दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ख्रिस्त तुमचा प्रभू आहे का? लेखक: ए डब्ल्यू पिंक

 ए डब्ल्यू पिंक यांनी दिलेला सुवार्ता संदेश

 

ख्रिस्त तुमचा “तारणारा” आहे का? हा प्रश्न आम्ही विचारत नाही. पण तो खरोखर तुमचा प्रभू आहे का? जर तुमचा तो प्रभू नसेल तर तो तुमचा “तारणारा” नक्कीच नाही. ज्यांनी येशू ख्रिस्ताला आपला “प्रभू” म्हणून स्वीकारले नसेल आणि तरीही त्याला आपला “तारणारा” समजत असतील तर ते बुद्धिपुरस्सर स्वत:ची फसवणूक करून घेत आहेत आणि त्यांच्या विश्वासाचा पाया वाळूवरचा आहे. बहुसंख्य लोकांची या महत्त्वाच्या मुद्यापाशी फसवणूक झाली आहे. म्हणून जर वाचकाला आपला आत्मा मोलवान वाटत असेल तर गयावया करून आम्ही तुम्हाला विनंती करतो की ही छोटासा लेख तुम्ही काळजीपूर्वक वाचावा.

जेव्हा आम्ही तुम्हाला विचारतो की ख्रिस्त तुमचा प्रभू आहे का? तेव्हा आम्ही ही विचारपूस करत नसतो की तुम्ही नासरेथकर येशूच्या देवत्वावर विश्वास ठेवता का? दुरात्मेही हा विश्वास ठेवतात (मत्तय ८:२८,२९), तरीसुद्धा ते नाश पावणार आहेत. ख्रिस्ताच्या देवत्वावर तुम्ही दृढ विश्वास ठेवत असला तरी तुम्ही आपल्या पापातच असू शकता. तुम्ही अत्युच्च आदराने त्याच्याविषयी बोलत असाल. तुमच्या नित्याच्या प्रार्थनेत त्याला दैवी संबोधने वापरून स्तुती अर्पित असाल – आणि तरीही तारण पावलेले नसाल. त्याच्या व्यक्तिमत्त्वावर कोणी शिंतोडे उडवलेले, किंवा त्याचे देवत्व नाकारलेले तुम्हाला अजिबात खपत नसेल; तरीही त्याच्याविषयी तुम्हाला जराही आत्मिक प्रीती नसण्याची शक्यता आहे.

जेव्हा आम्ही तुम्हाला विचारतो की ख्रिस्त तुमचा प्रभू आहे का? तेव्हा आमच्या विचारण्याचा उद्देश असतो की प्रत्येक कृतीसाठी तो तुमच्या अंत:करणात राजासनावर असतो का? तो प्रत्यक्षात तुमच्या जीवनात राज्य करत आहे का? “आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता” (यशया ५३:६) यात आपण स्वभावत:च अवलंबत असलेल्या मार्गाचे वर्णन आढळते. परिवर्तन होण्यापूर्वी प्रत्येक आत्मा स्वत:लाच संतुष्ट करण्यासाठी जगत असतो. जुन्या करारात लिहिलेले आढळते की “जसे बरे दिसे तसे तो करी” असे का? तर “त्या काळी इस्राएलाला कोणी राजा नव्हता” (शास्ते २१:२५). अरेरे, हाच तर मुद्दा आमच्या वाचकापुढे आम्ही स्पष्ट करू पाहत आहोत. जोवर ख्रिस्त तुमचा राजा होत नाही (१ तीमथ्य १:१७; प्रकटी १५:३), त्याच्या राजदंडापुढे तुम्ही आपली मान तुकवत नाही, जोवर त्याची इच्छा तुमच्या जीवनात राज्य चालवत नाही, स्वत:चेच वर्चस्व चालते तोवर ख्रिस्ताशी तुम्ही आपला संबंध आहे असे म्हणू शकत नाही.

