Pages Menu
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Dec 24, 2019 in जीवन प्रकाश

ख्रिस्तजन्म- गव्हाणीचा अर्थ                                 जॉन पायपर

ख्रिस्तजन्म- गव्हाणीचा अर्थ जॉन पायपर

 

काही विहिरी कधीच कोरड्या पडत नाहीत. काही क्षितीजं तुम्ही त्यांच्या निकट जाताना अधिकच विस्तारू लागतात. काही गोष्टी अनंतकालापर्यंत  मागं पोचतात, अनंतापर्यंत पुढे जातात आणि त्यांचे रहस्य खोल खाली जात राहते अन् त्यांची उंची वैभवाला पोचते. ख्रिस्तजन्माची गोष्ट अशीच आहे तिचा कधी अंतच लागणार नाही.

गव्हाणीमध्ये राजवैभव

गव्हाणी हा शब्द नव्या करारात फक्त लूकच वापरतो. आणि त्याने वापरलेल्या ह्या एका शब्दाने – जनावरांना वैरण देण्याच्या एका पात्रामध्ये देव जे करतो त्यामुळे – आपण आनंदाने उड्या मारू लागतो.

गव्हाणी हा शब्द घोडे, गाढवे, गुरे ह्यांना खाण्यासाठी ज्यामध्ये दाणा-वैरण टाकली जात असे त्या पात्रासाठी वापरला जातो. आणि ह्या सर्वात प्रसिद्ध अशा ख्रिस्तजन्माच्या परिच्छेदात लूक आपले लक्ष तीन वेळा गव्हाणी या शब्दाकडे वेधून घेतो.

“आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती” (लूक२:७).

“आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल” (लूक २:१२)

“तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बालक त्यांना सापडले” (लूक २:१६).

गव्हाणीचा संदेश

गव्हाणीतून लूकला काय संदेश द्यायचा आहे?

१. गव्हाणी घाणेरडी होती

निश्चितच योसेफ आणि मरीयेने ती जितकी साफ करता येईल तितकी साफ केली होती. तिच्यावर कपड्यांच्या घड्या  टाकून मऊशार करण्याचा नक्कीच प्रयत्न केला असेल. तरीही लाळ गाळत खाणाऱ्या जनावरांच्या या पात्रातील बिछान्याचा विचार अद्भुत रीतीने करता येणे शक्य नाही. ती एक सामान्य गव्हाणी दाणा वैरण खाण्यासाठी होती.

२. गव्हाणीची योजना केली होती

प्रथम कोणी म्हणेल हे नशिबाने अचानक घडून आले. कारण लूक म्हणतो, “त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती” (लूक२:७).

पण ज्या पद्धतीने लूक ही गोष्ट सांगतो त्यापुढे असा विचार तग धरणार नाही. देवाला ह्या जन्माच्या तयारीसाठी कित्येक शतके होती. मीखा संदेष्ट्याने येशूच्या जन्मापूर्वी ७०० वर्षे आधी भविष्य केले होते की मशीहा हा बेथलेहेमात जन्मणार आहे.

“हे बेथलेहेम एफ्राथा, यहूदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझ्यामधून एक जण निघेल, तो माझ्यासाठी इस्राएलाचा शास्ता होईल; त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादि काळापासून आहे” (मीखा ५:२).

तर देवाला आपल्या पुत्राच्या देहधारणाच्या आगमनाची योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी आणि योग्य प्रकारे तयारी करायला सातशे (आणि अधिक ) वर्षे होती. उदा. दाविदाच्या घराण्यातील एक विश्वासू कुमारी आणि नीतिमान पुरुष हा बेथलेहेमातच मिळावा असे त्याने योजले असते. पण त्याऐवजी त्याने नाझरेथ येथे राहणारे मरीया व योसेफ निवडले. आणि भविष्य केलेल्या  गावापेक्षा अगदी दूर ठिकाणी मरीया गरोदर राहावी अशी योजना त्याने केली.

आता देवानेच निर्माण केलेली ही समस्या सोडवण्यासाठी काही वैयक्तिक कारणाने त्याने त्यांना बेथलेहेमाला आणले असते. उदा. कोणा नातेवाईकाची तातडीची गरज  अथवा स्वप्न, किंवा काही वैयक्तिक व्यावसायिक अथवा कायद्याचा मामला. पण त्याने तसे केले नाही.

त्याऐवजी त्याने योसेफ आणि मरीयेला एका राज्यभरच्या नावनिशीद्वारे बेथलेहेमात हलवले. दुसऱ्या शब्दांत देवाने जगातील सर्वात महान राजाने सर्व आपापल्या मूळ गावी जाऊन नोंदणी करावी अशी आज्ञा करण्याची योजना केली. कोणी त्याला “प्रारब्ध” म्हणेल. पण देव स्पष्ट करत होता: “मी जागतिक रीतीने काय करत आहे हे तुम्हाला समजतंय का? तुम्हाला कल्पना नाही. मला बरे वाटेल अशा ठिकाणीच मी प्रत्येक गोष्ट करतो. माझ्या पुत्राचा जन्मही.

