Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 25, 2020 in जीवन प्रकाश

उगम शोधताना                                                लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

 अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

 

प्रकरण ८वे

लिखित वचनाची जादू

आमच्या घराभोवती लोक गर्दी करू लागले होते. आज नव्या पर्वाची सुरुवात होण्याचा दिवस होता.

लोक खूप उत्साहाने गलका करत होते. अगदी प्रथमच फोलोपा भाषेत छापील पुस्तके प्रत्यक्ष त्यांच्या गावात येऊन पोहोंचली होती. त्यांना ती पाहायची होती. हे त्यांच्या संपूर्ण इतिहासातील नवे पान होते.

आम्ही फोलोपात पाऊल ठेवल्यापासून स्पष्ट सांगत आलो होतो की आम्ही कोण आहोत आणि काय कामासाठी आलो आहोत. त्यांची भाषा प्रथम आम्ही लिहायवाचायला शिकून मग आम्ही त्यांना ती लिहायवाचायला शिकवणार होतो. त्यांच्या दंतकथा, इतिहास व नित्याच्या जीवनातील गोष्टी ध्वनिमुद्रित करणार होतो. तेव्हापासून ते शाळेसारखे काहीतरी करण्यास अत्यंत उत्सुक झाले होते. शाळा ही काय चीज आहे हे त्यांनी प्रत्यक्षात कधीही अनुभवले नव्हते.

या प्रेरणेमागचे कारण आम्हाला माहीत नव्हते. पण शाळेला जाणाऱ्या व नोकरी करून खूप पैसे कमावणाऱ्या त्यांच्या सहनागरिकांकडून बाहेरच्या जगाविषयी त्यांनी बरेच काही ऐकले होते. कारण काहीही असो त्यांचा उत्साह मात्र लक्षणीय होता.

बऱ्याच महिन्यांपासून ते आम्हाला वहीत लिहिताना पाहात होते. त्यांना पुस्तकातून कधी ज्ञान मिळेल असे त्यांना झाले होते. वरचेवर पुस्तके आली का अशी विचारणा ते करत होते. एक दोन वर्षे आम्ही त्यावर काम करत होतो. गावातील मोमाको व त्याची पत्नी नुमायमे यांना घेऊन आम्ही उकारम्पा येथे कृतिसत्रास गेलो व फोलोपा कथांचे संकलन केले. चार आठवड्याच्या सत्राच्या मध्यावर आमचा मुलगा ब्रूस याचा जन्म झाला. त्यामुळे कॅरलचा फक्त एक आठवडा बुडला. पण तो तिने भरून काढला व प्राथमिक पुस्तक तयार झाले. कॅरलने चित्रे काढून मुखपृष्ठ तयार केले. ब्रूसने भरपूर झोप काढून आम्हाला मोलाचे सहाय्य केले.

प्राथमिक पुस्तकात ६९ धडे होते. धड्यात शिकवलेल्या शब्दांची ओळख चित्रांनी केली होती. पुस्तक १२० पानांचे होते. पुस्तक वही व पेन्सिलसकट किंमत दोन डॉलर होती. प्रथम २५ मुलांच्या गटावर प्रात्यक्षिक घ्यायचे होते. म्हणून आता ती पुस्तके गावात आणली होती.

आमचे मदतनीस हेलिकॉप्टरमधून उतरताच सांगत सुटले की आम्ही पुस्तके आणली आहेत. तेथून आमच्या घरापर्यंत सामान व पुस्तके नेईपर्यंत लोकांना दम नव्हता.

“कुठे आहेत पुस्तके? आम्हाला ती पाहायची आहेत.” माझ्या मनात आले, प्रत्यक्ष पाहिल्यावर हे इतकाच उत्साह दाखवतील का? एवढ्यात मोमाको व नुमायमे आले व म्हणू लागले, “चला त्यांना आपण पुस्तके दाखवू. त्यांना पाहायची आहेत.”

मी तर उष्णतेत दूरचा प्रवास करून दमलो होतो. एवढे दिवसात बंद असल्याने घाण झालेले घर स्वच्छ करून सामान नीट लावून स्थिरस्थावर व्हायचे होते. पुष्कळ काम पडले होते. हे सर्व आवरल्याशिवाय काहीही करायची माझी इच्छा नव्हती. तरी त्यांनी आग्रह धरला, तुम्ही शाळा कधी सुरू करणार? मी मोठ्याने जाहीर केले; “उद्या. पण एक वाईट बातमी आहे, फक्त १३ कुटंबांतील प्रत्येकी दोन अशा २६ मुलांना प्रवेश मिळेल. कोणाला पाठवायचे ते गावाचे पुढारी ठरवतील. हे सर्व फुकट मिळणार नाही. वही, पुस्तक पेन्सिलसाठी प्रत्येकी दोन डॉलर खर्च द्यावा लागेल.”

