नवम्बर 5, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

ख्रिस्ताची याजकीय कृती

 ह्यू मार्टीन (१८२२-१८८५)

 

ख्रिस्ताचा वधस्तंभ हे  फक्त त्याने शांतपणे सहन केलेले दु:खसहन आहे यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. व अशा अद्भुत व  अत्त्युच्च गौरवाला मर्यादा घालून त्याच्या मरणाचे तत्त्व मी कधीही बोलू शकणार नाही. तो मरण्यापूर्वी त्याचे गौरव करणारे सामर्थ्य नामशेष झाले होते व त्यामुळे तो एक निव्वळ बळी म्हणून मरणाचे साधन ठरला हा विचार मी मान्य करू शकत नाही. कारण यामुळे त्याने देवाला स्वत:चे अर्पण करताना स्वत:चे कृतिशील इच्छा व सामर्थ्य बाजूला ठेवले असा त्याचा अर्थ होईल. वधस्तंभावर त्याचे सर्व कर्तव्य हे शेवटी बंद होऊन फक्त सहनशीलताच बाकी राहिली होती हे मी नाकारतो. मरणे हे त्याचे कर्तव्य होते व ते कर्तव्य त्याने पार पडले. ख्रिस्त मरताना कृती करत होता. मरणे हे त्याचे कर्तव्य होते –त्याचे अधिकृत कर्तव्य. त्यामध्ये अधिकृत कृती होती ती म्हणजे – याजकीय कार्य. त्याने आपला आत्मा सोडून दिला (योहान १९:३०). त्याने स्वत:ला दिले (गलती १:४; २:२०; इफिस ५:२५; १ तीम. २:६; तीम. २:१४). यामध्ये त्याची प्रीती आहे; यामध्ये त्याचे सामर्थ्यही आहे – यामध्ये त्याचा विजय आणि त्याच्या मरणावरील विजयाचे अलौकिक गौरव आहे. देवाला स्वत:चे अर्पण करताना तो कधीही न हरणारा, अजिंक्य, विजयी असा प्रतिनिधी आहे.

वधस्तंभ हाच वैभवशाली आहे: त्यानंतर झालेले पुनरुत्थान व स्वर्गारोहण यामुळे नव्हे तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त – नंतरचा नव्हे तर खिळत असतानाचा ख्रिस्त – हे देवाचे सामर्थ्य आहे, आणि त्यामुळे तो वैभवशाली आहे. हे करताना तो अडखळत नाही. त्याच्या याजकीय मरणाच्या अर्पणामध्ये कार्यालयीन कृती आहे. “त्याने स्वत:स देवाला अर्पिले” (इब्री ९:१४). “त्याने मंडळीवर प्रीती केली व स्वत:ला तिच्यासाठी दिले” (इफिस ५:२५).

प्रायश्चित्ताचे तत्त्व हे ख्रिस्ताच्या मरणामध्ये झालेल्या याजकीय कृतीशिवाय विचारात घेऊ नये. खरे तर त्यामुळे ख्रिस्ताच्या मरणाचे चुकीचे चित्र पुढे केले जाणार नाही. पवित्र शास्त्रामध्ये हे स्पष्ट, लख्ख व वारंवार सांगितले आहे की ख्रिस्ताचे  मरण ही त्याची स्वत:ची कृती होती. जे लोक हे नाकारतात किंवा बायबलमधील हे सत्य विचारात घेत नाहीत ते शास्त्रलेखांचा नाकार करतात.

ह्या सत्याकडे दुर्लक्ष झाल्याचे कारण … ख्रिस्ताने स्वत:ला दिले (इब्री ७:२७)  व तो अर्पण व याजक एकाच वेळी होता ही विधाने आपल्या इतक्या परिचयाची आहेत की, आपल्याला वाटते याचा अर्थ आपल्याला समजलेला आहे. खरे तर आपण या विषयाच्या पृष्ठभागालाच फक्त स्पर्श केलेला असतो.

