जनवरी 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

एक प्रसिध्द आणि विसरलेली प्रीती

मार्शल सीगल

पौलाच्या पत्रामध्ये दखल घेण्यासारख्या एका सुंदर विवाहाकडे बऱ्याच जणांचे लक्षही जात नाही. ह्या विवाहाने पौलाचे ह्रदय काबीज केले असावे. तो लिहितो, “ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना सलाम सांगा; त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्यांही मानतात” (रोम १६:३-४).

त्यांनी त्यांच्या जीवनातल्या सर्व परिस्थितीत व प्रत्येक टप्प्यांवर जो विश्वासूपणा आणि फलदायीपणा दाखवला त्याची आपणही इच्छा करायला हवी.

एक ऐकणारी प्रीती

प्रीस्किल्ला आणि अक्वील्ला ही दोघे देवाच्या वचनाची मुले असल्याचे दिसून येते. ज्यांना त्यांची नावे ठाऊक आहेत त्यांना आठवेल की अपुल्लो ह्या प्रभावी व निपुण शिक्षकाला त्यांनी पुढे येऊन त्याची चूक दाखवली. लूक अपोल्लो बद्दल म्हणतो, “तेव्हा अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता व शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहूदी इफिसास आला. त्याला प्रभूच्या मार्गाविषयीचे शिक्षण मिळालेले होते; आणि तो आत्म्याने आवेशी असल्यामुळे येशूविषयीच्या गोष्टी नीट सांगून शिक्षण देत असे; तरी त्याला केवळ योहानाचा बाप्तिस्मा ठाऊक होता” (प्रेषित. १८:२४-२५). आणि तरीही “तो सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला” (प्रेषित १८:२६).

त्यांनी अपुल्लोचे ऐकले, त्याला बाजूला नेले आणि देवाचा मार्ग अधिक अचूकतेने स्पष्ट केला. पुरुष आणि स्त्री या नात्याने त्यांचे पाचारण निराळे होते आणि ते एकत्र राहून सेवा करीत असत. आणि त्यामुळे त्यांच्या विवाहाची व सेवेची भरभराट झाली. आपले किती विवाह झगडतात, हानी सोसतात कारण एक जोडीदार दुसऱ्यावर बायबल वाचन व अभ्यासाचे काम सोपवून देतो?

जरी प्रत्येक चांगला विवाह प्रीस्किल्ला व अक्वील्लासारखा दिसणार नाही तरी प्रत्येक विवाहाने आपले नाते दररोज शास्त्रलेखाच्या खोल विहिरीमध्ये चिंब करून घ्यायला हवे. जर आपण देवाचे वचन आपल्या विवाहाचे पुनरुज्जीवन करायला (स्तोत्र १९:८), आपली सुज्ञता प्रकाशित करायला (१९:७ ),  ह्रदयाला आनंदित करायला, आपली मने शुद्ध करायला (१९:८) आपले निर्णय स्थिर करायला  (१९:९) वापरतो, जर त्याच्या आवाजाने आपल्या जवळीकेला गोडवा दिला तर (१९:१०)?

सहन करणारी प्रीती

वचनाशी असलेला त्यांचा विश्वासूपणा पाहण्यापूर्वी आपण त्यांना त्यांच्या दु:खसहनात भेटतो. जेव्हा पौल करिंथला आला “तेव्हा पंत येथील अक्‍विल्ला नावाचा कोणीएक यहूदी त्याला आढळला. सर्व यहूद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता; त्यांच्याकडे तो गेला” (प्रेषित १८:१-२). जेव्हा पौल त्यांना भेटला तेव्हा त्यांना नुकतेच त्याच्या घरातून हाकलून लावले होते, केवळ ते यहूदी होते म्हणून. तेव्हा पौल त्यांच्यासोबत राहून सेवा करू लागला. नंतर करिंथ येथील मंडळीला आणखी मोठ्या विरोधाला आणि छळाला तोंड द्यावे लागले (प्रेषित १८:६, १२, १७). अखेरीस त्यांना इफिसला पळून जावे लागले (अपुल्लोला ते येथेच भेटले व मार्गदर्शन केले). येथेही मंडळीचा तीव्र छळ सुरू झाला (प्रेषित १९:२३). पौल कोणत्या संदर्भाचा उल्लेख करत होता हे आपल्याला ठाऊक नाही पण त्याने रोमकरांस पत्रामध्ये लिहिले,  “ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना सलाम सांगा; त्यांनी माझ्या जिवाकरता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्यांही मानतात” (रोम १६:३-४). आपल्या घराच्या सुरक्षेमध्ये न जाता त्यांचा विवाह छळ दु:ख यांना तोंड देत होता आणि धोके, संघर्ष व त्याग करायला ते सतत तयार होते.

