एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.
अनुवाद : क्रॉसी उर्टेकर
प्रकरण १४
लूक ११ : तो पिता आहे आणि तो चांगला आहे.
आम्ही लूक ११ अभ्यासत होतो. एका शिष्याने प्रभूला प्रार्थना करायला शिकवावे अशी विनंती केली असता येशूने पिता शब्दापाशी तिची सुरुवात करून प्रार्थनेची रूपरेषा देत एक प्रसिद्ध प्रार्थना त्यांना शिकवली.
आम्ही यावर काम करत असता एक वृद्ध व त्याच्यासोबतच्या एका मुलाने दार ठोठावले. आधीच बायबल खोलीत गर्दी झाली होती. कशी तरी दाटीवाटीने बसून त्यांनी त्यांना जागा दिली. आणखी बऱ्याच लोकांची ऐकायला गर्दी होणार होती. १२x१२ च्या खोलीत ४० लोक बसू लागले होते.
या जमावाविषयी काही तरी करणे गरजेचे वाटून मी तक्ता बनवला. त्यावर कोणी कोणत्या वारी हजर राहावे याची नोंद केली. रोज काही हुशार लोकांची उपस्थिती राहील याची काळजी घेतली. काही वृद्धांनी आग्रह धरला की त्यांना मुळीच वगळू नये. कोणाला गोष्टी ऐकण्यात रुची असे तर काही वृद्धांना गावात हीच एक गोष्ट मनोरंजक वाटत होती. बागकाम व शिकारीतून सूट मिळाल्याने घरातील राखण व मुले सांभाळणे या कामाऐवजी प्रामाणिकपणे ते येथे हजर राहत होते. अवियामे अली सारखे इतर अनेक येत होते कारण त्यांना काहीच चुकवायचे नव्हते.
“मला हे काम करता करताच मरण यावे” असे तो नेहमीच म्हणायचा.
मुले आणायला मी मनाई करत असे. ते वस्तू हलवायचे, खेळून व्यत्यय आणायचे. भूक लागल्यास त्यांना खायला देणे तेथे शक्य नसे. तशी व्यवस्थाच नव्हती. एका मुलाला अशीच भूक लागली. तो वडिलांकडे सारखे खायला मागू लागला. दुसऱ्याने लगेच एक टोळ त्याच्या तोंडात कोंबला.
मी हे पाहून आपले काम पुढे चालू ठेवले. आम्ही लूक ११:९ मध्ये होतो. “मागा म्हणजे तुम्हास मिळेल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडले जाईल.” मला वाटले दार उघडणे देवाच्या राज्यासाठी चांगला विषय होईल. पण फार व्यत्यय येत असल्याने मी थांबण्याचा निर्णय घेतला. आम्ही पुढे काम करू लागलो. येशू वर्णन करत होता, “तुमच्यापैकी असा कोण बाप आहे की आपल्या पुत्राने मासा मागितला असता त्याला साप देईल?” लोक चकित होऊन माझ्याकडे पाहू लागले व म्हटले, “का नाही? त्याला साप का द्यायचा नाही?”
“कारण देवाच्या चांगुलपणामुळे. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यासाठी चांगली असते तेव्हा तिच्याऐवजी तुम्हाला अपायकारक असणारी गोष्ट तो कशी देईल? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेऊ शकता कारण तो तुमचा पिता आहे आणि तो चांगला आहे.”
