Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on नवम्बर 6, 2018 in जीवन प्रकाश

असहाय, गरजू असे चर्चला या                              लेखक : जॉन पायपर

असहाय, गरजू असे चर्चला या लेखक : जॉन पायपर

ख्रिस्ती लोक एकत्रितपणे दर आठवडी भक्तीला जमतात ही साजेशी व सुंदर गोष्ट आहे.
जेव्हा आपण असे करतो तेव्हा त्र्येक देवाच्या ज्ञानाचे जे सत्य आहे आणि येशू ख्रिस्तामध्ये देव आपल्यासाठी जो आहे त्या ठेव्यामुळे जी खोलवर प्रीती आपल्यात आहे ती आपण प्रकट करतो. आपल्या अंत:करणाच्या डोळ्यांनी आपण देवाचे अत्युच्च सौंदर्य आणि त्याचे मार्ग पाहिले आहेत (इफिस १:८). आणि त्याच्या ठेव्याचे हे अत्युच्च मोल आपल्या ह्रदयात जतन करण्यासाठी आपण येतो (मत्तय१३:४४; फिली.३:८).
आणि जेव्हा सगळे मिळून देवाच्या सत्याच्या ज्ञानामध्ये मुळावलेली गाणी गाऊन त्याचा गौरव करतो तेव्हा हीच भक्ती आपण आपल्या जीवनाच्या हजारो दैनंदिन कामांमध्ये चालूच ठेवतो. कारण येथेच ख्रिस्ताचे अत्युच्च मूल्य आपल्या जीवनावर राज्य करते. ख्रिस्ती असणे म्हणजे हेच.

घेण्यासाठी या

पण असे नसते की ख्रिस्ती लोक जमतात तेव्हा प्रत्येक प्रभुवारी त्यांना आनंदाच्या स्तुतिगीतांमध्ये पूर्णतेने भरल्याचा अनुभव येतोच. जे भरलेले असताना भक्तीला येताना त्यांच्याद्वारे देवाचा जितका गौरव होतो तितकाच जे असहाय, गरजू असतात व देवाला भेटण्याची आशा धरून येतात त्यांच्याद्वारेही होतो. जे ह्रदय भरलेले असताना भक्तीमध्ये म्हणते “उपकार मानतो, स्तुती करतो” तेच ह्रदय रिकामे असताना असेही म्हणते, “मला तुझी गरज आहे मी तुझ्यासाठी तहानेला आहे मला तुझी उत्कंठा लागलीय.” त्यांची कल्पना एकच आहे. त्यांचे सर्वस्व एकच आहे.

सामूहिक उपासना हे फक्त भरून वाहणासाठी एकत्र येणे नाही. जे भरलेले आहेत ते भरून वाहतील. ही उपासना आहे. जे गळून गेले आहेत ते देवाच्या जीवनदायी वचनाच्या झऱ्याकडे पिण्यासाठी येतात. ही सुद्धा उपासनाच आहे. त्यामुळे देवासाठीची गरज व उत्कंठा वाढवली जाते. ज्यांच्या जिवाला भूक लागली आहे ते वचनाच्या समृद्ध साठ्यातून मेजवानीत वाढलेल्या पदार्थांतून खाण्यासाठी येतात, ही सुद्धा उपासनाच आहे.
काही पाळक जे फक्त घेण्यासाठी येतात देण्यासाठी नाही त्यांना निषेध करतात. जर भुकेले लोक घेण्यासाठी येण्याचे कारण देव आहे तर त्यामुळे जीव तृप्त करणाऱ्या देवाचे सौंदर्य व मोल वाढवले जाते. जर ते आठवड्यामागून आठवडे मनोरंजनासाठी येत असतील तर मात्र पाळकाने आरशात पाहण्याची गरज आहे, लोकांकडे नाही.

