नवम्बर 20, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

प्रकरण १०
फोलोपात ‘प्रीती’ ‘नाश’ या शब्दांचा शोध (योहान ३: १६)

हवा मस्त होती. फारसा पाऊस नव्हता. दोन तीन फूट लांब पंखांच्या वटवाघुळांच्या शिकारीसाठी उत्तम वेळ होती. गुहा व कपाऱ्यांमध्ये ही शिकार करावी लागते. त्यांच्या मशालींपेक्षा माझे टॉर्च जास्त उपयोगी पडणार होते. म्हणून मीही त्यांच्या मोहिमेत सामील झालो. गुहेपासून डोंगरातून आरपार नदी वाहते. असा तो बोगदा जातो. अरूंद गुहेतून पुढे जाताच मोठमोठ्या दालनांतून पाणी वाहाताना दिसते. त्यांच्या छतांच्या लोंबत्या चुनखडींना ही वटवाघुळे टांगून असतात. त्या उथळ पाण्यातून वाट काढत तळाशी खांबांप्रमाणे तयार झालेल्या चुनखडींच्या आधारे चालावे लागते. टॉर्चच्या उजेडात चमकणाऱ्या डोळ्यांवरून वटवाघुळांचा माग काढता येतो.

मध्येच हे लोक थांबले व प्रार्थना करून मगच पुढे जाऊ या असे म्हणू लागले. त्यांच्या प्रार्थनेत वारंवार मला ‘सोवे’ हा शब्द ऐकू आला. इतरही बरेच नवीन शब्द कानावर पडले. पण मला ते प्रार्थनाशील असल्याने हा आग्रह का करीत आहेत यावर विचार करणे योग्य वाटले नाही.

कायद्याने दफन करणे बंधनकारक होईपर्यंत हे लोक त्यांना हवी तशी मृतदेहाची विल्हेवाट लावत असत. जर मनुष्य सन्मानाचे जीवन जगला असेल तर त्याचे शव गावापासून दूर चौथऱ्यावर ठेवत. बायको फांद्यांनी त्यावर माश्या बसू देत नसत. अखेर कुजत चाललेले ते शव त्या थोडे थोडे करून खाऊन टाकत व सन्मानाने त्याचे अवशेष पुरत. पण जर त्रासदायक व्यक्ती मरण पावली तर त्याचा आत्मा जवळपासही वावरू नये म्हणून त्याला मुळीच पुरत नसत. वरवर शोक केल्यावर गुहेतून डोंगरात जाणाऱ्या नदीपाशी माचोळा बांधून त्यावर त्याचे शव ठेवून जाळून टाकत. तो माचोळा कोसळून राखेसह ते अवशेष नदीतील पाण्यातून गुहेत जात. त्याच नदीत आम्ही आता उभे होतो. प्रार्थना करून आम्ही पुढे चालू लागलो. लोकांचा गलका व उत्साह वाढला होता.

“इकडे प्रकाश दाखव.”

“मार जोरात. ते बघ पाण्यात पडलय.”

“बघ त्याला जखमी वटवाघुळ मिळालं.”

“तू कुठे नेम धरतोस बघ; मी इथे मारतो.” त्यांची विशिष्ट शस्त्रे होती. वटवाघुळाला पाण्यात पाडून ते पकडत होते.

आम्ही चुनखडीमुळे बनलेल्या तळ्यापाशी आलो.

“आता बस. पुढे रस्ता नाही.” आता तर माझ्या मते सोपा रस्ता होता. मग हे का पुरे म्हणताहेत हे मला समजेना.

मी म्हटले, “हे तळे फार खोल नाही.”

“नको; तिथे जाऊ नका.”

“पण का?”

“नको. आपण शेवटाला आलो पुढे रस्ता नाही.”

“पण वटवाघुळे तर तिथेच आहेत; आणि आपण ह्यासाठीच तर आलो आहोत.” पण कोणीही हलेना; आणि मला काही कळेना. नदी आणि तळ्यात असा काय फरक? मी सरळ पुढे जाऊ लागलो.

“मी पाहून येतो किती खोल पाणी आहे.”

“नको नको.” ही रांगडी माणसे अशी का करतायेत मला समजेना.

मी थोडा पुढे गेलो व म्हटले, “फक्त वाळू आहे.” पाणी माझ्या कमरेपर्यंत होते. पुढे काखेपर्यंत आले व पुन्हा कमी झाले. “हे पाहा मी पोहंचलो काही अडचण नाही; या.”

अखेर अपुसी अलीने धाडस केले. तो पाच फुटांहून थोडा कमी उंचीचा होता. त्याच्या मानेपर्यंत पाणी आले मी त्याला उत्तेजन देत राहिलो. तो सुखरूप आला. बाकी सगळे त्याच्यामागून आले. कोणाच्यातरी हाताला मानवी पायाचे हाड लागले. दुसऱ्यांनाही काही अवशेष सापडले. पण सर्व शांत मनाने आले. भरपूर वटवाघुळे पकडली . पुढे जाण्यास मार्ग नव्हता कामही झाले आणि आम्ही घरी परतलो.

