चॅड अॅश्बी
गेल्या काही वर्षांमध्ये काही प्रसिध्द ख्रिस्ती लोक त्यांना सेवेसाठी नालायक ठरवणाऱ्या पापात पडल्याचे आपण ऐकले ही दु:खद बाब आहे. त्यांचे असे दुटप्पी जीवन जेव्हा लोकांसमोर येते तेव्हा ते जाहीर क्षमेचे पत्रकही प्रसिद्ध करतात.
अशा पश्चात्तापाच्या कृतीमागची वृत्ती किती शुद्ध आहे याबद्दल शंका न घेणे कठीण आहे. नाहीतरी खरी पश्चात्तापी ख्रिस्ती व्यक्ती पाप पकडले जाण्यापूर्वीच सत्य कबूल करणार नाही का? पण आपण जर स्वत:शी प्रामाणिक असू तर ह्या सगळ्या बाबी किती नेहमीच्या झाल्या आहेत हे मान्य करावे लागेल. पापाचे परिणाम सौम्य करण्यासाठी धावून दिलगिरी व्यक्त करण्याची कृती!
जर पापाची कृती करताना आपल्याला पकडले तर खरा पश्चात्ताप शक्य आहे का?
जरी हल्लीचे हे अनुभव आपल्याला धक्का देतात तरी बायबलमध्ये शोधल्यास आपल्याला दिसून येईल की जेव्हा पाप उघड केले गेले तेव्हा खरा पश्चात्ताप केला अशी अनेक उदाहरणे आहेत. जेव्हा अबीगईलने धाडसाने दाविदाला सर्वांसमोर आपली बाजू मांडल्यावर दाविदाच्या लक्षात आले की त्याच्या गर्वामुळे तो खून करण्यास प्रवृत्त झाला होता (१ शमुवेल २५:२३-३५). त्यानंतर बथशेबा व उरीया यांच्याविरुद्ध जे भीषण गुन्हे केले होते त्यांच्याकडे दाविदाने कानाडोळा केला होता. पण नाथान संदेष्ट्याने त्याच्याकडे बोट रोखून म्हटले, “तो मनुष्य तूच आहेस” (२ शमुवेल १२:७). या दोन्ही प्रसंगानंतर दाविदाने मनापासून पश्चात्ताप केला. याच रीतीने देवाने योनाला निनवेच्या पापाविरुद्ध सार्वजनिक निषेध करायला पाठवल्यावरच त्यांनी दु:ख व्यक्त केले, तरीही त्यांच्या पश्चात्तापाची खुद्द येशूने प्रशंसा केली (मत्तय १२:४१).
जरी पाप उघड करून झालेल्या मानहानीनंतर पश्चात्ताप अशी योजना दिसते, तरी हे सत्य आहे की शास्त्रलेखांतून देवाचा नमुना असा दिसतो की ‘मानव’ हे साधन वापरून पाप दाखवून देणे व त्याद्वारे पश्चात्ताप घडवून आणणे. आता प्रश्न आहे की, कोणाला पकडले गेल्यावर खरा पश्चात्ताप शक्य आहे का आणि खरा पश्चात्ताप दिसतो तरी कसा?
खरा पश्चात्ताप संपूर्ण जबाबदारी स्वीकारतो.
पश्चात्ताप हा ह्रदयाशी सबंधित आहे आणि खरे पश्चात्तापी ह्रदय पापापासून अर्धवट नाही तर पूर्णपणे वळते. ह्या प्रश्नावर विचार करा: जर तुमच्या पापासबंधी तुम्हाला कोणी जाब विचारला तर तुम्ही कमीत कमी कबुली द्याल की सर्व काही कबूल कराल? योहान आपल्या पहिल्या पत्रात म्हणतो, “देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही” (१ योहान १:५). जेव्हा एक बंधू तुमच्या अंधाऱ्या कोपऱ्यात प्रकाश टाकू लागतो तर तुमची तातडीची प्रतिक्रिया काय असते? लगेचच कबुली देऊन तो टॉर्च बंद करायला लावणे? की तुम्हाला समजते की, आता एकतर सर्वच- नाहीतर काहीच नाही! पश्चात्तापी ह्रदय हा क्षण काबीज करेल आणि संपूर्ण प्रकाशात पाऊल टाकेल.