ह्यामध्ये इतके गहन सत्य आहे की त्याकडे आपण इतर कोणत्याही विषयापेक्षा अधिक, अजोड, अद्वितीय म्हणून लक्ष पुरवायला हवे. ख्रिस्त या मानवाने असे मरण सहन केले की तो दैवी नियमाच्या शापाखाली होता व कल्पना करता येणार नाही असे दु:ख, लज्जा, यातना त्याने सहन केल्या. हे मरण सहन करतानाच तो पापविरहीत होता, आज्ञापालन करीत होता व या मरणामध्ये त्याचा कृतीसह सहभाग होता. हे आपल्या बुद्धीला समजणे शक्य नाही. “शास्त्रलेखांप्रमाणे ख्रिस्त आमच्या पापांबद्दल मरण पावला” (१ करिंथ १५:३) हे आपल्याला समजते असे आपल्याला वाटते. पण याचा खरा अर्थ समजण्यासाठी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली विचारपूर्वक केलेल्या दीर्घकाल मननाची गरज आहे.  हा व्यवहार कालवरीवर झालेल्या मरणाने पूर्ण झाला आहे. ह्या कालवरीवर झालेल्या व्यवहारामध्ये  तर परस्परविरोधी दिसणाऱ्या अशा  दोन वृत्ती त्याने एकत्रित केल्या  त्या म्हणजे दु:ख सहन करणे  आणि स्वत:ला देणे. अशा पराकोटीचे आणि तीव्रतेचे  दु:ख की ज्याने कोणतेही कार्यशाली सामर्थ्य दाबून टाकले असते. तसेच देवाशिवाय कोणाचीही सहनशीलता शमवून टाकली असती. स्वत:ला दिले ही सुद्धा एक कृती आहे पण ती अशा प्रकारची की कोणालाही ती दाबून टाकता आली नाहीच तर ती विजयापलीकडे नेणारी होती; जसे काही त्याच्या कार्यशाली सामर्थ्याचा कोणतेही दु:ख ऱ्हास करू शकत नव्हते. हा ख्रिस्ताच्या मरणामध्ये असलेला विरोधाभास आहे आणि  अनेक जण त्याचा अगदी सहज विचार करतात अशी मला भीती वाटते. तरीही गहन विचार केल्याशिवाय व त्याचे मोल ओळखून त्याची प्रशंसा केल्याशिवाय हे लोक  “वधस्तंभामध्ये गौरव” कसे करू शकतात हे मला दिसत नाही.

ख्रिस्ताच्या मरणाचे वर्णन करताना शास्त्र म्हणते की, “येशूने मोठी  आरोळी मारून आत्मा सोडून दिला” (मार्क १५:३७). असे विधान आपल्या मनावर एकच प्रभाव पाडते की; आपल्या प्रभूने कुरकूर न करता कल्पना करता येणार नाही इतक्या यातना सोसल्या. पापाची असलेली  शिक्षा घेण्यासाठी त्याला मरणाच्या स्वाधीन केले, हे सर्व खरे आहे. पण त्यामुळे असे सूचित होते की, यापूर्वी तो कार्य करीत होता. सगळीकडे जाऊन चांगल्या गोष्टी करत होता. अशा सकारात्मक कर्तव्याचा काळ आता संपला होता. आता फक्त दु:ख सहन करण्याचा वेळ आला होता.

