Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on दिसम्बर 1, 2020 in जीवन प्रकाश

उगम शोधताना

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

 प्रकरण १७

वधस्तंभाचे चित्रण

 सर्व शुभवर्तमानात ख्रिस्ताच्या वधस्तंभी जाण्याचे वर्णन असल्याने अनेक वेळा ही गोष्ट कानावर पडली होती. प्रत्येक वेळा अधिक तपशील समोर आला होता. मी जरी इतक्या वेळा हा वृत्तांत वाचला होता, एवढे संदेश ऐकले होते, इतक्या फिल्म्स पाहिल्या होत्या, ईस्टर पाळला होता, कित्तीतरी वेळा प्रभुभोजन घेतले होते, तरी मननातून नवीन गोष्टी समोर आल्या होत्या…. तेही फोलोपांच्या नजरेतून व भाषेतून पाहताना अधिक नाविन्य वाटत होते.

फोलोपामध्ये ‘वधस्तंभी खिळणे’ यासाठी समानार्थी शब्द नाही. संस्कृतीचाही तो भाग नाही. ख्रिस्तामुळे ती ऐतिहासिक परंपरा म्हणून पाहिली जाते. आपण वधस्तंभी देण्याची  प्रक्रिया जाणतो. पण ही प्रक्रिया फोलोपांसाठी नवीनच होती. त्यांच्या छळून मारण्याच्या प्रक्रियेतही असे काही नव्हते. त्यामुळे त्यांनी हे प्रथमच ऐकले तेव्हा त्यांचा गैरसमज झाला. त्यांना वाटले की बळी दिल्यावर त्याला वधस्तंभी टांगले. अशीच आतापर्यंत त्यांची समजूत होती. प्रथमच आम्ही बायबल भाषांतर करताना त्यांना खरी कल्पना आली.

वधस्तंभावर असताना येशू बोलला, येशूचा प्याला, त्याने प्रार्थना केली हे तर त्यांना प्रथमच समजत होते. जो जिवंत आहे, तोच या हालचाली करू शकतो. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आल्याचा संदेश माहीत असूनही वधस्तंभावरील  ह्या घटना व त्याच्या मरणाचे सत्य आणि विशेषत: पुनरुत्थानाचे सत्य या गोष्टी त्यांच्यासमोर यापूर्वी कधी आल्याच नव्हत्या.

अर्थात आपण लक्षात घ्यायला हवे की हा इतिहास फोलोपांसाठी हळूहळू उलगडत गेला. शुभवर्तमानात या घटनांची मालिका दिलेली असली तरी त्यांचा मथितार्थ नंतर प्रेषितांची कृत्ये व पत्रांमधून स्पष्ट केला आहे. फोलोपांसाठी हे सारे प्रथमच पाहणाऱ्या लोकांप्रमाणे होते. त्यांना निदान वधस्तंभाच्या घटना तरी  कळल्या होत्या पण बाकी काही समजले नव्हते. ह्यांना तर त्याहून अधिक अज्ञान होते. येशूच्या उजव्या व डाव्या बाजूस चोरांना खिळलेले होते याचेही मला स्पष्टीकरण करावे लागले होते. त्यांची कल्पना होती की तिघांना एकाच वधस्तंभावर खिळलेले होते.

भिन्न संस्कृतीमुळे त्यांच्या कल्पना आमच्यापेक्षा अगदी वेगळ्या असल्याचे मला व कॅरलला समजून येई. येशूच्या पुनरुत्थानाची संकल्पना व सर्व विश्वासीयांचे पुनरुत्थान होणार हे सत्य समजावून द्यायला आम्हाला फार वेळ  लागला. त्यांच्या भाषेत यासाठी शब्दच नाही. जेव्हा ही सत्ये त्यांना उमगली तेव्हा आपल्या संस्कृतीपेक्षा त्यांच्यावर त्याचा अधिक खोलवर परिणाम झाल्याचे आढळले.

त्यांच्यासाठी हे अगदीच नवीन होते. फोलोपांच्या समजुतीप्रमाणे मनुष्य मेल्यावर त्याचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर पडून काही काळ गावाभोवतीच फिरत राहातो. तो शत्रुत्वाने किंवा मित्रत्वाने वागतो. त्याची आपल्यावर मर्जी असावी म्हणून विविध प्रकारे ते खात्री करून घेतात. कालांतराने तो आत्मा गाव सोडून सिकी आओ म्हटलेल्या जागी जातो. आम्हाला या जागेविषयी फारशी माहिती कोणी सांगू शकला नाही. त्यांनाच या स्थळाविषयी स्पष्टता नाही. गावाशी काम संपल्यावर ते आत्मे तेथे जातात एवढेच ते सांगतात. ज्या मृतांची नावे अजूनही स्मरणात आहेत अशांच्या आत्म्यांना भूतविद्याप्रवीण लोक बोलावतात. ज्यांची नावे माहीत नाहीत अशांच्या आत्म्यांना पाचारण करता येत नाही अशी त्यांची समजूत आहे.

