लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

प्रकरण २१
अनुवाद : क्रॉसी उर्टेकर
एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.
प्रेषितांची कृत्ये २-५
जणु पाणलोट क्षेत्र. आम्ही नुकतेच फुकुटाओत आलो तेव्हा उत्सुक लोकांचा लोंढा आमच्या मंडळीत लोटला होता. आमची छोटीशी खोली तुडुंब भरलेली असायची त्यामुळे गाण्याच्या निनादाने ती दुमदुमून जायची. आणि एक दिवस अत्यंत देवभीरू तरुण फेलेरीचा रहस्यमय मृत्यू झाला. त्याला लहान बाळ होते. सर्वांना मोठा धक्काच बसला. योनापेचे पाळक जे शिकवायचे ते लोकांच्या चांगलेच लक्षात होते. प्रत्येक विश्वासी व्यक्ती मरणानंतर स्वर्गात जाते याविषयी कोणी चिंताच करू नये. पण काही लोकांना यावर विश्वास बसत नव्हता. फेलेरीच्या घटनेची पडताळणी करणे त्यांना यथायोग्य वाटत होते. म्हणून काही दिवसांनी त्यांनी त्याची कबर उकरून पाहिली. तर त्याच्या शरीराचे अवशेष तर तिथेच होते. ‘म्हणजे ही शिकवण तर शुद्ध लबाडीच आहे!’ ज्यांचा विश्वास बळकट नव्हता, ते भराभर मंडळी सोडून जाऊ लागले आणि मंडळीची संख्या बरीच रोडावली. त्यांना आदर्श वाटणारी ख्रिस्ती मतप्रणाली खोटी वाटू लागली. ते पाळक स्पष्टीकरण देत होते , “माझ्या म्हणण्याचा अर्थ चुकीची लावून, अर्धवट समजून घेऊन तुम्ही गैरसमज करून घेतला आहे. तुम्ही पाहिलेले शव सर्पाने कात टाकावी तसे आहे. ते शरीर तेथे आहे, पण खरा माणूस तर स्वर्गात गेला आहे.”
त्यांच्या मते शरीर व आत्मा अस्थिंमध्ये परस्परात गुंफलेले असतात. म्हणून ते मृताच्या अस्थी दूर कुठे घेऊन जात असत. त्यामुळे या मनुष्याच्या अस्थी जिथल्या तेथे असल्याचे पाहून त्यांचा समज झाला की तो मनुष्य अजून तिथेच आहे.
पण झाले ते बरेच झाले, कारण ख्रिस्ती विश्वासीयांना अधिक स्पष्टता आली. पण हा लढा सोपा नव्हता. वैचारिक गुंतागुंत सुटणे आवश्यक होते. आमची उत्पत्ती ते प्रेषितांची कृत्ये पर्यंतची भाषांतरांची वाटचाल चांगली झाली होती. बायबल खोलीत आता ४८ लोक दाटीवाटीने काम चालू असताना बसत असत. त्यांना खूप आनंद वाटत होता. प्रेषितांच्या एकंदर कार्यात त्यांना पवित्र आत्म्याकडून बळ प्राप्त होत असल्याचे पाहून त्यांची उत्सुकता वाढत होती. त्यांच्याकडून होणाऱ्या चमत्कारांच्या घटनांनी ते स्तंभित होत असत. त्यांचा प्रेषितांविषयीचा आदर क्षणोक्षणी वाढत होता. पेत्र व योहानासारखे शाळा न शिकलेले अत्यंत साधारण लोक त्या धर्मपुढाऱ्यांना धैर्याने निष्प्रभ करीत असल्याचे पाहणे व प्रेषितांशी चाललेली त्यांची स्पर्धा त्यांना फारच रोचक वाटे. प्रेषितांचा सतत होत असलेला विजय पाहून त्यांना स्फुरण चढत असे. कोणाचे एखादे वेळी हजर राहाणे चुकले तर ते दुसऱ्यांकडून ती माहिती घेत. प्रार्थना होत असता भूकंप होणे, पवित्र आत्म्याने भरणे यावरून तर आमच्या बायबल खोलीतील सर्वांची खात्री पटली की ख्रिस्ती लोकांना थेट देवाकडून सामर्थ्य प्राप्त होते, म्हणून ते अजिंक्य असतात. पेत्राच्या कार्याचा वृत्तांत वाचून तर त्यांना तो महाकाय पुरूष वाटू लागला. पेत्राला तुरुंगवास घडूनही देवदूतांनी त्याची कशी सुटका केली ते वाचून ते खूप हसले आणि म्हणाले, “ह्या मनुष्यांमध्ये खरे सामर्थ्य आहे. त्यांच्यापासून आरंभ आहे. या प्रेषितांबाबत आपण घोळ घालू नये.” त्यांचे कार्य थांबवण्याचा दबाव आणत असता गमलिएलाने त्यांना कसे थोपवले ते ऐकून खोलीतील लोक म्हणाले, “तुम्ही प्रेषितांविरुद्ध लढा देता म्हणजे तुम्ही देवाशी लढता.” त्याच्या मते हे प्रेषित राक्षसासारखे प्रबळ व निर्भय होते, तर हे विरोधक त्यांच्यापुढे टोळांसारखे होते. गमलीएलचे सुज्ञ बोल त्यांच्या मते असे होते: कामाचा आरंभ, ‘बेटे’ मनुष्याने केलेला असला तर ते नष्ट होईल पण देवाने कामाचा आरंभ ‘बेटे’ केलेला असला तर ते नष्ट होणार नाही.