एवढे सारे ऐकूनही त्यांचा उत्साह जराही मावळला नव्हता. त्यांना पुस्तके पाहायची होती. मी पेटारा उघडला. नमुन्याचे पुस्तक उघडून दाखवले व घरात गेलो. तेही गेले व त्याची प्रदीर्घ चर्चा सुरू झाली सुमारे तीन तासांनी कोण वर्गाला येणार ते पक्के करून पुढारी मला भेटायला आले. ते सांगतील तशी मी कुटुंबाप्रमाणे यादी लिहून घेतली. मग मी उद्या येताना पैसे घेऊन या असे सांगितले. पैसे त्या देशात फार अवघड गोष्ट असते. त्यांना दुसऱ्या गावी जाऊन शिकार विकून पैसे आणावे लागतात. त्यांनी पटकन पैसेही भरले.

कॅरल व मी पुस्तके घेऊन आलो व  ती त्यांना दिली. तरी बाहेर गर्दी रेंगाळली होती. पुस्तक चाळत ते मोठ्याने ओरडत होते ‘आत्ताच घ्या’ त्यांना मी लागलीच शाळा सुरू करायला हवी होती. मला त्यांना सांगणे भाग पडले की, “नाही. शाळा उद्या सकाळी भरेल.” हे ऐकून त्यांना आनंद वाटला नाही. पण तरी घरी जायला त्यांनी तास दीड तास लावला. आम्ही घरकाम आवरले. मच्छरदाणी लावली. मेल्यासारखे बिछान्यावर पडलो. मुले तर केव्हाच गाढ झोपली होती.

पहाटेच कॅरलने मला ढुसणी मारून म्हटले, “नील, ऊठ, लोकांचा आपल्या घराभोवती वेढा पडलाय.”

मी मच्छरदाणीतून बाहेर पडून खिडकीबाहेर पाहिले तर काखेत पुस्तक आणि केसात पेन्सिल अडकवून सारा जमाव बाहेर उभा होता. त्यांना कळले होते की आम्ही उठलो आहोत. पण आवाज करू नका असे एकमेकांना सांगण्याचाच आवाज पूर्वीपेक्षा अधिक वाढला होता. ते म्हणत होते “श्शूssss गोरा माणूस झोपलाय, आवाज करू नका.”

मी बाहेर आलो व विचारले, “काय चाललंय?”

ते म्हणाले, “काही नाही. तुम्ही झोपा. तुमचं सर्व आवरल्यावर या, आम्ही इथंच आहोत.”

अजून तर सहा पण वाजले नव्हते. आम्ही नित्याची सकाळची कामे करू लागलो. बाहेरचा आवाज वाढतच चालला होता. लोकांचा जमावही वाढतच होता. असा हा एक सोहळाच होता.

न्याहारी होऊन सुरुवात करीपर्यंत आमचे पोर्च १०० लोकांच्या गर्दीने जाम झाले होते. मला बाहेर वाट काढत घराबाहेर पडून बायबल हाऊसकडे जाणेही मुश्किल झाले होते. माझ्या तुटपुंजा फोलोपा ज्ञानाने यांना मी कसे लिहायवाचायला शिकवावे याचा मी विचार करत होतो.

पण इतके लोक माझ्या दारापाशी का जमले आहेत ते मला समजेना. मी मोठ्याने म्हटले, “फक्त २६.”

ते म्हणाले, “चालेल. आम्हाला फक्त पाहायचेय.” कसातरी गर्दीतून वाट काढत जात होतो तर मोठा गोंधळ उडाला. घामाघूम झालेला एक माणूस सर्वांना ढोपरत पुढे सरसावला होता. एक लहान मुलगा त्याच्यामागून येत होता. तो एकदम माझ्या चेहऱ्याला तीन इंचांच्या अंतरावर भिडून म्हणाला, “तुम्ही हे काय केले? तुम्ही सर्व कुटंबे न मोजता पुस्तके कशी वाटली? आम्ही याच गावाचा भाग होतो, आणि तुम्ही आम्हाला कसे गाळले? आमच्या घराण्यातून मी शेवटचा आहे आणि हा माझा मुलगा आहे. त्याला तुम्ही प्रवेश दिलाच पाहिजे.”