कष्ट करणारी प्रीती

त्यांच्या एकत्रित जीवनाची झलक आपण पाहतो. पौलाने प्रीस्किल्ला व अक्विल्ला यांच्यासोबत राहणे पसंत केले. कारण त्यांच्या उपजीविकेचा धंदा एकच होता. “तेव्हा पंत येथील अक्‍विल्ला नावाचा कोणीएक यहूदी त्याला आढळला. सर्व यहूद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटलीहून नुकताच आला होता; त्यांच्याकडे तो गेला. आणि त्यांचा व ह्याचा व्यवसाय एकच असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालवला; त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता” (प्रेषित १८:२-३). त्यांची पौलाशी मैत्री ही लाकूड, दोऱ्या, आणि खांब यांच्यासोबत उभारली गेली – दुसऱ्या शब्दात सामान्य काम करताना.

आपल्याला हे दिसू शकते की, त्या दोघांनी जगण्यासाठी व सेवेसाठी किती खडतर कष्ट केले. त्यांनी वचनाची सेवा करायला स्वत:ला वाहून घेतले होते पण तरी हा त्यांचा व्यवसाय नव्हता. येशूमध्ये असलेला खऱ्या विसाव्याची त्यांनी चव घेतली होती आणि म्हणून या पतन झालेल्या जगात विश्वासू जीवनाने काम करणे त्यांनी कवटाळले.

विवाह, कुटुंब आणि सेवा यासाठी लागणारे कष्ट व घाम यामुळे आपल्यातले कितीजण मनात कुढतात अथवा मोठ्याने तक्रारीही करतात? विश्वासूपणा (आणि टिकून राहणे) यासाठी चांगल्या नोकऱ्यांची गरज नाही तर दोघांनी आनंदाने व त्यागपूर्वक केलले कठोर परिश्रम हे निरोगी व फलदायी विवाहाचे चिन्ह आहे.

स्वागत करणारी प्रीती

प्रीस्किल्ला व अक्विल्ला यांनी मंडळीत विविध प्रकारची सेवा केली इतकेच नाही पण त्यांनी मंडळीचेच आपल्या घरी स्वागत केले. आपल्याला समजते की इफिस ( १ करिंथ १६:१९) आणि रोममध्ये त्यांच्या घरामध्ये मंडळी जमत असे. पौल रोमकरांसमध्ये लिहितो; “माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना सलाम सांगा…जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा” (रोम १६:३-५). त्यांचे विवाह दाखवणारे हे छोटे झरोके आहेत पण जेव्हा पहिल्या शतकातील मंडळीला जो विरोध आणि छळ सहन करावा लागला त्याचा विचार केला तर याची सत्यता अधिकच पटते. आपल्याला ठाऊक आहे की त्याने व्यक्तिश: त्यांच्या पाहुणचाराचा अनुभव घेतला होता (प्रेषित १८:३,४). आणि त्यांच्या इतर अनेक ठिकाणच्या घरामध्येही (प्रेषित १८:१८,१९, १ करिंथ १६:१९). आणि त्यांचा विचार करताना तो आपल्याही विवाहांचा विचार करत आहे. ख्रिस्ती विवाह हे आदरातिथ्य करणारे विवाह असतात कारण देव तशी आज्ञा करतो, “कुरकुर न करता एकमेकांचा पाहुणचार करा” (१ पेत्र ४:९). आणि इतर कोणत्याही सेवेप्रमाणेच आदरातिथ्य आपल्या ह्रदयात असलेला प्रकाश दाखवते. त्यासाठी आपल्याला घरी मंडळी भरवायची असे नाही. इतरांना सतत घरात घेतल्याने होणारी गैरसोय व खर्च आपण आनंदाने स्वीकारायला हवा. ख्रिस्ती विवाहाचे कोठेही आणि प्रत्येक टप्प्यावर खऱ्या आणि आनंदाने केलेले आदरातिथ्य हे चिन्ह असायला हवे.

मुलाबला करणारी प्रीती

अपुल्लोशी झालेला वाद अक्विल्ला व प्रीस्किल्ला यांचे असामान्य गुण दाखवतो: चुकीला सामना देण्यास तयार – एका प्रसिध्द आणि सन्मान्य शिक्षकाशी सुद्धा. अपुल्लो हा साधासुधा शिक्षक नव्हता. “अपुल्लो नावाचा एक मोठा वक्ता व शास्त्रपारंगत आलेक्सांद्रियाकर यहूदी इफिसास आला” (प्रेषित १८:२४). तो उच्चशिक्षित असा शुभवर्तमानाचा समर्थ पुरस्कर्ता होता. तरीही अक्विल्ला आणि प्रीस्किल्ला जेथे त्याची चूक होती तेथे त्याच्याशी सामना करायला तयार झाले. निरोगी वादासह येणारी सुधारणूक स्वीकारायला ते तयार होते आणि त्यांनी त्याला प्रीतीने सत्य दाखवून दिले (इफिस ४:५). आणि फक्त एका वचनात त्यांच्या निषेधातली प्रीती दिसून येते. “तो (अपुल्लो) सभास्थानात निर्भीडपणे बोलू लागला, तेव्हा प्रिस्किल्ला व अक्‍विल्ला ह्यांनी त्याचे भाषण ऐकून त्याला जवळ बोलावून घेतले व त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखवला” (प्रेषित १८:२६). प्रीतीने त्यांनी त्याला चुकीचा विश्वास धरून तो शिकवू दिला नाही.  त्याचा अपमान करून सर्वांसमोर त्याची शोभा करण्याऐवजी प्रीतीने त्यांनी त्याला बाजूला नेले. बहुतेक वेळा प्रीती ही खाजगी रीतीने चूक दाखवते (मत्तय १८:१५).

