Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अगस्त 2, 2022 in जीवन प्रकाश

एकटे असणे आपल्याला का कठीण जाते

एकटे असणे आपल्याला का कठीण जाते

ग्रेग मोर्स

एकटे असण्याची थोडीशी गैरसोय आणि माझ्या मनात विचार येतो : मी इथं काय करत आहे? इतकी वर्षांची परिचयाची माझी खोली बेढब आकार घेऊ लागते. शांतता, स्तब्धता प्रत्येक वस्तूला अनैसर्गिक दर्जा देऊ लागते. काहीच हलत नसते.

अखेरीस मला शांततेची सवय होऊ लागते. लक्ष विचलित करणाऱ्या बाबी सर्व बाजूंनी खुणावतात. “हे आमच्या स्वर्गातील बापा,” मी प्रार्थना करू लागतो. “तुझे नाम पवित्र मानले जावो. माझ्या गावात तुझे नाव उंच कर. माझ्या जीवनात” — माझे पाय एवढे थंड का पडलेत?

मी पायात सॉक्स चढवून पुन्हा माझ्या जागी येतो. कुठे होतो बरं मी?

हं आठवलं. “ प्रभू माझ्या जीवनात तुझं नाव उंच कर. आणि कृपा करून तुझं राज्य येऊ दे, तुझी  इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर सुद्धा होऊ दे.” – थांब, हा आवाज कसला? माझ्या मुलाचा? एवढ्यात  शक्य नाही.

मी हॉलमध्ये दृष्टिक्षेप टाकतो. माझ्याजवळ असलेल्या शेल्फवरची पुस्तकं दिसतात. ते यात्रिक्रमणाचं पुस्तक परत वाचायला पाहिजे… अमेझॉननं पाठवलेल्या त्या पुस्तकाचा कोपरा खराब दितोय. परत करायला हवंय. काल कोणती ऑर्डर यायला हवी होती बरं?

एकटेपणापासून पलायन

हल्ली मला जाणवतंय की एकटे असणे मला बिकट होत आहे. देवाबरोबर एकटे असण्याचे आश्रयस्थान, जेथे तासनतास कसे जायचे ते कळायचं सुद्धा नाही. त्याचा आता कार्यक्रमांनी व्यस्त असलेल्या जीवनाने बळी पडलाय. “एकांत समय” हे कठीण वाटत आहेत. आणि प्रार्थनाघरात पारवे आणि जनावरे विकणारे गोंधळ करत आहेत. याहून वाईट म्हणजे मीच त्यांना बोलावलंय. पण का?

ब्लेझ पास्कल हे, तारण न पावलेले जग शांततेचा तिरस्कार का करते याचे योग्य स्पष्टीकरण देतात. “दिशाबदल. मरणावर उपाय सापडत नसल्याने दुष्टपणा आणि दुर्लक्ष करणे. लोकांनी ठरवले आहे की आनंदी राहण्यासाठी या गोष्टींचा विचारच करायचा नाही.”

पास्कल यांना दिसते की लोक देवाशिवाय आहेत व ते प्रत्येक वळणावर त्यांच्या निर्माणकर्त्यापासून व स्वत:पासून दूर पळत आहेत. हे जग गर्दी आणि गोंधळात फिरत आहे. याचे कारण पतित जग जेव्हा एकटेपणात असते तेव्हा  लोकांच्या नापसंतीच्या आठ्यांना तोंड  देणे त्याला नको वाटते. यामुळे ते नको त्या गोष्टींच्या सुद्धा मागे जात राहतात.

अशा रीतीने गलबला स्वत:बद्दलच्या ज्ञानाचा प्रकाश बाजूला सारतो. ते ज्ञान म्हणजे आदामाचा वंश हा मरत असलेला रुग्ण आहे आणि तो सागराच्या किनार्‍यावर रेतीचे किल्ले उभारत आहे. त्यामुळे आपण मर्त्य मानव आहोत हा विचार तो बाजूला सारतो. किंवा येशूने योहान १५:६ मध्ये चित्रण केल्याप्रमाणे “वाळलेले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.”

