जनवरी 21, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

मला आजच्यासाठी उठव लेखक : स्कॉट हबर्ड

आपल्यातले कित्येक जण गडद तपकिरी छटांच्या जगातून चालतात.

कदाचित एके काळी तुमचे जीवन सुस्पष्ट होते. तुम्ही झोपी जायचा आणि कधी उठतो अस वाटायचं. तुम्हाला तुमचे काम फार प्रिय होतं, किंवा तुमचा विवाह ठरला होता, किंवा नुकतंच तुम्हाला पहिलं बाळ झाल होतं. पण  जीवन बदललं आणि हळहळू तुमच्या जीवनातले रंग फिके पडत गेले. आता तुम्ही उठता आणि एका निरस दिवसातून चालत राहता. तुम्ही पहुडता फक्त उद्या तेच करण्यासाठी. तुमची दिनदर्शिका तपकिरी रंगाच्या ३६५ छटांची झालीय.

आपल्याला देवाने आजच्यासाठी उठवण्याची गरज आहे. “परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू” (स्तोत्र ११८:२४). याची आपल्याला पुन्हा आठवण देण्याची गरज आहे. हा एकमेव दिवस, अर्थपूर्ण दिवस, असा दिवस आहे की जो  दैवी प्रीतीच्या हातातून उतरलाय. आजच्यासाठी उठण्यासाठी कदाचित आपल्याला काही भव्य करण्याची गरज आहे असे नाही. ज्या सर्वसामान्य वैभवाचा आपल्याला सतत विसर पडतो त्यांच्यावर कदाचित आपल्याला मनन करावे लागेल. बहुतेक आपल्याला वर, भोवताली आणि पुन्हा समोर पाहावे लागेल.

वर पाहा

आज देवाकडे वर पाहा.

देव आहे: आजसाठी सर्वात मूलभूत असलेले हे सत्य सर्वात अद्भुत व भयावह आहे: देव आहे. आपण जे काही पाहतो व अनुभवतो त्यामागे पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा पदन्यास आहे: कधीही न बदलणारा, सदैव सुखी, चांगुलपणाचा ज्वालामुखी आणि तसेच आनंद. सर्व प्रीतीमागे असलेली प्रीती तोच आहे (१ योहान ४:८). सर्व सौंदर्यामागे असलेले सौंदर्य (स्तोत्र २७:४), सर्व सत्याखालचे सत्य (योहान १४:६). तो निर्माता आहे, प्रभू आहे आणि राजा. मेंढपाळ, शब्द, तारणारा, सांत्वनदाता, मार्गदर्शक, शिक्षक, तो देव आहे आणि त्याने स्वत:ला ख्रिस्त येशूमध्ये प्रकट केले (योहान १:१८) – आणि तो आहे.

देव इथे आहे. जॉन वेबस्टर यांनी म्हटले, “आपण देवाबद्दल त्याच्यामागे बोलू शकत नाहीच.”  त्याच्यामागे आपण विचार करू शकत नाही, श्वास घेऊ शकत नाही किवा खाऊ शकत नाही. “त्याच्या पाठीमागे अशी कोणतीच जागा नाही – एखाद्या नऊ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहावर वा आपल्या दिवाणखान्यात. देव आता इथे आहे, ह्या क्षणी, त्याच्या शब्दाच्या सामर्थ्याने आपल्याला आधार देत आहे (इब्री १:३). श्वास घ्या आणि सोडा आणि त्याचा शब्द तुमची फुप्फुसे विस्तारत आहेत याचा अनुभव घ्या. त्याने तुम्हाला आतून, मागून, पुढून घेरले आहे – तो तुम्हाला पाहत आहे, शोधत आहे, जाणत आहे  (स्तोत्र १३९:५). देव तुमच्यासाठी आहे. ख्रिस्तामध्ये हा देव आज तुमच्यासाठी आहे – त्याच्या सर्व अंत:करण आणि जिवासह (यिर्मया ३२:४१). सूर्योदयाकडे पाहा आणि त्याच्या नव्या दयेचा अनुभव घ्या. “आम्ही भस्म झालो नाही ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. ती रोज सकाळी नवी होते” (विलापगीत ३:२२,२३). तुमच्या मागे पाहा व तुमच्या टाचेशी असणारे त्याचे चांगुलपणा पाहा (स्तोत्र २३:६). त्याचे पुस्तक उघडा आणि त्याच्या प्रेमाची हकीगत ऐका (रोम ५:८). तुमचे तोंड उघडा आणि त्याच्या हातावर तुमचे हृदय ओता (स्तोत्र ६२:८).

आणि मग तुमच्या दिवसामध्ये जा आणि जाणून घ्या की तो तुमच्याबरोबर आहे – तुमच्यामध्ये आहे (योहान १४:१७). तो तुम्हाला मदत करील. सामर्थ्य पुरवील. तो आपल्या नीतिमान हाताने तुम्हाला उचलून धरील (यशया ४१:१०). आणि आज जे काही घडते ते तो गुंफून घेईल मग ते कितीही कंटाळवाणे असो व हृदय भग्न करणारे असो. ते तो त्याचे चांगुलपणा, दया आणि प्रीतीच्या नक्षीदार कपड्यावर गुंफून ठेवील (रोम ८:२८).

