दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

माझ्या पापाचा अनंतकालिक पारितोषिकावर परिणाम होतो का?

जॉन पायपर

Beautiful Beam of light and the clouds

ब्रॅंडनचा प्रश्न-  बायबलमध्ये स्वर्गात मुगुटांची पारितोषिके मिळतील असे लिहिले आहे. येणाऱ्या जीवनात मला  खूप आनंद हवा आहे. पण या जीवनात मला वाटते की मी सतत पाप करतो. आणि प्रत्येक वेळेला मी पाप केले की मला वाटते माझे अनंतकालिक पारितोषिक माझ्या हातातून निसटत आहे. माझी शिल्लक नेहमी शून्यावर जाते, ती पुढे जातच नाही. अशा प्रमाणात मला स्वर्गात काही पारितोषिक असणार नाही. की माझे विचार अप्रचलित आहेत? मला कृपया मार्गदर्शन कराल का?

उत्तर- स्वर्गामध्ये सर्वाधिक आनंद मिळावा हा विचार अगदी योग्य आहे. पण त्यामागचे ध्येय देवामध्ये सर्वोच्च  समाधान मिळावे आणि त्याच्या कृपेद्वारे  दिलेल्या पारितोषिकांचा आनंद दुय्यम असणार असे असेल तरच. अशा इच्छेला आपण आमेन म्हणू या. ब्रॅंडन तुला जर वाटते की तू रोज पाप करतोस तर ते बरोबर आहे – आणि आपण सर्वच जण रोज पाप करतो. आपल्यापैकी कोणीच देवावर जसे करायला हवे तसे प्रेम करू शकत नाही. आपल्या सर्वात चांगल्या कृत्यांमध्ये सुद्धा खेद वाटावा असे काही असतेच.

स्वर्गीय खातेवही नाही

ब्रॅंडनने म्हटले, “प्रत्येक वेळेला मी पाप केले की मला वाटते माझे अनंतकालिक पारितोषिक माझ्या हातातून निसटत आहे. माझी शिल्लक नेहमी शून्यावर जाते.” असे म्हणण्याने बायबलमध्ये जे लिहिले आहे ते समजण्यात त्याने एक गंभीर चूक केली आहे. ती चूक अशी आहे: त्याच्या म्हणण्यानुसार पारितोषिके दिली जातील ती फक्त चांगल्या कृत्यांसाठी नाही तर अशा चांगल्या कृत्यांसाठी की ज्यांचा आकडा वाईट कृत्यांना पार करून पुढे जाईल. दुसऱ्या शब्दांत तू जर पाच चांगली आणि चार वाईट कृत्ये केली तर तुला एका चांगल्या कृत्यासाठी बक्षीस मिळेल. जर तू पाच चांगली आणि पाच वाईट कृत्ये केली तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुझी शिल्लक शून्य झाली. आता ही कल्पना तुला कुठून मिळाली मला माहीत नाही पण हे का बरोबर नाही हे दाखवणारी काही वचने मी तुला बायबलमधून दाखवतो. असा खातेवहीचा विचार न करता पारितोषिकांचा निराळ्या प्रकारे विचार करायला हवा.

कुठलेच पारितोषिक मुकले जाणार नाही

प्रथम आपण मत्तय १० :४१-४२ पासून सुरुवात करू या: “संदेष्ट्याला संदेष्टा म्हणून जो स्वीकारतो त्याला संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्याला नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल. आणि ह्या लहानांतील एकाला शिष्य म्हणून जो कोणी केवळ गार पाण्याचा एक प्याला पाजतो तो आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही असे मी तुम्हांला खचीत सांगतो.”

तुम्हाला एखाद्या ख्रिस्तशिष्याची खिस्ताला उंचावणारी सेवा आवडते त्यामुळे त्या शिष्याला थंड पाण्याचा पेला दिल्यानंतर दिवसभरात समजा तुम्ही तुमच्या मुलाशी कठोरपणे बोललात तर तुम्ही तुमच्या पारितोषिकाला मुकाल असा कुठलाच इशारा इथे दिलेला नाही. इथे लिहिले आहे की, तुम्ही आपल्या प्रतिफळाला मुकणारच नाही.

आता जर तुम्ही कायम प्रीती न करणारे जीवन जगून तुम्ही विश्वासी नाही असे सिद्ध केले तर तुमची सत्कर्मे ही चांगली कृत्ये नाहीत कारण ती तुमच्या विश्वासाद्वारे आलेली नाहीत. पण जर तुम्ही विश्वासी आहात तर विश्वासाद्वारे तुम्ही केलेली सकाळी चांगली कृत्ये ही दुपारी केलेल्या कठोर बोलण्याने रद्द केली जात नाहीत. येशू किंवा नव्या करारातील कोणीच असा विचार करत नाही.

अग्नीद्वारे परीक्षा

आता १ करिंथ ३:१३-१५ वर विचार करा: “तर बांधणार्‍या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल, त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वत: तारला जाईल; परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.”

