एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.
अनुवाद : क्रॉसी उर्टेकर
प्रकरण १३
प्रार्थना पाठ म्हणू नका
आम्ही स्वत:साठी व फोलोपांसाठीही प्रार्थनेचा खोल अर्थ अभ्यासत होतो. आमचे काम तपासायला पापुआ गिनीच्या दुसऱ्या भागातील बायबल भाषांतरतज्ञ डेविड हायमन आले होते. भाषांतर अचूकपणे लोकांपर्यंत भिडावे यासाठी अशी दक्षता बाळगली जात असे. ते फोलोपाच्या पिडगिन या बोली भाषेत चर्चा करून फोलोपाचे भाषांतर सखोल तपासत आणि त्यांच्या परिस्थितीशी जुळते का ते पाहात.
इंग्रजीशी फोलोपा भाषांतर पडताळून पाहताना मूळ अर्थाला बाध येणार नाही हे कटाक्षाने पाहिले जाई. डेविड मध्येच थांबले व प्रार्थना म्हणजे ‘होसो’ वर स्पष्टीकरण विचारले. सुवार्तिक किरापारेकेच्या काळापासून हा शब्द कसा वापरला जातो ते विचारले. जरी ही कल्पना त्यांना नवी होती तरी शब्द जुनाच होता. देवाची त्यांना ओळख नसल्याने प्रार्थना करायची कोणाला हाच प्रश्न होता. भाषांतर टेबलापाशी प्रथम या शब्दाची ओळख झाली. तेथे मला लक्षात आले की ‘होसो’ शब्दाचा मानवधारी होण्याशी काहीतरी संबंध दाखवला जात असावा. मी प्रार्थनेसाठी ‘होसो’ हा शब्द योग्य असल्याची शहानिशा करीत असता त्याला पूरक ‘मोमा’ हा शब्दही सुचवला पण तो आत्म्यांशी संधान साधण्याशी निगडित असल्याने त्यांनी नापसंत केला. डेविडला या शब्दांच्या मुळाशी जायला हवे होते.
“देवाला प्रार्थना करण्यास हा ‘होसो’शब्द वापरण्यापूर्वी तुम्ही त्याचा कसा वापर करायचा?”
“आमच्या बागेत रोपांची लागवड करण्यासाठी किंवा शिकारीसाठी.”
“तुम्ही ‘होसो’ कशी करायचा?”
“ते परिस्थितीवर अवलंबून असे. पण जेव्हा जेव्हा आम्ही ती करीत असू तेव्हा ती योग्यच करण्याचा आमचा प्रयत्न असे.”
“म्हणजे कसे?”
“समजा, आम्हाला डुक्कर चांगले निरोगी राहून पोसले जावे असे वाटत असेल तर आम्ही डुकराच्या मानेजवळून त्याच्या कानाशी आमचे बोल बोलत असू.”
“तुमचे काही ठरलेले शब्द असायचे का?”
“होय आणि तेच तेच आम्ही परत परत बरोबर तसेच्या तसे बोलायचे असत.”
“ आणखी दुसरा कसा वापर तुम्ही करायचा?”
“अनेक प्रकारे. लागवडीची प्रत्येक कृती करताना, अगदी बागेला कुंपण घालण्यापासून. कारण कुंपण नीट झाले नाही तर डुकरे आत शिरून तुमच्या सर्व पिकाची वाट लावणार. कुंपण बांधायला सुरुवात करण्यापूर्वी कुऱ्हाडीला पान बांधून आम्ही ‘होसो’ म्हणतो. यामची लागवड करताना आम्ही तसेच करतो. जेव्हा त्यांना फूट येते तेव्हा त्याच्याजवळ जाऊन आम्ही ‘होसो ’प्रार्थना म्हणतो. द्राक्षवेलीसाठी मांडव टाकताना त्या खांबाला पान बांधून ‘होसो’ प्रार्थना म्हणतो. वेल वाढत असता त्याचे ‘बेटे’ सुरूवातीपासूनच बीटल्स व कीटकांपासून हंगामापर्यंत रक्षण व्हावे म्हणून ‘होसो’ म्हणतो.”
“मग त्याचा फायदा झाला?”
“कोणास ठाऊक ? पण लोक हे असे नेहमीच करायचे. तेवढाच मार्ग आमच्याकडे होता.”
“अजूनही लोक असे करतात?”
“काही असे करतात, काही जण प्रार्थना करतात. पण दोन्ही कृतींना ते ‘होसो’ हाच शब्द वापरतात.”
“आणखी कोणत्या प्रकारे तुम्ही हा शब्द वापरता?”
“शिकारीत”
“कसा?”
“अनेक प्रकारे. कशाची शिकार करत आहोत व फासा किंवा जाळे किंवा सापळा वापरणार आहोत यावर ते अवलंबून असते. उदा॰ आम्ही जर सापळा वापरणार असू तर त्या सापळ्याला मानवी स्पर्शाचा वास येऊन सावज त्यात न सापडता पळून जाईल म्हणून मानवी स्पर्श धुवून जायला पाऊस पडावा यासाठी आम्ही ‘होसो’ म्हणतो.”