पास्कल धाडस करून म्हणतात, “माणूस सुखी नसण्याचे कारण त्याला आपल्या खोलीत शांत कसे राहावे ते समजत नाही”

शांततेला धमकी

अर्थातच हे ख्रिस्ती व्यक्तीचे उदाहरण नाही. देवाने आपल्याला भर दुपारी विहिरीतून पाणी काढताना शोधले आहे. तेथे त्याने आपल्याला आपले पाप आणि आपली स्थिती दाखवली. तेथेही त्याने स्वत:ला आपल्यासाठी देऊ केले – जिवंत पाणी म्हणून.

शांत क्षणीच आपल्या जिवासमोर एक झुडूप जळत होते; आपण आपली पायतणे काढली आणि त्याच्या आवाजाने आपल्याला भग्न करून बरे करण्यासाठी देऊन टाकले.

आणि हाच नमुना सुरू राहतो. रोजचे एकांत समय देवाशी भेट घेण्याच्या संधी होत राहतात. वह्या भरून जातात. शब्द अधोरेखित केले जातात. प्रार्थना केल्या जातात. अश्रू गाळले जातात. गाणी गायली जातात.

पण हळूहळू जर आपण दक्ष राहिलो नाही तर हा चांगला वाटा, ही एक आवश्यक असलेली गोष्ट, शांत खोली विसरली जाते. गावातला धर्म – हिरवे, नैसर्गिक, शांत-  हे धातूच्या, यंत्राच्या, गलबल्याच्या शहराजवळ सरकू लागते.

देवाशी एकांतात जाण्याच्या इच्छेला धमकी देणारे तीन धोके मला दिसतात.

पहिले:  मैत्रीपूर्ण जग

माझ्या खोलीबाहेरचे जग दोन्ही हात पसरून आपल्या सहभागितेत घेण्यासाठी मला आमंत्रण देण्यास तयार आहे. जॉन बनियन आपल्या यात्रिक्रमण या पुस्तकात ख्रिस्ती व्यक्ती जात असलेल्या या मार्गातील ठिकाणाला ‘माया बाजार’ म्हणतात. आणि हे खरं आहे.

याला मी ‘व्यस्त असणे’ म्हणतो – करीयर उभारणे, जोडीदाराचा शोध, आनंदाचा पाठलाग – येशू याला “प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ” असे म्हणतो.  जेव्हा या गोष्टी माझ्या जीवनातील येशूचा आवाज गुदमरून टाकू लागतात तेव्हा ह्या देणग्या काटे बनतात.

पेरणाऱ्याच्या दाखल्यामध्ये येशू म्हणतो, “काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते” (मार्क ४: १८-१९).

देवाचे सत्य ह्रदयात आणि मनात गुदमरू लागते, छळाच्या जोरदार पकडीने नव्हे तर श्रीमंतीच्या हळूवार स्पर्शाने.

मग मला आठवण देण्याची गरज आहे. “जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही” (१ योहान २:१५).

काही वेळा मला खडसावण्याची गरज असते. “अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे” (याकोब ४:४).

इतर काही वेळा मला दाखवण्याची गरज असते. “ देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला” (२ तीम. ४:१०).

आणि सर्ववेळ मला प्रार्थना करण्याची गरज आहे. “तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर, म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन आमचे सर्व दिवस आनंदात घालवू” (स्तोत्र ९०:१४).

दुसरे: कृश होणारा आत्मा

जेव्हा मी जगाची इच्छा करतो तेव्हा देवाबरोबर एकटे वेळ घालवण्यास मला वेळ नसतो. माझ्या खिशातले जग बायबलच्या जगापेक्षा मला अधिक भुरळ घालू लागते. माझा आत्मा वितळून पातळ होऊ लागतो- लोण्यासारखा.

