जनवरी 15, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

येशूचे वंशज – येशूच्या कुटुंबातील कुप्रसिध्द स्त्रिया जॉन ब्लूम

 

येशूशी ठळकपणे संबंधित असणाऱ्या स्त्रियांमध्ये एक विचित्र धागा आढळतो. त्या सर्व स्त्रिया कुप्रसिद्ध होत्या असे म्हणू या का? आणि ही कुप्रसिद्धी त्यांच्या लैंगिक लफड्यातून निर्माण झाली होती.  हे ख्रिस्ताबद्दल काय सांगते? बरेच काही.

जर तुम्हाला मत्तयच्या पहिल्या अध्यायातील वंशावळ गाळून पुढे वाचायची सवय असेल तर अब्राहाम ते योसेफापर्यंत चाळीस वाडवडिलांनी बनलेल्या येशूच्या वंशावळीत पुरलेला खजिना तुम्ही गमावत आहात. दडलेला खजिना आहे पाच स्त्रियांचा: तामार, राहाब, रूथ, बथशेबा, आणि येशूची आई मरीया. त्यांचा उल्लेख येथे का केला आहे? आणि त्यांना वर नमूद केलेल्या कोणत्याही पुरुषाइतकी किंमत का दिली गेली?

अगदी हेच मत्तयही विचारत आहे.

पाच कुप्रसिध्द स्त्रिया

पहिली तामार  (मत्तय १:३). जर आपण आपल्या कुटुंबाचा इतिहास सांगत असू तर तामारसारख्या पूर्वजाचा उल्लेखही करणार नाही. तुम्हाला तिची कथा आठवतेय का (उत्पत्ती ३८)? आपल्या सासऱ्याला फसवून वेश्येचे रूप घेऊन तिने मशीहाच्या वंशावळीत प्रवेश केला. हे दृश्य आणि गोष्ट कठीण आहे. त्या वेळेच्या संस्कृतीच्या चालीरीतीनुसार ती त्याच्यापेक्षा अधिक धार्मिकतेने वागली. कारण त्याने तिला अन्यायाने वागवले होते व तिला काही आधार नव्हता. तरीही हा गोंधळ भयानक होता यात शंका नाही.

दुसरी आहे राहाब (मत्तय १:५). तिला वेश बदलण्याची गरज नव्हती. ती एक वेश्या होती (तिच्या विवाहापूर्वी तरी). ती विदेशी पण होती. फक्त विदेशी नव्हे तर कनानी होती आणि यरीहोची रहिवासी होती. यहोशवाने वचनदत्त देशातील त्या नगराला पहिले लक्ष्य केले होते. आता राहाब येशूची पणजीची पणजी करत २४वी पणजी कशी झाली? तिने यहूदी हेरांना लपवून त्यांना पळून जाण्यास मदत केली. म्हणून यहोशवाने तिला व तिच्या कुटुंबीयांचा बचाव केला. एकदा इस्राएलामध्ये समावेश झाल्यावर राहाबेचा सल्मोनशी विवाह झाला आणि त्याचा परिणाम रूथचे या वंशावळीत आगमन झाले.

रूथ ही आपल्या यादीतली तिसरी स्त्री आहे (१:५). ती स्वत: काही अनैतिक वर्तनात गोवली गेली नव्हती पण ती ज्या लोकांमधून आली ते होते. रूथ मवाबी होती. लोट आणि त्याची थोरली मुलगी यांच्या व्यभिचारातून मवाबाचे राष्ट्र निर्माण झाले (उत्पत्ती १९: ३०-३८). रूथचे लोक हे अनेक देवांची भक्ती करणारे विदेशी राष्ट्र होते. ते कमोश देवाला कधी नरबळीसुद्धा देत असत. रूथच्या वैयक्तिक दु:खाने आणि महान विश्वासूपणामुळे ती बेथलेहेमामध्ये आली. आणि पुढे बवाजाशी लग्न होऊन येशूच्या वंशवृक्षाशी जुळली गेली. यहूदी लोकांना मवाबी लोकांशी विवाह करण्याची मना असतानाही हे कसे घडले? त्यासाठी तुम्ही रूथ हे पुस्तक वाचलेच पाहिजे. यहूदी पवित्र ग्रंथातील एक संपूर्ण पुस्तक ह्या मवाबी स्त्रीच्या नावाने लिहिले गेले आहे! पण हे लक्षात घ्या: मत्तय हा बवाजाची नोंद राहाब व सल्मोनाचा पुत्र अशी करतो. जर हे खरे असेल तर (कारण प्राचीन वंशावळीत कधी पिढ्या वगळल्या जात असत) तर कल्पना करा की राहाबने तरुण बवाझाला परदेशी स्त्री ही देवाच्या इच्छेने यहूदी द्राक्षवेलात कलम केलेली रानटी डहाळी आहे असेच पाहण्यास शिकवले असेल.