बहुधा जाब विचारल्यास मोह येतो की स्वत:ची वकिली करावी. अनेकदा आपण ह्या गुन्ह्यात दुसऱ्यांना सहभागी करून आपले समर्थनही करतो. उदा. जेव्हा शमुवेलाने शौलाला विचारले की अमालेक्याची संपूर्ण छावणी नष्ट करायची देवाची आज्ञा तू का मोडली? तेव्हा शौल इतरांवर दोष घालून म्हणतो, “मी तर परमेश्वराचा शब्द पाळला आहे; परमेश्वराने मला पाठवले त्या मार्गाने मी गेलो आणि अमालेक्यांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग ह्याला घेऊन आलो आहे. पण ज्या लुटीचा नाश करायचा होता तिच्यातून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर ह्याला गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवली आहेत” (१ शमुवेल १५:२०-२१).
जेव्हा आपण आपला बचाव करू पाहतो तेव्हा आपण सुवार्तेच्या सत्याशी प्रतारणा करतो. “जर कोणी पाप केले, तर नीतिसंपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे” (१ योहान २:१). देवाच्या न्यायालयात पापी लोक आपला दावा लढताना तांत्रिकपणा, इतरांशी तुलना, स्व-धार्मिकता या मुद्द्यांच्या आधारे लढतात. तथापि पश्चात्तापी भग्न पापी सर्व आरोपांसाठी आपण दोषी असल्याचे मान्य करतो. तो त्याचा वकील जो येशू त्याच्या नीतिमत्तेवर आपली क्षमा सुरक्षित करतो – स्वत:च्या नव्हे. तो हे ही कबूल करतो की त्याच्या पापामुळे इतरांना हानी पोचली आहे आणि ज्यांचा गुन्हा त्याने केला आहे त्यांच्यासाठी ख्रिस्ताकडे तो आरोग्य मागतो.
जर तुम्हाला तुमच्या जीवनातील पापाबद्दल जाब विचारला तर तुमचा प्रतिसाद काय असतो? “ होय मी केले” की “हो, पण …” तुम्हाला लगेच समजेल की तुम्ही पूर्ण जबाबदारी घेत आहात की नाही.
खरा पश्चात्ताप नियंत्रण सोडून देतो.
पश्चात्ताप न करणारे ह्रदय हे एखाद्या धीट राजकारण्यासारखे आहे. त्याला त्या मामल्याच्या पुढे ठाकायचे असते म्हणजे सर्व कथा तो आपल्या ताब्यात घेऊ शकेल. धडकी, लाज, ओशाळवाणेपणा आणि दोषी भावना ह्या आपल्या निर्णयावर सावट घालू शकतात. ज्या गर्वाने आपल्याला पापाच्या धोक्यापासून अंध केले होते तोच गर्व आता पश्चात्तापाच्या प्रक्रियेत आपल्यावर नियंत्रण घेऊ लागतो.
यामुळेच खरा पश्चात्ताप हा सर्व सोडून देण्याची आणि सत्य कबूल करण्याची इच्छा दाखवतो. “माझ्या पापाचे परिणाम मी निवडणार नाही.” हीच वृत्ती दाविदामध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेली आपण पाहतो. नाथान संदेष्ट्याने त्याच्या पापाचे परिणाम सांगितल्यावर त्याने वाटाघाट केली नाही तर फक्त मान्य केले “मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे.” (२ शमुवेल १२:१३).