माझी  कमकुवत इच्छा मला देवापासून दूर माझ्या फोनमध्ये नेते. योनाची  तार्शिशला जाण्याची यंत्रणा मी वापरू लागतो. आणि जसे मी पुन्हा पुन्हा त्या जहाजात बसू लागतो तेव्हा तसे जाणे अधिक आणि अधिक सोपे होत जाते आणि देवाबरोबर पूर्वीसारखे बसणे अधिक आणि अधिक कठीण होऊ लागते. माझा आत्मा चुळबुळ करू लागतो, माझे मन विचलित करण्यासाठी, मनोरंजनासाठी तो अधीर होत राहतो.

जसा माझा हात  अधिक आणि अधिक जंक खाण्याच्या पाकिटात जात राहतो तशी देवाबरोबरच्या महान मेजवानीसाठी माझी भूक कमी होत जात जाते.

तिसरे: आकुंचित होणारा विश्वास

कृपेच्या साधनांपासून मला दूर ठेवण्याने माझ्या विश्वासाला इजा पोचते. जेव्हा मी परततो तेव्हा शांत खोली मला विचारू लागते: हे सर्व खरेच का खरं आहे? यामुळे वाटलेल्या अस्वस्थतेमुळे मी या सुचनेविरुद्ध विश्वासाची ढाल घ्यायला हवी आहे. 

मी प्रार्थना करू लागतो, “प्रभू कृपा करून माझी आजची भाकर मला दे, आणि मला क्षमा कर – मी अनेक वेळा दुर्लक्ष केलंय, विचलित होणाऱ्या, जगिक अपराधांबद्दल मला क्षमा कर – जसे मी माझ्याविरुध्द वागणाऱ्यांना क्षमा करतो तशीच.”

देवानं तुझं ऐकलंय अशी तुला खात्री आहे का? माझ्या मनात विचार येतो. जर हे खरं नसेल तर तासन तास, दिवसामागून दिवस, वर्षांमागून वर्षे वाया गेली आहेत.

प्रभू मला – लक्ष विचलित होण्याच्या – परीक्षेत आणू नकोस . पण मला त्या दुष्टापासून सोडीव. कारण राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्वकाळ तुझीच आहेत. आमेन”

त्या जमिनीवर मी थंड जगातून माझ्या पित्याच्या सान्निध्यात प्रवेश करतो.

त्याच्या जवळ एकांतात जाण्याने माझ्या विश्वासाची परीक्षा होते. “कारण देवाजवळ जाणार्‍याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे” (इब्री ११:६). जर देवाचे अस्तित्व नसेल किंवा तो आपल्याला भेटत नसेल तर आपण हे मौल्यवान क्षण एका स्वप्नात किंवा सावलीबरोबर घालवत आहोत. पण जगाला बंद करून  आणि शंकेकडे पाठ फिरवून आपला शोध म्हणतो, “मी तुझ्यावर भरवसा ठेवतो, मला तुझी गरज आहे. मला तुझ्याबरोबर असण्याची उत्कंठा आहे.”

तुम्ही परत फिराल का?

जो आपले जीवन आहे  (कलसै ३:४) तो या व्यस्त आणि गलबल्याच्या जगातून फिरण्यासाठी साद घालणार नाही का? एलियाच्या दिवसाप्रमाणेच आजसाठी पण ते खरे आहे.

“ परमेश्वर जवळून जात असताना त्याच्यासमोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारत व खडक फोडत होता; पण त्या वार्‍यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला; पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता.

भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला; पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता; त्या अग्नीनंतर शांत, मंद वाणी झाली” (१ राजे १९:११-१२).

देवाने अक्षरशः एलियाला दर्शन दिले, “ एका शांत व मंद वाणीमध्ये.” देव बहुधा सोसाट्याचा वारा, भूमिकंप , धगधगता अग्नी  जाऊ देतो – त्याच्या वचन आणि आत्म्याद्वारे शांत खोलीमध्ये आपल्याशी हळूवार बोलणे त्याला अधिक आवडते. आपण आपल्या प्रार्थनेच्या खोलीत एकटे जाणार का? जगाला आणि त्यातील लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींना  बंद करून, ज्या देवाला आपल्याला भेटण्यात महाआनंद आहे त्याच्यासमवेत तुम्ही बसणार का?