निराश शिष्य

जेव्हा दावीद म्हणतो “तो माझा जीव ताजातवाना करतो” (स्तोत्र २३:३). तेव्हा त्याला म्हणायचेय की जिवाला ताजेतवाने होण्याची गरज असते. म्हणून आम्ही म्हणतो, “तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे” (स्तोत्र ५१:१२). “हे देवा, तू आम्हांला परत आण; आपला मुखप्रकाश आमच्यावर पाड म्हणजे आम्ही तरू” (स्तोत्र ८०:३). “हे आमच्या उद्धारक देवा, आम्हांला परत आण” (स्तोत्र ८५:४). हाच सर्व जगभरच्या ख्रिस्ती लोकांचा अनुभव असतो. हे अंशत: आपण पापी असल्याने घडते. आपला जुना स्वभाव आपल्या जिवाविरुध्द युद्ध करतो आणि त्याचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करतो. (गलती ५:१७; कलसै३:५, १ पेत्र २:११). या युद्धाचा एक भाग आहे निराशा.  आपल्याला ताजेतवाने होण्याची गरज असण्याचे दुसरे कारण म्हणजे आपण मानवप्राणी आहोत आणि असणार. आणि त्यामुळे देवाच्या कृपेची आपल्याला नेहमीच गरज असते. येणाऱ्या पापविरहित युगात गौरवी व परिपूर्ण झालेल्या संतांनाही इतर संतांच्या सेवेद्वारे लाभ होणार आहे. नाहीतर ती सहभागिता अर्थरहित होईल. म्हणून जेव्हा जेव्हा आपण आपल्याकडे पापी किंवा मानवप्राणी म्हणून पाहतो तेव्हा आपले ह्रदय भक्तीने भरलेले राहावे म्हणून आपल्याला मदतीची गरज असते. खऱ्या ख्रिस्ती लोकांची ही गरज लक्षात घेऊन आपल्या सर्वज्ञ देवाने आपली भक्ती जागृत राहावी टिकावी व सामर्थ्ययुक्त व्हावी म्हणून आपण इतरांवर अवलंबून राहावे असे आपल्याला निर्माण केले आहे. हे नव्या करारातील अनेक वचनांवरून स्पष्ट होते.

मानवांद्वारे टिकवून ठेवलेली ह्रदये

प्रथम देवाने मंडळीमध्ये पाळक व शिक्षक असे नेमून दिले (इफिस ४:११). ते “निपुण शिक्षक” (१ तीमथ्य ३:२) असावेत अशी तो अपेक्षा करतो. याचा अर्थ इतर मानवी सेवकांनी वचनाद्वारे आपल्याला मदत करावी असे देवाने आपल्याला निर्माण केले आहे, फक्त आपल्या खाजगी वाचन व प्रार्थनेद्वारे नव्हे.

दुसरे, पौलाने मंडळ्या दृढ व्हाव्या म्हणून जे उदाहरण ठेवले त्याद्वारे आपल्याला इतर सेवकांची गरज आहे हे स्पष्ट होते (प्रेषित १४:२१-२२). ख्रिस्ती जनांना इतर ख्रिस्ती सेवकांनी त्यांच्या जिवाला दृढ केल्याशिवाय त्यांची विश्वासात व भक्तीत वाढ होऊ शकत नाही अशी देवाने त्यांची रचना केली आहे.

तिसरे, आपले आनंदी व विश्वासू पवित्रतेमध्ये आणि भक्तीमध्ये आपण दृढतेने वाटचाल  करणे हे इतर ख्रिस्ती जन आपल्याला पुन्हा पुन्हा देवाच्या वचनाद्वारे जो बोध करतात त्यावर अवलंबून असते हे स्पष्ट आहे. “बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये” (इब्री ३:१२-१३).
ह्रदयाची कठीणता चुकवून, पापाला मारणाऱ्या आनंदमय विश्वासात पुढे चालणे हे इतर विश्वासीयांच्या बोधावर अवलंबून असते. इतरांनी आपल्याला वचनाची सेवा दिल्याशिवाय आपण टिकू शकणार नाही अशी आपली रचना केली आहे.

