आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जी व्यक्ती माझा पुनर्जन्म झाला आहे असा दावा करते ती ख्रिस्ताची खरीखुरी अनुयायी असते. लाईफ वे रिसर्च या संस्थेने २०१७ मध्ये एक सर्वेक्षण केले. त्यात त्यांना आढळले की अमेरिकेतील २४% लोक आपण सुवार्तावादी असल्याचा दावा करतात. त्याहून अधिक लोक आपला पुनर्जन्म झाला असे म्हणतात. पण खोलात शिरल्यास समजते की त्यातील फक्त १५% लोक तारणाची मूलभूत सत्ये सांगू शकतात.
ही समस्या काही नवी नाही. ख्रिस्ती म्हणवणारी व्यक्ती पण ख्रिस्ती होण्यासाठी ज्यावर विश्वास ठेवायचा ते माहीत नसलेली व्यक्ती कोण; तसेच योग्य विश्वास ठेऊनही काही फळ न देणारी व्यक्ती कोण हे सहज ओळखता येते. पुनर्जन्म झाल्याचा दावा करणारे लोक आणि ज्यांचा खरा पुनर्जन्म झाला आहे अशा लोकांच्या आकड्यात नेहमीच तफावत असते. प्रत्येक मंडळीची ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच सुवार्ता सतत सांगितली गेली पाहिजे. जितकी सुवार्ता सांगितली जाईल तितकी ही तफावत कमी होईल.
तर पुनर्जन्म झाल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा खरोखर पुनर्जन्म झाला की नाही हे आपल्याला कसे समजेल? ज्यांचा खराखुरा पुनर्जन्म झाला आहे त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा वास्तव्य करतो (योहान ३:५). पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहतो याचा अर्थ काय? मूलभूतपणे याचा अर्थ पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या नैतिक सौंदर्याची आपल्या डोळ्यांना, कानांना आणि ह्रदयाला खात्री करून देतो. ह्या संवादामध्ये चार महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
- पहिले, देवाच्या संवादाचे माध्यम म्हणजे विश्वासाची खात्री.
- दुसरे, जेथे हे घडते ते ठिकाण म्हणजे ह्रदय.
- तिसरे, यामध्ये दिलेले ज्ञान म्हणजे ख्रिस्ताचे नैतिक सौंदर्य – नैतिक व आध्यात्मिक चांगुलपणाची वाढती पकड.
- चवथे, याचा परिणाम म्हणजे आचरणात बदल. देव जसा पवित्र आहे तसे पवित्र होण्याच्या इच्छेने हा बदल होण्यास प्रेरणा मिळते.
तुम्हाला खरी खात्री झाली आहे का?
पहिले, देवाच्या संवादाचे माध्यम म्हणजे विश्वासाची खात्री. लक्षात घ्या की, “विश्वास हा… न दिसणार्या गोष्टींबद्दलची खातरी आहे (इब्री ११:१). खरा विश्वास हा देवाच्या नजरेतून – दैवी दृष्टिकोनातून सत्य पाहण्यास आपल्याला समर्थ करत जातो. आपण “चव घेऊन पाहतो की देव चांगला आहे” (स्तोत्र ३४:८). नवा जन्म आपल्याला आध्यात्मिक सत्यांची चव घेण्यास अधिकाधिक सक्षम करतो. ही चव घेण्याचा प्राथमिक मार्ग म्हणजे खात्री.
उदा. नुकतेच मी पौलाने पापी माणसाचे केलेले रोम ३:९-२० मधील वर्णन वाचले. “त्यांचा घसा म्हणजे उघडे थडगे; त्यांनी आपल्या जिभांनी कपट केले आहे;”
हे वाचत असताना देवाने माझ्या अंत:करणाचे डोळे उघडले आणि दाखवले की तो मीच आहे. मग देवाने अशा स्थितीतही माझ्यावर प्रीती केली ह्या विचाराने माझे मन भरून आले. याचा परिणाम मला देवाची प्रीती व दया याची नवी खात्री झाली. माझा जीव कृतज्ञतेने भरून गेला आणि देवासाठी मी जगावे व त्याची सेवा करावी ही भावना प्रखरतेने माझ्यामध्ये आली.