चवथी स्त्री आहे उरीयाची बायको (१:६). आपण हिला बथशेबा म्हणून ओळखतो. या स्त्रीला स्वत:कडे घेण्यापासून इस्राएलचा सर्वात मोठा राजा स्वत:ला आवर घालू शकला नाही. २ शमुवेल ११ मधला वृत्तांत बथशेबाच्या बाजूची व्यभिचाराची कहाणी सांगत नाही. पण दावीदाच्या हाती राजा म्हणून सर्वच अधिकार असल्याने हा अनेक प्रकारे केलेला दुरुपयोग होता हे साधे आणि सोपे आहे. पण त्याचा परिणाम हा मुळीच साधासुधा झाला नाही. या एका उपभोगाचा परिणाम अनेक दु:खद घटनांमध्ये झाला. बथशेबा गरोदर राहिली. हे झाकण्यासाठी तिच्या नवऱ्याचा खून करण्यात आला. दावीदाने स्वत:वर व त्याच्या घराण्यावर एक मोठा शाप ओढवून घेतला की त्यामुळे अनेकांना खूप सहन करावे लागले विशेषकरून खुद्द बथशेबेला (२ शमुवेल १२ वाचा). आणि तरीही ती येशूच्या पार्श्वभूमीत गोवली गेली आहे.

यादीतील शेवटची स्त्री आहे मरीया – येशूची आई (१:१६). तिला विवाहापूर्वी येशूचा गर्भ राहिला. या बालकाचा पिता तिच्याशी मागणी झालेला योसेफ नव्हता. “अनैतिक” गर्भधारणेची सावली तिच्या (आणि तिच्या पुत्राच्या) अप्रतिष्ठेमागे जन्मभर रेंगाळत राहिली असेल.

येशूच्या पहिल्या स्त्रिया

येशूच्या जीवनात दोन स्त्रिया प्रामुख्याने दिसून येतात आणि येथे त्यांचा उल्लेख करणे जरुरीचे आहे. या दोघींच्या अप्रतिष्ठेमुळे मानवी ज्ञानानुसार येशूच्या पहिल्या लोकांत त्यांची गणना करणे हे आश्चर्यच होय.

योहानाच्या चवथ्या अध्यायात सूखार गावात याकोबाच्या विहिरीजवळ येशूची शोमरोनी स्त्रीशी गाठ पडली (योहान ४:६). राहाब व रूथप्रमाणे (आणि कदाचित तामार) ही स्त्री यहूदी नव्हती. आणि तामार, राहाब व बथशेबाप्रमाणे तिचाही अनेक पुरुषांशी सबंध आला होता. पाच नवरे आणि एकाबरोबर विवाहाशिवाय  राहत होती. आणि तरीही योहानाच्या शुभवर्तमानात ही पहिली स्त्री आहे जिला येशूने आपली मशीहा म्हणून ओळख दिली (४:२५-२६). पहिली व्यक्ती : ही स्त्री.

आणि मग मरीया मग्दालीया ह्या मरीयेबद्दल बायबल आपल्याला थोडीच माहिती देते की तिच्यामध्ये सात भुते होती. (लूक ८:१-३).  येशूला वधस्तंभांशी खिळताना ती हजर होती (योहान १९:२५). येशूला पुरताना ती तिथे होती (मार्क १५:४७). आणि तिने पुनरुत्थित येशूला पाहिले (मत्तय २८:१-१०). तथापि इतिहासाने मरीयेचा भूतकाळ एक अनैतिक चालीची बाई असा असल्याची चित्रे रंगवली आहेत. का ते आपल्याला ठाऊक नाही. कदाचित ती मग्दाला या कुप्रसिद्ध गावची होती म्हणून. किंवा कदाचित मरीयेचा भूतकाळ तसाच असावा (असे मला वाटते). एक अस्पष्ट, रेंगाळणारी व्यक्ती जी एकदा सामाजिक लज्जेचा विषय होती ती तिच्या अशा अप्रतिष्ठाला धरून राहते कारण त्यामुळे तिच्या तारणाऱ्याची कृपा ठळकपणे दिसावी.

मरीया मग्दालीया बाबतीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे मरणातून पुन्हा उठल्यानंतर येशू हिलाच प्रथम दिसला (योहान २०:११-१८). पहिली व्यक्ती! येशू त्याच्या आईला प्रथम भेटला नाही किंवा पेत्रालाही नाही तर पूर्वी अनैतिक असलेल्या, भुतांनी पछाडलेल्या प्रथम स्त्रीला भेटला.