सिकी आओ ही अंधारलेली जागा आहे व ज्यांना त्याविषयी माहिती आहे ते ती कोणाला सांगत नाहीत. आपण जे पवित्र आत्म्याची किंवा शारीरिक पुनरुत्थानाची बातमी घेऊन येतो त्यांना तर ते मुळीच सांगत नाहीत. विश्वासी जन तर गौरवी शरीराने सदासर्वकाळ स्वर्गात राहाणार आहेत. स्वर्गासाठी ते जो ‘तालेने बे’ हा शब्द  वापरतात त्याचा अर्थ ‘प्रभूचे स्थान’ ‘मालकाचे घर’ असा होईल. त्या घरात ते एकटे नसतील, तर तेथे कुटुंब, प्रेम व प्रकाश असेल.  तेथे अंधार, एकटेपण, भकासपणा, अधर्म नसेल…. ही संकल्पना त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होती. हे सर्व ऐकून फोलोपा ढवळून निघाले.

हे मोफत दान पृथ्वीच्या पाठीवर कोणीही नाकारू शकत नाही. ते इतके उत्तम आहे की काही लोकांचा त्यावर विश्वास बसत नाही हा वेगळा विषय झाला. ह्याची  वचनात शिकवण आहे. पण हे दान मोफत असले तरी त्याला मोल नाही असे नाही तर ते अत्यंत मोलवान आहे. मानवजात ते मोल देऊच शकत नाही अशी त्यांच्या कुवतीपलीकडे त्याची किंमत आहे.

देवाने स्वत: आपल्या पुत्राच्या मरणाच्या अर्पणाने ती भरून दिली. ही हत्या अगदी टोकाची होती. पण गुन्हा पण तसाच होता. येशूने सर्वांच्या पापासाठी मोल दिले. हळूहळू फोलोपांना समजले की येशूचे केवळ मरणे व वधस्तंभावर खिळून लटकत असता यातना सहन करत हळूहळू वधस्तंभावर प्राण सोडणे या दोहोत किती मोठा फरक आहे.

आम्ही हे भाषांतर करताना त्यांना हे स्पष्ट झाले, तरी आम्ही ह्या सुवार्तेवरील चित्रपट दाखवल्यावर संपूर्ण गावाला त्याचा प्रभावी स्पर्श झाला. तो लूकाच्या शुभवर्तमानावर आधारित असल्याने २४ रात्री आम्ही रोज तो दाखवला. चर्च खच्चून भरलेले असे. त्यांनी कधी चित्रपट पाहिला नव्हता. त्यामुळे घडलेल्या घटनातील हे  प्रत्यक्ष लोक नसून कलाकारांनी त्या काळच्या लोकांसारखी वेशभूषा करून ते आपल्याला समजेल असे चित्रित केल्याचे आम्हाला त्यांना वारंवार समजावून सांगावे लागले. आम्ही रोज संध्याकाळी फोलोपा भाषेत एक अध्याय वाचायचो आणि मग त्यांना त्यावरील चित्रपट दाखवायचो. त्यामुळे नुकतेच वाचलेले त्यांना लक्षात ठेवावे लागे. हे काम छानच झाले. त्यांना जे समजायला अवघड गेले त्यावर आम्ही नंतर चर्चा करायचो. पाच हजारांना भोजन आणि पेत्राने एवढे सारे मासे धरलेले पाहताना त्यांना मोठी गंमत वाटायची. पण वधस्तंभाचा जो प्रभाव पडला त्याला कशाकशाचीच तोड नव्हती.

जेव्हा येशूला सैनिकांनी वधस्तंभावर झोपवले तेव्हा सर्वत्र स्मशान शांतता पसरली. तो अजूनही जिवंत असल्याचे सर्वांना स्पष्ट दिसत होते. पण ही तर वादळापूर्वीची शांतता होती. पहिला हातोडा त्याच्या हातातील खिळ्यावर पडताच सर्व स्त्रियांच्या टाहो फोडण्याने चर्च दुमदुमून गेले. त्यामुळे चित्रपटातील देखावा अधिकच भयंकर वाटू लागला. संस्कृतीनुसार पुरुष मंदिरात दुसऱ्या बाजूला बसले होते. ते बायकांना गप्प करू लागले पण त्या काही शांत होईनात. ते ओरडले, “हे खरे नाही. हा येशू नाही.” त्यांना वाटत होते की येशू त्यांच्यासमोर तेथे त्याचवेळी वधस्तंभी खिळला जात होता.

त्यांच्या संस्कृतीनुसार तो प्रतिसाद बरोबरच होता. येशूला असे खिळले म्हणजे कोण हरले व कोण जिंकले हे त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते. मी व कॅरलवर या लोकांचे हे दृश्य पाहून खोल परिणाम झाला.

मग येशू बोललेले शब्द मी वाचले; “हे बापा, ह्यांना क्षमा कर कारण हे काय करतात ते ह्यांना समजत नाही.” चर्चमधील जमीनीवर बसलेल्या त्या पामरांमध्ये हे  शब्द खोल रुतले. आपल्याला त्याची अनेक प्रकारची खरी व्याप्ती कळत नाही.

पित्याने ती प्रार्थना ऐकून क्षमा केली. वधस्तंभाच्या या कृतीमुळे केली. हा आणखी एका नवीन मूळारंभाचा ‘बेटे’ चा शोध लागला होता.

रोज संध्याकाळी लोक गंभीर होऊन आपल्या झोपडीकडे परतत होते. वधस्तंभ आमच्या सर्वांच्या खूप जवळचा झाला होता ….. आणि आमची अंत:करणे देवाजवळ जाऊन भिडली होती.