांना अशा स्थानी नेत होता की जेथे निसर्गत:च त्या वस्तूंचा विपुल पुरवठा होईल. (अनुवाद ८:७-९). पण त्या भूमीत प्रवेश करण्यापूर्वी देवाने त्याच्यावर अवलंबून राहायचा धडा यासाठी दिला की कदाचित ते आपल्याच मनाच्या गर्वाने मोहित होतील आणि म्हणतील, “हे धन माझ्याच सामर्थ्याने व भूजबलाने मला प्राप्त झाले आहे” (अनुवाद ८;१७). म्हणून दावीद राजाचे बोल किती समर्पक आहेत. “मी पिडीत झाल्यामुळे माझे बरे झाले कारण तेणेकरून मी तुझे नियम शिकलो” (स्तोत्र ११९:७१).

आपल्या आपत्तीपेक्षा देवाचे ज्ञान महान आहे

देवाचे ज्ञान आपल्यापेक्षा उच्च आहे. स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे. एवढेच नव्हे तर आपत्तीच्या कपटी ज्ञानापेक्षाही उंच आहे. यात आपल्याला केवढे सांत्वन आहे. मनुष्यांकडून येणाऱ्या आपत्तीपेक्षा प्रतिकूल परिस्थितीमुळे येणारी आपत्ती सहन करणे सोपे असते. दावीद २ शमुवेल २४:१४ मध्ये म्हणतो; “मी मोठ्या पेचात पडलो आहे. परमेश्वराच्या हाती आपण पडू या. कारण त्याचे वात्सल्य मोठे आहे. मनुष्याच्या हातात मी पडू नये.” लोक अन्यायाने वागून आपला गैरफायदा उठवतात. आपला उपयोग त्यांच्या स्वार्थासाठी करून घेतात. पण नीति. २१:३० म्हणते, “परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती चालत नाही.” म्हणून पौलाप्रमाणे आपण म्हणू या, “देव आम्हांला अनुकूल असल्यास आम्हांला प्रतिकूल कोण असणार?” (रोम ८:२१). देवाने जे घडावे म्हणून आपल्याला राखले ते तोच त्याच्या सार्वभौम अमर्याद ज्ञानाद्वारे घडवून आणील. योसेफाच्या भावांच्या सर्व कृती अधर्माच्या होत्या. पण त्या सर्व गोष्टी देवाने भल्याकरता घडू दिल्या. दाविदाचा उदोउदो झाल्याने मत्सर पेटून शौल दविदाला ठार करू पाहत होता. त्यामुळे काही काळ दाविदाला भूमिगत राहावे लागले . पण त्यावेळी देव त्याला राजा व आपल्याला प्रिय असलेली व्यक्ती म्हणून घडवत होता. त्याचा काळात त्याने अर्थपूर्ण स्तोत्रे लिहिली. वेडाचे सोंग केले तेव्हा ३४वे स्तोत्र लिहिले. आपण निराश होतो तेव्हा हे स्तोत्र समाधान देते. शौलाने वाईट योजले होते पण देवाने त्यातून कल्याणच घडवले. इयोबाने देवाला शिव्याशाप द्यावे म्हणून सैतानाने योजना आखल्या. पण तीच गोष्ट इयोबास देवाच्या सान्निध्य जाण्यास कारण झाली. पौलाच्या शरीरात काटा ठेवून सैतानाने पौलाला छळले. त्यामुळे पौलाची सेवा कमकुवत करू असे त्याला वाटले. तरीही पौल मात्र हेच तत्त्व त्यातून शिकला की, “देवाची कृपा मला पुरे आहे.” आपल्या दुर्बलतेत त्याचे सामर्थ्य प्रत्ययास येते याचा अनुभव त्याने घेतला (२ करिंथ १२: ९).आजवर कित्येक विश्वासीयांचा अनुभव आहे की, “देवाची कृपा मला पुरे आहे.” ती वचनातून प्राप्त होते. लोक अगर सैतान यांच्यापेक्षा देवाचे ज्ञान अगाध आहे म्हणून ते जे काही करू पाहतात त्याचे भय धरण्याची आपल्याला गरज नाही. देव याबाबत कार्यरत असतो. आपत्ती, आजार, मरण, आर्थिक दुरावस्था, नैसर्गिक आपत्ती यातही तो तितकाच कार्यरत असतो.

