Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Dec 18, 2018 in जीवन प्रकाश

खिस्तजयंतीच्या वेळी तुम्हाला ख्रिस्ताचाच कंटाळा येत नाही ना?                  लेखक : स्टीफन विटमर

खिस्तजयंतीच्या वेळी तुम्हाला ख्रिस्ताचाच कंटाळा येत नाही ना? लेखक : स्टीफन विटमर


ख्रिस्तजयंतीच्या वेळी मार्काच्या शुभवर्तमानाकडे दुर्लक्ष केले जाते. इतर शुभवर्तमाने येशूच्या जन्माची तपशीलवार हकीगत सांगतात (मत्तय आणि लूक) किंवा त्याचा उल्लेख तरी करतात (योहान).
मार्क आपल्याला यातले काहीच देत नाही – गव्हाणी नाही, मेंढ्या नाही, मेंढपाळ नाही, देवदूत नाहीत, मागी नाहीत, तारा नाही, येशूबाळही नाही. मार्काच्या शुभवर्तमानाच्या आरंभी येशू हा प्रौढ व्यक्ती आहे. आपल्याला थेट त्याच्या सेवेकडे नेले जाते. आणि उरलेले शुभवर्तमान हे वेगाने त्याच्या सेवेचा वृत्तांत देत आपल्याला त्याच्या मरणाकडे नेते.
तथापि सहाव्या अध्यायात मार्क आपल्याला येशूचा जन्म व त्याची वाढ होतानाचा अप्रत्यक्ष संदर्भ देतो – आणि हा संदर्भ आपल्याला ख्रिस्तजन्माच्या गोष्टीचा वेगळा दृष्टिकोन देतो.

खात्री असलेले  तरी गोंधळलेले

मार्क आपल्याला सांगतो, “नंतर तो तेथून आपल्या गावी आला व त्याचे शिष्य त्याच्यामागे आले. मग शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, ‘ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात!’”
नाझरेथ गावाचे लोक येशूच्या शिक्षणाने चकित होतात व अनेक प्रश्नांचा त्याच्यावर मारा करतात. ह्याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? काय हे ज्ञान ह्याला देण्यात आले आहे आणि ह्याच्या हातून केवढी ही महत्कृत्ये होतात!
(व. ३). हे खरेखुरे प्रश्न आहेत व त्यांची उत्तरे त्यांना हवी आहेत पण इतर नाझरेथकरांकडे ती नाहीत.

लोकांचा गोंधळ हा पुढच्या अनेक प्रश्नांनी स्पष्ट होतो. “जो सुतार, जो मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” (मार्क ६:३). या प्रत्येक प्रश्नाचे अपेक्षित उत्तर “होय,  तो सुतार आहे, मरीयेचा पुत्र आहे आणि आम्हाला त्याच्या भाऊबहिणी ठाऊक आहेत.”

हा इतकी अद्भुत शिक्षण देणारा माणूस आपल्याला माहीत असलेला येशूच आहे ह्या दोन गोष्टींचा गावातल्या लोकांना मेळ घालता येत नाही. त्यांना जे माहीत आहे त्याविषयी त्यांची खात्री आहे तरीही जे त्यांना माहीत नाही त्याविषयी ते गोंधळलेले आहेत, यामुळे त्यांचा प्रतिसाद विनाशकारी ठरला. “असे ते त्याच्याविषयी अडखळले.” (मार्क ६:३).

सर्व चुकीच्या मार्गांशी परिचित

ह्याचा ख्रिस्तजन्माशी काय संबंध आहे? मार्काचा ख्रिस्तजन्माच्या घटनांशी एकमेव दृष्टिकोन असा आहे: एका अगदी छोट्याश्या गावात येशू बाळ म्हणून आला व वाढला हे सत्य विश्वासाला उत्तेजन देणारे नाही तर अडखळण देणारे ठरले. आपण बऱ्याच वेळा (योग्यच) विचार करतो की लोकांनी जर येशूवर विश्वास ठेवायला हवा तर येशू कोण आहे याचा त्यांना परिचय होण्याची गरज आहे. पण या परिच्छेदात येशूच्या मित्रांना त्यांच्या परिचयापलीकडे जाता येत नाही. परिचय हा एक अडखळण ठरतो. ओळखीने अनादर निपजला जातो. कदाचित आपला पण ख्रिस्ताशी परिचय आहे. आपण त्याच्याबरोबर नाझरेथ गावाच्या धुळीच्या रस्त्यांवरून धावलो नाहीत, त्याला संडेस्कूलमध्ये शिकवले नाही किंवा आपली तुटकी खुर्ची दुरुस्त केली म्हणून पैसे दिले नाहीत. पण आपण त्याच्या ओळखीत वाढत गेलो. संडेस्कूलमधील प्रत्येक प्रश्नाला जर उत्साहाने ‘येशू’ असे उत्तर दिले तर बहुतेक वेळा ते बरोबरच असेल असे अगदी लहानपणीच आपण शिकलो. येशूच्या गोष्टी आपण चित्रांद्वारे शिकलो, प्रत्येक सोहळ्यात आपण गव्हाणीच्या देखाव्यात भाग घेतला. नाताळाची बहुतेक गाणी आपली तोंडपाठ आहेत.