आता ज्या देवाने एका स्त्रीला नाझरेथमधून बेथलेहेमात आणण्यासाठी एक साम्राज्य फिरवले त्याला त्याच्यासाठी एका खोलीची व्यवस्था करता आली नाही हे हास्यास्पद वाटते. एका बिछान्याची सोय करणे हे साम्राज्यभरच्या नावनिशीपेक्षा सोपे होते. येशूबाळ हा देवाने त्याच्यासाठी योजना केलेल्या अगदी नेमक्या ठिकाणीच झोपला होता: जनावरांच्या वैरणीच्या गव्हाणीत.

३. गव्हाणी ही  एक खूण होती

प्रभूच्या दूताने मेंढपाळांना जे काही सांगितले ते कल्पनेपलीकडे चांगले होते.
“तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे” (लूक २:११).

ह्यावर विश्वास ठेवावा व साक्ष व्हावे म्हणून त्यांना खूण द्यायची होती. ती देवदूतांनी दिली: “आणि तुम्हांला खूण ही की, बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल” (लूक २:१२).

बाळंत्यात? बेथलेहेमातले प्रत्येक बाळ बाळंत्यातच गुंडाळलेले होते. ही काही खूण नव्हती. गव्हाणी ही खूण होती. ही गोष्ट ऐकायला इतकी धक्कादायक वाटली असेल की आपण देवदूतांचे बरोबर ऐकले का असा त्यांना प्रश्न पडला असेल.

तारणारा. ख्रिस्त. प्रभू. हाच जन्मला आहे असे दूताने सांगितले. तारणारा: आपल्या सर्व शत्रूंपासून सुटका करणारा- कदाचित याहून अधिक! ख्रिस्त: मशीहा, देवाच्या सर्व अभिवचनांची पूर्ती करणारा. प्रभू: “प्रभूचा दूत, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले” (२:९). तारणारा, ख्रिस्त, आणि प्रभू कुठं निजला आहे?

ही खूण आहे. जगातला दुसरा कोणताच राजा गव्हाणीत निजला नव्हता. ह्याला तुम्ही शोधा आणि तुम्ही राजांच्या राजाला पाहाल. आणि तुम्हाला काहीतरी समजेल. त्याच्या राजेपणाबद्दलची अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजेल.

४. गव्हाणी वैभवी होती

“गव्हाणीत ठेवलेले एक बालक तुम्हांला आढळेल” असे शब्द देवदूताच्या तोंडातून बाहेर पडताच सर्व आसमंतातून स्तुती निनादली.  “इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, ‘ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”’ (२:१३-१४).

देवाला गौरव असो! “तारणारा गव्हाणीत आहे” देवाला गौरव असो! “मशीहा गव्हाणीत आहे” देवाला गौरव असो! “प्रभू गव्हाणीत आहे” “परमउंचामध्ये देवाला गौरव” सर्वोच्च असताना सर्वात खाली! काय हा देव! काय हा तारणारा!

५. गव्हाणी हा शिष्यत्वाचा मार्ग आहे

प्रभूचा दूत मेंढपाळांकडे आला. शास्त्री परूशांकडे नाही.
“ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.” (लूक२:१४)

देव कुणावर संतुष्ट (प्रसाद) झाला आहे? हाच शब्द लूकच्या शुभवर्तमानात पुन्हा आढळतो. “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या आहेत; होय, पित्या, कारण तुला असेच योग्य दिसले (यामध्ये तुला संतोष आहे) ” (लूक १०:२१).
ज्ञानी नाही, विचारवंत नाही तर मुलांना. जे गव्हाणीतील बाळासबंधी काहीच आक्षेप घेणार नाहीत. हे तारणाऱ्याचीच अपेक्षा करतील चांगल्या बिछान्याची नाही.

ते वाटेने चालत असता कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही” (लूक ९:५७-५८).

गव्हाणीशिवाय माझ्याकडे काही नाही. तू माझ्यामागे ये.

६. गव्हाणी हे कालवरीकडे टाकलेले पहिले पाउल होते

कालवरीचा रस्ता हा उतरणीचा रस्ता आहे. चालायला सोपा आहे म्हणून नाही तर तो खाली जातो म्हणून. हाच फिली.२:६-८ चा मुद्दा आहे.

“तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.”

तारणारा अशाच प्रकारे तारण करतो. मशीहा सर्व अभिवचने अशा प्रकारे पूर्ण करतो. प्रभू अशा प्रकारे राज्य करतो: अनंत देवापासून जनावरांना चारण्याच्या गव्हाणीपर्यंत आणि अखेरीस वधस्तंभाच्या छळापर्यंत. ज्यांना पाहण्यास डोळे आहेत त्यांना देवदूताचा संदेश समजतो. होय. आपण त्याच्यामागे जायलाच हवे! “त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही” (लूक १४:३३). तो नम्रतेचा मार्ग आहे. तो कठीण रस्ता आहे. पण ह्या तारणाऱ्यासोबत या रस्त्यावर चालण्यासारखा दुसरा आनंद नाही.

“भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो” (लूक २:१०).

हा साधासुधा आनंद नाही. हा महान आनंद आहे. “परमोच्चावर देवाला गौरव” (लूक२: १०-१४).

महान आनंद आपल्याला. महान गौरव देवाला.

आमच्या सर्व वाचकांना ख्रिस्तजयंतीच्या शुभेच्छा !