आता येथे स्पष्ट आहे की हा अग्नी म्हणजे तुमचे खाते नाही. अग्नी म्हणजे चांगली आणि वाईट कृत्ये मोजणे नाही. अग्नी अशा प्रकारे काम करत नाही. तो काही मोजत नाही. तो फक्त लाकूड, गवत, पेंढा जाळून टाकतो. तो निरुपयोगी, अपायकारक कामे अथवा शिक्षण जाळून टाकतो. त्यातून जाणारे या अग्नीत टिकतील आणि या आगीत कितीही वाईट कामे भस्म झाली असली तरी ते वाचतील. जर आपण खरे विश्वासी असू तर आपली चांगली कामे टिकून राहतील.

बायबलचे न्यायाचे हे चित्र ब्रॅंडनच्या चित्रासारखे नाही जे चांगली कृत्ये आणि वाईट कृत्ये मोजते आणि जी चांगली कृत्ये वाईट कृत्यांपेक्षा अधिक आहेत त्यांनाच फक्त पारितोषिक देते. बायबलनुसार न्याय असा नाही. 

जे काही चांगले

आता इफिस ६:८ वर विचार करा: “कारण तुम्हांला माहीत आहे की, प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो, तेच तो प्रभूकडून भरून पावेल.” येथेही वाईट कृत्यांपेक्षा अधिक केलेल्या चांगल्या कृत्यांसाठी प्रतिफल मिळेल असा काहीही उल्लेख नाही.

तसेच लूक १४:१३-१४ पाहा “तर तुम्ही मेजवानी द्याल तेव्हा दरिद्री, अपंग, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण करा; म्हणजे तुम्ही धन्य व्हाल, कारण तुमची फेड करण्यास त्यांच्याजवळ काही नाही; तरी नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची फेड होईल.”

म्हणजे जर एखाद्या ख्रिस्तजन्माच्या दिवशी तुम्ही गावाबाहेरून शिक्षणासाठी आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना, किंवा ज्यांना कोणी नाही अशा वृद्धांना जेवायला बोलावले आणि येशूच्या नावाने तुमच्या जवळ जे आहे ते आनंदाने त्यांना दिले तर हे वचन म्हणते की पुनरुत्थान समयी त्याची परतफेड केली जाईल. समजा पुढच्या वर्षी तुम्ही स्वार्थीपणाने अशा संधीचा फायदा करून घेतला नाही, तर दुसऱ्या वर्षाची कृती जळून जाईल पण पहिल्या ख्रिस्तजन्माच्या कृतीला पुनरुत्थानसमयी प्रतिफळ मिळेल.

सर्व चांगले देवापासून
ह्या प्रकारच्या विचारामागचे तत्त्व असे आहे: ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील सत्कृत्यांना प्रतिफळ मिळेल कारण ती सुंदर आहेत. आणि हे सौंदर्य त्या व्यक्तीच्या जीवनात देवाने जे पुनर्जीवनाचे आणि पवित्रीकरणाचे कार्य केले आहे त्यामुळे आले आहे. आपण खऱ्या रीतीने चांगले करतो कारण देवाने आपल्याला नवा जन्म दिला आहे- आध्यात्मिक रीतीने जिवंत केले- आणि त्याचा आत्मा आपल्यामध्ये त्याच्या दृष्टीला जे आनंद देणारे आहे ते करवून घेतो (इब्री १३:२१).

ह्या पारितोषिकांद्वारे देव खात्री करून देतो की आपला खरा नवा जन्म झाला आहे, आपण खऱ्या रीतीने ख्रिस्तामध्ये आहोत आणि त्याचे पुत्र आहोत. हे इतके महत्त्वाचे आहे की ते आपण कधीही विसरू नये. “कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली” (इफिस २:८-१०).

या भागाचा मुद्दा आहे की केवळ देव आणि देवच आपल्या चांगल्या कृत्यांचा उगम आहे. म्हणून जेव्हा ह्या कृत्यांसाठी आपल्याला प्रतिफळ मिळेल तेव्हा देवाबद्दल उत्सव केला जाईल. आणि जरी आपल्या जीवनात इतर उरलेली पापे असली तरी देवाच्या हस्तकृतीला म्हणजे आपल्याला योग्य प्रतिफळ मिळाल्याशिवाय  राहणार नाही. 

Previous Article

सामान्य भक्तीचे शांत सामर्थ्य

Next Article

उगम शोधताना

You might be interested in …

विश्वासाची संधी फक्त इथेच

“ परंतु असली चिन्हे त्याने त्यांच्यासमक्ष केली होती तरी देखील त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही” ( योहान १२:३७). तारण हे विश्वासानेच होते. तारणाकरता त्याची निकडीची गरज आहे. नि ज्यामुळे लोकांनी विश्वास ठेवावा असली अनेक कामे […]

स्वर्गाचीउत्कट इच्छा

(५) (अ) पवित्र शास्त्रानुसार ‘सध्याच्या ‘स्वर्गाच्या ३ पातळ्या आहेत– पहिली वातावरणाची, दुसरी ग्रहमंडळाची व तिसरी ही अनंतकाळाची. मृत्यूनंतर- देवाने जिवंत असतांना त्याच्याकडे घेऊन जाण्यामुळे-‘विश्वासणारी व्यक्ती सरळ ‘तिसऱ्या पातळीच्या’ स्वर्गांत जाते व म्हणून आम्हीही सर्व विश्र्वासणारे […]