Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जनवरी 8, 2019 in जीवन प्रकाश

तुमच्या जीवनात तुम्ही करू शकता अशी सर्वात महान गोष्ट                              लेखक : जॉन ब्लूम

तुमच्या जीवनात तुम्ही करू शकता अशी सर्वात महान गोष्ट लेखक : जॉन ब्लूम

तुम्ही आणि तुमच्या जीवनासंबंधी सर्वात अद्भुत आणि आशादायक गोष्ट  ह्या खालील साध्या नम्र वाक्यामध्ये पकडली गेली आहे.

“तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे” (१ करिंथ ७;१७).
जर आपण कठीण किंवा दु:खद परिस्थितीतून जात असाल तर हे वचन काहीसे संकुचित किंवा अन्यायी आहे असे वाटेल. आणि त्यामुळे देवाची आपल्यासाठी जी इच्छा आहे त्याचा गाभाच गमावला जाईल.

तुमचे जीवन हे देवापासून मिळालेली देणगी व नेमून दिलेले काम आहे. ते चांगले आणि वाईट, कडू आणि गोड, आरोग्य आणि दु:खे, भरभराट आणि गरिबी, आराम आणि भोग यांनी भरलेले असले तरी त्यामध्ये अमाप प्रतिष्ठा, हेतू आणि वैभव आहे, हे आपण आपल्या मनावर बिंबवायला हवे. तुम्ही काही एक अपघात नाही. तुम्हाला कमी प्रकारचा अनुवंशिक साचा लाभला, दुसऱ्यांनी तुम्हाला वाईट वागवले किंवा तुम्ही मूर्ख व पापमय  निवडी केल्या म्हणून तुम्ही तुमची पात्रता गमावली आहे व आता तुम्ही इतके आशाहीन आहात की देवाच्या राज्यात जाऊन उपयोगी पडण्याच्या आशेपलीकडे आहात असे मुळीच नाही.

नाही, तुम्ही अस्तित्वात आहात कारण तुम्ही अस्तित्वात असावे अशी देवाची इच्छा होती. आणि जे काही तुम्ही आहात, तुम्ही जसे आहात, जेथे तुम्ही आहात, जेव्हा तुम्ही आहात; तसे आहात कारण देवाने तुम्हाला निर्माण केले (योहान १:३). तुमच्या मातेच्या उदरात तुम्हाला घडवले (स्तोत्र १३९:१३). तुम्ही त्याचे असावे म्हणून तुम्हाला बोलावले (योहान १०:२७; रोम ८:३०) आणि तुम्ही जेथे राहावे ती जागा नेमून दिली (प्रेषित १७:२६).

सर्वात महान गोष्ट तुम्ही करू शकता ती अशी की देवाने हे जे धाडसाचे काम तुम्हाला दिले आहे त्यासाठी शक्य होईल तितके तुमचे जीवन तुम्ही जगावे.

देवाने तुम्हाला पाचारण केले आहे

“जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे” यावर थोडा विचार करा. तुमचे सर्व जीवन हे देवाचे पाचारण आहे!

आपले पाचरण हे आपला व्यवसाय, किंवा काहीतरी ओळख देणारे, मोठे शीर्षक असणारे असे देवाने दिलेले महत्त्वाचे काम असते असा आपण विचार करतो. कदाचित ती चर्चमध्ये किंवा सेवाकार्यामध्ये नोकरी असेल किंवा स्वयंसेवक म्हणून तुम्ही ते करत असाल. पण हे सर्व फार संकुचित आहे. अर्थात हे कार्य /नोकरी ही देवाच्या पाचारणची साधने आहेत. त्यांच्याद्वारे आपण देवाने आपल्याला दिलेले कार्य पार पाडू शकतो. पण आपल्या पाचरणामध्ये अशा कामांपेक्षा बरेच काही समाविष्ट आहे.

आपले प्रथम आणि मूलभूत पाचारण आहे की आपण देवावर आपल्या सर्वस्वाने प्रीती करावी आणि आपल्या शेजाऱ्यावर आपल्या स्वत:सारखी प्रीती करावी (लूक १०: २७). हे पाचारण ज्या सर्वांशी आपला संबंध येतो, ज्यांचा आपण विचार करतो त्यांच्यासाठी आहे आणि जे काही आपण सकाळपासून रात्रीपर्यंत करतो ते सर्व त्यात समाविष्ट आहे.

म्हणूनच जॉन केल्विन यांनी म्हटले आहे “आपल्या प्रत्येकाला देव आज्ञा करतो की त्याच्या पाचारणाचा आपण जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये विचार करावा.”

याच अर्थ आपले पाचारण हे त्या दरवाजामागे आहे आणि एक दिवस देव तो दरवाजा उघडेल असे नाही. आपले पाचारण असे आहे की आज आपण देवावर प्रेम करावे, देव जो शेजारी आपल्या मार्गात आज आणील त्याच्यावर आपण प्रेम करावे आणि जे काही आज देवाने आपल्याला करायला दिले आहे ते आपण योग्य रीतीने करावे.

याच कारणामुळे येशूने म्हटले, “उद्याची काळजी करू नका” (मत्तय ६:३४). उद्याच्या पाचारणात अधिक गुंतवून घेणे अधिक भुरळ घालणारे आहे व त्यामुळे आजच्या पाचारणापासून दूर राहण्यात ते आपल्याला फसवते. आपल्याला दिलेल्या अमोल जीवनाची ठेव आपण उद्याच्या काल्पनिक बाबींमध्ये गुंतवावी अशी येशूची इच्छा नाही.