योहान ३:१६ चे भाषांतर अजून गवसले नव्हते. आम्ही जुन्या कराराचे काही शास्त्रभाग अनुवादित केले होते पण नव्या करारातून काहीच केले नव्हते. योहान ३:१६ या सदाजीवी वचनातील ‘प्रीती’ व ‘नाश’ यासाठी मला अजून शब्द मिळाले नव्हते. दुपारी आम्ही कामाला बसलो पण सकाळी गुहेतील पाण्यात असताना जे काही घडले होते त्याविषयी माझ्या मनात प्रश्न होते. मी हेपेलला म्हटले, “तुम्ही एवढी धाडसी माणसं ते तळे ओलांडायला का घाबरत होता?”

क्षणही न दवडता तो म्हणाला, “सोवे.”

“सोवे म्हणजे काय?”

“तुम्हाला सोवे कोण आहे म्हणायचे आहे का?”

“ठीक आहे तसे म्हण. सोवे कोण आहे?”

“तुम्हाला दोन भावांची दंतकथा ‘डेटे फेले फो’ माहीत नाही?”  ‘दंतकथा’ शब्द सापडला. मी टिपून घेतला.

हेपेलचा चेहरा एकदम गंभीर झाला व तो गोष्ट सागू लागला.

दोन भाऊ तळ्यावर मासे पकडायला गेले. तराफ्यावर बसून थोरला भाऊ सागोच्या फांद्यांनी वल्हवत होता व त्या  फांदीत मासा अडकताच धाकटा भाऊ तो काढून घेत होता.

थोरला भाऊ थकताच धाकटा भाऊ त्याचे काम करू लागला व मोठा भाऊ मासे गोळा करू लागला. काही वेळाने मोठा भाऊ ओरडला, “अरे तू बुडतोस.” मचवा पाण्याखाली गेला तेव्हा पाणी त्याच्या घोट्यापर्यंत होते. मोठ्या भावाने त्याला पाण्याबाहेर यायला सांगितले. तो मचवा किनारी आणायचा प्रयत्न करू लागला. पण मचवा हलेना. तोवर पाणी गुडघ्यापर्यंत आले. आणि तो ओरडला, “इथे खाली काही तरी आहे. त्याने मचवा आणि माझा घोटाही पकडून ठेवलाय आणि ते मला आत ओढत आहे.” तेव्हा थोरला भाऊ त्याला वाचवण्यासाठी जमेल ते प्रयत्न करू लागला. त्याला पकडायला वेल टाकला. बांबू टाकला. ताकदीनिशी ओढायचा प्रयत्न केला. पण काही फायदा झाला नाही. दोघे आरडा ओरडा करत होते. पण तो आणखीनच खाली जात होता. त्याचे फक्त डोके पाण्याबाहेर दिसू लागले. अखेर त्याने काठीची पकड सोडून दिली त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, “भाऊ, कोनेओ.” आणि तो नाहीसा झाला.  लागलीच त्याचा मोठा भाऊ धावत गावात आप्तांकडे ओरडत गेला.

“भावांनो, माझ्या भावाला त्या सोवेने नेले ! त्या सोवेने नेले!”  लागलीच सारे आप्त कामाला लागले. एक पोसलेले डुक्कर त्यांनी नदीवर  नेले. त्याचे दोन तुकडे करून नदीत फेकत आरोळी दिली, “सोवे, हे घे तुला डुक्कर!”

हेपेल गोष्ट सांगता सांगता थांबला. आता गोष्टीचा महत्त्वाचा मुद्दा तो सांगणार होता.

“मग काय झाले माहीत आहे? त्या सोवेने त्याच्या भावाला गिळले होते. कोणीच काही करू शकणार नव्हते.

त्याच्या आप्तांनी उत्तमातले उत्तम डुक्कर त्याचा कोप शमवायला अर्पण केले. पण त्याने ते स्वीकारले नाही.

म्हणून तो माणूस मेला. एवढेच नाही तर त्याहून जास्त काहीतरी केले. त्याला तो खोल खोल सर्वकाळासाठी घेऊन गेला. त्याचा नाश झाला.

“काय?”

“त्याचा नाश झाला. अलुयालेपो.”  मला शब्द सापडला. मी तो वहीत टिपून घेतला. केव्हापासून मला या शब्दाची गरज होती. हेपेल पुढे बोलू लागला.

“लोक त्या तळ्याजवळ जातच नाहीत. तिथे मासे पकडत नाहीत. तेथे कुजबुजत नाहीत. पायांची चाहूलही लागू देत नाहीत. माणसांनाच ओढून नेणारा सोवे त्या तळ्यात राहातो.” आता मला कळू लागले की हे सारे किती गंभीर आहे.

“मला वाटले, ही दंतकथा आहे.”

“आहे. पण ही सत्यकथा आहे.” आम्ही दोघे स्तब्ध झालो. मी विचारले, “सर्वांना ही गोष्ट माहीत आहे? आणि सर्वांचा यांवर विश्वास आहे?”

“सर्वांना माहीत आहे. हे घडले आहे ना.”

त्या तळ्यात एक प्राणी राहातो, तो लोकांना ओढून नेतो. मानवी सामर्थ्यापलीकडची ही दुष्ट शक्ती आहे.

