लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर अनुवाद : क्रॉसी उर्टेकर
प्रकरण १६
भग्न शरीरे (मार्क ५:७-८; १०: ३३-३४)
‘तुम्ही कधी शत्रूला ताब्यात घेतले आहे का?’ — ते कां कूं करत आहेत असे दिसले. मी का बरे मागील गोष्टी उकरून काढत होतो? बायबल खोलीतील काही वयस्कर लोक त्या काळातील होते. कोणी त्या काळी लढ्याचे नेतृत्व करणारे होते. ओवारापे अली व एलेके व्ही अली यांची गावात ‘बलवान’ वीर म्हणून आजही ख्याती होती. खोलीतील काहींनी सर्व चर्चा ऐकलेली होती तर काहींनी नव्हती. तरीही सर्वच येशू या मनुष्याचे चारित्र्य, त्याची शिकवण व त्याची कृत्ये याविषयी ऐकून भारावून गेले होते.
मार्काच्या ५व्या अध्यायात येईपर्यंत येशूने शिष्य गोळा केले होते, रोगी बरे केले होते, वादळ शांत केले होते, आणि त्याची एकूणच ओळख करून दिली होती. अशुद्ध आत्म्यांनी देखील तो कोण आहे याविषयी साक्ष दिली होती. गरेसेनच्या कबरांमधील बेभान मनुष्याला येशू केवढ्या धाडसाने सामोरा गेला हे तर फोलोपांना फारच आवडले होते. तो मनुष्य एक श्वापदच होता. कोणी मनुष्य त्याला काबूत ठेऊ शकत नव्हता की साखळ्या त्याला डांबून ठेऊ शकत नव्हत्या. रात्रन्दिवस तो कबरांमधून ओरडत असे व दगडाधोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे. त्याच्या वेदनांविषयी अधिक काही न सांगता पुढे त्याची सर्व शक्ती एकवटून तो येशूकडे धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडला असे म्हटले आहे.
“हे येशू , परात्पर देवाच्या पुत्रा तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो मला छळू नकोस.” कारण येशू त्याला म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून निघ” ( मार्क ५:७-८). आम्ही ‘छळ’ या शब्दापाशी अडकलो. म्हणून मी त्यांना प्रश्न केला होता की ‘तुम्ही कधी शत्रूला ताब्यात घेतले आहे का?’ त्यांनी होकार दिल्यावर मी विचारले, “तुम्ही त्यांना जेव्हा पकडले तेव्हा त्यांना काठ्यांनी किंवा इतर कशाने मार दिला होता का?” तोवर त्यांचे डोळे पांढरे पडलेले दिसले. कसेबसे हेपल धाडस करून बोलू लागला आणि मग हळूहळू इतर जण त्याला साथ देऊ लागले. आणि मी कधी ऐकले नाही असे छळाचे भयानक वर्णन माझ्या कानी पडू लागले…… पकडलेल्या माणसाला फोड येईपर्यंत ते त्वचेला मशालीने डाग देत किंवा त्याची कातडी गळेपर्यंत त्याच्या अंगावर उकळते पाणी ओतीत असत किंवा त्याला जमीनीवर उघडे करून उताणे झोपवीत आणि स्त्रियांना त्यांच्या खणायच्या काठ्यांनी विशेषत: खाजगी अवयवांवर मार द्यायला लावीत. किंवा त्याला खोडाला बांधून सुऱ्याने त्याच्या मांसाचा तुकडा काढून विस्तवावर भाजत व त्याच्यासमोर येऊन उभे राहात व “मी तुझे मांस खात आहे” असे त्याला सांगत एकेक घास खात असत.
आता मात्र हे ऐकत असता माझेच डोळे पांढरे पडले. साहजिकच असा छळ होण्यापेक्षा या योद्ध्यांच्या हस्ते जिथल्या तिथे मरणे पत्करले पण पकडले जाऊन त्यांच्या गावात हळूहळू असे मरणे नको; असे वाटणे योग्य होते. एका गटाविषयी इतका प्रखर द्वेष त्यांनी सतत बाळगला होता की त्या गावावर छापा घालून त्यांनी सगळे लोक मारून टाकले होते. इतके भयानक काहीच नसेल.