आता आपले पाचारण वेळेनुसार बदलत जाते हे खरे आहे. आपण जीवनाच्या निरनिराळ्या टप्प्यांतून जातो. निराळ्या ठिकाणी वेळेनुसार आपले काम बदलते. आणि आपल्या परिस्थितीत व आरोग्यामध्ये बदल होत राहतात. ह्या सर्वांमुळे आपले पाचारण बदलत राहते. आणि चांगले कारभारी या नात्याने आपण जसे देवाचा आत्मा दाखवेल तसे बदलासाठी प्रतीक्षा करून योजना कराव्यात.

परंतु आपल्याला देवाने जीवनामध्ये जे पाचारण दिले आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करावे अशी देवाची इच्छा आहे आणि ते जीवन आजचे आहे.

तुम्हाला दिलेल्या कार्याशी विश्वासू राहा

पौलाद्वारे देवाचा आत्मा आपल्याला सांगतो, “देवाने नेमून दिले आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीने जीवन जगावे.”

कदाचित तुम्ही विचार करत असाल, “माझ्या परिस्थितीची तुम्हाला कल्पना नाहीये.”
तुमच्या भावनांची मला कदर आहे तरीही मी म्हणतो हे परिस्थितीशी सबंधित नाही.

ज्या करिंथकरांस पौलाने लिहिले तेथील ख्रिस्ती जन सर्व प्रकारच्या परिस्थितीतून आले होते. विवाहित, मागणी झालेले, एकटे, विधवा, गुलाम, सुंता झालेले, बेसुंती इ. गुलामांचा विचार करा. ते एका मानवी धन्याची मालमत्ता होते. तरीही पौल त्यांना १ करिंथ ७:२१ मध्ये म्हणतो,  “त्याची काळजी करू नका. (पण आज जर तुम्हाला स्वातंत्र्य मिळत असेल तर त्या संधीचा फायदा घ्या).” पौलाला असे म्हणायचेय की, परिस्थिती, अगदी कठीण परिस्थिती सुद्धा देवाने दिलेल्या कामापासून आपल्याला अपात्र ठरवू शकत नाही. जर आपण योग्य रीतीने त्या परिस्थितीपासून स्वत:ला बाजूला काढू शकतो तर आपण ते करायला हवे. पण जर नाही तर ते देवाने आपल्याला निदान आज दिलेले काम आहे असे समजून विश्वासू राहावे. “माणसांना खूश करणार्‍या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणार्‍या ख्रिस्ताच्या दासांसारखे ते करीत जा. ही चाकरी माणसांची नव्हे तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा; कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल” (इफिस ६:६-८).

छळ होण्यासाठी नेमला गेलेला

पौलाच्या निरनिराळ्या परिस्थितींचा विचार करा:  कैदेत जावे लागले, भयंकर छळ सोसला, मृत्युच्या दाढेत गेला, कडक थंडी व उघडावागडा पडला, गलबत फुटले, धोके दिले, बेघर, दगडमार, थट्टा, छीथू केलेला, आध्यात्मिक विरोध, मारहाण, संकटावर संकटे आणि अखेरीस वध करण्यात आला  (२ करिंथ ११;२३-२८). आणि ते वैभवी होते. सर्व काही! कारण त्याचे जीवन ख्रिस्ताबरोबर गुप्त ठेवलले होते  (कलसै ३:३). आणि या जीवनाने त्याला सार्वकालिक जीवन दिल्यामुळे त्याच्यासाठी मरणे हा केवळ लाभ होता. ते त्याला जीवनाच्या एका नव्या पातळीवर नेणार होते (फिली. १:२१).

जॉन केल्विन यांनी म्हटल्यानुसार “आपण आपली ठराविक परिस्थिती देवाने आपल्याला नेमून दिलेले काम अशी पाहावी नाहीतर जीवन क्रमण करताना आपण पुढेमागे हेतूशिवाय भटकत राहू.” आज तुमचे जीवन देवाने नेमून दिलेले काम असे पाहा. आणि जोपर्यंत देव तुम्हाला तेथे ठेवील तोपर्यंत विश्वासू राहा.

तुमचे महान धाडस

१ करिंथ ७:१७ मागे हा भक्कम पाया आहे: देव – अस्तित्वात जे काही आहे त्याचा निर्माता व रक्षक – त्याने आपल्याला निवडले आहे आणि येथे व आता जगण्याचा एक अपूर्व मान त्याने आपल्याला बहाल केला आहे. हे जीवन पुढे नेण्याचे काम त्याने आपल्याला दिले आहे. आणि यापेक्षा अद्भुत, आशादायी, तृप्ती देणारा, आनंद देणारा जीवनाचा हेतू दुसरा नाही. तो आपल्याला जाणीव देतो की आपण जे कोणी आहोत, जे काही आहोत, जसे आहोत, जेथे आहोत आणि जेव्हा आहोत ते सर्व देवाने नेमून दिले आहे.

तुम्हाला जीवनाची अगाध देणगी दिली गेली आहे. तुम्हाला त्याहून अनंत अशी सार्वकालिक जीवनाची अमोल देणगी देण्यात आली आहे. आणि तुम्हाला विस्मयकारक आणि अत्यंत दुर्लभ अशी देवापासून नेमले जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. देवाने नेमून  दिलेले हे जीवन जगण्यापेक्षा मोठे कोणतेही पाचारण नाही. या नेमणुकीला कवटाळून धरा. हे मोठे धाडस तुमच्यासाठी निवडले गेले आहे ते घ्या आणि पराकाष्ठेने ते पुढे न्या.