हा दोष नाही

चवथे, इतरांनी आपली सेवा करावी ही आपली गरज आहे कारण ख्रिस्ताच्या शरीराची तशी रचना आहे. पौलाने हे स्पष्ट केले; ‘तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की, “मला तुझी गरज नाही” तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की, “मला तुमची गरज नाही”’ (१ करिंथ १२:१८-२१).

पौलाने २१व्या वचनात वापरलेला गरज हा शब्द स्पष्ट सांगतो ख्रिस्ती लोकांनी एकमेकांवर अवलंबून राहणे हा दोष नाही. देवाच्या कृपेवर पूर्ण भरवसा ठेवणे याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्या कृपेच्या साधनांवर अवलंबून राहू नये.
आपले शारीरिक जीवन हे देवावर व जे अन्न तो आपल्याला देतो त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्याला धीर येण्यासाठी भावनिक साधने ही देवाच्या आत्म्यावर व आपल्याला जी उत्तेजन देणारी झोप तो देतो त्यावर अवलंबून असते. आपले आत्मिक सामर्थ्य हे देवाच्या वचनावर आणि जे सेवक तो आपल्याकडे पाठवतो त्यांच्यावर अवलंबून असते.

पाचवे, शास्त्रलेख स्पष्ट सांगते की आपल्याला इतर ख्रिस्ती लोकांची वचनाची सेवा आवश्यक आहे. पौलाने तीमथ्याला म्हटले, “वचनाची घोषणा कर” (२ तीम. ४:२). ही आज्ञा निरर्थक नाही. उपदेश करण्याची आज्ञा दिली आहे कारण त्याची गरज आहे. देवाचे लोक विश्वासात टिकून राहण्यासाठी व  देवाची उपासना करण्यासाठी एकमेकांना अनेक प्रकारे मदत करतात. सामूहिक उपासनेमध्ये संदेश हा त्याचा एक अविभाज्य घटक म्हणून नेमला आहे. लोक एकत्र येऊन देवाबद्दलचे त्यांना झालेले ज्ञान व त्यांची त्याच्यावरील प्रीती गाणी व प्रार्थना यांद्वारे व्यक्त करतात. संदेश हा त्याच्या उलगड्याद्वारे हे ज्ञान व प्रीती वाढविण्यासाठी मदत व्हावी असा नमुना देवाने आखलेला आहे. त्याचा विषय व आखणीद्वारे आपले देवासबंधीचे ज्ञान विस्तृत केले जाते व देवाबद्दलची आपली उत्कटता वाढवली जाते.

आजची दया

सामान्य ख्रिस्ती जीवन हे निराशा देऊ शकते. कालच्या दयेवर जगण्यासाठी देवाने आपली रचना केलेली नाही.
“आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते; तुझी सत्यता थोर आहे” (विलाप. ३:२२-२३).

प्रत्येक दिवसात आपल्याला निष्काम करणारी संकटे असतात (मत्तय ६:३४). आणि प्रत्येक दिवसाला ताजेतवाने करणाऱ्या दया असतात (विलाप ३:२३). यामुळे सामूहिक उपासना ही विश्वास व प्रीतीचे भरते आलेल्या ख्रिस्ती लोकांसाठी फक्त नाही पण खचलेल्या, शुष्क झालेल्या व देवाच्या नव्या दयेसाठी आसुललेल्या जनांसाठी पण आहे. आणि देवाने त्याच्या शरीराची रचना अशी केली आहे की ही दया त्यांना सहविश्वासीयांच्या सेवेद्वारे मिळावी.

म्हणून चर्चला जात राहा – मनापासून देवाबद्दल अधिक समजण्यासाठी. आणि अपेक्षा करा की तो तुम्हाला त्याच्या लोकांद्वारे भेटेल.