क्रूसाचा असला अर्थ अपुरा आहे. यामुळे क्रूस हा फक्त दु:खसहनाचा देखावा असा मांडला जातो.  क्रूस  हा  त्याच वेळी याजकाच्या कार्याची वेदी आहे,  सामर्थ्यवान कृतीचे राजासन आहे व विजय आणि यशाचा रथ आहे. अशा वैभवशाली व गौरव देणाऱ्या बाबी झाकल्या जातात. त्यामुळे ख्रिस्ताचे कार्य फिके पडले, संपुष्टात आले होते किंवा तात्पुरते थांबले होते असे दाखवले जाते. परंतु शास्त्रलेखानुसार ख्रिस्ताचे आज्ञापालन, त्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन, त्याचे कार्य हे कधीही थांबवता येणार नाही, नामशेष करता येणार नाही. पृथ्वी, नरक, स्वर्ग, जगातील अधिकारी व वक्ते, राजे, याजक, सैनिक, त्याच्यावर तुटून पडलेले गुन्हेगार, यहूदी व विधर्मी, तिच्यातील निर्बुद्ध प्राणी, पृथ्वीतील अरण्यातील वृक्ष, त्याला पाणी न देणारे पृथ्वीतील झरे, कटुमिश्रीत आंब, पृथ्वीच्या  राजासनावरील शापित राजे, त्याची थट्टा करण्यासाठी  त्याला मुगुट घालणारे, त्याला आधार देण्यास नकार देणारे पृथ्वीचे पाये, त्याच्यावर तळपण्यास नकार देणारे अंतराळ, नरकाचे उसळलेले सामर्थ्य व क्रोध, त्याला ग्रासून टाकणारी स्वर्गाची तलवार  आणि स्वर्गाच्या देवाने केलेला त्याचा त्याग – हे कोणीही त्याला थोपवू शकले नाहीत. पृथ्वी, स्वर्ग व नरक यांनी त्याच्याविरुद्ध कट केला असा की स्वर्गाचा सर्वोच्च न्याय  तसेच जग आणि नरक यांचा सर्व अन्याय  त्याच्यावर लादला गेला. ह्याशिवाय दुसरे कोणते  क्रूसाचे गौरव असू शकते? त्याची कृती शमवून टाकण्यासाठी त्याच्या विरुद्ध कट करणाऱ्या या सर्व कृती होत्या. परंतु त्याची  कृती विजयी झाली आणि चिरकाल  टिकून राहिली आहे ! मरताना तो काबीज केला गेला नाही पराजित झाला नाही : जोपर्यंत त्याने स्वत: जीव सोडून दिला नाही तोपर्यंत तो मेला नाही. काय, इम्मान्युएल हा त्याच्या मरणामध्ये  केवळ  सहन करणारा होऊ शकतो? “वधस्तंभाचा उपदेश हा …देवाचे सामर्थ्यच आहे” (१ करिंथ १:१८).

ह्या आध्यात्मिक सत्याचा स्पष्ट पुरावा: या आध्यात्मिक सत्याला पुष्टी देणाऱ्या काही गोष्टी आपण थोडक्यात पाहू या. ख्रिस्ताचे मरण ही त्याची याजकीय कृती होती हे आपल्याला यशया सांगतो: “ त्याने आपला जीव मरणापर्यंत ओतून दिला ( यशया ५३:१२). ह्याच विधानाचा पौल वारंवार वापर करतो: “ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली व आपणाला तिच्याकरता अर्पून दिले ( इफिस ५:२५). आणि ही प्रीती व प्रीतीची सेवा प्रत्येक विश्वासी व्यक्तीला लागू करत तो म्हणतो, “त्याने माझ्यावर प्रीती केली आणि आपणाला माझ्याकरता दिले” (गलती २:२०). तसेच इफिस ५:२ मध्ये तो म्हणतो, “ख्रिस्ताने आम्हांवर प्रीती केली व देवाला सुगंधाचा सुवास असे आम्हांसाठी आपणाला अर्पण व यज्ञ म्हणून दिले. तसेच “स्वत:कडून आमच्या पापाचे शुद्धीकरण केल्यानंतर …” (इब्री १:३). योहान आपल्या स्तुती गीतात म्हणतो, “जो आम्हांवर प्रीती करतो, आणि ज्याने आपल्या रक्ताने आम्हांला आमच्या पापांपासून सोडवले”
(प्रकटी. १:५). प्रभूने वारंवार म्हटले की, “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायला आला नाही, तर सेवा करायला व पुष्कळांच्या खंडणीकरिता आपला जीव द्यायला आला आहे (मत्तय २०:२८). आणि सर्वात खास म्हणजे उत्तम मेंढपाळ म्हणून त्याने स्वत:चे दिलेले अविस्मरणीय उदाहरण: “उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो” (योहान १०:११). हा मुद्दा आपल्या प्रभूला इतका महत्त्वाचा होता की त्याने तो पुन्हा पुन्हा होकारार्थी व नकारार्थी दोन्ही रीतीने स्पष्ट केला: “कोणी तो (माझा जीव)  माझ्यापासून काढून घेत नाही, परंतु मी आपणच होऊन तो देतो” (योहान १०:१८). त्याच्या मरणामध्ये असलेले त्याच्या कृतीचे महत्त्व तो इतक्या प्रभावाने पुढे आणतो की ते तो त्याच्या पुनरुत्थानाच्या कार्यासोबत मांडतो. पित्याची आज्ञा व पित्याची प्रीती व प्रशंसा ह्या एकत्रितपणे तो पुढे करतो. “बाप माझ्यावर प्रीती करतो कारण मी आपला जीव देतो, यासाठी की तो मी परत घ्यावा. कोणी तो माझ्यापासून काढून घेत नाही, परंतु मी आपणच होऊन तो देतो, मला तो देण्याचा अधिकार आहे, आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या बापापासून मिळाली आहे” (योहान १०:१७,१८).  ह्या सर्व विधानांमध्ये स्वत:च्या सामर्थ्याने करणारी कृती किती स्पष्टपणे मांडली आहे! “आणि जसा प्रमुख याजक दर वर्षी दुसऱ्याचे रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसा हा अनेक वेळा स्वत:ला अर्पायला जात नाही; कारण तसे असते तर त्याला जगाच्या स्थापनेपासून पुष्कळदा दु:ख सोसावे लागले असते, पण आता काळाच्या समाप्तीस हा स्वत:च्या यज्ञाने पापे दूर करण्यासाठी एकदाच प्रगट झाला आहे (इब्री ९:२५,२६). देवाच्या बोलण्यात असलेली प्रेरणा निर्भीडपणे येथे सांगत आहे की वधस्तंभावरच्या मरणामध्ये, अर्पणामध्ये दु:खसहन आहे व दु:ख सहनामध्ये अर्पण आहे. या दोन्ही बाबींना न्याय देणारे सत्य हे एकाच गोष्टीमुळे शक्य झाले आहे ती म्हणजे देव –मानव हे येशूमध्ये  एक झाले.