तेथे तर रोजच पाऊस पडतो. म्हणून मी विचारले , “मग ते यशस्वी होत असे का?” ते हसत म्हणाले , “हो. पाऊस तर पडतच असे.”
“आणि सापळ्यांचे काय?”
“ते तर नेहमीच यशस्वी होत.”
“आणि धनुष्यबाणाने शिकार करताना?”
“त्यांच्या पावलांचे ठसे व विष्ठेच्या खुणांवरून माग काढताना फार काळ दबा धरून बसावे लागू नये म्हणून ‘होसो’ म्हणतो.”
मग डेविड ‘मोमा’ शब्दांचा शोध घेऊ लागला. तो गत मृतात्माच्या आत्म्याशी संपर्क साधण्याशी जवळचा शब्द वाटू लागला. त्यात मानवी अवताराशी किंवा रीती-पद्धतीशी काही संबंध नव्हता. तर उत्स्फुर्तपणे परिस्थितीनुसार आपली इच्छा व्यक्त करण्याशी संबंध होता. ख्रिस्ती लोक कोणाला उद्देशून प्रार्थना करतात हे महत्त्वाचे होते.
‘होसो’ व ‘मोमा’ या दोन संकल्पनामध्ये मूलभूत शक्ती कोणती वाटते?” डेविडने विचारले.
‘होसो’ शब्दाचे ‘बेटे’- मूळ, जे बोलायचे आहे ते शब्द योग्य व अचूक बोलणे हे मुळात महत्त्वाचे आहे. तर ‘मोमा’ चे मूळ – ‘बेटे’ वेगळे आहे. ते ज्या आत्म्याला उद्देशून तुम्ही बोलता त्याच्या शक्तिशी संबंधित आहे. ‘मोमा’ हा शब्द खऱ्या अर्थाने देवपित्याला प्रार्थना करण्यासंबंधी अधिक योग्य वाटत होता.
पण अजून त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती. कारण ते फक्त चुकीच्या म्हणजे अशुद्ध आत्म्यांशीच संपर्क साधत आले होते. आता त्यांना कळू लागले होते की देवही आत्मा आहे, व त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करायची असते. सत्य हे मनापासून अंत:करणापासून असते. पोपटपंचीने संक्षिप्त मांडलेला तो सारांश नसतो.
सैतानाला प्रार्थना करणारे लोक जगात आहेत. पण म्हणून आपण देवाची प्रार्थना करण्यापासून व प्रार्थनेच्या सामर्थ्यापासून स्वत:ला का वंचित ठेवावे? आपले कितीतरी ख्रिस्ती लोक पोपटपंचीने प्रार्थना पाठ म्हणतात व त्याद्वारे देवाजवळ जाण्यात समाधान मानतात बरे?
त्या दिवसात आम्हीच प्रार्थनेचा खोल अर्थ शिकत होतो. कारण येथे येऊन आम्हाला प्रार्थनेचे सामर्थ्य प्रकर्षांने जाणवले होते. मध्यरात्री मुले घाबरून वाईट स्वप्नांमुळे रडत उठायची. त्यांनी नक्की काय अनुभवले ते त्यांना सांगता येत नसे. काही होणार नाही, असे काही नसते असे म्हणत आम्ही त्यांना सांत्वन देऊन झोपवायचो. त्यांना भीती वाटू नये म्हणून त्यांच्यासोबत प्रार्थना करायचो. जेव्हा हे सतत घडत राहिले तेव्हा आम्हाला समजले की ही दुष्ट शक्ती आमच्यावर नव्हे पण आमच्या दुर्बल मुलांवर हल्ला करत आहे. आफ्रिकेतील मिशनरींच्या घरात असेच घडायचे. तेव्हा त्यांच्याप्रमाणेच या अविश्वासी जिवांना दुरात्म्यांना दूर ठेवावे अशी प्रार्थना करायला आम्ही सुरुवात केली. व येशूला त्यांच्या बिछान्यापाशी राहण्याची विनंती करू लागलो. आणि मुले शांतीने कसलाही व्यत्यय न येता झोपू लागली. रोज रात्री अशी प्रार्थना करून झोपायची आम्हाला सवयच लागली.
पण आपला देव कोण आहे, त्याची अभिवचने काय आहेत, त्याच्याशी आपले काय नाते आहे, आपल्या नित्याच्या जीवनात व विशेषकरून आपल्या आध्यात्मिक जीवनात त्याची काय मदत असते हे समजणे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
त्याचाच एक भाग म्हणजे प्रथम प्रार्थनेची संकल्पना जाणून घ्यायला हवी. फोलोपांना पण आता प्रार्थनेचा खरा अर्थ उलगडायला सुरुवात झाली होती. कोणत्या पद्धतीने प्रार्थना केली यापेक्षा ती कोणाला उद्देशून केली याला महत्त्व आहे.
Social