नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

प्रकरण १८: मोबदला

लूक २२:१९-२०

फुकुटाओत राहायला आल्यापासून देवाने आम्हाला आमच्या अज्ञानामुळे घडणाऱ्या दुष्परिणामांपासून वाचवले आणि त्यात अजूनही बदल झालेला नाही. पण अशा घटनांपासून आम्ही बरेच काही शिकलो आहोत.

अगदी प्रथम आम्ही फुकुटाओत राहायला आलो तेव्हा प्रत्यक्षात आम्हाला मोबदल्याविषयीचा धडा मिळाला. आम्ही तेथे जाण्यापूर्वी त्यांच्याविषयी बरीच पुस्तकी माहिती मिळवली होती, प्रशिक्षण घेतले होते, पण तेथे प्रत्यक्ष राहिल्यावर येणारे अनुभव त्याहून पुष्कळ वेगळे होते.

आम्ही आमचे घर बांधत होतो. लाकूडकाम करायला मी छपरावर चढलो होतो. सभोवती पुष्कळ लोक जमले होते. कोणी बघत होते तर कोणी मदत करत होते. मी हातोडी मागितली. दुसऱ्या गावचा वेई अली नावाचा मुलगा होता . त्याने मला देण्यासाठी हातोडी वर धरली ती ओढताना झावळ्यांमध्ये अडकल्याने माझ्या हातातून सटकली आणि तिच्या धारेची कड वेई अलीवर पडताना घाव करून गेल्याने त्याला छोटीशी जखम झाली. देवाच्या दयेने जखम किरकोळ होती, पण शर्ट फाटला होता. शर्ट तसा जीर्ण, मळकट कळकटच होता. पण लागलीच मोठा कल्लोळ माजला. त्यांची भाषा समजत नसल्याने कोण काय म्हणत आहे ते मला काही समजत नव्हते. लोक काही भयंकर घडल्याच्या अविर्भावात  एकदा वेई अलीकडे व एकदा माझ्याकडे पाहात होते. मी पटकन छतावरून उतरलो. प्रथमोपचाराची पेटी काढली त्याच्या जखमेवर मलमपट्टी करून बॅंडेज बांधले. एवढ्यावरच ते संतुष्ट झाले नव्हते त्यांना आणखी काही अपेक्षित होते. तणाव दिसत होता आणि ओरडा वाढतच होता आणि ते वाट पाहात होते. पण मला त्यांचे म्हणणे भाषा समजत नसल्याने लक्षात येत नव्हते. वेई अली आपल्या फाटक्या जीर्ण शर्टकडे व माझ्याकडे पाहत होता. कदाचित मी शर्टचे पैसे दिले तर त्याला बरे वाटेल असे समजून मी त्याला काही डॉलर्स दिले. लागलीच सर्व वातावरण बदलून गेले. तो गोड हसला व न्याय मिळाल्याच्या अविर्भावात शांत झाला. मी योग्य केल्याची मला पावती दिल्याप्रमाणे सर्व पूर्ववत झाले. मी योग्य काळजी घेतली होती, जखमेला मलमपट्टी केली होती, शर्टचा मोबदला दिला होता, पण त्यांच्यासाठी याला फार गहन अर्थ होता.

तेथे अपघात लक्षात घेतले जात नाहीत. कळत नकळत काहीही इजा होवो, योग्य ती भरपाई दिलीच पाहिजे असा त्यांचा कडक नियम असतो. त्यांच्या जमातीतील या परंपरेशी झालेला हा माझा पहिलाच मुकाबला होता. आदिवासींच्या लढ्याचे ‘डोळ्यासाठी डोळा व दातासाठी दात’ हे मूलभूत तत्त्व असे: मी चेहऱ्याला इजा केली म्हणजे मी त्याच्या मूळ चेहऱ्याची हानी केली, म्हणजे मी त्याची भरपाई करून द्यायची ही माझी नैतिक जबाबदारी होती.