भोवताली पाहा

आता जगाकडे सभोवती पाहा.

आकाशे त्याच्या सौंदर्याचे गायन करतात. आज सूर्य पुन्हा का वर आला बरे? त्याला नेमून दिलेल्या कालक्रमाने नव्हे तर देवामुळे. आणि अर्थातच हे करायला सूर्याची मुळीच हरकत नाही: देवाचा महिमा वर्णन करण्याचे तो कसे थांबवील (स्तोत्र १९:१)? शय्यागृहातून जेव्हा तो वरासारखा क्षितिजावर बाहेर पडतो तेव्हा त्याचा आनंदाचा गजर तुम्ही ऐकू शकता का (स्तोत्र ६५:८)?

पृथ्वी त्याच्या प्रीतीने भरलेली आहे. सूर्य हा त्याच्या निर्मितीतील गायकवृंदाचा एक सभासद आहे. आकाशातून खाली पाहा, आणि देवाचे प्रत्येक कानाकोपऱ्यांतून ओसंडून वाहणारे वात्सल्य पाहा (स्तोत्र ३३:५). होय सृष्टी ही अखेरीस ह्या भ्रष्टतेच्या कवचातून बाहेर पडून देवाच्या मुलांच्या गौरवी मुक्ततेची वाट पाहत कण्हत आहे (रोम ८:१९-२१). पण हीच सृष्टी तरीही पुकारा करते, गाणे गातेय, नृत्य करतेय – त्र्येकाच्या प्रीतीच्या गाण्याच्या सुराला सूर देत (स्तोत्र १०४:२४).

प्रत्येक देणगीला देवाचा चांगुलपणा कुजबुजताना तुम्ही ऐकलेत (याकोब १:१७)? शरद ऋतूच्या झुळकेतील त्याची दया तुम्हाला जाणवते काय? मध्यरात्रीच्या गडगडातात त्याचे सामर्थ्य तुम्हाला ऐकू येते काय? तुमच्या उबदार स्वेटरमध्ये तुम्हाला त्याची ऊब जाणवते काय? आंब्याच्या रसामध्ये तुम्हाला त्याच्या गोडव्याची चव कळते काय?

आज रात्री जेव्हा देव तुमच्या खंडावर तुम्हाला आराम देण्यासाठी अंधार ओढून आणील तेव्हा ताऱ्यांकडे पाहा. ते बाहेर येतात कारण तो त्यांना बोलावतो – त्यांचे नाव घेऊन (यशया ४०:२६). त्या सर्व शेकडो अब्जावधी ताऱ्यांना. आपण आपल्या घड्याळाचा गजर ऐकून उठतो, दात घासतो व आपल्या बिछान्यापाशी गुडघे टेकतो तोपर्यंत त्याचा आवाज आपण अजून शोधून काढल्या नाहीत त्या आकाशगंगांंपर्यंत पोचतो व कुत्र्याला जसा त्याचा यजमान बोलावतो तसे त्यांना बाहेर काढतो. हे आपल्या पित्याचे जग आहे. आज या जगात झोपेत चालू नका. जसे एखादा पर्यटक चॅपेलच्या छताची कलाकुसर पाहण्याचे गमावतो कारण त्याचा फोन आलेला असतो! तुमचे डोळे वर करा. चालताना थांबा, तुमच्या गाडीच्या काचा खाली करा. जमिनीवर बसा आणि निर्मितीचे गीत ऐका.

समोर पाहा

शेवटी आजच्या तुमच्या जीवनाकडे समोर पाहा.

राजाच्या सैन्यातील तुम्ही एक सैनिक आहात. आजच्या ह्या सामान्य, चाकोरीबद्ध दिवसात काय घडणार हे दिसतेय अशा या दिवशी तुम्ही युद्धाच्या भूमीवरून जात आहात. राग, वासना, हेवा, काळजी अशा मोहांना तुम्ही तोंड देत असताना आजच्या दिवसाची तुमच्या जिवासाठी असलेली लढाई तुम्हाला दिसते काय? “ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन न व्हावे म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये; आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा” (रोम ६:१२-१३). राज्ये कोलमडताना तुम्हाला दिसतात का? सापाचे फुत्कार तुम्हाला ऐकू येतात का? त्याचे जळते बाण हवेतून येताना तुम्हाला दिसतात का (इफिस६:१६)? आणि तुमचा कप्तान “मी सदैव तुझ्याबरोबर आहे” असे म्हणतोय हे तुम्हाला ऐकू येते का (मत्तय २८:२०)?

तुम्हाला प्रेम करायला लोक आहेत. आज तुम्ही ज्या लोकांबरोबर आहात त्यांच्याकडे पुन्हा पाहा – विशेषकरून त्रासदायक. आता ट्रॅफिकमध्ये तुमच्यापुढे कोण घुसला? बँकेचा कॅशियर एवढा वेळ का घेत आहे? तुमचा रूममेट तुम्हाला का डिवचतोय?