पापुआ गिनीत व सर्व फोलोपांमध्ये कौटुंबिक बंधने फार दृढ असतात. पालक मुलांना भरपूर वेळ देतात. ते त्यांच्यावर फार प्रेम करतात. ते त्यांना प्रशिक्षणही देतात. त्यांना कधीच अलिप्त ठेवत नाहीत. आईवडिलांच्या कामापासून त्यांना दूर ठेवत नाहीत. मुले आपल्या आपण काही करू लागताच त्यांच्यासोबत ते त्यांना शिकारीला नेतात. मुली आपल्या मातांसोबत झाडाझुडुपात काही ना काही करत राहतात. उंदीर, कीटक पकडतात, कंद , फळे गोळा करतात. त्यामुळे बायबलमध्ये रंगवलेल्या पित्याचे वर्णन त्यांच्या संस्कृतीला अगदी साजेसे असते. पण देवाचे असे वर्णन फोलोपांमध्ये वर्णिलेले नसते. फोलोपात देवाला बोपोरोवाए म्हणतात. तो दुर्गम जागी कोठेतरी आहे, तो बेदरकार असून बापाप्रमाणे मुळीच कोणी चांगला नाही अशी त्यांची समजूत असते. ते म्हणतात, “तो जगाला खालून आधार देण्याखेरीज काही करतो की नाही माहीत नाही.” मी त्यांना विचारले, “त्याने जग निर्माण केले का?”
“हो केले असेल पण त्यावर कोणी विचारच करत नाही. त्याचा मानवाच्या कारभारात काही सहभाग नाही. तो फक्त आता जगाला आपल्या कोपरांचा आधार देऊन ते स्थिर ठेवतो. जेव्हा तो थकतो तेव्हा जरा आपली पकड ढिली करतो म्हणून भूकंप होतो. याखेरीज त्याचा आवाज कोणाच्या कानी पडत नाही.” खोलीतील सर्वांना माहीत होते की बोपोरोवाए म्हणून त्यांची देवाविषयीची पुरातन कल्पना कालबाह्य होती. पण आता येशू जे बोलला ते का म्हणाला हे त्यांना समजत नव्हते.
“चांगला पिता आपल्या पुत्राला माशाऐवजी साप का देईल?” फोलोपांमध्ये तर सापाचे खाद्य देणे म्हणजे मेजवानी असे. केळीच्या पानात बांधून ते भाजतात. उलट फोलोपा प्रांतात एका घासाचे छोटे छोटे मासे मिळतात. म्हणजे ते तर किरकोळ भोजन झाले.
आमच्या चर्चेतून मला त्यांचे म्हणणे समजले.
“तुम्ही वाईट असता आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे समजता तर तुमचा स्वर्गीय पिता किती विशेष करून उत्तम देणग्या देईल” (लूक ११:१३)?
पण माशाऐवजी साप का देऊ नये?
दोन संस्कृतीतील फरक साप व त्याचा वापर याविषयीच्या मतप्रणालीत होता. येशू ज्या लोकांशी बोलत होता ते साप खाणारे नव्हते. ते साप अशुद्ध समजत. पण कोणत्याही संस्कृतीत बाप आपल्या पुत्राला चांगले देण्याऐवजी वाईट देणार नाही, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. चर्चेनंतर आम्ही लिहिले, “जर तुमचा पुत्र भुकेला असेल व त्याला मासा हवा असेल तर तुम्ही दंश करून त्याला ठार करणारा विषारी साप त्याच्यावर भिरकावणार नाही.”
हे अगदी अचूक भाषांतर झाल्याची मला खात्री नव्हती. पण योग्य मतितार्थ स्पष्ट होत होता.
मासा किंवा साप हा मुद्दा नव्हता. ‘किती विशेष करून’ हा महत्त्वाचा मुद्दा होता. देव आमचा पिता आहे. आम्हा पित्यांपेक्षा आपला स्वर्गीय पिता किती चांगला असेल बरे! आपल्या विनंतीची तो वाट पाहातो आणि आपण ती करताच आपण मागतो त्यापेक्षा अधिक तो देतो. आपण देवाला आपल्यात रुची न घेणारा त्या फोलोपांसारखा बोपोरोवाए समजतो; आणि त्याच्याजवळ त्याच्या नामात काही मागतच नाही.
अजून देव आपला पिता आहे व तो चांगला आहे हे ते शिकलेले नव्हते.
Social