मग पुढचे वचन आम्ही अनुवादित केले. ‘त्यांनी प्रेषितांस बोलावून त्यांना मारहाण केली.’ हे ऐकताच आमच्या खोलीत शांतता पसरली.
“काय? मारहाण केली?”
“हो.”
“हे बरोबर नाही. असाच शब्द तेथे नक्की आहे ना?”
“हो. काळ पण हाच आहे.”
त्यांना तुरुंगवास घडणे ठीक आहे ; पण मारहाण ? त्यांचा विश्वासच बसत नव्हता आतापर्यंत त्यांनी शेकडो गुण प्रेषितांना दिले होते तर परूशी व धर्मपुढाऱ्यांना शून्य गुण दिले होते. आता एकदम कलाटणी मिळाली होती. सगळा आनंद जल्लोष थांबला होता. मने अंधारून आली होती. काहीजण निघून जाण्याच्या तयारीत होते तर काहीजण मनाने केव्हाच सोडून गेले होते.
“थांबा, आणखी हे एक वचन पाहा,” मी म्हणालो. आणि मी ५:४१ चे तोंडी भाषांतर केले.
“ते तर त्या नामासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यात आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.”
मला वाटले आता त्यांना सर्व स्पष्ट झाले असेल पण त्यांच्या मते याला काही अर्थ नव्हता. त्यांच्या मते त्यांचे शूर वीर ज्या देवाची सेवा करत होते तो देव हे घडू देणार नव्हता. त्यामुळे त्यांचे हे म्हणणे ते पचनी पाडू शकत नव्हते. त्यांच्या मते मारहाण म्हणजे सन्मान नव्हे, तर लज्जास्पद गोष्ट होती. जर तुम्हाला योग्य ठरवण्यात आले तर पारितोषिक, बक्षीस, बढती मिळते. पण अपमान होण्यात कसला सन्मान? अपात्र व्यक्तींनी चूक केली तर त्यांच्यावर दु:ख येणे मानहानीचे असतेच. शब्दश: भाषांतराऐवजी मला या वचनाचा मथितार्थ चर्चा करून पटवून देणे गरजेचे होते.
मी म्हटले, “ माणूस कोणत्या धातूंनी बनला आहे हे देवच जाणतो, होय ना.” सर्वांनी माना डोलावल्या. “आणि त्याला त्याचे उद्देश माहीत असतात.” पुन्हा माना डोलावल्या. “आणि माणसाला अपमान भोगावा लागण्यामागे देवाचा हेतू असतो. कारण ख्रिस्ताने दु:खसहन केल्यामुळे तो त्याच्याप्रमाणे दु:खसहनाशी समरूप होत असतो. त्यामुळे आपण जे त्याचे शिष्य आहोत, त्या आपल्याला त्याच्यासारखी वागणूक दिली तर तो आपला सन्मानच असणार. देव कधीकधी येशूच्या नामासाठी अपमान सहन करायला आपल्याला पात्र ठरवतो. अशा प्रसंगी आपण अपमान सहन केला नाही तर आपण अपात्र ठरतो.” सर्व माझ्याकडे शून्यात पाहात होते.
संध्याकाळीही प्रार्थना करून आम्ही विखुरलो. पण आज आम्ही अत्यंत कठीण संकल्पना हाताळली होती.
त्यांना हे निराशाजनक वाटले तरी खरे ख्रिस्तीत्व समजणे चांगलेच होते. कठीण समयीच आपले खरे स्वरूप उघड होते. आपण कोणता पवित्रा घेतो ते स्पष्ट होते. प्रेषितांच्या कृत्यांची सुरुवात फार प्रभावी झाली होती, तरी ही कडू गोळी खायची होतीच. प्रेषितांना मारहाण झाली, ख्रिस्ती लोक नेहमीच विजयी होत नसतात. दृश्य स्वरूपात तरी! काही माणसे परतली नाहीत. ते पुढचे वचन ऐकू शकले नाहीत.
“आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्याचे त्यांनी सोडले नाही”
(प्रे कृ ५:४२). प्रेषितांना दु:खसहनाचा तडाखा बसला पण त्यांनी त्यात आनंद मानला कारण त्यामागे गहन मूळारंभ होता.
Social