जगाच्या कारभारातील देवाचे ज्ञान

देवाचे सार्वभौम सामर्थ्य व अगाध ज्ञान आपल्या परिस्थितीपलीकडे जाऊन जगावरही आपले नियंत्रण करते यावर आपण तपशीलवार चर्चा केली. जगाची अवस्था अत्यंत वाईट आहे. आपण शापित जगात राहतो. पण बेफाम, बेलगाम, घटनादेखील देवाच्या पूर्ण नियंत्रणाखाली असतात. आपण ‘का’ प्रश्न विचारण्याचे  थांबवले, स्पष्टीकरणाची अपेक्षा धरली नाही, देव विश्वाचा सूत्रधार आहे याची जाणीव ठेवली तर आपण आपले मन शांत राखू शकू व दाविदाप्रमाणे म्हणू; “खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे” (स्तोत्र १३१:२). जगात येणाऱ्या प्रत्येक दु:खद घटनेबाबत आपण हे म्हणावे. जगाचे सर्व कारभार व व्यवस्थापन सामाजिक अगर वैयक्तिक असो ते सर्व सुज्ञ देवाच्या हाती आहे. ‘स्व’ ला आपण माघार घ्यायला लावू या. आणि देवाच्या ज्ञानाच्या अधीन राहू या. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका. लूथरसारख्या देवाच्या भक्तावरही ताणतणाव, दबाब आले. स्वत:ला जगाचे सूत्रधार समजू नका. सर्व अधिकार देवाच्या हाती सोपवा, त्याने ते घडवले व त्यालाच ते माहीत आहेत. आपल्या सभोवतालच्या घटनांबाबत आपण अज्ञान राहायचे नाही तर आपत्ती व विपत्तीचे बळी झालेल्यांसाठी प्रार्थना करायची. त्यांना दिलासा देण्यास मिळेल ती संधी वापरायची. जगातील सत्ताविषयी देवाला प्रश्न करायचा नाही. देवाच्या ज्ञानाला प्रश्न करणे म्हणजे त्याचा अनादर करणे. आत्मिक दृष्ट्या कमजोर होणे. देवाच्या गौरवाला मलीनता आणणे. त्याच्यावर फक्त भरवसा ठेवायचा म्हणजे सुख, शांती आनंद मिळेल. काही आकलन न होताही आडपडदा न ठेवता देवावर भरवसा ठेवणे हाच सुख, शांती आनंद प्राप्तीचा मार्ग होय. ह्या कृतीने आपण देवाचा आदर करतो. यामुळेच सर्व काही आपल्या कल्याणार्थ व देवाच्या गौरवार्थ होते. आम्ही हर्ष करावा कारण जगाच्या कारभारास देवाचे अगाध ज्ञान मार्गदर्शन करते. पुष्कळदा त्यातील घटना रहस्यमय अंधारात दडलेल्या असतात. त्यांचा गुंता सोडवता येत नाही. दुष्टाईचा जोर चालतो. देव आपल्या निर्मितीला विसरला आहे का असा भास होतो. आपला जीवनमार्ग बहकलेला, अंधारलेला वाटतो. तो धोके व अडचणींनी व्याप्त  असतो. अशा वेळी प्रत्येक घटना देवाच्या अगाध ज्ञानाच्या मार्गदर्शनातून आलेली आहे, हे तत्त्व किती मोठे समाधान देते. गोंधळलेल्या जगाला ते शांती देते. अंधारात प्रकाश देते. देवावर प्रीती करणाऱ्यांचा अनुभव असतो. तत्कालीन कोणताही प्रसंग आपल्या कल्याणार्थ घडण्यास कारणीभूत आहे असा त्यांचा विश्वास असतो.

 

Previous Article

धडा २३. १ योहान ४:७-११ स्टीफन विल्यम्स

Next Article

धडा २४.   १ योहान ४:१२-१६ स्टीफन विल्यम्स

You might be interested in …

कुमारीपासूनच्या जन्माने झालेले येशूचे गौरव

 डेविड मॅथीस      येशूचा जन्म कुमारिकेच्या पोटी झाला. देव – मानव असलेल्या येशूचा हा एकमेव गौरव आहे.संपूर्ण इतिहासात आतपर्यंत जन्मलेल्या अब्जावधी मानवांमध्ये एकाच व्यक्तीने जगामध्ये अशा रीतीने प्रवेश केला. देव आणि मनुष्य यांमध्ये एकच मध्यस्थ […]

दररोजच्या निर्णयांमध्ये देव कसे चालवतो?

जॉन पायपर माझ्या दररोजच्या निर्णयांमध्ये देवाच्या मार्गदर्शनाला मी कसे अनुसरावे? तो माझा मेंढपाळ आहे हे मला ठाऊक आहे. तो मला चालवतो. पण मी त्याच्या मागेच जातोय हे मला कसे समजते? ह्या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण […]

धडा ३.  १ योहान १:४ आनंदाची पूर्णता – स्टीफन विल्यम्स

  देवाला तुम्ही आनंदित राहायला हवे आहे की देवाला तुम्ही पवित्र राहायला हवे आहे? • अर्थात हा प्रश्न पेचात पाडणारा आहे पण चांगल्या कारणासाठी. आनंद व पावित्र्य ही दोन्ही आपण परस्परांपासून विभक्त करू शकत    […]