त्यामुळे ह्या  लोकांना हे समजावून सांगणे सोपे जात असे की देवाला नैतिक दृष्ट्या दुखावले तर त्याची भरपाई करणे का गरजेचे आहे. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तिबरोबर पाप करील पण शेवटी ते पाप देवाविरुद्ध असते. त्याने म्हटले आहे की : लबाडी करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको. यातील एकही नियम मोडल्यावर काही तरी केलेच पाहिजे. त्या मनुष्याचीच नव्हे तर देवाला दुखवल्याबद्दल त्याचीही मोबदला भरून भरपाई केली पाहिजे. आपल्यामध्ये हे करण्याची कुवत नाही. म्हणून देवाने आपल्यासाठी पुढाकार घेतला, याविषयीच सुवार्तेचा संदेश आहे. सुवार्ता समजलेल्या फोलोपांना हे माहीत आहे. येशूचे मरण हे आमच्या गुन्ह्यांसाठी भरलेला मोबदला आहे. कोणासाठीही बोजड असलेली भरपाई येशूने भरून दिली. तो स्वेच्छेने जे मरण सहन करून मरण पावला, ते फोलोपांसाठी फारच अर्थपूर्ण आहे. आपल्यापेक्षा या सत्याविषयी ते अधिक संवेदनशील आहेत. फोलोपांना विचारपूर्वक कृती करण्यास प्रवृत्त करायला फार वेळ लागत नाही.

वरील घटनेनंतर आम्ही एक वर्षाने लूक २२ मधील मोबदल्यास सामोरे गेलो. हा शास्त्रभाग काही सोपा नव्हता. येशू आपल्या शिष्यांबरोबर शेवटचा वल्हांडण सण पाळत होता. त्यातील यज्ञपशुच्या अर्पणाचे चिन्ह खुद्द त्याच्या मरणामध्ये थोड्याच अवधीत पूर्ण होणार होते. मानवाच्या पापासाठी तो पित्याला संतुष्ट करून समेट घडवून आणणार होता. या जुन्या चिन्हांची पूर्णता करून त्याने नवीन गोष्टी स्मरणार्थ करायला लावून दिल्या. त्याचे शरीर मोडले जाण्याच्या स्मरणार्थ भाकर व रक्त सांडले जाण्याच्या स्मरणार्थ द्राक्षारस.

“मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना ती देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे; ते तुम्हांसाठी  दिले जात आहे . माझ्या स्मरणार्थ हे करा.” त्यानंतर भोजन झाल्यावर त्याने म्हटले, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे” (लूक २२:१९-२०). ‘शरीर’  या शब्दापाशी आम्ही अडलो. त्यांना त्याचे भाषांतर ‘ मांस’ असे हवे होते कारण त्यांचे पाळक तसेच म्हणायचे. त्यांची तशीच पद्धत होती. फोलोपांमध्ये प्रभुभोजनविधी अत्यंत गांभीऱ्याने होतो. ते द्राक्षे व भाकरीऐवजी लिंबूरस व रताळे वापरतात. तेच त्यांच्याकडे उपलब्ध असते. भाषांतर करताना त्यांनी मला रताळे शरीरासाठी व लिंबूरस रक्तासाठी कसे समर्पक चिन्ह आहेत यांचे स्पष्टीकरण केले. त्यांचा मुद्दा ऐकून मी त्यांच्याशी सहमत झालो नाही. कारण मानवी मांस खाण्याची फोलोपांमध्ये प्रथा होती. त्यामुळे त्यांचे अर्थ समर्पक नव्हते. येशू येथे मांसाविषयी बोलतच नाही. तो शरीराविषयी बोलत आहे; आणि शरीरासाठी फोलोपात शब्द आहे, टिकी. यावर आम्ही थोडा वेळ चर्चा केली. त्याने आपल्या शरीराने या भूतलावर सेवा केली, धिक्कार झेलला व मरण पावला. त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे मन, इच्छा, भावना, आत्मा हे सर्व  या कृतीत कार्यरत होते. त्याच्या संपूर्ण शरीराने आपल्या पापांसाठी शिक्षा सहन केली.

त्याने आपली शिक्षा स्वत:वर, त्याच्या संपूर्ण शरीरावर घेतली. आणि रक्त म्हणजे रक्त. हा शब्द सरळ वापरला आहे.

रक्त हे जीवनाचे दर्शक आहे. अत्यंत गंभीर कराराशी रक्ताचा संबंध आहे. ‘करार’ साठी आम्ही शब्द वापरले: ‘बंधनकारक सहमती असणे.’ पण ह्या बंधनकारक सहमतीशी बांधील राहण्यात रक्ताचा काय सहभाग आहे हे समजावून सांगणे फार कठीण होते.