बऱ्याच वेळा आपण आपले पवित्रीकरण आखण्यास पाहतो पण तसे चालत नाही. आपल्यातले जे पाप देव मुळापासून काढून नष्ट करू इच्छितो त्याच पापाने येशूला – त्याच्या पुत्राला खिळे ठोकले. हे भयानक आहे. जेव्हा तुमची पत्नी, मित्र अथवा चर्चचा सभासद तुमचे पाप दाखवण्यास देव मध्ये आणतो ते कदाचित तुम्ही तुमचे पाप गंभीरपणाने घेत नसल्यामुळे असेल. तुम्हाला मदत हवी आहे. त्या क्षणाला खरा पश्चात्ताप म्हणतो, “खरं तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी पाप केलं आहे. आता मी काय करू ते सांगा.” पवित्रीकरण हा सांघिक प्रयत्न असतो. देवाच्या दया आणि ख्रिस्ताची प्रीती किती गहन आहे की त्याने आपल्या आत्म्याची काळजी इतरांवर सोपवली आहे…आणि ती इतर कोणावरही नाही तर जे आपल्यावर विनाप्रश्न प्रेम करतात त्या बंधू- भगिनींवर सोपवली आहे! जर आपण नियंत्रण सोडून दिले तर देव आपल्यातला जुना मनुष्य काढून टाकायला इतरांचा वापर करील.
खरा पश्चात्ताप शिस्तीचे मोल समजतो.
विश्वासीयातील खऱ्या पश्चात्तापाचे तिसरे चिन्ह म्हणजे देवाची शिस्त नीट समजून घेणे. बायबलमधून आपल्याला आठवण दिली आहे की, “कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो” (इब्री १२:६). भग्न ह्रदयाचा विश्वासी देवाच्या शिस्तीपासून पळणार नाही तर ती आपल्या पित्यापासून असलेली देणगी आहे असे मोल तिला देईल.
इब्रीकरांस पत्राचा लेखक पळवाट न शोधता म्हणतो, “कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते” (१२:११). तरीही पश्चात्तापी ह्रदय भरवसा ठेवते की, “तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतिकारक फळ देते” (१२:११). पापाची तीव्रता लक्षात घेऊन शिस्त म्हणजे नातेसबंध गमावणे, काम गमावणे, पाळकपण सोडावे लागणे, क्वचित तुरुंगातही जावे लागणे, असे होऊ शकते. पश्चात्तापी मन अशा वेदनामय शिक्षाही मान्य करेल कारण त्या दयाळू देवाच्या हातातून आल्या आहेत हे तो मान्य करतो. “ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की, जगाच्याबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये” (१ करिंथ ११:३२).
शिस्त म्हणजे नक्कीच गतकाळातील चुकांपासून पूर्वस्थितीला येणे. तसेच भावी नीतिमत्तेसाठी प्रशिक्षित होणे असाही त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ ज्या बंधू-भगिनींनी “देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये” (इब्री १२:१५) हा आदेश गंभीरपणे घेतला त्यांच्या मदतीची नोंद घेणे. स्थानिक मंडळी, जोडीदार, मित्र हे भविष्यात पापाच्या मोहापासून राखण्यास खंबीर पावले उचलण्यास मदत करण्यास आवश्यक आहेत. पुन्हा याचा अर्थ जीवनात कठीण व कठोर बदल स्वीकारावे लागतील.
अशा रीतीने आपल्यामध्ये नम्रता, एकमेकांवर अवलंबून राहण्याची वृत्ती, मंडळीमध्ये एकता या बाबी वाढवण्यासाठी पवित्र आत्मा आपल्यामध्ये कार्य करतो. कदाचित तुम्ही एका बंधूला एका कमकुवत विभागात मदत करत आहात तर तो तुम्हाला दुसऱ्या विभागात मदत करत आहे. आज तो तुम्हाला तुमच्या पापाबद्दल जाब विचारत आहे तर उद्या तुम्ही त्याला जाब विचारणारे असाल. अशा रीतीने खऱ्या पश्चात्तापाद्वारे मंडळीची प्रीतीमध्ये वृद्धी व्हावी आणि एकमेकांची ओझी वाहून ख्रिस्ताचा नियम पूर्ण करावा म्हणून पवित्र आत्मा मंडळीला सामर्थ्य पुरवतो (इफिस ४:१६; गलती ६:१).
Social