आपण त्याचे मरणे व त्याची कृती याविषयी बोलत आहोत. त्याचे मरणे ही त्याची सर्वात मोठी कृती होती. त्याच्या कृतिशील आज्ञापालनाचा प्रकाश व पुरावा वधस्तंभ फिक्का करण्याऐवजी सर्वाधिक उजाळून टाकतो. मरणाच्या  अंधकाराला व अन्यायाच्या क्रुद्ध मुद्रेला तो उजाळून टाकतो, जोवर अनंतकालिक न्यायाधीशाच्या चेहऱ्यावरची दाट नापसंती नाहीशी होते व पित्याच्या मुद्रेवरचा प्रकाश दिसू लागतो. हे केव्हा झाले  तर जेव्हा “ हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हातात सोपवून देतो” (लूक २३:४६). असे त्याचा आज्ञाधारक पुत्र ज्या क्षणी बोलला तेव्हा. पित्याची इच्छा पूर्ण झाली आहे. ही त्याच्या अनंतकालिक पुत्राने अनंतकालिक आत्म्याद्वारे पूर्ण केली आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा एकमताने आपल्या अमर्याद, आकलन होऊ न शकणाऱ्या कृतीने व शक्तीने ख्रिस्ताचे मरण भरून टाकतात. यामुळेच  वधस्तंभाचा उपदेश हा देवाचे सामर्थ्य आहे.

Previous Article

उगम शोधताना

Next Article

उगम शोधताना

You might be interested in …

सिरियन चर्च आणि रोम

सोळावे शतक प्रकरण ७  भारतातील ख्रिस्ती धर्म व युरोपातील ख्रिस्ती धर्म यात मूलभूत फरक आढळतो. परस्पर विरोधी मतांवरून युरोपातील ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये झगडे झाले तसे भारतात आढळत नाही. कारण भारतात पाश्चात्य मंडळ्यांचा एकच शत्रू होता व […]

येशूचे वंशज – येशूच्या कुटुंबातील कुप्रसिध्द स्त्रिया जॉन ब्लूम

  येशूशी ठळकपणे संबंधित असणाऱ्या स्त्रियांमध्ये एक विचित्र धागा आढळतो. त्या सर्व स्त्रिया कुप्रसिद्ध होत्या असे म्हणू या का? आणि ही कुप्रसिद्धी त्यांच्या लैंगिक लफड्यातून निर्माण झाली होती.  हे ख्रिस्ताबद्दल काय सांगते? बरेच काही. जर […]

एका बळीचा विजय    

कॅमरॉन ब्युटेल (संदर्भ दिलेली वचने कृपया बायबलमधून वाचावीत.) जेव्हा माहिती करून घेण्याचा  उगम फक्त कल्पना  असेल तर चित्र डोळ्यापुढे उभे करण्याचे ते समर्थ शस्त्र ठरते. मी लहान असताना येशू हा बलवान गुंडापुढे असलेला एक कमकुवत […]