एक कृपाशील महिलांचा गट

मरीया मग्दालीया का? विहिरीजवळची स्त्रीच का? अविवाहित मरीयाच का? बथशेबा, रूथ, राहाब, तामार का? देवाने अशा अप्रतिष्ठा असलेल्या स्त्रियांना त्याच्या पापांपासून सुटकेच्या इतिहासात इतके ठळक स्थान का दिले?

यासाठी की इतिहासाचा भर पापाच्या सुटकेवर पडावा

या सर्व स्त्रियांमध्ये समाईक गोष्ट आहे: लज्जास्पद भूतकाळ. त्यांनी लज्जास्पद गोष्टी केल्या किंवा त्यांना लज्जा भोगावी लागली.  यासाठी त्या पात्र होत्या किंवा नव्हत्या तरी त्या प्रत्येकीमागे एक कलंकित अप्रतिष्ठा होती. त्यांनी इतरांकडून अपमान सोसला, आणि लज्जेमुळे होणारी खरीखुरी वेदना अनुभवली. ह्या सहापैकी निदान चार जणींना अत्यंत वेदनामय आणि वाईट आठवणी बाळगाव्या लागल्या.

पण देव त्यांना असे लज्जास्पद म्हणून पाहत नाही तर कृपाशील असे पाहतो. देवाने त्यांची ओळखच बदलून टाकली. अप्रतिष्ठित स्त्रिया असे न पाहता त्याने त्यांना मशीहाचे पूर्वज व शिष्य असे केले. आपल्या सर्व मुलांसाठी तो जे करतो त्याचे हे पुरातन उदाहरण आहे. या प्रत्येक स्त्री द्वारे देव मोठ्याने म्हणत आहे: “म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे. ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वत:बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली” (२ करिंथ ५:१७-१८).

जुने ते सरून गेले आहे

ख्रिस्तामध्ये जुने ते होऊन गेले आहे!  येशू पूर्वीची अप्रतिष्ठा दूर करतो. येशूमध्ये तुमची मागील पापे, किंवा तुम्ही सहन केलेला अन्याय, आणि इतरांनी ज्या दृष्टीने अपमान केला, आणि यामुळे तुम्ही स्वत:ला जसे पाहिले आणि इतरांनी तुम्हाला ज्या दृष्टीने पाहिले हे सर्व आता तुम्ही नाहीत. येशूमध्ये तुमचा स्वर्गीय पिता म्हणतो:

तू माझे मूल आहेस (इफिस १:५). मी तुला धुतले आहे आहे आणि पवित्र केले आहे (१ करिंथ ६:११). तू शुध्द आहेस आणि तुला दुसरे काहीही म्हणण्याचा कुणालाही अधिकार नाही (प्रेषित १०:१५). आणि तू मला प्रिय आहेस (रोम ९:२५). मी तुझे सर्व दोष पुसून टाकले आहेत (स्तोत्र ५१:७).

देव जे करतो त्यासाठी त्याला हजारो कारणे असतात. त्याने या कृपाशील महिलांना स्थिर करण्याचे  सर्वात मोठे कारण म्हणजे नालायक, तुच्छ आणि दुर्लक्षित जणींवर त्याने वधस्तंभावर केलेल्या त्याच्या उदार कृपेची आठवण करून देणे. दुसऱ्या प्रकारे तो हे सांगतो की त्याला पापी लोकांना तारायला आवडते. एखाद्या कुरूप गोष्टीतून काही सुंदर घडवायला आवडते, विदेशी लोकांना त्याला स्वत:ची मुले बनवायला आवडते आणि त्याच्या शत्रूंशी त्याला समेट करायला आवडते. “देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात” (रोम ८:२८) केवळ त्याच्या गौरवासाठी.

Previous Article

येशू सांताक्लॉजसारखा असता तर  जिमी नीडहॅम

Next Article

ख्रिस्तजन्म- गव्हाणीचा अर्थ जॉन पायपर

You might be interested in …

मौल्यवान क्षण तुम्हाला ओलांडून जाऊ देत

ग्रेग मोर्स आम्ही एकटेच बसलो होतो, कित्येक मैल दूरवर कोणीच  दिसत नव्हते. शिखराच्या टोकावरून पलीकडे ‘लेक सुपीरियर’ हे तळे दिसत होते व त्याच्या लाटा खडकांवर आदळत होत्या. एकटेपणाच्या ताज्या हवेचा श्वास आम्ही घेतला. मित्रांबरोबर इथून […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण १३ प्रार्थना पाठ म्हणू […]