मी तर स्तंभित झालो होतो. माझ्या मनांत विचार आला, मी कोणासोबत काम करत आहे? मी फक्त एका शब्दाचा शोध घेत होतो, आणि आता तर जणू काही मी किल्लीने अधोलोकाचे दारच उघडत होतो. माझ्या प्रश्नाला त्यांनी दिलेला प्रतिसाद बरोबरच होता यात काही नवल नव्हते. छळासाठी त्यांच्याकडे असलेला शब्द सापडला. ‘सुसुपौ एरॅटापो.’ मार्क ५ मधील अशुद्ध आत्मे असे करत होते म्हणजे पृथ्वीवरील मानवांना आजवर तेच असे वागायला प्रोत्साहन देत होते…हे समजताच ह्या माणसांना भय वाटून त्यांचे डोळे पांढरे झाले होते यांत नवल नाही.
एक आठवड्याने आम्ही पुन्हा त्याच विषयावर आलो. आम्ही मार्क १० मध्ये होतो. येथे अशुद्ध आत्मे आपल्या नाशाला भीत नव्हते तर येशू आपले पुढे काय होणार आहे याचे भाकीत करत होता.
“पाहा, आपण वर यरुशलेमेस जात आहो, तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक व शास्त्री यांच्या स्वाधीन करण्यात येईल, ते त्याला देहांत शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील, आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील; आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल” ( मार्क १०: ३३-३४). पुन्हा आम्ही ‘फटके मारतील’ या शब्दांसाठी अडकलो.
“समजा कोणी आपल्या शत्रूला दोरासारख्या कशाने तरी मारत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता?” मी विचारले.
ते सगळे शून्यात पाहू लागले. चाबकाने किंवा दोरांनी मारणे त्यांना परिचित नव्हते. पण येशूबाबत हे सर्व घडणार होते आणि त्याबाबत ही वचने होती. म्हणून मी आणखी निराळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला.
खोलीतील कोपऱ्यामधील सामानात बोटाएवढी जाड, ३ फूट लांब वाळलेल्या द्राक्षवेलीची काटकी पडली होती ती मी उचलली. सामानातील चुलाण समजा ख्रिस्ताची पाठ व हा दोर समजा असे म्हणत मी शक्ती एकवटून त्यावर मारू लागलो. लागलीच ओवारापे अली डोळे वटारून व नाक फुगवून ओरडला, ‘फोकोसौ सिरापौ!’ तो माझ्या नजरेला नजर मिळवून हा अन्याय असल्याचे त्याच्या बसल्या जागेवरून सूचित करू लागला.
मी परत माझ्या टेबलापाशी गेलो आणि शब्द लिहिला, ‘फोकोसौ सिरापौ’.
“मला या शब्दाविषयी आणखी सांगा.” मी म्हणालो. ते सगळे माझ्याकडे नजरा रोखून पाहू लागले. ते पुन्हा जुन्या काळात चालले होते.
एक जण ओरडला, “एक मिनिट थांबा. तुम्हाला असे म्हणायचे आहे का की त्यांनी ख्रिस्ताला हे असे केले?”
“होय.”
‘पण येथे तो फक्त असे म्हणाला असे म्हटले आहे. खरेच त्यांनी त्याला असं केले?’
“होय.”
खोलीत भयाण शांतता पसरली. अखेर एलेकै व्ही अली म्हणाला, “आम्ही असे करायचो. पण फक्त आमच्या शत्रूंना ठार करण्यापूर्वी करायचो.”
“होय, आपण तेही पाहाणार आहोत.”
सर्वांच्या माना लज्जेने अस्वस्थ होऊन खाली गेल्या.
‘फटके मारतील’ म्हणजे फोकोसौ सिरापौ त्यांच्या मनांतील आठवण ताजी झाली. त्यांना क्रौर्याचे भीषण चित्र स्पष्ट होऊ लागले होते. माझ्या कल्पनेपलीकडे त्याचा कळस झाला होता. ज्याचा ते इतका सन्मान करत होते, जो त्यांचा अतिशय लाडका होता, त्याला हे सारे होणार होते! हा मनुष्य लहान मुलांना मांडीवर घेत होता, गरजूंना हात देऊन मदत करत होता, ज्याच्या मनात कोणाविषयी शत्रुत्व नव्हते. ह्या लोकांना मारहाण व छळ म्हणजे काय चांगलेच माहीत होते. हा येशू अशा प्रकारे दु:खसहन करायला आला हे ग्रहण करणे त्यांना फार जड जात होते.
सकाळपर्यंत थांबणे आम्हाला भाग होते.
Social