जेव्हा पवित्र आत्म्याचे एखाद्याच्या आत्म्यात कृपेचे काम सुरू होते तेव्हा तो प्रथम पापाची खात्री देतो. तो मला पापाचा खरा व भयंकर स्वभाव दाखवून देतो. तो मला दाखवून देतो की हा एक बंडाचाच प्रकार आहे, देवाचा अधिकार उघडपणे अवमानणे आहे, त्याच्या इच्छेच्या विरोधात माझी इच्छा घेऊन उभे राहणे आहे. तो मला दाखवून देतो की मी माझा “मार्ग धरणे” (यशया ५३:६) म्हणजे स्वत:ला संतुष्ट करणे व देवाविरुद्ध लढणे होय.

माझे नेत्र उघडल्यावरच मला दिसून येते की किती दीर्घकाळ मी देवाविरुद्ध बंड केले आहे, देवाचा आदर करण्यात किती अलिप्तता दाखवली आहे, त्याच्या इच्छेनुसार करण्यात किती बेदरकार वागलो आहे – मग मी यातनेने व भयाने ग्रस्त होतो आणि आश्चर्य करून उठतो की या देवाने मला आतापर्यंत तिप्पट नरकयातना भोगायला नाही पाठवले. हे वाचका, असे वाटल्याचा अनुभव तुला कधी आला आहे का? जर नसेल आला तर तू आध्यात्मिक मृतावस्थेत असल्याची भीती वाटण्यासाठी हे गांभीऱ्याने विचार करण्यासारखे कारण आहे.

परिवर्तन, खरे परिवर्तन, तारणदायी परिवर्तन म्हणजे ख्रिस्तामध्ये पापापासून देवाकडे वळणे होय. त्याच्या विरोधात उभारलेल्या लढ्याची शस्त्रात्रे फेकून देऊन त्याचा अधिकार तुच्छ लेखून त्याकडे दुर्लक्ष करण्याचे थांबवणे होय. नव्या करारातील परिवर्तनाचे वर्णन असे केले आहे, “तुम्ही मूर्तीपासून देवाकडे – जिवंत देवाची सेवा करण्यासाठी (त्याच्या अधीन राहण्यास, त्याची आज्ञा पाळण्यास) फिरला (१ थेस्सलनी १:९,१०). “मूर्तिपूजा” म्हणजे केवळ देवालाच जे द्यायचे असते ते सर्व तुम्ही एखाद्या वस्तूला किंवा कशाला तरी किंवा व्यक्तीला देता – म्हणजे प्रेमाचे अत्युच्च स्थान, आपल्या अंत:करणावर प्रभाव पाडणाऱ्या बाबींचे स्थान, आपल्या जीवनावर वर्चस्व चालवण्याचे सामर्थ्य त्या वस्तूला अथवा व्यक्तीला देता. परिवर्तन म्हणजे पाप, स्व, आणि जगापासून आपले ऱ्हदय  पूर्णपणे विरुद्ध दिशेकडे तोंड करून वळवणे. खऱ्या परिवर्तनाचा पुरावा नेहमी हाच असतो की तुम्ही म्हणता, “प्रभू आता मी काय करावे म्हणून तू सांगत आहेस?” (प्रे. कृ. ९: ६). परिवर्तन म्हणजे काहीही राखून न ठेवता आपले देवाच्या पवित्र इच्छेला संपूर्ण समर्पण करणे. तुम्ही त्याला स्वत:चे संपूर्ण समर्पण केले आहे का? (रोम ६:१३).