हे देवाची प्रतिमा असलेले लोक आहेत (उत्पत्ती १:२७). त्यांना गौरव व महती यांनी मंडित केले आहे (स्तोत्र ८:५). पण सर्वांना मिळालेल्या शापाने ते कलंकित झाले आहेत (रोम ३:२३). आणि ते अनंत कालाकडे धावत आहेत. एकतर येशूकडे नाहीतर येशूशिवाय. सी.एस लुईस यांनी म्हटले, “आपण ज्यांच्याबरोबर विनोद करतो, काम करतो, तुच्छतेने वागतो आणि ज्यांचा फायदा उठवतो ते सर्व अमर आहेत – अनंत भयानकतेचे किंवा अनंत वैभवाचे.” आज या लोकांना आपण कसे वागवणार आहोत?  अडखळण म्हणून? – मग आम्हाला आराम लाभेल! एक किटकीट म्हणून? किंवा त्यांचे ऐकावे, सेवा करावी, क्षमा करावी असे लोक म्हणून (कलसै ३:१२-१३)?
आपण ज्यात चालावे अशी चांगली कामे आहेत. तुमच्या समोर आज दिसत असलेली कितीतरी चांगली कामे तशी भव्य वाटत नाहीत. पण ती ख्रिस्तामध्ये तुमचा जन्मसिध्द हक्क आहेत (इफिस २:१०) आणि त्यातल्या एकाकडेही दुर्लक्ष केले जाणार नाही किंवा बक्षिसाविरहित ते जाणार नाही. तुम्ही आराम न मिळता केलेल्या महान त्यागाचे काम किंवा विश्वासाने केलेले एखादे छोटेसे काम (इफिस ६:८).

म्हणून एखाद्या खिन्न मित्राला बोलवा व त्याला/तिला देवाच्या स्वभावाची आठवण करून द्या. तुमच्या वडिलांना भेटा आणि त्यांना पुन्हा ख्रिस्त कसा सादर करता येईल याचे मार्ग शोधा. देवावर अवलंबून राहून कामाला लागा. आणि मग कागदपत्रे भरा, बटाटे सोला, भेट नियोजित करा, बाळाचे कपडे बदला किंवा वर्गपाठ लिहा. आणि हे जाणून घ्या की या सरावामध्ये विश्वाच देव पाहत आहे आणि स्मित करत आहे.

जागे राहा

तुमच्या जीवनाचा विचार करताना कदाचित ते चाकोरीबद्ध वाटेल. कदाचित असे भासत असेल की एक कंटाळा, तोचतोचपणा, तणाव यांचे हे एक जंगल आहे. या जीवनाची रुक्षता आपण नक्कीच टाळू शकणार नाही. काही दिवस तर या जगाच्या व्यर्थतेने आपण इतके वाकून चालत राहू की देवाकडे डोळे वर करून पाहण्यास किंवा जगाकडे सभोवती पाहण्यास व जीवनात समोर पाहणे आपल्याला जड जाईल.

पण या दैनंदिन जीवनाच्या जंगलातून चालताना तुम्ही असा विश्वास ठेवू शकता का की यातून मार्ग काढून पुढे नेण्यास देव समर्थ आहे – जेथे सूर्य प्रकाशत आहे, मंद हवा अंगावर शहारे आणत आहे आणि जीवन विस्मयाने धकधक करत आहे? त्याला शक्य आहे. म्हणून आज देवाकडे वर पाहा. त्याच्या जगाकडे आज भोवताली पाहा. तुमच्या जीवनात आज समोर पाहा आणि देवाला म्हणा, मला उठव.

Previous Article

तुमच्या जीवनात तुम्ही करू शकता अशी सर्वात महान गोष्ट लेखक : जॉन ब्लूम

Next Article

फार जोराने धावण्यापासून सावध राहा जॉनी एरिक्सन टाडा

You might be interested in …

एका बळीचा विजय    

कॅमरॉन ब्युटेल (संदर्भ दिलेली वचने कृपया बायबलमधून वाचावीत.) जेव्हा माहिती करून घेण्याचा  उगम फक्त कल्पना  असेल तर चित्र डोळ्यापुढे उभे करण्याचे ते समर्थ शस्त्र ठरते. मी लहान असताना येशू हा बलवान गुंडापुढे असलेला एक कमकुवत […]

“मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो”

मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.                                                       योहान १४:२७ लेखक: ऑस्वल्ड चेंबर्स आपल्या वैयक्तिक जीवनात काही  समस्या […]

जर मरणे हे मला लाभ आहे तर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी का?

ट्रेवीस मायर्स गेल्या वर्षी मला एक हॉजकिन्स लिम्फोमा नावाचा रक्ताचा कॅन्सर झाल्याचे निदान करण्यात आले. यामध्ये रसग्रंथीचा कॅन्सरच्या गाठींमध्ये बदल होतो. तसे अनेक प्रकारचे लिम्फोमा आहेत, या प्रकारचा कॅन्सर अमेरिकेत प्रौढ लोकांना होणाऱ्या लिम्फोमात सातव्या […]