अशा प्रामाणिकपणाने, प्रीतीने व आशेने खिस्ती लोकांनी व दांपत्यांनी धैर्याने असे सामोरे जाण्याची किती गरज आहे! अशी प्रीती त्या क्षणी जरी कठीण आणि कटू वाटली तरी बहुधा ती फळ देते.

विस्तार करणारी प्रीती

प्रीस्किल्ला व अक्विल्ला यांनी फक्त अपुल्लोलाच सरळ मार्गावर आणले असे नाही तर तो ज्या ज्या शहरात आणि मंडळ्यात गेला त्यांना आशीर्वादित केले. “नंतर त्याने (अपुल्लोने) अखया प्रांतात जाण्याचा बेत केला, तेव्हा बंधुजनांनी त्याला उत्तेजन दिले आणि त्याचे स्वागत करण्याविषयी शिष्यांना लिहिले; तो तेथे पोहचल्यावर ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहूद्यांचे खंडण करत असे” ( प्रेषित १८:२७-२८) तो यहूदी लोकांचे समर्थपणे  खंडन करून त्यांना ख्रिस्ताविषयी शास्त्रलेख काय म्हणतात त्याचे सत्य दाखवू शकला. हे केवळ अक्विल्ला व प्रीस्किल्ला यांच्या विश्वासूपणा व धैर्यामुळे झाले.

पौल जेव्हा म्हणतो, “ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्‍विला ह्यांना सलाम सांगा; …त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्यांही मानतात” (रोम १६:३-४) तेव्हा ह्याच फलद्रूपतेची आपण चव घेतो. सर्व मंडळ्या आणि विदेशी लोकांनी या विवाहाबाबत ऐकले होते – त्यांचा विश्वास, धैर्य, सुज्ञता, आदरातिथ्य, दु:खसहन आणि प्रीती. जरी प्रत्येक विश्वासू विवाहाला इतका प्रभाव पाडता येणार नाही तरी प्रत्येक प्रत्येक विश्वासू विवाहाने काही दिसेल असा त्यागाचा अनंतकालिक प्रभाव मंडळीवर पडायला हवा.

सर्व ख्रिस्ती प्रीती ही विस्तार करणारी आहे कारण ती अधिक लोकांना आपल्या विश्वासात, आशेत आणि आनंदात येण्याची इच्छा करते. खरी प्रीती ही फक्त आपल्या लोकांसाठी स्वार्थी नसते तर ती उदार, कनवाळू, सेवाभावी, धोका घेणारी असते. प्रीती म्हणते , “जसा आपल्याला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे” (गलती ६:१०).

प्रीस्किल्ला व अक्विल्ला यांनी एकत्रितपणे अनेक चांगल्या गोष्टी केल्या आणि विशेषकरून जे त्यांच्यासोबत येशूसोबतचा आनंद उपभोगत होते त्यांच्याबरोबर. आणि हे करताना त्यांनी काही नियम किंवा कायदे लावून दिले नाहीत तर आपल्या विवाहांसाठी एक आकांक्षा व वारसा समोर ठेवला.

Previous Article

आत्म्याचे फळ – शांती

Next Article

सामान्य भक्तीचे शांत सामर्थ्य

You might be interested in …

फ्रान्सिस झेवियर

इ.स. १५०६ ते १५५२ प्रकरण ६  आधुनिक काळात स्थापन झालेल्या मिशनांपूर्वी आलेल्या मिशनरींपैकी ज्यांची छाप भारतातील ख्रिस्ती जगतावर पडली अशा दोन व्यक्तींची नावे घेतली जातात. प्रेषित थोमा आणि सोळाव्या शतकातील फ्रान्सिस झेवियर, थोमाला ‘भारताचा प्रेषित’ […]

पक्षांपासून सावध राहा

ग्रेग मोर्स दर रविवारी सकाळी ते आमच्यामध्ये येतात. काळजीपूर्वक ऐकले तर त्यांचे पंख फडफडणे तुम्हाला ऐकू येईल. गाण्याचा आवाज बंद होतो , पाळक पुलपिटवर येतात. पुस्तक उघडले जाते. या मानवाद्वारे देव आज आपल्याशी काय बोलणार […]

“ माझं गौरव” (॥I)

कशासाठी गौरव ? ज्या कारणास्तव तो हे वैभवी शब्द बोलतो, ते नको का समजून घ्यायला? त्यांनी असं काय केलं? म्हणून तो हे बोलतो? या महायाजकीय प्रार्थनेत तो त्यांच्याविषयी सात विधानं करतो. ती लक्षपूर्वक पाहा. आपल्याविषयी […]