पुष्कळ लोक असे आहेत की त्यांची नरकापासून सुटका व्हावी अशी इच्छा आहे. पण त्यांना स्वत:ची इच्छा, आपला मार्ग, जगिक जीवनाची वाटचाल सोडायला नको आहे. पण देव त्यांच्या अटींनुसार त्यांचे तारण करणार नाही. तारण होण्यासाठी आपण देवाच्या अटी मान्य करायला हव्यात. “दुर्जन आपला मार्ग सोडो. अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो (आदामामध्ये देवाविरुद्ध बंड करून उठण्यापासून) म्हणजे तो त्याच्यावर दया करील” (यशया ५५:७). “तुम्हांपैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही (जे म्हणून माझ्या विरोधात आहे अशा गोष्टींचा) त्याला माझा शिष्य होता येत नाही.” (लूक १४:३३). “लोकांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे” त्यानंतर त्यांना “पापांची क्षमा व पवित्र लोकांमध्ये वतन मिळेल” (प्रे. कृ. २६:१८).

“तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा” (कलसै २:६). हा ख्रिस्ती जनांना केलेला बोध आहे. आणि जोर यावर दिला आहे की जशी सुरुवात केली तसेच  पुढे चालू ठेवा. पण त्यांनी सुरुवात कशी केली होती? ख्रिस्त येशूला “प्रभू” म्हणून स्वीकारून, त्याला समर्पण करून, त्याच्या इच्छेच्या अधीन राहून, स्वत:ला संतोष देण्याचे थांबवून. आता त्याचा अधिकार त्यांनी मान्य केला होता. त्याच्या आज्ञा आता त्यांच्या जीवनाचा नियम झाल्या होत्या. त्यांनी काही राखून न ठेवता आनंदाने आज्ञापालन करायला देवाच्या प्रीतीने त्यांना गळ घातली होती. “प्रथम त्यांनी स्वत:स प्रभूला दिले होते” (२ करिंथ ८:५). माझ्या प्रिय वाचका,  तू हे केले आहेस का? तुझ्या जीवनातील क्षुल्लक बाबतीतही याचे पुरावे आढळतात का? तुमच्या संपर्कात येणाऱ्यांच्या लक्षात येते का की तुम्ही आता स्वत:ला संतुष्ट करायला जीवन जगत नाही (२ करिंथ ५:१५)?

हे माझ्या वाचका, या मुद्यावर चूक करू नकोस. पवित्र आत्मा जे परिवर्तन घडवून आणतो तो अमूलाग्र बदल असतो. तो कृपेचा चमत्कार असतो. ते ख्रिस्ताला आपल्या जीवनात अंत:करणाच्या राजासनावर विराजमान करणे असते. असे परिवर्तन खरोखर दुर्मिळ असते. बहुसंख्य लोकांकडे असा धर्म भरपूर प्रमाणात आहे की जो त्यांना कष्टी करून सोडतो. ते ठाऊक असलेले सवयीचे प्रत्येक पाप सोडायला तयार नसतात. आणि ते केल्याशिवाय तर कोणाच्याही आत्म्याला खरी शांती प्राप्त होत नाही. त्यांनी येशू ख्रिस्ताचा प्रभू म्हणून कधीच स्वीकार केलेला नसतो (कलसै २:६). त्यांनी ही गोष्ट केली तर “प्रभूचा आनंद त्यांचे सामर्थ्य होईल” (नहेम्या ८:१०). पण त्यांच्या अंत:करणाची व जीवनाची (ओठांची नव्हे) भाषा असते की “ह्याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही” (लूक १९:१४). तुमचीही हीच परिस्थिती आहे का?

कृपेचा महान चमत्कार हा आहे की स्वैराचार करणाऱ्या बंडखोर व्यक्तीचे प्रेमळ आणि एकनिष्ठ प्रजेत रूपांतर करणे. हे अंत:करणाचे नवीकरण असते. त्यामुळे मेहरबानी प्राप्त झालेल्या त्याच्या प्रजेला तिटकारा वाटणाऱ्या गोष्टी आता प्रिय वाटाव्यात आणि एकेकाळी अति कंटाळवाण्या वाटणाऱ्या गोष्टींचे आता आकर्षण वाटावे (२ करिंथ ५:१७). “आता त्याचा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करतो” (रोम ७:२२). आता त्याला शोध लागतो की “ख्रिस्ताच्या आज्ञा कठीण नाहीत” (१ योहान ५:३). “आणि त्या पाळल्याने मोठी फलप्राप्ती होते” (स्तोत्र १९:११). हा तुमचाही अनुभव आहे का? तुम्ही जर येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारले तरच हे शक्य आहे.