मी इतर घराण्यांच्या पुढाऱ्यांना विचारले, “हे खरे आहे का?”  ते म्हणाले, “बरोबर आहे. त्याचे छोटेसे घराणे शाबूत आहे.”

सर्वांना प्रश्न पडला आता मी काय करतो. मी आधीच २५ चा २६आकडा केला होता. मी कॅरलला विचारले, “आणखी एखाद्या पुस्तकाची प्रत आहे का?”  तिचा होकार मिळाला.

तो लहान मुलगा १२ – १३ वर्षांचा असेल. त्या क्षणाचा माझा निर्णय जणू त्याचे सार्वकालिक भविष्य ठरवणार असल्याचे समजून अत्यंत आशाळभूतपणे तो काकुळतीने माझ्याकडे पाहात होता. विद्यार्थ्यासारखे दिसावे म्हणून तो तसाच तयार होऊन हातात कसलासा कागद घेऊन आला होता. त्याच्या वडिलांना मी दोन डॉलर पुस्तक वही व पेनसाठी भरायला सांगताच त्याने ते तत्काळ काढून दिले. कॅरलने त्याला सर्व साहित्य दिले आणि आम्ही पुढे व मागून हा जमाव असे बायबल खोलीकडे निघालो.

आमच्याकडे त्या काळात फक्त फळा आणि झाडांपासून बनवलेली ओबडधोबड बाके होती. आमच्या समोर असे २७ विद्वान बसले होते, की ज्यांना पुस्तक कसे धरावे हे देखील माहीत नव्हते. पेन्सिलने काय करायचे हे देखील अनेकांना माहीत नव्हते. त्या पेन्सिलींना टोक केलेले नव्हते आणि टोक कसे करावे हे देखील त्यांना माहीत नव्हते. दाराखिडक्यांपाशी रेंगाळत डोकावून पाहाणारे १०० लोक तरी असतील. आता पुढे काय होणार हे पाहण्याची त्यांना आतुरता लागली होती.

मी अगदी मनापासून माझ्या मर्यादित फोलोपा ज्ञानाने पहिला धडा शिकवायला घेतला. मी ई मुळाक्षर दाखवून डिकि (बाण) कडे बोट दाखवले. मग दुसऱ्या शब्दातील ई मुळाक्षर दाखवून डिका(याम ) शब्द दाखवला. उत्तम प्रकारे फोलोपा भाषेत मी समजावत होतो. माझी प्रत्येक हलचाल ते एकाग्रतेने व बारकाईने टिपत होते. वर्ग अध्ययन ही नवीन संकल्पना होती. अध्यापनपद्धत पण त्यांच्यासाठी नवीन होती. त्यांना अपेक्षित होते की आपल्याला काही जादू पाहायला मिळेल. ते श्वास रोखून बारकाईने निरीक्षण करीत बसले होते. त्या चार भिंतीत जादू होणारच होती.

माझ्यासाठी तर हे काम माझा कीस काढणारे होते. पहिल्याच धड्यासाठी मी भरपूर शक्ती आटवली होती. मी दहा तरी वेळा निरनिराळ्या पद्धतीने पहिलाच धडा शिकवला. ते सर्व ओरडून मोठमोठयाने म्हणत होते,’ ई ‘ डिकी, डिका’. मोठ्याने बोलून त्यांना ते समजणार होते की काय कोण जाणे. अखेर दोन तासांनंतर मीच प्रचंड थकलो व म्हणालो, “बस्स. पहिला धडा झाला. आजची शाळा संपली.”

ते सगळे माझ्याकडे बघतच राहिले.

एक धिटुकला उठला आणि त्वेषाने म्हणाला, “तुम्ही वाईट आहात.”

“का?”

“दुसरीकडे दिवसभर शाळा घेतात. आम्हाला पण दिवसभर शाळा पाहिजे.”

“ठीक आहे. दुसरीकडे दिवसभर शाळा भरत असेल. पण येथे आज एवढे पुरे. उद्या आपण दुसरा धडा शिकू. तुम्हाला आणखी शिकायचे तर बाहेर जा, चित्रे पाहा आणि पुन्हा पुन्हा वाचा.” मी तर जाम थकलो होतो आणि आणखी पुढे शिकवायची मला तर ताकद नव्हती.