येशू म्हणत आहे की, ‘हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे.’ रक्ताचा ह्यात  सहभाग आहे, ही कोड्यात पाडणारी बाब होती. ‘माझ्या रक्तात’ हे सहमत असणे कसे होऊ शकते?

मी पुष्कळ भाषांतरांमधून पर्याय अर्थाचा शब्द शोधण्यासाठी प्रयत्न केला. पूर्ण अर्थ न समजताच हे फोलोपा लोक कित्येक वर्षे प्रभुभोजन घेत होते. शेवटी आम्ही ‘येशूने बंधनकारक सहमती आपल्या रक्ताने अस्तित्वात आणली’ असे भाषांतर केले व रक्ताने करार अस्तित्वात आणला हे दाखवून रक्त व करारातील संबंध स्पष्ट केला. येशूने आपल्या रक्ताने ती बंधनकारक सहमती घडवून आणली.

फोलोपांना या गोष्टी फार महत्त्वाच्या वाटतात की, येशू खरोखर जगला, त्याने दु:खसहन केले, आणि त्यांच्यासाठी मरण पावला. प्रभुभोजनाच्या वेळी तर प्रकर्षाने ते या बाबींचे स्मरण करतात. जरी ते त्यांना खऱ्या अर्थाने स्पष्ट झाले नव्हते तरीही! पण आता त्यांना ते स्पष्ट झाले होते. एक जीव मारला जाणे एवढ्याचेच ते रक्त चिन्ह नव्हते तर देव त्याच्याशी संमत व सहमत असल्याचे देखील ते चिन्ह होते.

करार नेहमी दोन व्यक्तींमध्ये होतो… येथे तो मानव व देव यांच्यामध्ये व्हायला हवा होता, पण मानव चुकणारा असल्याने तो आपली बाजू दृढ राखू शकणार नव्हता. त्यामुळे देवाने स्वत:शीच आपल्या पुत्राद्वारे करार केला . देवाच्या पुत्राच्या रक्ताने बांधून घेऊन तो करार कायमस्वरूपी केला. फोलोपांना हे महत्त्व लक्षात आले. प्रभुभोजनाच्या वेळी आपण फक्त येशूच्या वधस्तंभावरील प्रत्यक्ष मरणाचे स्मरण करत नसतो तर देवाने आपल्या पुत्राद्वारे आपल्या वतीने केलेल्या कराराचे  देखील स्मरण करत असतो.

मोबदला पूर्णपणे भरून देण्यात आला. कोणत्याही समाजगटासाठी हे क्रांतीकारक सत्य आहे.  विशेषत: ज्या समाजात भरपाई देणेच सर्वस्व आहे तेथे तर जास्तच.

खोल अर्थाने हा मूळारंभ, ‘बेटे’ होता.

Previous Article

जेव्हा येशू पुन्हा येईल

Next Article

आणखी एक नवे वर्ष दरवाजा ठोकत आहे

You might be interested in …

राजा होण्यास लायक असा पुत्र

स्कॉट हबर्ड बायबलचे अनेक वाचक मत्तयाच्या शुभवर्तमानाकडे जातात, अगदी उत्सुकतेने आणि निर्धाराने. पण ते पहिल्या सतरा वचनांमध्येच ठेच खातात. आम्ही एका कहाणीची अपेक्षा करत होतो. एक नाट्यमय गोष्ट, देवदूत, मागी लोक, आणि बेथलेहेमेत जन्मलेलं बाळ; […]

देवाची सुज्ञता लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

“अहाहा ! देवाचे ज्ञान व विद्या यांची संपत्ती किती अगाध! त्याचे न्याय किती अतर्क्य आणि त्याचे मार्ग किती अगम्य! (रोम ११:३३). अचानक कोळशाची खाण खचली आणि गावातील मुले मरण पावली तर देवाने किती मोठी चूक […]

अनपेक्षित आणि गैरसोयीसाठी देवाची योजना जॉन ब्लूम

  जेव्हा लूकाने (लूक११:२-४) मधील प्रभूची प्रार्थना नमूद केली तेव्हा त्याने येशूने केलेला त्या प्रार्थनेचा उलगडाही नमूद केला. यावेळी येशूने एक जुना दाखला वापरला. तो ऐकून त्यावेळचे त्याचे  श्रोते आतल्या आत दचकले असतील: “मग त्याने […]