पण येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून स्वीकारणे हे पूर्णपणे मानवी कुवतीच्या पलीकडचे आहे. नवीकरण न झालेल्या अंत:करणाला ही तर गोष्ट सर्वात शेवटी करायची असते. त्यासाठी ख्रिस्ताने आपल्या अंत:करणाच्या सिंहासनावर आसनस्थ होण्याची इच्छाही होण्यापूर्वी अंत:करणात दैवी बदल घडून येणे गरजेचे आहे. हा बदल घडवून आणण्याचे काम देवाशिवाय कोणीही करू शकत नाही (१ करिंथ १२:३). “परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा” (यशया ५५:६). “पूर्ण जिवेभावे त्याचा शोध करा” (यिर्मया २९:१३). हे वाचका, गेला बराच काळ तू ख्रिस्ती असल्याचा दावा करत असशील. आणि तू अगदी प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करत असशील. पण जर देव खालच्या पातळीवर येऊन या लेखाचा वापर करून तुला दाखवत असेल की तू खरोखर येशू ख्रिस्ताला आपल्या अंत:करणात आपला प्रभू म्हणून कधीच स्वीकारले नाहीस आणि तुझ्या विवेकभावात तुला जाणीव होत असेल की आजवर तुझ्या स्व-नेच तुझ्या जीवनात राज्य केले, तर मग आताच तू गुडघ्यावर येऊन देवाला या गोष्टीची कबुली देशील का? आपल्या स्वेच्छेची, त्याच्या विरोधात केलेल्या बंडाची कबुली दे. आणि तुझ्यामध्ये असे काम करण्याची त्याला विनंती कर की आणखी विलंब न लावता तू  त्याच्या इच्छेला पूर्णपणे शरण जाशील आणि सत्यात व आचरणात त्याची प्रजा, त्याचा गुलाम, त्याचा प्रेमळ सेवक, होशील.

Previous Article

 धडा २६.  १ योहान ५: १- ५ स्टीफन विल्यम्स

Next Article

धडा २७. १ योहान ५: ६- ९ स्टीफन विल्यम्स

You might be interested in …

धडा १    पाहणे आणि विश्वास ठेवणे   योहान १:१   – स्टीफन विल्यम्स

  आपण देवाविषयी का शंका घेतो? (चर्चा करा) ▫   पाप, औदासीन्य, सहभागितेचा अभाव (इब्री ३:१२-१४). ▫   देवाच्या वचनाशी निगडित न राहणे. ▫   बायबलमधील संदर्भ न घेता अगदी निराळाच भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध लावणे. ▫   […]

हेन्री मार्टिन

  (१७८१-१८१२) लेखांक १६                                                                                                 हेन्रीने विविध प्रकारची सेवा केली. ही भूमिका साकारण्याचे काम त्याच्याखेरीज कोणालाच जमले नसते. तुम्ही त्याला कदाचित मिशनरी संबोधणार नाही, कारण तो आपल्या देशबांधवांचा चॅप्लेन म्हणून आला होता. पण त्याला […]

फार जोराने धावण्यापासून सावध राहा

जॉनी एरिक्सन टाडा जेव्हा मी ३० वर्षांची होते तेव्हा माझ्या जॉनी ह्या पुस्तकाला आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लाभली होती. जॉनी हा चित्रपट राष्ट्रभर गाजत होता आणि मी कॅलिफोर्निया येथे जॉनी अॅंड फ्रेंड्स ही संस्था स्थापण्यास स्थलांतर केले. […]