जेव्हा पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो तेव्हा असे घडते. आपण देवाच्या नजरेतून आध्यात्मिक सत्ये पाहतो आणि त्याचा परिणाम नेहमीच खात्रीमध्ये होतो.
वाचकांपैकी अनेकांनी अशाच प्रकारचा अनुभव घेतला असेल. असा अनुभव बायबल वाचताना, संदेश ऐकताना, गाडी चालवताना, घर साफ करताना कुठेही येऊ शकतो. जितक्या प्रमाणात हा संवाद घडतो तितके तुम्ही बदलत जाता.
तुमच्या अंत:करणात काही घडले आहे का?
दुसरे, देवाशी घडणाऱ्या या संवादाचे स्थळ आहे तुमचे ह्रदय. केवळ मन नाही. पवित्रीकरणाच्या कार्यामध्ये देव मनाला कधीच वगळत नाही. बुद्धी ही अत्यावश्यक आहे. जरी नव्या जन्माकडे नेणारी पापाची खात्री मनात होते तरी ती ह्रदयामध्ये घडते. कारण “जो अंत:करणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो” (रोम १०:१०).
परिवर्तनापूर्वी आपले ह्रदय जगिक संपत्ती, प्रसिद्धी , करमणूक, किंवा व्यवसायामधील यश यामध्ये असेल. परिवर्तनानंतर आपण अधिकाधिक खुद्द देवामध्येच असतो (केवळ त्याच्या देणग्यांमध्ये नाही). तो आपल्या ह्रदयाचा वाढता आनंद बनतो.
ख्रिस्त हा अधिक आणि अधिक सुंदर आहे का?
तिसरे, ह्या संवादाचा विषय हा अखेरीस ख्रिस्ताच्या नैतिकतेचे सौदर्य आणि त्याचा चांगुलपणा आहे. येथे मी त्याचे पुनरागमन किंवा आदर्श मंडळीत असणे यासंबंधी बोलत नाही. अशा बाबींची योग्य खात्री असूनही तुमचा पुनर्जन्म झालेला नसेल. पण ख्रिस्ताचे नैतिक सौंदर्य, अत्युच्च गौरव, त्याचा विश्वासूपणा यांची खात्री पवित्र आत्म्याच्या आंतरिक वास्तव्याशिवाय घडू शकतच नाही.
यामुळेच पौल नव्या जन्माचे वर्णन करताना म्हणतो; “देव येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे” (२ करिंथ ४:६). देव चांगला आहे, आपण त्याच्यावर भरवसा ठेऊ शकतो, मी माझे सर्व आयुष्य त्याच्या सेवेमध्ये घालवले तरी निराश होणार नाही अशी ह्रदयामध्ये वाढती खात्री होते. देवाच्या चांगुलपणाची अशी खात्री मला धोका पत्करण्यास व त्यासोबतच आज्ञापालन करण्यास मोकळीक देते. पवित्र आत्मा हा आपल्या अनंतकालिक वतनाचा विसार आहे (इफिस १:१३,१४).
जसे आपण ख्रिस्ताचा प्रकाश पाहतो तसा तो अधिक प्रकाशमान होतो. उदा. परिवर्तनाच्या वेळी देवाच्या गौरवाचे माझे ज्ञान प्राथमिक होते. देवाने माझ्यावर प्रीती केली व माझ्या पापांची क्षमा केली असा मी विश्वास ठेवला. आता जशी वर्षे सरत आहेत तसे देवाने हा प्रकाश अधिक प्रकाशित केला आहे. आता यामध्ये देवाचा उत्कृष्ट न्याय, त्याच्या नीतिमत्तेची खोली, त्याच्या सार्वभौमतेचे वैभव ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक संवादासोबत त्याच्या चांगुलपणामध्ये आनंद घेण्याची क्षमता वाढत आहे व त्यानंतर आनंदाने त्याचे अधिकाधिक आज्ञापालन केले जाते.
ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने तुम्ही बदलला आहात का?
चवथी गोष्ट म्हणजे या संवादाचा एक सतत परिणाम घडतो: पवित्रतेत आणि नीतिमत्तेत ख्रिस्तासारखे होण्यास आपल्याला चालना मिळते. नवा जन्म आणि आध्यात्मिक फळ हे अलग करता येत नाहीत.