हे लोक ६९ धडे संपेपर्यंत रोज वेळेवर येत होते. काही लोकांना काही जमत नव्हते तर काहींना वाटत होते की पुस्तक नीट धरले की जादू होते आणि तुम्हाला ते ओळखता येते. त्यातील त्या छोट्या मुलासकट ४-५ जण वाचायला शिकले.

गाव आश्चर्याने मंत्रमुग्ध झाले. काहींना वाटले की ही फार प्रभावी जादू आहे. आम्ही मान्य केले की ही नवलाची गोष्ट होती. जे वाचायला शिकले ते पुढे फोलोपातील आमच्या तांत्रिक चुका आम्हाला समजावून सांगू लागले. सहकार्याची कार्यपद्धत फोलोपा लिखाणात आम्हाला फारच सहाय्यक ठरली.

त्यानंतर जे वर्गाला आले नव्हते ते ज्यांना वाचायला येऊ लागले, त्यांना विनवू लागले की, “चला, आम्हाला ते वाचनाचे रहस्य सांगा व ही शक्ती द्या.” मग ते एकमेकांना शिकवू लागले.

एक मनुष्य तर स्वत: शिकवत होता. त्याचे नाव होते, अविआमे अली. पहिल्यापासूनच अविआमे अली आम्हाला पंखाखाली घेऊन आम्हाला गोंधळून टाकणाऱ्या त्यांच्या संस्कृतीतील गोष्टींचे स्पष्टीकरण करीत असे. आमचा तोही एक जिगरी दोस्त होता. तो या वर्गासाठी निवडला जाऊन व विश्वासूपणे सर्व वर्गांना उपस्थित राहूनही अ की ठ शिकला नव्हता. त्यामुळे तो खूप निराश झाला होता. तो ३५ वर्षांचा असेल. त्याला पोलिओसारखाच काही आजार असल्याने त्याचे पाय लाकडासारखे बारीक व ताठ असून कमरेपासून वर तो तगडा होता. पण त्याला काठी घेऊन चालावे लागत होते. आम्ही आमचे घर बांधत असता तो म्हणाला होता, “हे पाहा मी पांगळा आहे. मी काही कष्टाची कामे करू शकणार नाही. पण तुमच्या घरासाठी खड्डे खणून देईन.” आणि सुमारे १४ फूट खोल खणण्याचे त्याने काम केले.

आपल्याला वाचायला यावे असे त्याला मनोमन वाटत होते. आम्ही जेव्हा उत्पत्तीचे पुस्तक भाषांतर करून सुट्टीला गेलो तेव्हा पाच प्रती त्या वाचू शकणाऱ्या लोकांजवळ मी ठेऊन गेलो. त्याने त्यांच्याकडून एक प्रत मिळवली आणि तो प्राथमिक पुस्तक आणि उत्पत्तीचे पुस्तक एकसाथ वाचू लागला. त्या लोकांना हाताशी धरून तो बागेत, झुडपात मासेमारी करताना, शिकारीला गेला असता ते वाचायला शिकू लागला. ती पुस्तके त्याची सततीची सोबती झाली होती आणि परत परत तो ते वाचत होता.

एक वर्षाने आम्ही सुट्टीवरून परतलो तेव्हा काम करत असता कॅरल मला म्हणाली, “नील, कसला रे हा आवाज येतोय?” दाराबाहेर डोकावून पाहात ती आनंदाने ओरडली, “अरे, पोर्चमध्ये अविआमे अली उत्पत्तीचं पुस्तक वाचतोय वाटतं.”  मी म्हणालो, “शक्यच नाही त्याला वाचताच येत नाही.”  पण मी स्वत: जाऊन पाहिले तेव्हा माझी खात्री पटली. आम्ही जाऊन त्याला घेरले.

“अविआमे अली, तुला वाचतां येतंय ?”

मग अतिहर्षाने त्याने आम्हाला त्याची कथा ऐकवली.

त्या दिवशी आमच्या पोर्चमधला अविआमेचा प्रकाश गावभर पसरला. आणि ते एकमेकांना वाचायला शिकवू लागले.

आणखीही प्रकाश गावकऱ्यांवर पडला की जादू नव्हे तर निर्धार व परिश्रम ही लिखित वचनाचे सामर्थ्य प्राप्त करण्याची गुरुकिल्ली आहे.