तिला शमवायला त्यांच्या दृष्टीने डुक्कर उत्तम म्हणून ते अर्पण करतात. पण काही फायदा होत नाही.

त्यात जीवनासाठी धडा होता. या जगाच्या अंधकाराच्या शत्रूंच्या अशुद्ध शक्तीविषयी इशारा होता. त्यांच्याशी लढून काही परिणाम होणार नव्हता. पण मला अजून काही जाणून घ्यायचं होतं.

“बुडण्यापूर्वी तो काय म्हणाला?”

“कोनेओ.”

“म्हणजे काय?”

“बायबाय?  हॅलो? आवडते? प्रिय?” कोनेओ या शब्दाच्या बऱ्याच छटा होत्या. बरेच वापर होते. अखेर बऱ्याच चर्चेनंतर प्रीती “प्रेम” यासाठी हा शब्द असल्याचा निष्कर्ष निघाला. कॅरल एका वृद्ध स्त्रीशी बोलत असता या शब्दाची खातरजमा झाली. ती विधवा झाल्यावर अनेक कटु अनुभवांतून गेल्यावर तिच्या जीवनात एक विधुर मनुष्य आला. तो तिला आवडला. ती म्हणाली, त्याचे प्रेम ‘कोनेओ’ पाहून तिने त्याच्याशी लग्न केले. कॅरलने हा किस्सा ऐकवला. पण अजून आम्हाला खात्री करून घ्यायची होती. तो एकटा होता म्हणून की त्याच्यासाठी सहानुभूती वाटली म्हणून तिने त्याच्याशी विवाह केला? ती नक्कीच म्हणाली होती की ती आनंदी होती.

मग ती प्रेमाविषयीच बोलत असेल. पुन्हा आम्ही योहान ३:१६ कडे वळलो.

“हेपेल, देवाने जगाची एवढी चिंता, काळजी केली की आपल्या पुत्राला जगात पाठवले.  प्रीती केली यासाठी ‘कोनेओ’ शब्द वापरला तर?”

“होय. हा शब्द अगदी बरोबर आहे,” त्याने पुष्टी दिली.

आम्ही योग्य शब्द सापडल्याने भाषांतर पूर्ण केले. प्रत्येक शब्द महत्त्वाचा होता. ‘दंतकथा’ सापडली आणि योग्य अर्थाचे शब्द गवसले. त्या दंतकथेतील वाईट बातमी आम्हाला चांगली बातमी द्यायला कारण झाली.

‘नाश’ हा शब्द मृत्युपेक्षा अधिक काही सूचित करतो. ‘सोवे’ च्या दंतकथेत हा शब्द सापडला. जे वचन बायबलची गुरुकिल्ली आहे, त्या वचनाच्या भाषांतरासाठी हा शोध चालू होता. उत्तम बातमी आहे प्रीती. ‘कोनेओ’ – गहन प्रीती. आपल्या मित्रांसाठी आपला प्राण देणाऱ्या माणसाचं प्रेम ‘कोनेओ’ हे गहन प्रेम होय. देव आपला पुत्र देऊन टाकतो यासारखे गहन  प्रेम कोणते असू शकते? ह्या यज्ञार्पणाने मानवाला खाली खेचून नाश ‘अलुयालेपो’ करणाऱ्या शत्रूच्या शक्तीला नामोहरम केले. याविषयी सांगण्यासाठी आपल्या जीवनाचे आपण मोल  द्यावे असे हे अमूल्य प्रेम आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Sent from my iPad

 

Previous Article

तुमच्यासाठी येशू कोण आहे वनिथा रिस्नर

Next Article

आपल्या पित्यापासून शक्ती मिळवणे (पूर्वार्ध) क्रिस विल्यम्स

You might be interested in …

देवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी – भाग २ लेखक: जेरी ब्रिजेस

जेरी ब्रिजेस  ( १९२९ -२०१६) हे गेल्या काही दशकातील नामवंत ख्रिस्ती लेखकांपैकी एक आहेत. त्यांची अनेक पुस्तके जगप्रसिद्ध झाली असून अनेकांना त्यांच्या ख्रिस्ती वाटचालीत खोल मार्गदर्शन करणारी ठरलेली आहेत. त्यांच्याशी जवळून परिचय असणाऱ्यांची साक्ष आहे […]

आत्म्याचे फळ – सहनशीलता

डेरिल गुना सहनशीलता म्हणजे काय? – दीर्घ सहन करण्याची वृत्ती, मंदक्रोध असणे. हा खुद्द देवाचा स्वभाव आहे. “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” (निर्गम ३४:६). ख्रिस्ती लोकांनी सहनशीलता दाखवावी अशी […]

अन्यायाचं धन : लूक १६:९

१. प्रस्तावना – हा उतारा अवघड आहे. त्यात अवघड काय ते आधी लक्षात घेऊ. (अ) अवघड बाब  (१) हा दाखला असून त्यात एक कारभारी असून तो अन्यायी आहे. आपल्या मालकीची नसलेली, धन्याची असलेली मिळकत उधळून […]