ख्रिस्तासमोर देवाच्या गौरवाची ह्रदयात वाढती खात्री होऊन जे पाहतो त्याचे अनुकरण न करणे हे शक्यच नाही. हेच पौलाने लिहिले आहे, “आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत; आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत” (२ करिंथ ३:१८). आपल्या भक्तीचा जो विषय आहे त्याचे आपण नेहमीच अनुकरण करू. म्हणूनच योहान नव्या जन्माला नव्या जीवनाशी जोडतो “आपण बंधुजनांवर प्रीती करतो ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत” (१ योहान ३:१४).
मी खरंच बदललो आहे का?
काही खरा नवा जन्म पावलेले लोक कदाचित हे वाचून स्वत:च्या तारणाबद्दल शंका करू लागतील. पण ही माझी इच्छा नाही. तुमचा पुनर्जन्म झालाय ही खात्री तुम्हाला मिळू शकते. गेल्या १० वर्षांपेक्षा आता तुम्ही ख्रिस्तावर अधिक प्रीती करून त्याच्यावर अधिक भरवसा ठेवता का? होय, मला कल्पना आहे की तुम्हाला शंका आहेत. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला केव्हातरी शंका येतेच. पण ख्रिस्ताविषयीचा तुमचा दृष्टिकोन बदलला आहे का? त्याचे अनुकरण तुम्हाला अधिकाधिक करावेसे वाटते का? ज्यासाठी तुम्ही तुमचे सर्वस्व विकून टाकाल अशा शेतातल्या ठेवीसारखा तो तुमच्यासाठी झाला आहे का (मत्तय १३:४४)?
दुसरे, तुम्ही बदलत आहात का? तुम्ही परिपूर्ण आहात का असे मी विचारत नाही तर तुम्ही बदलत आहात का? “जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हेही तुम्हांला माहीत झाले आहे” (१ योहान २:२९). तुमचा पैसा, तुमचा वेळ, तुमची दाने तुम्ही निराळ्या प्रकारे हाताळता का? तुमचे बोलणे देवभीरू आहे का? आपल्या शत्रूला क्षमा करण्यास तुम्ही अधिक तयार आहात का? तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते तुम्ही बदलले आहे का? तुमच्या आईवडिलांशी? मित्रांशी? “जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो (सरावाने) पाप करत नाही; कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते; त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे” (१ योहान ३:९).
तिसरे, देवापासून जन्मलेल्या लोकांना आपण अयोग्य (नालायक) आहोत असे (आनंदाने) वाटते. त्यांना पाप जास्त जाणवते आणि म्हणून ते ख्रिस्तावर व त्याच्या कृपेवर अधिक अवलंबून राहतात. याचे कारण त्यांच्या बदलण्याच्या पात्रतेपेक्षा ख्रिस्ताच्या परिपूर्णतेचे त्यांचे ज्ञान अधिक वेगाने वाढत राहते. जरी त्यांची क्षमा झाली आहे व ते ख्रिस्तामध्ये वाढत आहेत तरी हा विरोधाभास त्यांना आपण अयोग्य असल्याची भावना देतो.
चांगली कृत्ये करण्यासाठी नवा जन्म
नवा जन्म झालेल्या लोकांना देवाबरोबर सहवास ठेवण्यास अधिकाधिक आवडते. आणि जो विश्वासी देवाबरोबर सहवास ठेवतो तो बदलत राहील “जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो जगावर जय मिळवतो” (१ योहान ५:४). याचे कारण देव हेतुपूर्वक तारण करतो. “आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली” (इफिस २:१०).
जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहण्यास येतो तेव्हा तो आपल्या ह्रदयाच्या डोळ्यांना आणि कानांना ख्रिस्ताच्या नैतिक सौंदर्याची वाढती जाणीव देतो. आणि हळूहळू सर्व बदलू लागते. जॉन हॅना यांनी लिहिले आहे; “परिवर्तनाचा गाभा म्हणजे मानवाच्या ह्रदयात एका नव्या तत्त्वाचे राज्य. हे तत्त्व म्हणजे खुद्द देवाचे जीवन. हाच खऱ्या आणि नैतिक सद्गुणाचा पाया आहे आणि देवाचे गौरव होण्यासाठीचे एकमेव साधन आहे.”
Social