जे सी राईल यांनी लिहिले “पवित्र गोष्टींचा परिचय झाल्याने लोकांचा त्यांना तुच्छ लेखण्याकडे कल होतो.” हे खरे आहे. येशूशी आपला इतका परिचय होणे शक्य आहे की त्याला संडेस्कूलचे उत्तर म्हणून आपण ओळखू शकू. पण आपले मन ओढून घेणारा, महान, ह्रदय विरघळून टाकणारा, प्रभू, जो आपल्या जीवनावर हक्क दाखवतो,  सर्व काही याचेच आहे, जो एकटाच आनंद देऊ शकतो व जो सर्व स्तुती आराधनेला योग्य आहे हे समजण्याचे आपण गमावतो. येशूशी परिचय होऊन आपल्याला वाटू शकते की तो आम्हाला समजलाय. सोप्या शब्दात सांगायचे तर आम्हाला त्याचा कंटाळा आलाय.

परिचयाने विश्वास निपजला जावू दे

जर आपल्यापैकी कोणाच्या बाबतीत हे खरे असेल तर हे नक्की सूचित करते की आपल्याला त्याची खरी ओळख नाही. निदान आपल्याला तो पुरेसा माहीत नाही. येशूला ओळखणे हे हिमालयाला ओळखण्यासारखे आहे. ज्यांना हिमालय माहीत आहे ते सांगतील की तो पुन्हा पुन्हा रोमांचकारी अनुभव देतो, खिळवून ठेवतो, आनंद देतो, स्फूर्ती देतो, आनंदाने भारून टाकतो. जर लोकांना हिमालयाचा कन्टाळा आला असेल तर त्याचे कारण ते त्यांच्या दिवाणखान्यात बसून त्याच्याबद्दल शिकत आहेत, तो चढून जाऊन नाही.

परिचयाने अनादर निपजण्याची गरज नाही. त्याऐवजी त्याद्वारे विश्वास निपजला जाऊ शकतो. मार्क येशूच्या चार भावांची नावे देतो चारपैकी दोघा जणांनी – यहूदा व याकोब – नव्या करारातील पत्रे लिहिली. दोघांनाही येशूशी भाऊ म्हणून अगदी जवळून अनेक वर्षांची ओळख होती. पण यहूदा त्याच्या पत्राची सुरुवात करतो, “येशू ख्रिस्ताचा दास यहूदा ह्याच्याकडून” (यहूदा १). आणि याकोब आपल्या पत्राची सुरुवात करताना म्हणतो, “येशू ख्रिस्ताचा दास याकोब” (याकोब १:१).

होय. येशू हा त्यांचा भाऊ होता. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा धनी व मशीहा म्हणून त्यांना त्याची ओळख झाली. त्यांच्या जीवनामध्ये परिचयाने त्यांना विश्वासाकडे नेले. जितके त्यांना समजले, जितके त्यांनी पाहिले तितके त्यांनी त्याची अधिक भक्ती केली. जितकी अधिक भक्ती केली तितके अधिक त्याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा त्यांच्यामध्ये आली.

आपण सुद्धा येशू खरा कोण आहे हे जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्यामध्ये पण असेच होते. आपला अनंतकाळासाठी त्याच्याशी अधिकाधिक परिचय होत जाईल आणि आपण कधीही कंटाळून जाणार नाही. जॉन न्यूटन यांच्या “अमेझिंग ग्रेस” या गाण्यातील एका कडव्याचा आशय असा:

चमकत्या सूर्यासमान
राहू हजार साल
प्रभूची स्तुती सर्वकाल
स्तवने गात फार